आम्ही तीन मैत्रिणींनी मोठ्ठी सुट्टी घेऊन परदेशात कुठेतरी जायचे ठरवले. पण नेमकं कुठे जायचं ते ठरवणं जरा जिकिरीचं होतं.
श्रीलंका ?
‘‘नको, त्यापेक्षा केरळ बरं !’’
’’अमेरिका?’’
’’छे, too commercial!''
’’मग फ्रान्स?’’
’’अजिबात नाही, उगाचच महागडं.’’
architecture, culinary असं करत जवळजवळ १० देशांचे नाव कटऑफ झाले. आम्ही तिघी जरी शाळेपासून एकत्र असलो तरी, आवडी-छंद वेगळे, एकीला साहित्याची आवड, दुसरी स्वत: पेंटर आणि मी बागा-निसर्गात रमणारी, त्यामुळे आम्ही जाऊ तो देश भौगोलिक, ऐतिहासिक, प्राकृतिक, सांस्कृतिक, कला असा सर्व गुणांनी संपन्न असायला हवा होता आणि हो, खिशाला परवडणारा देखील! आणि मग आम्ही सर्वानुमते निवडला, स्पेन! युरोपमध्ये असूनही खिशाला परवडणारा! स्पेनमधेच अनेक स्पेन आहे, असं म्हणतात.
मग कोणते शहर बघावे, त्यातही कोणती ठिकाणे बघावी, राहायचं कुठे, प्रवास कसा करायचा अशा अनेक गोष्टींचे संशोधन केले, त्यासाठी अनेकांशी चर्चा केली, पुस्तकं वाचली. सगळं काही स्वत:च करायचं, हा अट्टाहास होता जरासा, तसंही ऑनलाईन तर सगळं मिळतंच! खूप वर्षांपूर्वी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्पेनने एक जाहिरात चालवली होती. 'spain is different'
युरोपात असूनही युरोपपेक्षा वेगळा. ते खरंही आहे आणि याला कारणीभूत आहे याचा भूगोल आणि इतिहास. स्पेनला ८००० कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. दक्षिण आणि पूर्वेकडे Mediterranean sea म्हणजेच भूमध्य सागर, आग्नेयेला Atlantic महासागर. स्पेन युरोपचा एकमेव देश आहे जो आफ्रिकेच्या एवढा जवळ आहे. त्यांच्यामध्ये फक्त ८ कि.मी. अंतर असून, त्या दोहोंच्या मध्ये strait of Gibraltar आहे. पूर्वेला pyreness पर्वतरांगा आहेत, ज्या फ्रान्स आणि स्पेनला विभागतात.
आफ्रिकेच्या एवढ्या जवळ असल्यामुळे याच्या इतिहासाला वेगळी कलाटणी मिळाली. आफ्रिकेच्या एवढ्या जवळ असल्याने तिथून ‘मूर’ चक्क पोहत येऊ शकले. त्यांनी दक्षिण भाग ताब्यात घेतला आणि सुमारे ८०० वर्ष राज्य केलं. त्या आधी ग्रीक-रोमन लोक आलेले होतेच. आफ्रिकेतून कारथेजिनियनही आले. प्रत्येकाने स्वत:बरोबर स्वत:च्या अनेक गोष्टी आणल्या. मूर लोकांनी इस्लाम धर्म तर आणलाच शिवाय भव्य वास्तू बांधल्या, युरोपात नसलेली अनेक पिके, खजूर, संत्री, केशर, तांदूळ आणले. स्पेनमध्ये भात पिकवायला पुरेसा ओलावा नाही. रोमन लोकांनी Irrigation systems विकसित केल्याने तेही शक्य झालं.
जसे लोक आले, तसे देशाचे नाव बदलत गेले. उत्तर आफ्रिकेतून आलेल्या लोकांनी ’आईबेरिया’ असं नाव दिलं. आईबर म्हणजे नद्यांची भूमी. ग्रीक लोक पूर्वेकडून आले. त्यांनी नाव दिलं ‘हेसपेरिया’, सूर्यास्ताची भूमी, (हेच त्यांचे पश्चिमेचे टोक!)
कॅर्थेनिनियन लोकांनी नाव दिलं, ’इसपानिया’, म्हणजे सशांची भूमी. रोमन लोकांनी हेच नाव उचललं आणि लॅटिनमध्ये ’हिसपानिया’ केलं. पुढे अपभ्रंश होत एस्पाना झालं आणि आताचं स्पेन हे नाव म्हणजे ‘सशांची भूमी’ कायम राहिलं!
स्पेन हा मोठा साम्राज्यवादी देश होता. दक्षिण अमेरिकेतले असंख्य देश त्यांनी अगदी क्रूर पद्धतीने बळकावले. मूळ इटलीच्या कोलंबसला फर्डिनेंड आणि इसाबेला यांचा राजाश्रयच मिळाला. इंडिजच्या शोधात तो निघाला आणि पोहोचला दक्षिण अमेरिकेला. तो जेवढे नवीन देश शोधेल त्यांची governorship आणि एक दशांश महसूल द्यायचे त्याला आश्वासन देण्यात आले होते. त्याशिवाय Admiral of the Ocean ही पदवी देखील बहाल करण्यात येईल, असे डील झाले होते. खरंतर, एवढे मान्य करत असताना कोलंबस एवढ्या लांबून परत येईल, याची शाश्वती नव्हती. पण तो परत आला. एवढे देश, एवढी बेटं शोधली, स्पेनने तर त्यांची लूट करून उच्छादच मांडला. एवढी संपत्ती, समृद्धी झाल्याने तो त्यांचा सुवर्णकाळ होता, असे म्हणायला हरकत नाही. दक्षिण अमेरिका तर स्पेनच्या ताब्यात आल्या. जगात इंग्रजीनंतर स्पॅनिश भाषाच सर्वात जास्त बोलली जाते, यात काही नवल नाही. राजाने कोलंबसला मान्य केल्यापैकी किती दिले माहीत नाही पण, १८८८ साली कोलंबसच्या स्मरणार्थ बार्सिलोनाच्या बंदरावर एक भव्य स्मारक उभारलं. साठ मीटर उंचीचं हे स्मारक आणि त्यावर सागराकडे बोट दाखवत उभा असलेला कोलंबसचा मोठा पुतळा.

या पुतळ्याचीही एक गंमत आहे. कोलंबस नेमके कुठे बोट दाखवतोय याबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जातात. काही वादही आहेत. १२ ऑक्टोबर १४९२ रोजी कोलंबस अमेरिकेला पोहोचला, आणि स्पेनची भरभराट सुरू झाली! त्यामुळे १२ ऑक्टोबर हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. काही गटांचा याला विरोध आहे. क्रूर साम्राज्यवादाला साजरं करणं त्यांना मान्य नाही, काहीतर तो पुतळा काढून टाकावा, या टोकाच्या मताचेही आहेत.
दक्षिण अमेरिकेच्या शोधाने स्पेनमध्ये चांदी आली शिवाय अन्नात आणखीन भर पडली. बटाटे, मका, कोको, आले, यांनी इथली खाद्यसंस्कृती आणखी बदलली, त्यात वैविध्य आले.
आपल्याकडे जसे काश्मीर ते कन्याकुमारी अन्न बदलत जातं तसंच इथेही आहे. कच्च्या भाज्यांचे सॅलेड वजा सूप गाजपॉचो, चटपटीत तपास, बोरविता इसपॅनॅनो म्हणजे स्पॅनिश ऑमलेट, पाया म्हणजे पसरट कढईतला भाताचा प्रकार. तर्हे-तर्हेचे मासे आणि दाट चॉकलेटच्या सॉसमध्ये बुडवून खायचे चूरसे इथले मुख्य प्रकार. जोडीला भरपूर ऑलिव्ह असतातच. माशांमधली विविधता तर भरपूर. कारण एका बाजूला गार पाण्याचे अटलांटिक आणि त्यातले ऑक्टोपस आणि कॉड फिश तर उन मॅडेचेरेनियन सीचे शिंपले! पोर्क, हॅमचे खारवलेले मांस इथे येणारे पर्यटक आवर्जून नेतातच.

ऑलिव्ह ऑईल उत्पादनात स्पेनचा पहिला क्रमांक आहे. तसेच वाईन निर्मितीतही हा पहिल्या चार देशांपैकी आहे. रुचकर अन्न, मुबलक वाईन आणि योग्य हवामान! त्यामुळे राष्ट्रीय छंद म्हणजे निवांत खात-पित गप्पा मारत बसणे, हसणे, खिदळणे! पर्यटकांसारखेच स्थानिक लोकही प्लाझामध्ये निवांत बसलेले असतात. निवांतपणाचा कहर म्हणजे Siesta!! दुपारची हमखास झोप. अगदी सरकारी कार्यालयेसुद्धा जेवायच्या सुट्टीबरोबर झोपायची सुट्टी घेऊन बंद! निसर्गाने आणखी एक गंमत बहाल केली आहे, इथे उन्हाळ्यात सूर्यास्त रात्री दहा वाजता होतो! आम्ही रात्रीच्या नऊ वाजतादेखील गॉगल लावून फिरत होतो.
गप्पांच्या व्यतिरिक्त सर्वात मोठा छंद म्हणजे फूटबॉल. जगातले सर्वात मोठे आणि श्रीमंत फूटबॉल क्लब्स इथेच आहेत. Barcelona, Real Madrid Valencia आणि फूटबॉल इथला धर्म आहे, स्टेडियम देवस्थान आणि मेस्सी, रोनाल्डिनो इथले देव.
इथल्या सुवर्णकाळात कला, नृत्य, संगीत, वास्तुकला खूप फोफावले. Flamenco या विशिष्ट प्रकारच्या टाळ्या, संगीत आणि गिटारच्या तालावरच्या नृत्याला UNESCOने विशेष दर्जा दिला आहे. इथल्या असंख्य स्थळांना, कलाकृतींना, वास्तूंना हा दर्जा प्राप्त आहे. बार्सिलोनात गाउडी या प्रसिद्ध वास्तुविशारदानेे बांधलेल्या आणि अजूनही बांधकाम चालू असलेल्या Sadrida Familia या चर्चचाही समावेश आहे.
स्पॅनिश लोक आपल्यासारखेच उत्सव प्रिय. बुल फाइटिंग हा विवादास्पद खेळ. काही ठिकाणी यावर बंदी आहे, तर काही ठिकाणी अजूनही तेवढ्याच जोमाने चालू. टोमॅटिनो हा तासभर चालणारा टोमॅटोची रंगपंचमी. असलेला खेळ. अनेक जत्रा, अनेक उत्सव येथे साजरे होतात. त्यामुळे एवढ्या देशातून स्पेन निवडले. त्याचा आनंद होताच, त्याचबरोबर इथल्या माणसांना भेटूनही झाला. इथे फक्त २५ टक्के लोक इंग्लिश बोलू शकतात. त्यामुळे भाषेची पंचाईत होती. तरीपण हातवारे करून, हावभावाने त्यांच्याशी मैत्री करता आली. रस्ता विसरलो आणि समोरचा माणूस समजावू शकला नाही म्हणून तो चक्क सरळ हात धरून आम्हाला पोचवायला आला, असेही घडले.
चला मग.. पुढल्या भागात अशाच आणखी गंमती पाहूयात थेट स्पेनमधून!
- अंजना देवस्थळे