#ओवी लाईव्ह - नारीशक्ती

    18-Jun-2017   
Total Views |


“खरं खरं सांग रजूताई, तू मुद्दाम मी दिलेला कंपास वापरत नाहीस ना?”, रघु चिडून म्हणाला.

“नाही रे! तू दिलेला कंपास लहान आहे म्हणून वापरत नाही.”, रजू समजावणीच्या स्वरात म्हणाली.

“खोटं बोलतेयस तू, मला माहित आहे. तू मुद्दाम वापरत नाहीस.”, रघु अजूनच तावातावाने म्हणाला.

“काहीतरीच काय! उगीच मुलींसारखे एकच एक लावून धरू नकोस!”, रजू वैतागून म्हणाली.

“बघ ग आजी! ही कशी मला ‘बायकी’ म्हणते!”, रघूने आजीकडे तक्रार नेली.

“आज सकाळी Father’s day म्हणून बाबाला ‘आईसारखे प्रेम करणाऱ्या बाबाला’ शुभेच्छा दिल्यास ते! तेंव्हा नाही वाटते ‘बायकी गुण’ कमीपणाचा वाटला! हं?”, नीला आजी डोळे मिचकावून म्हणाली.

“ते वेगळे ग आजी. हे ‘बायकी’ म्हणणे म्हणजे एकदम घोर insult आहे!”, रघु म्हणाला.


रघू चांगलाच चिडलेला पाहून, नीला आजीने गीतेचा आधार घेतला. “तुला एक गंमत सांगते. ये ग रजू, तू पण बस. काय आहे, गीतेत कृष्णाने आपल्या वेगवेगळ्या विभूती सांगितल्या आहेत. जसे, पर्वतांमध्ये मी हिमालय आहे, पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे, दैत्यांमधील प्रल्हाद मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे तर यादवांमध्ये मी कृष्ण आहे! तसेच स्त्रियांमध्ये मी कोण आहे हे देखील सांगितले आहे.

“कृष्ण म्हणतो – कीर्ति, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा, या सात स्त्रीया मी आहे. हे सात स्त्री गुण ज्ञानोबा उलगडून सांगतांना म्हणतात - सत्कर्माच्या वेलीवर नित्य उमलणारे कीर्तीचे फुल मी आहे. औदार्यपूर्ण अशी संपत्ती ती श्री मी आहे. न्यायाच्या सिंहासनावर बसून जी विचाराने चालते ती वाचा मी आहे. जिच्यामुळे रूप पाहून नाम आठवते, ती स्मृती मी आहे. स्वहिताला जी अनुकूल आहे, जी श्रेयस्कर आहे, ती मेधा अथवा बुद्धी मी आहे. संकटाला तोंड देण्याचे धैर्य जी देते ती धृती मी आहे. तर अपराधांना विशाल मनाने क्षमा करणारी क्षमावृत्ती मी आहे.

“हे सगळे ‘बायकी’ गुणच आहेत की, नाही का? पण जो पुरुष हे गुण धारण करतो तो ...?”

“तोच श्रीकृष्ण होय!”, रघु हसत म्हणाला.

आता स्त्री गणांच्या पैकी | माझिया विभूती सात आणिकी |


तिया ऐक कवतिकी | सांगिजतील || १०.२७५ ||


तरी नित्य नवी जे कीर्ति | अर्जुना ते माझी मूर्ती |


आणि औदार्येसी जे संपत्ती | तेही मीची जाणे || १०.२७६ ||


आणि ते गा मी वाचा | जे सुखासनी न्यायाच्या |


आरुढोनि विवेकाचा | मार्गी चाले || १०.२७७ ||


देखीलेनी पदार्थे | जे आठवूनी दे माते |


ते स्मृतीही एथे | त्रिशुद्धी मी || १०.२७८ ||


पै स्वहिता अनुयायिनी | मेधा ती मी इये जनी |


धृती मी त्रिभुवनी | क्षमा ते मी || १०.२७९ ||


एवं नारीमाझारी | या सातही शक्ती मी अवधारी |


ऐसे संसारगजकेसरी | म्हणता जाहला || १०.२८० ||


 

दीपाली पाटवदकर 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121