साधारणत: साडेचार लाख विद्यार्थी दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात. त्यातले ०.२ टक्के विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडले जातात. म्हणजे हजार विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थी असं हे समीकरण आहे. लाखो विद्यार्थी आयएएस, आयपीएस बनण्याचं स्वप्नं उराशी बाळगतात. हजारातले दोनजणच यशस्वी होतात. उरलेले अयशस्वी ठरतात. अशाच अयशस्वी विद्यार्थ्यांपैकी तो एक. मात्र, हे अपयश जिव्हारी न लावता त्याला त्याने सकारात्मकदृष्ट्या स्वीकारले. स्वत:ची बलस्थाने, कच्चे दुवे शोधले. आव्हान आणि भविष्यातील संधीचा वेध घेतला. स्वत:मध्ये बदल करत शून्यातून स्वत:चं उद्योजकीय विश्व निर्माण केलं. हजारो विद्यार्थ्यांना संगणकीय कौशल्य शिकविणारी संस्था उभी केली. हा तरुण म्हणजे आयसीआयटी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक संतोष खडतरे होय.
सातार्यातील खटाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. या परिसरातील पडळ या गावचे खडतरे कुटुंब. या कुटुंबात संतोष खडतरेंचा जन्मझाला. आईवडील, ३ बहिणी आणि २ भाऊ असं हे सातजणांचं कुटुंब. मुंबईतल्या नाना चौकामध्ये संतोषचे आई-बाबा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत. जोगेश्वरी या मुंबईच्या उपनगरात एका १० बाय १०च्या खोलीत हे सगळे राहत. संतोषचं सातवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालं. माध्यमिक शिक्षणासाठी संतोषला दापोलीच्या हॉस्टेलला पाठविण्यात आलं. संघाच्या विचारसरणीने भारावलेल्या या हॉस्टेलमुळे संतोषमध्ये आमूलाग्र बदल झाले. इथेच त्याला वाचनाची, व्याख्यानाची गोडी लागली. आठवी ते दहावीची ही तीन वर्षे संतोषला आयुष्याचे चांगले धडे देऊन गेली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ महाविद्यालयात पूर्ण केले. १९९८ साली संतोष वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला.
दरम्यानच्या काळात संगणकाचा बोलबाला होता. संगणकाचे धडे गिरविण्यासाठी संतोषने कॉलेजमध्ये असतानाच सुरुवात केली. मात्र, दापोलीमध्ये शिकत असताना तिथल्या वातावरणाने देशासाठी काहीतरी सेवा करायची हे मनाने ठरविले होते. देशसेवा करण्याचा उत्तमपर्याय म्हणजे प्रशासकीय सेवा. तेव्हा संतोषने आयएएस अधिकारी होण्याचे ठरविले. त्यासाठी १९९८ ते २००० अशी दोन वर्षे त्याने पूर्ण वेळ झपाटून अभ्यास केला. मात्र, त्यात यश मिळालं नाही. दोन वर्षे इतरांसाठी वाया गेली होती, मात्र या दोन वर्षांत कोणत्याही गोष्टीचा तौलनिक, तार्किकदृष्ट्या अभ्यास कसा करावा याचे धडे संतोषने गिरविले होते, जे पुढील आयुष्यासाठी उपयोगी ठरणार होते. घराला हातभार म्हणून संतोषने उषा कॉम्प्युटर्समध्ये ४०० रुपये महिना पगार अशी नोकरी केली. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर तो सेंटर मॅनेजर झाला. आता पगार होता तब्बल आठ हजार रुपये. मात्र, नोकरीत मन रमत नव्हतं. स्वत:चं वेगळं काहीतरी सुरू करावं हे मनाने ठरवलं. मात्र, सोन्यासारख्या नोकरीला लाथाडणं संतोषच्या घरच्यांना पसंत नव्हतं. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता संतोषने एक बंद पडलेले कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट भागीदारीत चालविण्यास घेतले. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ४८ हजार रुपये त्याने कमावले. आपल्या इन्स्टिट्यूटची ही भरभराट पाहून मालकाचे डोळे दिपले आणि त्याने संतोषलाच बाजूला केले.
आता असं भागीदारीत व्यवसाय सुरू न करता स्वत:चंच सुरू करायचं हे संतोषने ठरवलं. याचवेळी त्याला कळलं की, खालिद नावाच्या फर्निचर व्यापार्याचं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे जे नीट चालत नाही. संतोषने ते इन्स्टिट्यूट चालविण्याची इच्छा खालिदभाईकडे व्यक्त केली. महिना १६ हजार रुपये भाडेतत्त्वावर खालिदभाईने हे इन्स्टिट्यूट चालविण्यास दिले. इथेच आयसीआयटी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा जन्मझाला. मुख्य रस्त्यापासून हे इन्स्टिट्यूट आत असल्याने हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. दोन महिने हा हा म्हणता निघून गेले. विजेचं बील, कॉम्प्युटरचा मेन्टेनन्स, कर्मचार्यांचे पगार असा अधिभार वाढत होता. त्या तुलनेत पैशाचं येणं काहीच नव्हतं. याचवेळी एका मुलाचे बाबा प्रवेशासाठी आले होते. त्या मुलाचे बाबा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांच्या बोलण्यातून संतोषला कळलं की, यांची पोलिसांत ओळख आहे. त्या ओळखीचा वापर करून संतोष वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटला. एमएचसीआयटी सरकारने सक्तीचे केल्याने पोलीस कर्मचार्यांना संगणक प्रशिक्षण कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. अधिकार्याने हिरवा कंदील दिला. या ठिकाणी १२० पोलीस संतोषला मिळाले आणि हाच त्याच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. तुमची महत्त्वाची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्येच यावं लागेल, ते देखील वर्दीवर, असा आग्रह संतोषने धरला. पोलीस शिपायांपासून ते थेट उच्च अधिकार्यांपर्यंत सगळे पोलीस वर्दीसहीत इन्स्टिट्यूटमध्ये येऊ लागले. याचा फायदा असा झाला की, पोलीस येण्यामुळे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव झालं. आता इतर लोकांचीसुद्धा गर्दी होऊ लागली. मार्केटिंग स्ट्रॅटेजी यशस्वी झाली. याच सुमारास संतोषला कळले की, एके ठिकाणी संगणकाशी संबंधित पुस्तके वाजवी दरात विकत मिळतात. चव्हाण नावाचे गृहस्थ ही पुस्तके विकत. चव्हाणांचे हे इन्स्टिट्यूट गोरेगाव स्थानकानजीक होते. तिथे गेल्यानंतर कळले की, चव्हाण इन्स्टिट्यूटचे इन्फ्रास्ट्रक्चर विकणार आहेत. संतोषने चौकशी केल्यानंतर साडेसात लाखांपर्यंत हे इन्स्टिट्यूट मिळेल असे कळले. कसंही करून हे इन्स्टिट्यूट हातचं जाऊ द्यायचं नाही, हे संतोषने ठरविले. चव्हाण मात्र साडेसात लाखाच्या खाली येण्यास तयार नव्हते आणि संतोषकडे तेवढे पैसे नव्हते. सौदा कर ण्यासाठी त्याने आपल्या बाबांना गाठले आणि चव्हाणांकडे घेऊन आला. ’’अरे हे तर भंगार आहे, कितीला देणार?,’’ असं म्हणून व्यावहारिक चातुर्य दाखवत संतोषच्या बाबांनी ते इन्फास्ट्रक्चर अवघ्या दोन लाख रुपयांत खरेदी केले. यानंतर संतोष खडतरे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आज आयसीआयटी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या मुंबई आणि परिसरात १९ शाखा आहेत. संगणकाशी संबंधित २२ प्रकारचे अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, सिक्कीम मणिपाल विद्यापीठ, पंतप्रधान कौशल्य विकास योजना अशा शासकीय संस्थांशी आयसीआयटी संलग्न आहे. अवघ्या १६ हजार रुपयांनिशी सुरू झालेली ही संस्था आज तीन कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. या क्षेत्रातील योगदानासाठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ऍण्ड मॅनेजमेंट या संस्थेचा २०१४ चा ’उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ’ हा पुरस्कार दिल्ली येथे संतोष खडतरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच ’इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिल’ या संस्थेतर्फे राष्ट्रीय विद्या गौरव सुवर्ण पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातदेखील संतोष खडतरे यांनी पाऊल ठेवले आहे. ‘टर्टल हेल्थ केअर’ नावाची प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणारी संस्था त्यांनी निर्माण केली आहे. फेब्रुवारी २०१७ ला ही संस्था अस्तित्वात आली. शिक्षण आणि आरोग्य ही दोन्ही क्षेत्रे सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याची क्षेत्रे. या क्षेत्रातील उत्तमसेवा अल्पदरात सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, हा संतोष खडतरेंचा मानस आहे. आपल्या आसपास असे अनेक विद्यार्थी आहेत, जे युपीएससी वा एमपीएससी परीक्षा पास न झाल्याने हताश होतात. त्यांच्यासाठी संतोष खडतरेंच्या उद्योजकतेचा हा खडतर प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल.