एक बाल स्वयंसेवक ते रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक असा बाळासाहेब देवरस यांचा मन थक्क करणारा प्रवास! रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक प. पू. श्रीगुरुजी यांच्या पश्चात बाळासाहेबांनी समर्थपणे संघाची धुरा सांभाळली. संघाला अधिक समाजव्यापी बनविण्यामध्ये बाळासाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आणीबाणीच्या काळात संघावर बंदी असतानाही बाळासाहेबांनी वैचारिक लढा देऊन संघशक्ती आणि संघाच्या संघटन कौशल्याचा आदर्श प्रस्थापित केला. अशा या ‘सामान्य भासणार्या असामान्य’ जीवनचरित्राचा घेतलेला हा आढावा.
कोणतीही जीवमान गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांमधून जात असते. लय हा विनाशाच्या रूपातही असू शकतो किंवा तो आपल्या उद्दिष्टप्राप्तीनंतर झालेले समर्पणही असू शकतो. जीवमान गोष्टीच्या शक्तीचा जसजसा क्षय होऊ लागतो, तेव्हा ती विनाशाकडे वाटचाल करू लागते. मात्र, आपल्या जीवनकार्याचे तिचे भान कायमराहिले, तर त्या जीवनोद्देशाच्या पूर्तीत तिच्या अस्तित्वाचा विलय होतो व त्याद्वारे ती अधिक उच्चतर पातळीत विलीन होऊन जाते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही अशीच एक जीवमान संघटना आहे. हिंदू समाजांतर्गत एक प्रभावी संघटना बनणे, हे तिचे उद्दिष्ट नसून, ते समग्र हिंदू समाजाचे संघटन बनून, हा समाज आजच्या वैश्र्विक सांस्कृतिक संकटात सांस्कृतिक उन्नयनाचे साधन बनावा, या उद्दिष्टाने ती कार्य करीत आहे. व्यक्तीचे किंवा संस्थेचे कार्य कितीही उदात्त असले, तरी तिला आपल्या कार्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी सर्वसामान्याप्रमाणे संघर्ष करावाच लागतो. किंबहुना, त्या संघर्षाचे स्वरूप अधिक बिकट असते; परंतु सर्वसामान्य व्यक्ती एक तर संकटाने, अपयशाने कोसळून पडतात किंवा यशाच्या अहंकाराने आपल्याला झालेल्या त्रासाची किंमत वसूल करू पाहतात. मात्र, ज्या व्यक्ती किंवा संस्था उदात्त व उच्चतर ध्येयांनी प्रेरित झालेल्या असतात, त्या संकटातून अधिक तेजस्वी होऊन बाहेर पडतात व यशानंतर जबाबदारीच्या जाणिवेने अधिक विनम्र बनतात.
***
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत पहिल्या तीन सरसंघचालकांचे कार्य हे पायाभूत स्वरूपाचे आहे. एकोणीसाव्या व विसाव्या शतकाची पहिली ५० वर्षे ही भारतीय समाजजीवन घुसळून टाकणारी होती. १८५७च्या युद्धातील पराभवाने भारतातील सरंजामशाही राजवटीच्या समाप्तीला प्रारंभ झाला. इंग्लिश शिक्षणाने जगाचे भान आलेल्या नवशिक्षित मध्यमवर्गीय तरुणांनी समाजकारणाची व राजकारणाची सूत्रे हाती घेतली. लोकशाही, राष्ट्रवाद, समता, व्यक्तिस्वातंत्र्य, साम्यवाद आदी संकल्पना भारताचे वैचारिक विश्र्व ढवळून काढीत होत्या. एका बाजूला या विचार संकल्पनात हिंदू समाज आपले भविष्य शोधू पाहत होता, तर त्याच वेळी आपले मध्ययुगीन भावविश्र्व वाचविण्यासाठी मुस्लीमसमाज आक्रमक व हिंसक बनत होता. या आक्रमकतेच्या आणि हिंसकतेच्या पार्श्र्वभूमीवर हिंदू समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले होते. जर हिंदू समाजाचे अस्तित्व धोक्यात आले, तर परिवर्तनाची स्वप्ने पाहणार्या वैचारिकतेचा डोलारा कोसळून पडेल, या वास्तवाकडे पाहण्याचे भान फारच कमी जणांपाशी उरले होते. यासाठी भविष्यदर्शी, परिवर्तनशील दृष्टिकोन ठेवून हिंदूंच्या अस्तित्वरक्षणासाठी त्यांची संघटित शक्ती उभी करण्याची नितांत आवश्यकता होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीने ती आवश्यकता पूर्ण करण्याचा संकल्प डॉ. हेडगेवार यांनी केला.
डॉ. हेडगेवार जो हिंदू समाज पाहत होते, तो अनंत विसंगतींनी भरलेला होता. जेवढे तत्त्वज्ञान श्रेष्ठ, तेवढेच आचरण संकुचित. तोंडी मोक्षाची भाषा व व्यवहारात आत्यंतिक स्वार्थी व्यवहार. व्यक्तिगत मोक्षाच्या अतिरेकी श्रद्धेने हिंदू समाजाची ऐहिक एकता व कर्तृत्व हरवून गेले होते. हिंदू संस्कृतीने अनेक जाती, भाषा, रूढी, चालीरीती या विविधतांच्या पलीकडे जाऊन विलक्षण आंतरिक एकात्मतेचे बंध निर्माण केले. व्यवहारात मात्र, अनेक अमानवीय विषमतांच्या परंपरा ईश्र्वराधिष्ठित समाजरचनेच्या नावे निर्माण केल्या. त्यामुळे विसाव्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ऐहिकाकांक्षी, कर्तृत्वसंपन्न, एकरस, एकात्म, समतायुक्त हिंदू समाजाच्या स्थापनेच्या उद्दिष्टाने डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. बाळासाहेब देवरस यांच्या व्यक्तिमत्त्वाची पूर्ण जडणघडण ही डॉ. हेडगेवारांच्या व्यक्तिगत सहवासातून व संघाच्या कार्यपद्धती व विचारपद्धतीतून विकास पावलेली असल्याने सरसंघचालकपदावरून त्यांनी ज्या भूमिका घेतल्या व जे निर्णय घेतले, त्याची पार्श्र्वभूमी समजण्यापुरताच हा संघस्थापनेचा आढावा घेतला आहे.
***
श्रीगुरुजींसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या नेतृत्वाच्या पार्श्र्वभूमीवर बाळासाहेबांकडे सरसंघचालकपदाची सूत्रे हाती आली. ‘‘आजवर हिंदू समाजाच्या इतिहासात झाला नसेल, असा हिंदू समाजाला संघटित करण्याचा प्रयोग संघाच्या रूपाने आपण हाती घेतला आहे,’’ असे डॉ. हेडगेवारांनी ‘आपण संघाची स्थापना का केली?’ या लेखात नमूद केले आहे. अशा इतिहास निर्माण करणार्या संस्थेला आकार देण्यासाठी त्यांना फक्त १५ वर्षांचा कालावधी मिळाला. त्यांच्या मृत्यूनंतर श्रीगुरुजींच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा आली. आपल्या नेतृत्वाच्या ३३ वर्षांच्या वादळी कालखंडात श्रीगुरुजींनी संघावर आलेली कितीतरी संकटे आपल्या खांद्यावर झेलली व संघाचे एका अखिल भारतीय वटवृक्षात रूपांतर केले. श्रीगुरुजींच्या कालखंडाचे, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ असे दोन भाग पडतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डाव्या विचारवंतांच्या प्रभावामुळे हिंदू संस्कृतीकडे आणि परंपरांकडे सरसकट तुच्छतेने, हीनतेने, केवळ टीका करण्याच्या भूमिकेतून पाहिले जात होते. या टीकेला वैचारिकदृष्ट्या व व्यावहारिकदृष्ट्या उत्तर देणे भाग होते. श्रीगुरुजींनी आपल्या भाषणातून, मुलाखतीतून, बौद्धिक वर्गातून हिंदू संस्कृतीच्या परिवर्तनशील स्वरूपाची मांडणी केली. मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी एखाद्यावर टीका करून, ‘प्रतिगामी’ अशी त्याची प्रतिमा निर्माण करायची, ही डावी कार्यपद्धती. त्यामुळे ‘प्रतिगामी’, ‘मध्ययुगीन काळात राहणारे’ अशी त्यांची व संघाची प्रतिमा निर्माण करण्यात आली. व्यावहारिक स्तरावर, जीवनाच्या अनेक क्षेत्रांत हिंदू सांस्कृतिक विचारांवर आधारित संस्थाजीवन उभे करणे शक्य आहे, हेही त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने सिद्ध करून दाखविले.
***
या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या पार्श्र्वभूमीवर बाळासाहेब देवरसांनी सरसंघचालकपदाची सूत्रे हाती घेतली. ती सूत्रे हाती घेत असताना, त्यांच्या प्रारंभीच्या दौर्यातील विविध भाषणांत आपल्या मर्यादा स्पष्ट करताना ते म्हणत, ‘‘पहिल्या दोन सरसंघचालकांच्या पार्श्र्वभूमीवर मी कसे कामकरीन याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. डॉ. हेडगेवारांना संघाची संकल्पना सुचली व त्यांच्या आयुष्यात तिला अखिल भारतीय संघटनेचे स्वरूप दिले. श्रीगुरुजींचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तापूर्ण आणि तपस्वी होते. त्यांच्या काळात संघाने प्रभावी संघटनेचे रूप धारण केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात संघाला वैचारिक मार्गदर्शन केले. मला या दोघांच्याही सहवासाचे भाग्य लाभले आणि बाल स्वयंसेवक, गटनायक, गण शिक्षक, मुख्य शिक्षक, शाखा कार्यवाह ते सरकार्यवाह अशा अनेक भूमिका पार पाडल्या. ती व्यवस्थापनाची कामे होती; परंतु आताच्या कामाचे स्वरूप वेगळे आहे. या पदावरून मला मार्गदर्शकाची भूमिका वठवायची आहे. ती आता निभावणे भाग आहे. आपण ती निभावू शकू, असा मला विश्र्वास वाटतो.’’
या विवेचनातील ‘आपण’ हा शब्द महत्त्वाचा आहे. संघाची कार्यपद्धती व विचारपद्धतीच अशी आहे की, ज्यात ‘मी’चा ‘आपण’ होतो. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या पार्श्र्वभूमीवर नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली, तरी त्याचे ओझे न बाळगता, त्यांनी आपल्या स्वतंत्र शैलीत आपले विचार व्यक्त केले. विज्ञानाप्रमाणे विचारसरणीचेही ‘तात्त्विक’ व ‘व्यावहारिक’ असे दोन भाग असतात. पहिला भाग काही निवडक संशोधकांच्या आकलनाच्या कक्षेत येतो. सर्वसामान्य लोक तात्त्विक विचार मांडणार्याच्या विद्वत्तेने भारून जातात. ज्याला त्याचे व्यावहारिक उपयोजन करायचे असते, त्याची मांडणी व भाषा वेगळ्या स्वरूपाची असते. संस्था यशस्वी होण्यासाठी दोन्ही प्रकारांची गरज असते. श्रीगुरुजींचे व्यक्तिमत्त्व पहिल्या प्रकारचे होते, तर बाळासाहेबांचे दुसर्या प्रकारचे. याची चुणूक त्यांनी
प्रारंभीच्या दोन वर्षांतच दिली.
‘नवाकाळ’ या मुंबईतील वृत्तपत्राला श्रीगुरुजींनी एक मुलाखत दिली होती व त्या मुलाखतीतील चातुर्वर्ण्यविषयक विवेचनाने देशभरात गहजब माजला होता. वास्तविक, ज्याला संघाची कार्यपद्धती व विचारपद्धती माहीत आहे, त्यापैकी कोणालाही श्रीगुरुजी जातीय विषमतेचे समर्थन करतील, अशी स्वप्नातही शंका येणार नाही; परंतु संघाच्या विरोधकांना वस्तुस्थितीशी काही देणे-घेणे नव्हते. त्यांना केवळ संघाच्या बदनामीत रस होता. या पार्श्र्वभूमीवर १९७४ साली पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी जे भाषण केले, त्याचे ‘क्रांतिकारी’ या शब्दात वर्णन करण्यात आले. ‘सामाजिक समता आणि हिंदू संघटन’ या नावे ते प्रसिद्ध आहे.
या भाषणात हिंदू हाच समाज कसा राष्ट्रीय आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, ‘‘काही वर्षांपूर्वी आपल्या देशात एक कोड बनविण्यात आले, हिंदू कोड. संसदेने ते संमत केले. ते संमत व्हावे, यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, त्यामध्ये पंडित नेहरू होते, डॉ. आंबेडकर होते. कोड बनविल्यानंतर येथील ज्या बहुसंख्य जमातींना ते लागू करायचे, तिला कोणते नाव द्यायचे? असा जेव्हा त्यांच्यापुढे प्रश्न आला, तेव्हा त्यांना दुसरे कुठले नाव सुचले नाही. त्यांना कोडास ‘हिंदू कोड’च म्हणावे लागले. मुसलमान, ख्रिस्ती, यहुदी आणि पारशी हे चार लोक सोडून दिले, तर हिंदुस्थानात बाकीचे जेवढे लोक आहेत, त्या सनातनी, लिंगायत, जैन, बौद्ध, शीख, आर्य समाज इत्यादी सर्व लोकांना हे कोड लागू होईल. त्यांनी कोडाला नावही दिले ‘हिंदू कोड’. ‘हिंदू’ या नामाभिधानाखाली कोण-कोण येतील, हे सांगताना त्यांनी अगदी स्पष्ट म्हटले आहे की, या सर्व लोकांना हे लागू होईल आणि याही पुढे जाऊन म्हटले आहे की, वरील यादीतून राहिलेले आणखीही कोणी असतील, तर त्या सर्वांनासुद्धा हे लागू होईल आणि ज्यांना हे आपल्याला लागू होत नाही असे वाटत असेल, त्यांच्यावर ‘आपल्याला हे लागू नाही’ हे सिद्ध करण्याची जबाबदारी राहील, तेव्हा ‘हिंदू’ शब्दाची व्याख्या करता येत नाही म्हणून हिंदू समाजच नाही, असा जो वादंग कधी-कधी माजविण्यात येतो, तो बरोबर नाही. येथे हिंदू समाज आहे, हिंदू कोडखाली सर्व लोक येतात, असे पंडित नेहरूंनी म्हटले, डॉ. आंबेडकरांनी म्हटले. याचा अर्थ असा की, यामागे काही ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक कारणे असली पाहिजेेत.’’ (सामाजिक समता व हिंदू संघटन). त्याचबरोबर आपल्या भाषणात हिंदू संघटनेसाठी समतायुक्त हिंदू समाजाची आवश्यकता नि:संदिग्ध शब्दांत प्रकट करीत असताना ते म्हणाले, ‘‘अस्पृश्यता हा आपल्या समाजातील अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक असा प्रकार आहे. काही विद्वान लोक म्हणतात की, पूर्वीच्या काळी ही पद्धत अस्तित्वात नव्हती, आगंतुकपणे ती पुढे रूढ झाली; पण अनेक शतकांपासून अस्पृश्यता अस्तित्वात असल्याचे आपण पाहत आहोत एवढे खरे; परंतु आता मात्र, सर्वांना हे मान्य आहे की, अस्पृश्यता ही चूक आहे. It must go lock, stock and barrel!!ती सर्वतोपरी गेली पाहिजे. ती संपूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे, यासंंबंधी आता कोणाच्याही मनात शंका नाही. अमेरिकेतील गुलामगिरी घालवणार्या अब्राहम लिंकनने म्हटले आहे, "If slavery is not wrong, nothing is wrong!'' अस्पृश्यता वाईट नसेल, तर मग जगात काहीच वाईट नाही!, तेव्हा अस्पृश्यता वाईट आहे आणि ती समूळ नाहीशी झाली पाहिजे, यासंबंधी दुमत असण्याचे कारणच नाही. सर्व लोकांनी त्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था यांमुळे आपल्याला जो सामाजिक विषमतेचा अनुभव येतो, तो दुःखद आहे. ही विषमता गेली पाहिजे, असा भाव आपणा सगळ्यांच्या मनात असला पाहिजे. या विषमतेमुळे समाजात विघटन आले आहे, दुर्बलता आली आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे, लोकांसमोर स्पष्ट केले पाहिजे. ती दूर करण्याचे उपाय सांगितले पाहिजेत. सगळ्यांनी प्रयत्नाला हातभार लावला पाहिजे. त्याने विषमता दूर होईल आणि हिंदू संघटनेच्या मार्गातील अडथळे दूर होतील’’. (सामाजिक समता व हिंदू संघटन).
हिंदुत्वाचा विचार करणे हे जातीय आहे व तो विचार सामाजिक विषमतेचे पोषण करणारा आहे, या चालणार्या अपप्रचारालाच केवळ दिलेले शाब्दिक उत्तर नव्हते, तर ती विचारांची मूलभूत धारणा होती व त्याचा परिणाम सामाजिक क्रांतीच्या प्रवर्तकांच्या कार्याचा परिचय करून घेण्याची आवश्यकता संघाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली आणि त्यातूनच ‘सामाजिक समरसता मंच’ यासारख्या संघटनांची निर्मिती झाली.
बाळासाहेबांनी सरसंघचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, काही काळातच जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाबाबत संघ कोणती भूमिका घेणार, हा उत्सुकतेचा विषय बनला. बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, ‘‘संघाचा स्वयंसेवक हा समाजाचाही घटक आहे. ज्या भ्रष्टाचाराच्या प्रश्र्नामुळे लोक अस्वस्थ आहेत, तसा तोही अस्वस्थ आहे. संघाच्या शाखेवर झालेले संस्कार शाखेतून घरी आल्यानंतर दंड बाजूला ठेवावा, तसे ठेवता येत नाहीत. त्याचा परिणामत्याच्या २३ तासांच्या वागण्यावर होणारच, किंबहुना, झाला पाहिजे. त्यामुळे संघाचे स्वयंसेवक भ्रष्टाचारमुक्तीच्या आंदोलनात भाग घेत असतील, तर ती स्वाभाविक गोष्ट आहे.’’
जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची परिणती आणीबाणीत झाली. याचा परिणामसंघबंदीत झाला. मात्र, संघाने या विरोधात जे आंदोलन केले, ते संघबंदीच्या विरोधात न करता, लोकशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी म्हणून केले. हा निर्णय सोपा नव्हता. त्या निर्णय प्रक्रियेमागची भूमिका सांगताना बाळासाहेब म्हणाले, ‘‘दुसरी सूचना अशी आली की, सत्याग्रह करावयाचा; पण संघावर आलेली बंदी उठावी एवढाच विचार करून सत्याग्रह करावा, दुसरा कोणताही विचार करावयाचा नाही. दुसरे कोणतेही कारण सांगावयाचे नाही. आता हा विचार पुढे आला असताना, कशी स्थिती निर्माण झाली असेल? आपल्या विचार करण्याच्या प्रकारामध्ये ही सूचना पुष्कळ अंशी बसू शकते. कारागृहामधून बाहेर असलेल्या बंधूंमधून आणि इतरांकडून विचार आलेला असेल की, सत्याग्रह करावयाचा तो संघाचा सत्याग्रह हाच विषय! असे असले, तरी निर्णय घेताना विचार करावा लागला असेल की, देशात आणीबाणीची परिस्थिती आहे, त्यामुळे संघावर बंदी आहे. त्यानंतर एकामागून एक काळे कायदे करण्यात आले आहेत. अनेक पक्षांच्या हजारो बंधूंना पकडण्यात आले आहे. येथे लोकशाहीचा अस्त झाला आहे. तेव्हा जर केवळ संघावरची बंदी उठावी, एवढेच कारण घेऊन आपण सत्याग्रह केला, तर ते इष्ट होईल काय? हे चालेल काय? जनमत आपल्याबरोबर येईल काय? आपण अलग तर पडणार नाही? असे अनेक प्रश्न येणे स्वाभाविक होते. निर्णय घेणे सोपे नव्हते; पण त्यांनी निर्णय घेतला. केवळ संघावरील बंदी उठावी हा विषय डोळ्यापुढे न ठेवता, जे काही विषय होते, त्या सर्व विषयांकरिताच आणि आपल्या नावावर न करता, लोक संघर्ष समितीच्या माध्यमातून सत्याग्रह करावयाचा झाला. त्यामध्ये ८० टक्के, ९० टक्के आपले बंधू होते. ज्या प्रांतात जाऊन आलो आहे, तेथील पुढारी मला भेटले आहेत.सर्वोदयवादी लोकही भेटले आहेतच आणि सगळीकडे आपली प्रशंसाच प्रशंसा! या लहानशा प्रांतातदेखील, तेथील संघ दुर्बळ असतानाही येथे जो काही सत्याग्रह झाला तो तुमच्यामुळेच,’’ असे म्हणत, यामुळेच आणीबाणीच्या विरोधातील संघाच्या सहभागाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले,
‘‘मी जेव्हा परिस्थितीचे निदान करतो, झालेल्या या दोन वर्षांतील कालखंडाचे निदान करतो, तेव्हा जसे दुसर्या महायुद्धासंबंधी असे म्हटले आहे की, ‘‘One man Churchill and 20 miles of English channel stood between Hitler and his victory.'' (हिटलर आणि त्याचा विजय यांच्यामध्ये एक मनुष्य चर्चिल आणि २० मैलांची इंग्लिश खाडी होती.) मी जर या वेळी विधान केले, ‘‘One man Jayprakash and RSS stood between dictatorship and democracy,'' तर हे विधान अतिशयोक्तीचे ठरणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या वेळेला आणि या सगळ्या परिस्थितीला कलाटणी देण्यामध्ये आपला सहभाग राहिला आहे’’ (१९ मे १९७७ - पुणे येथील बौद्धिक वर्ग).
आणीबाणीच्या संघर्षाचे संघाला अनेक फायदे झाले व त्याचा परिणामसंघाच्या पुढील वाटचालीवर झाला. संघाच्या कार्यकर्त्याची ‘संघटनाकेंद्री’ भूमिका बदलून ती ‘समाजकेंद्री’ झाली. आपण एखाद्या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व करू शकतो, याचा विश्र्वास आला. ज्या नेत्यांना प्रसारमाध्यमांनी मोठे केले होते, त्यांचा वकूब काय याचा अंदाज आला. आपण लढाऊ संघटना असून, ‘संघ कागदी वाघ’ असे म्हणणार्यांचा लढाऊपणा किती असतो, हे प्रत्यक्ष संघर्षाच्या वेळी उघड झाले. इतर कोणत्याही संस्था किंवा चळवळीपेक्षा संघापाशी अधिक समाजघटक आहेत, याची सर्वांनाच जाणीव झाली. यापुढच्या काळात राष्ट्रीय धोरणे ठरविण्यात संघाची भूमिका महत्त्वाची राहणार, यावर शिक्कामोर्तब झाले. या सर्वाचा परिणाम‘हिंदुत्वाच्या संघटनेकडून हिंदुत्वाची चळवळ’ बनण्यात झाला. जनजागरण अभियान, एकात्मता यज्ञ, श्रीरामजन्मभूमी यामुळे हिंदुत्वाची कार्यसूची देशाचा मुख्य प्रवाह बनली.
त्यामुळे १९८४ सालच्या विजयादशमीच्या भाषणात राष्ट्रहिताच्या दृष्टीने हिंदूंनी ‘हिंदू’ या नात्याने राजकीयदृष्ट्या का सक्रिय झाले पाहिजे, याचा ऊहापोह करून ते म्हणाले, ‘‘आता देशात सार्वत्रिक निवडणुका येत आहेत. या निवडणुकीत हिंदूंनी आपला संप्रदाय, पक्ष, भाषा, जाती यांच्या अभिमानातून नव्हे, तर राष्ट्रीय हिताच्या आधारावर मतदान केले पाहिजे. प्रत्येक हिंदूने आपला निर्णय विवेकबुद्धीने घेतला पाहिजे. जो हिंदुहिताच्या विरोधात आहे, अशा व्यक्तीला केव्हाही मदत देता कामा नये. जे उमेदवार हिंदुत्वाच्या संकल्पनेला राष्ट्रजीवनाची आधारशिला मानतात, जे हिंदुत्वाची व्यापक परिभाषा समजतात आणि अल्पसंख्याकांना राष्ट्रीय जीवनात सहभागी करून घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, जे राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देतात, सत्ताप्राप्ती हे राष्ट्रसेवेचे माध्यममानतात आणि सत्तेच्या लोभापायी आपल्या सिद्धांतांचा बळी देत नाहीत, त्याच उमेदवारांना हिंदूंची मते मिळाली पाहिजेत.’’ बाळासाहेबांच्या या आवाहनाचे दूरगामी परिणामझाले. त्यानंतर झालेली निवडणूक पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दुःखद छायेखाली झाली; परंतु त्या निवडणुकीनंतर जो राजकीय प्रवाह बदलला, त्याची बीजे बाळासाहेबांच्या या भाषणात आहेत.
सामाजिक समता, राष्ट्रीय हितासाठी हिंदुहिताचा आग्रह याचबरोबर बाळासाहेबांनी जो सेवाकार्याचा आग्रह धरला, त्याचाही संघ समाजव्यापी बनण्याच्या दृष्टीने किती व्यापक परिणामझालेला आपण अनुभवतो आहोत. समाजाच्या सर्व क्षेत्रात सेवाकार्याच्या रूपाने आपण गेले पाहिजे, याची आवश्यकता सांगताना ते म्हणाले, ‘‘संघामधील संस्कार हे विधायक आहेत आणि ते समाजास उपयुक्त होतात, हा इतरांना अनुभव आला पाहिजे. संघशाखेवरून आल्यानंतर आपण हाफ पॅण्ट काढून ठेवतो, त्याप्रमाणे संस्कारही ठेवून दिले, तर? आणि मग जो काही व्यवहार असेल, तो कोणताही असो, तो करताना संस्कारांची आठवण ठेवणार नसू, तर चालणार नाही. जो काही आपला व्यवसाय असेल, त्यात संघाचे संस्कार प्रकट झाले पाहिजेत, तसेच आपल्या आसपास जी काही कामे असतील, त्या कामांमध्ये, त्या कामाच्या आवश्यकतेप्रमाणे, आपल्या रुचीप्रमाणे व आपल्या गुणांप्रमाणे आपले पुरेसे योगदान झाले पाहिजे. असे झाले, तरच संघाच्या संस्कारांची क्षमता लोकांना मान्य होणार आहे. या दृष्टीने लोकांच्या अपेक्षा फार उंचावल्या आहेत. आता पूर्वीपेक्षा आपण अनेक क्षेत्रांमध्ये शिरलो आहोत आणि चांगल्यापैकी शिरलो आहोत. आपल्या संबंधात जे लोक आले, त्यांना हे मान्य झाले आहे. आपण त्यास प्रसिद्धी दिली नाही, इतकेच! केवळ शैक्षणिक क्षेत्र म्हटले, तर हजार तरी संस्था आपण चालवीत आहोत. त्यापैकी शेकडो संस्था या आणीबाणीच्या काळात सरकारने ताब्यात घेतल्या. त्या संबंधीच्या वार्ता वृत्तपत्रांतून आपण वाचल्या असतील. याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्र काय, अन्य क्षेत्रे काय, अशी अनेक क्षेत्रे राहणार आहेत. त्यामध्ये व्यक्तिशः एखाद्या स्वयंसेवकाने किंवा चार स्वयंसेवक मिळून आणि शक्य असेल, तर आपल्याशी सहमत असलेल्या इतर अनेक बंधूंचा सहयोग घेऊन, अनेक प्रकारची कामे आपणास करावी लागणार आहेत, हे दायित्व आपणास टाळता येणार नाही. केवळ संघस्थानावर उपस्थित राहून आणि संघाचा विचार करून चालणार नाही (१९ मे, १९७७ - पुणे येथील बौद्धिक वर्ग). समता, संघर्ष आणि सेवा या त्रिसूत्रीच्या आग्रहातून संघ आणि हिंदू समाज समकक्ष होण्याच्या दृष्टीने संकल्पनात्मक मोठी झेप घेतली. हे सर्व करीत
असताना आपण नव्याने काही करत नसून, संघ ज्या कारणांसाठी स्थापन झाला, त्या भूमिकेशी हे सुसंगतच आहे, हे ते स्पष्ट करीत.
***
एक बाल स्वयंसेवक ते सरसंघचालक असा प्रवास झालेल्या बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, हा ‘शिवरायांचे कैसे वागणे’ या सारखाच विलक्षण प्रेरक आणि खूप काही शिकवून जाणारा अनुभव असे. त्यांचे ‘मी’पण खर्या अर्थाने संघसृष्टीत विलीन होऊन गेले होते. जो विषय मांडायचा, तो ‘माझा’ नसून ‘आपणा सर्वांचा’ आहे, अशी त्यांची मांडणी असे. आणीबाणीनंतर त्यांचे जे सर्वत्र सत्कार झाले, त्यात ते चर्चिल यांचे उदाहरण देत, दुसर्या महायुद्धातील विजयानंतर चर्चिल यांचा सत्कार झाला व त्यात चर्चिलना सिंहाची उपमा दिली गेली, तेव्हा चर्चिल म्हणाले की, ‘‘सिंह तुम्ही आहात, मी फक्त तुमच्या वतीने गर्जना केली, तसेच आपल्याबाबत आहे,’’ असे ते म्हणत. ‘सामाजिक समता आणि हिंदू संघटन’ हे भाषण करण्यापूर्वी ते आपल्या सहकार्यांना दाखवून त्यांच्या मान्यतेनंतर त्यांनी ते व्याख्यान दिले. विनम्रता आणि दृढ निश्र्चय या दोन्हीचा मनोहारी संगमत्यांच्या स्वभावात होता. त्यांना आपल्या व आपल्या संघटनेच्या सामर्थ्याची व मर्यादांची पूर्ण जाण होती. हिंदू समाजातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपणापाशी आहेत, असा दावा त्यांनी कधीच केला नाही. ‘‘संघाने माणसांचे संघटनाशास्त्र विकसित केले आहे. त्याचे आम्ही तज्ज्ञ आहोत. त्यामुळे अशा प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणार्यांना संघटनात्मक मदत आपण देऊ शकतो,’’ असे ते म्हणत. त्यांच्या लोकविलक्षण स्नेहपूर्ण वागण्याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. प्रश्र्नोत्तराचा कार्यक्रमहा त्यांचा आवडता कार्यक्रमअसे. या कार्यक्रमाचे ते वातावरणच असे निर्माण करीत की, देशाचे
भवितव्य ठरविणार्या एका नेत्याशी आपण बोलत आहोत, याचे ओझे कोणालाही वाटत नसे. प्रश्र्न विचारताना एखाद्याला त्याचे नीट शब्दांकन करता आले नाही, तर तो प्रश्र्न स्वत: योग्य शब्दात मांडून, ‘‘तुला असेच म्हणायचे होते ना?’’ असे विचारून ते त्या प्रश्र्नाचे उत्तर देत. कोणत्याही प्रसंगी प्रश्र्न विचारणार्याची हेटाळणी केली नाही की, त्याला अपमानित केले नाही. आपल्या सहकार्यांबद्दलचा अतूट विश्र्वास त्यांच्या मनात होता ‘‘आणीबाणीत एक सरसंघचालक तुरुंगात असला, तरी पाच-सहा सरसंघचालक बाहेर आहेत,’’ असे ते सांगत. आणीबाणी उठल्यानंतर राजकीय पक्षाप्रमाणे आपल्या अन्य संघटनाही जनता परिवारात विलीन करून टाकाव्यात, या आग्रहाला ते बळी पडले नाहीत. प्रत्येक संघटना उभी करणारेच त्या संघटनांच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. संघशाखेच्या कार्यपद्धतीतूनच संघाचे सामर्थ्य उभे राहिले आहे, हे स्पष्ट करीत असतानाच संघाच्या कार्यपद्धतीचे व्यवस्थात्मक वैशिष्ट्यही ते स्पष्ट करीत. ‘‘माणसांचे व्यवस्थापन हा संघाचा विशेष कार्यक्रम असून, समाज चालविण्यासाठी अनेक गुणांच्या माणसांची गरज असते. माणसातील गुणवैशिष्ट्ये ओळखून त्यांच्या प्रवृत्तीला अनुरूप असे कामदेणे, हे संघाच्या व्यक्ती व्यवस्थापनेचे वैशिष्ट्य आहे,’’ असे ते सांगत.
अनेक वेळा संघटनात्मक मतभेदांमुळे अनेक कार्यकर्त्यांनी संघाच्या रचनेच्या बाहेर जाऊन कामसुरू केले. त्या कार्याची प्रेरणा ही राष्ट्रीय परिवर्तनाचीच होती; परंतु स्थानिक कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक अभिनिवेशामुळे त्यांना संघ कार्यकर्त्यांकडून बहिष्कृत असल्याचा अनुभव येत असे. सरसंघचालक झाल्यानंतर बाळासाहेबांनी आवर्जून अशा कार्यांना भेट देऊन, बहिष्काराचे वातावरण संपवून निरोगी वातावरण निर्माण करण्याचे संकेत दिले. त्यांना मिळालेल्या लोकमान्य टिळक पुरस्काराची रक्कममधुकर देवल यांनी सुरू केलेल्या दलितांमधील सहकारी चळवळीला दिली. त्याचबरोबर अप्पा पेंडसे यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील ‘ज्ञान प्रबोधिनी’ला भेट देऊन, स्थानिक कार्यकर्ते आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्यातील अबोला संपवला. समाजपरिवर्तन ही केवळ एका संघाची संस्थात्मक जबाबदारी नसून, त्यात सर्व समाजाचा सहभाग असला पाहिजे, या त्यांच्या मूलभूत धारणेचे हे प्रत्यंतर होते. संघाच्या व्यक्तिनिरपेक्ष कार्यपद्धतीला अनुसरून त्यांनी जे महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याचे दूरगामी परिणामसंघावर झाले. पहिल्या दोन सरसंघचालकांव्यतिरिक्त आपली प्रतिमा उत्सवात लावायची नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. आपला अंत्यसंस्कारही रेशीमबागेत करायचा नाही, हेही स्पष्टपणे नमूद केले. ‘‘आपणाला रेशीमबागचा स्मशान घाट बनवायचा नाही,’’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. ‘‘आपला अंत्यसंस्कार कसा करणार?’’ असा प्रश्र्न डॉ. हेडगेवारांनी विचारला होता व ‘‘तो लष्करी पद्धतीने न करता, सर्वसामान्य पद्धतीने झाला पाहिजे,’’ असे सांगितले होते, त्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.
त्यांची भाषा सरळ, सोपी आणि तर्काला बंदुकीच्या गोळीसारखी थेट भिडणारी असे. संतांच्या अभंगात जे तुकारामांचे स्थान, तसेच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या मांडणीबाबत म्हणता येईल. दुसरे महायुद्ध आणि त्यानंतर निर्माण झालेले विविध सामाजिक व राजकीय प्रवाह यांचा त्यांचा केवळ अभ्यासच नव्हता, तर त्यांनी त्या संकल्पना पचविल्या होत्या व हिंदू समाजहिताच्या संदर्भात त्या कशा मांडायच्या, यावर त्यांचा स्वतंत्र व प्रगल्भ दृष्टिकोन होता. त्यामुळे त्यांची मांडणी कधीही आक्रस्ताळी झाली नाही. लोकशाही, सेक्युलॅरिझम, समाजवाद या विचारप्रणालींचे सामर्थ्य व मर्यादाही त्यांना माहीत होत्या. राष्ट्र उभारणीसाठी ज्या समर्पणाच्या प्रेरणा लागतात, त्या केवळ प्रखर राष्ट्रभक्तीतूनच येऊ शकतात, याची त्यांना जाणीव होती. आपल्या सन १९७८च्या विजयादशमीच्या भाषणात ते म्हणतात, ‘‘समाजवादविरोधी व भांडवलवादाचा पुरस्कर्ता अशी संघावर टीका केली जाते. आपल्या देशात निरर्थक गोष्टींवरून मोठा गदारोळ केला जातो. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आदी घोषणा दिवसरात्र दिल्या जातात. त्याचा खरा अर्थ काय आहे, हे कोणाला माहीत आहे काय? आज समाजवाद, बहुरूप्यांचा मुखवटा बनला आहे. लोकशाही, सेक्युलॅरिझम, समाजवाद हे सिद्धांत म्हणून ठीक आहेत; परंतु लोकांना कार्यप्रवण करण्याचे, समाजात एकात्मता आणण्याचे सामर्थ्य या संकल्पनांत नाही. या तिन्ही गोष्टी विद्यमान आहेत किंवा त्यापैकी एक किंवा दोन अस्तित्वात आहेत, असे देश खूप कमी आहेत आणि या देशातील त्यांच्या शासनव्यवस्थेद्वाराच या संकल्पना प्रकट होतात. त्या देशातील जनतेचे प्रेरणास्रोत वेगळे आहेत. अधिकांश लोकांची प्रेरणा त्यांच्या मातृभूमी-पितृभूमीवरील श्रद्धेतून निर्माण होते. यासाठीच मातृभूमीवरील अविचल निष्ठा आणि आमच्या सांस्कृतिक महापुरुषांवरील श्रद्धा हा संघाच्या कार्याचा आधार राहिला आहे. त्यामुळेच आम्हाला हे यश मिळाले आहे.’’ आणीबाणीतून मिळालेला जो मौलिक लाभ होता, तो आणीबाणी उठल्यानंतर त्यांच्या भाषणांतून त्यांनी अचूक टिपला होता. ‘‘आणीबाणीतील संघर्ष कितीही बिकट असला, तरी त्यातून सामान्य माणसाची जी जागृती झाली, त्याचे परिणामभारतीय राजकारणात कायमचे राहणार आहेत,’’ हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आणीबाणीनंतर देशभरात मतदाराने जे सातत्याने सत्तापालट केले, त्यातून ही गोष्ट सिद्ध झाली. त्यामुळे आणीबाणीतील अत्याचारांचा बाऊ न करता, ‘‘विसरा आणि क्षमा करा! या भूमिकेतून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला लागा,’’ असा सल्ला त्यांनी दिला. हा सल्ला अनेकांना पटला नाही; परंतु त्यानंतरचा घटनाक्रमपाहिला, तर बाळासाहेबांचा सल्ला किती अचूक होता, हे लक्षात येते. बाबरी ढांचा उद्ध्वस्त झाल्यावर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती विचारी मुस्लिमांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारी होती. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले होते, ‘‘बाबरी ढांचा उद्ध्वस्त झाल्यामुळे मुस्लीमसमाजाच्या मनात जे दुःख व जो संताप निर्माण झाला आहे, त्यावरून हिंदूंची हजारो मंदिरे उद्ध्वस्त झाल्यामुळे, त्यांच्या मनात किती दुःख आणि संताप निर्माण झाला असेल, याची मुस्लीमसमाजाने कल्पना करावी. एकूणच जर या प्रतिक्रियेचा मुस्लीमव तथाकथित सेक्युलरवाद्यांनी नीट अभ्यास केला असता, तर बाबरी पतनानंतर देशामध्ये जे जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले, ते झाले नसते.’’
***
भारत स्वतंत्र झाला, तेव्हा चार प्रमुख विचारसरणीच्या संघटना कार्यरत होत्या. कॉंग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी आणि संघ. यापैकी कॉंग्रेसला, तर स्वातंत्र्यचळवळीचा वारसा लाभला होता. म. गांधी, नेहरू, पटेल यांच्यासारखे उत्तुंग व लोकप्रिय नेतृत्व लाभले होते. कम्युनिस्टांना आपल्यापाशी क्रांतीचे वैज्ञानिक तत्त्वज्ञान असून, चीन, रशियाप्रमाणे जगभरात क्रांती होणार आहे, असा विश्र्वास मनात होता व त्यांच्यामागे समर्थनाला त्या दोन महासत्ताही उभ्या होत्या. समाजवाद्यांच्या मागे स्वातंत्र्यलढ्याची पार्श्र्वभूमी होती आणि प्रसारमाध्यमांमधून मिळणारी प्रसिद्धी होती. याउलट संघ म्हणजे शाखेवर खेळणारी चार मुले आणि डोक्यावर गांधीहत्येचा कलंक. या पार्श्र्वभूमीवर संघ सातत्याने वाढत गेला व अन्य चळवळींचा र्हास होत गेला. डार्विनचा सिद्धांत असे सांगतो की, जे कालविसंगत आहे व बदलत्या काळाशी सुसंगत बदल घडवून घेऊ शकत नाही, ते नष्ट होत जाते, जे कालसुसंगत आहे व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते, तेच जीवनसंघर्षात टिकते. संघाच्या भाग्याने उत्पत्ती, स्थिती आणि विलय या तिन्ही अवस्थांकरिता आवश्यक ते सक्षमनेतृत्व मिळाले. संघ हे हिंदू समाजांतर्गत प्रभावी संघटन न बनता, ते वैश्र्विक मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी हिंदू समाजाचे संघटन बनावे, हे संघस्थापनेमागचे ध्येय होते, त्याकडे जाणारी वाट बाळासाहेबांनी खुली करून दिली. ज्याला आपल्या असामान्यत्वाचे आंतरिक भान आहे व नियतीने आपल्यावर दिलेल्या जबाबदारीची जाणीव आहे, तीच व्यक्ती राष्ट्रीय प्रवाहात एवढा मूलगामी बदल घडवून आणू शकते. बाळासाहेबांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी आपले अलौकिकत्व, असामान्यत्व एका सर्वसामान्य स्वयंसेवकाच्या भूमिकेत झाकून टाकले. डॉ. हेडगेवारांवर बाळासाहेबांनी एक लेख लिहिला आहे. डॉ. हेडगेवार यांची संन्याशाची वृत्ती होती; परंतु त्यांनी संन्याशाची भगवी वस्त्रे परिधान केली नव्हती. त्या संबंधात बाळासाहेबांनी त्यांना एक प्रश्न विचारला आणि डॉक्टरांनी त्याचे जे उत्तर दिले, ते त्यांनी लेखात नमूद केले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर म्हणाले, ‘‘संन्यासी वेशाच्या माणसाकडे हा कोणी असामान्य पुरुष आहे, अशा भावनेने लोक पाहतात. माझ्याकडे तशा दृष्टीने लोक पाहू लागतील, तर मी करतो ते कार्य सामान्य माणसांना करणे अशक्य आहे, अशी चुकीची कल्पना लोक बाळगतील. आज मी अविवाहित राहून जेवढे कामकरू शकतो, तेवढे कामगृहस्थाश्रमी जीवन जगून करता आले असते, तर मला अधिक बरे वाटले असते. जनतेच्या दृष्टीने त्याचा परिणामअधिक झाला असता. कार्यकर्ता हा आपल्यासारखाच सामान्य माणूस आहे, अशी समाजाची धारणा झाली पाहिजे. मी संन्याशासारखा राहू लागलो, तर मला साधुपुरुष समजून फार तर माझ्या पायावर डोकी ठेवतील; पण मला प्रिय असलेले काममुळीच करणार नाहीत. त्यात माझे महत्त्व वाढले, तरी देशाचा काय फायदा?’’ त्यामुळे त्यांनी त करीत असता, आपण एक सामान्य स्वयंसेवक आहोत, या भूमिकेतून बदल केले. त्याचे परिणामआपण अनुभवत आहोत; पण ते बदल आपणच केले, अशी सर्वसामान्य स्वयंसेवकाची भावना असते.
- दिलीप करंबेळकर