“शर्रर्रर्वSSSSरी!!!”, खालून हाक.
“येतीये! येतीये! एकच मिनिट!”, मी. मोठ्याने.
“शरू! अग भरभर आवर, शाळेची रिक्षा आली!”, खिडकीतले तोंड आत करून, पुन्हा मी.
“झालं ग!”, शांतपणे पायात बूट अडकवत शरू म्हणाली.
“डबा घेतलास का? आणि पाण्याची बाटली?”, मीच.
“हो! हो! Relax! डबा, बाटली आणि for your kind information दप्तर पण घेतले!”, इतके म्हणून शरू जिन्यातून खाली उतरली सुद्धा.
मला दप्तरापेक्षा डबा – बाटलीचेच जास्त पडले असते, असे शरूचे मत आहे.
तिचे अगदीच काही चुकीचे नाही. रोज २ डबे शाळेचे, १ डबा क्लासचा, १ बाटली पाण्याची, कधी १ बाटली सरबताची, आणि कधीमधी मैत्रिणीसाठी एखादा डबा. अशी दप्तराच्या तोडीस तोड खाऊची बॅग घेऊन शरू शाळेला जाते. मला तर रोज आपण “डबा, बाटलीवालेSS!!” आहोत असे वाटते!
शरूच्या १०-१२ वर्षाच्या शालेय शिक्षणाने मला डबा भरायला शिकवलं. एक असे की डबा भरायचा म्हणजे न, घाईघाईने करून कोंबून दिला एकदाचा, असे allowed नाही. लवकर उठून, पदार्थ करून, गार झाल्यावर डब्यात भरला तरच छान होतो. आणि दुसरे म्हणजे शाळकरी मुले presentation ला सुद्धा मार्क देत असावेत! खूप लहान असतांना शरुला डब्यात शिऱ्याच्या मुदीवर दोन बेदाणे आणि एक काजू लावलेला ‘smiley’ असला तरच शिरा खायची. किंवा sandwich चे बरोबर नऊ चौकोनी तुकडे केले असतील तरच ते संपवायची. अशा प्रत्येकाच्याच काही बाही अंधश्रद्धा असतात. पण मधल्या सुट्टीत डबा उघडल्यावर, नीट भरलेला डबा पाहून, मन प्रसन्न झाले तर डबा नक्की संपतो!
काही शाळांमध्ये डब्याचे वेळापत्रक देऊन आयांची बरी सोय करतात. एकदा माझ्या मैत्रिणीकडे, सुचेताकडे गेले होते. तिच्या स्वयंपाकघरातील कपाटावर लावलेले डब्याचे वेळापत्रक जाम आवडले! सोमवारी - उसळ पोळी, मंगळवारी - भाजी पोळी, बुधवारी - sandwich, गुरुवारी - पुलाव आणि शुक्रवारी - शिरा / उपमा / पोहे.
एकूण डबे भरण्याच्या व्याप फार मोठा असतो. कुणाला वाटेल त्यात काय एवढे? खरे आहे, कृती लहानशीच असते, पण त्या मागे करावा लागणारा विचारच दमवून टाकतो! ‘डब्यात काय द्यायचे?’ या प्रश्नाचे उत्तर देतांना विचारात घ्यायच्या गोष्टींची लांबच लांब यादी आहे. शरुला आवडले पाहिजे, मला जमले पाहिजे, डब्यात मावले पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे. परत न सांडणारे, पौष्टिक आणि गार झाल्यावर सुद्धा चविष्ट लागणारे असावे. एक दिवस अशा फिल्टर मधून पास झालेल्या पदार्थांची एक जंत्रीच करून फ्रिजवर लावली. आता सकाळी उठून त्या जंत्री मधून एखादा पदार्थ निवडला की काम झालं!
माझ्या खूप मैत्रिणींनी त्या जंत्रीचे फोटो काढून नेले. काही जणींनी मुलांना बरोबर घेऊन त्यांच्या आवडीप्रमाणे एक एक यादी केली.
तर हीच ती प्रसिद्ध जंत्री! या मध्ये फक्त काही वेगळ्या पदार्थांची कृती दिली आहे, नक्की करून पहा! आणि तुमच्या आवडीचे डब्याचे पदार्थ सुद्धा कळवा!
पोळीचा पौष्टिक लाडू
कढईत थोड्या तुपात चिरलेला गुळ घालायचा. तो वितळला की त्यात थोडा दाण्याचा कुट, थोडे किसलेले खोबरे, भाजलेले तीळ, काजू, बेदाणे, बदामाचे तुकडे आणि शिळ्या पोळीचा कुस्करा घालून, दोनच मिनिटे मस्त खुसखुशीत परतायचे. जरा गार झाले की मग लाडू वळून डब्यात भरायचे.
पोळीचा रोल
कारळ्याची, जवसाची, लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी व पाव चमचा तेल – असे लावून केलेले रोल चविष्ट, पौष्टिक आणि पोटभरीचे पण होतात.
गुळांबा, साखरांबा, तूप-गुळ किंवा तूप-साखर लावून केलेले गोड रोल मुले आवडीने खातात.
उकडलेल्या बटाट्याचा कुस्करा + उकडलेला मका + मीठ, सॉस, चीझ. हे मिश्रण पोळीला लावून केलेले रोल नक्की संपतात.
फ्राईड राईस
फोडणीत उभा चिरलेला कांदा, वेगवेगळ्या रंगांची ढोबळी मिरची, उभे चिरलेले गाजर, लांब चिरलेला कोबी असे परतवून घ्यायचे. हळद, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. त्यामध्ये मोकळा केलेला भात घालून परत थोडे परतायचे.
गरम मसाला ऐवजी, पावभाजी मसाला किंवा सोया सॉस पण बेष्ट!
टीप - या पदार्थाला ‘फोडणीचा भात’ म्हणाल तर नाक मुरडून, “हे नको! दुसरं काहीतरी दे!” अशी प्रतिक्रिया मिळू शकते. - अनुभवातून शिकलेली आई.
सॅंडवीच
दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात अशी रेसिपी दाखवली होती. त्यात मला मानवतील असे थोडे बदल करून केलेली ही पाककृती -
फोडणीत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, आणि चिरलेला टोमाटो घालून परतवून घ्यायचे. गरम मसाला, थोडसं तिखट आणि चवी प्रमाणे मीठ घालायचे. त्यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून आणि चीझ किसून घालायचे. मिश्रण एकजीव करायचे. दोन ब्रेडच्या स्लाईस मध्ये लावून लोणी लावून तव्यावर भाजायचे.
पराठा
पराठा, थालीपीठ आणि कटलेट हा प्रितीचा, माझ्या मैत्रिणीचा हातखंडा आहे. कोणत्याही भाज्या घालून ती हे पदार्थ करते. पोटात गेलेली भाजी आपल्याला न आवडणारी होती याचा मुलांना पत्ता सुद्धा लागत नाही! तर पुढच्या दोन्ही रेसिपी मी तिच्याकडून शिकले.
सारण भरून पराठा – आलू, पनीर, चीझ, फुलकोबी यापैकी कशाचेही सारण भरून केलेले पराठे फस्त होतात.
साधे पराठे - कोबी / मुळा / मेथी / पालक / गाजर / वरण. त्यात आले, लसूण व मिरची वाटून, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, मीठ, धणे – जिरे पूड, कणिक, थोडं बेसन, थोडं ज्वारीचे पीठ, तांदळाची पिठी आणि थोडं तेल घालून मळून घ्यायचे. तेल लावून खरपूस भाजायचे.
कटलेट
उकडलेला बटाटा कुसकरून त्यात उकडलेला मका, आले, लसूण व मिरची वाटून, चवी प्रमाणे मीठ, किंचित साखर आणि ब्रेडचा चुरा घालून मळायचे. लहान चपटे गोळे करून बाजूने तेल सोडून तव्यावर परतवून घ्यायचे.
या मध्ये किसलेले गाजर, कोबी, बीट, मटार पण घालता येतो.
बटाट्याच्या ऐवजी भिजवलेले पोहे पण घालता येतात.
अप्पे
माझी आई, सौ. प्रभा, बेळगावची. तिने केलेल्या डोसे, अप्पे, अंबोळ्यांना तोड नाही. हमखास मस्तच होणारी ही रेसिपी -
१/२ वाटी उडीद डाळ, १ वाटी चणा डाळ, २ वाटी तांदूळ सकाळी पाण्यात भिजत ठेवायचे. संध्याकाळी वाटून घ्यायचे. त्यात १ वाटी भिजवून वाटलेले पोहे आणि २ वाटी रवा घालायचा. रात्रीतून पीठ छान फसफसून येते. सकाळी मस्त मोहरी घालून फोडणी करायची. फोडणीत मिरची, आले, भरपूर कडीपत्ता, कोथिंबीर वाटून घालायचे. पिठात मीठ आणि फोडणी घालून मिसळून घ्यायचे. मस्त खरपूस अप्पे करायचे.
या पिठात बारीक चिरलेला कांदा, उकडून जाडसर वाटलेला मका घालून देखील छान अप्पे होतात.
डोसे
काकडी किसून त्या मध्ये मावेल इतका रवा, मैदा व थोडे ताक घालून १५ मिनिटे झाकून ठेवायचे. नंतर मिरचीचे बारीक तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ घालायचे. नॉनस्टिक तव्यावर मस्त डोसे करायचे.
काकडी ऐवजी किसलेला दुधी भोपळा पण छान लागतो.
वाफोळी
ही रेसिपी आहे वंदनाची. वंदना माझी घरकाम मदतनीस, एकदा वाफोळीचे तयार पीठ घेऊन आली. नाश्त्याला मस्त गरम गरम वाफोळी केलेली, सगळ्यांना आवडली.
तांदूळ + चमचाभर मेथ्या - धुवून, वाळवून, मिक्सर मधून रावळ दळायचे. थोडंसं दही घालून, हवे तेवढे पीठ रात्री गरम पाण्यात भिजवायचे. सकाळी त्यात सुंठ पूड, वेलची पूड, दाण्याचा कुट, किसलेले खोबरे, किसलेला गुळ आणि किंचित मीठ घालायचं. लहान लहान डोसे करायचे.
इडली
इडली चटणी
व्हेज इडली चटणी
फळे
ही सगळी फळे न चिरता, अख्खी डब्यातून देता येतात.
संत्र
सफरचंद
केळे
चिक्कू
अंजीर
सलाड
राजमा आदल्या रात्री भिजवून ठेवणे आवश्यक. सकाळी मीठ घालून कुकर मधून उकडून घ्यायचा. त्यात मोठे चिरलेले टोमाटो, चिरलेली ढोबळी मिरची, मीठ, मीरी पूड, चाट मसाला, आणि मस्त लिंबू पिळायचा.
राजमा ऐवजी – छोले किंवा मक्याचे दाणे पण आवडीने खाल्ले जातात!
चिक्की
‘Breakfast Bar’ सारखा चिक्कीचा डबा पौष्टिक व ‘ready to eat’ असतो.
राजगिऱ्याची चिक्की
दाण्याची चिक्की
लाडू
सर्वसाधारणपणे रविवारी ५-१० लाडू करून ठेवले की पूर्ण आठवड्यासाठी एक डबा तयार असतो.
बेसनाचा
कणिकेचा
दाण्याचा
खजूराचा
नाचणीचा
डिंकाचा
अळीवाचा
लाल भोपळ्याचे घारगे
सारनोऱ्या
तिखट मिठाच्या पुऱ्या
थालीपीठ
साबुदाण्याची खिचडी
- दिपाली पाटवदकर