आज जवळपास प्रत्येकच घरांमध्ये काम करणारी मावशी येते. ती आपल्या घरची धुणी, भांडी, केर, फरशी, कपडे सगळं करते. अगदी अनेक वर्षांपासून काम करण्याऱ्या मावश्यांची आज्जी कधी होते ते कळतंच नाही. आपण तिच्या कामाचे तिला पैसे देतोच, मात्र अनेकदा ती आपल्या घरातील एक सदस्य होते. अगदी नकळत. माझ्या घरी सुद्धा रिंकी, गीता आल्या की आई आधी त्यांना म्हणायची, "पहले कुछ खा ले रे रिंकी, काम बाद में कर लेना.." ही अशी आत्मियता आपल्यात आणि त्यांच्यात निर्माण होते. त्याही अगदी हक्काने आपल्याला सगळं सांगतात. मात्र त्यांचं वय झाल्यावर जेव्हा त्यांच्याकडून काम होत नाही, तेव्हा त्यांची गरज संपते? ती आत्मियता संपते? याच विषयावर प्रकाश पाडणारा लघुपट म्हणजेच "आज्जी."
एक सुखवस्तु घर. त्यात अनेक वर्षांपासून एक आज्जी कामाला असते. त्या घरातली लहानग्यासाठी ती त्याच्या खऱ्या आज्जी प्रमाणेच असणार. त्या आज्जीने त्या घरातील अनेक पिढ्या बघितलेल्या असतात. मात्र आता त्या आज्जीचे वय झाले आहे, तिला काम करणे शक्य नाही. हे त्या घरातील स्त्रीला कळतं. आणि ती दुसरी कामवाली शोधायला लागते. पण कुठेतरी मन खात असतं. तिचं काय होणार?, तिला कसं सांगायचं या विचारात तिला काही केल्या काहीच सुचत नाही, आज्जी नेहमी प्रमाणे येते. आपल्या रोजच्या गोष्टी, कष्ट, कथा सांगते.. मात्र तिला हे सत्य समजणार का?.. तिची जागा कुणी दुसरं घेणार हे तिला कळंतं का?... कळलं तर?... जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा..
या लघुपटात आज्जीच्या भूमिकेत आहेत, दिग्गज अभिनेत्री ऊषा नाडकर्णी. सिक्स सिग्मा फिल्म्स तर्फे हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या लघुपटाला यूट्यूबवर ७ लाख ५३ हजार ६२७ व्ह्यूज मिळाले आहे. अत्यंत मार्मिक असा हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघा.
रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.