घानामधले हिंदू

    13-Jun-2017   
Total Views | 12

 


घाना हा पश्चिम आफ्रिकेतला एक छोटासा देश. ह्या देशाचं पूर्वीचं नाव गोल्ड कोस्ट होतं आणि भारतासारखंच घानामध्येही ब्रिटीशांचं राज्य होतं. आपल्यानंतर बरोबर एका दशकाने, म्हणजे १९५७ मध्ये घानाला स्वातंत्र्य मिळालं. सोनं आणि कोको हे ह्या देशाचे महत्वाचे निर्यात होणारे प्रोडक्टस ह्या जुजबी माहितीखेरीज घाना ह्या देशाबद्दल सर्वसामान्य भारतीयाला काहीही माहिती नसतं. मलाही नव्हतं. पण २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी मला घानामधल्या एका हिंदू माणसाचा फेसबुक वर संदेश आला. 'तुम्हाला खरंच असं वाटतंय का की, मोदी पंतप्रधान होतील ? आम्हा घानामधल्या हिंदू लोकांची फार इच्छा आहे की मोदी पंतप्रधान व्हावेत.'

 

आता तुम्ही म्हणाल की, यात इतकं आवर्जून सांगण्यासारखं काय आहे ? बऱ्याच अनिवासी भारतीयांना मोदी पंतप्रधान व्हावेत असं वाटत होतंच की. बरोबर आहे, पण मला हा प्रश्न विचारणाऱ्या माणसाचं नाव होतं भक्तीअर्जुन दादझी आणि तो घानामध्ये राहणारा अनिवासी भारतीय नव्हता, तर तिथलाच निवासी घानायन माणूस होता, तोही अगदी तरुण, अगदी बावीस-तेवीस वर्षांचा. मी त्याला विचारलं की, तू कुणाकडून हिंदू धर्माची दीक्षा घेतलीस. त्याने मला सांगितलं की तो घानामधल्या आफ्रिकन हिंदू मोनास्टरी ह्या हिंदू धार्मिक आश्रमाचा सदस्य आहे. हा आश्रम आफ्रिकन स्वामी घनानंद सरस्वती ह्यांनी १९७५ साली स्थापन केला. हिंदू धर्माची दीक्षा घेणारे आफ्रिकेतले ते पहिले काळे संन्यासी.

 

अर्जुनकडून हे कळलं आणि माझं कुतूहल चाळवलं. मी ह्या आफ्रिकन हिंदू मोनास्टरीबद्दल अधिक माहिती शोधायला सुरवात केली. अर्जुनच्या इतरही आफ्रिकन हिंदू मित्र-मैत्रिणींशी बोलले. स्वामी घनानंदांविषयी जे जे काही सापडेल ते वाचायला सुरवात केली. स्वामी घनानंद यांचं पूर्वाश्रमीचं नाव होतं गाईड. स्वामीजींचा जन्म झाला होता तेव्हा त्यांचे आई-वडील घानाचा पारंपारिक धर्म पाळायचे, पण पुढे मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन ते पूर्ण कुटुंब ख्रिस्ती झालं, पण गाईडचं काही त्यातून समाधान झालं नाही. त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं गाईडला बायबलमध्ये सापडत नव्हती. त्या उत्तरांच्या शोधत असतानाच कधीतरी त्याच्या हातात गीता पडली, आणि त्याला एकदम वाटून गेलं की आपण शोधत होतो ते तत्वज्ञान हेच आहे. गीता वाचून तरुण गाईड भारताच्या वाटेवर पोचला. भारतात ऋषीकेशला स्वामी शिवानंदांच्या आश्रमामध्ये राहून वेदाभ्यास करत असताना गाईडने हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि संन्यास घेण्याचाही. स्वामी शिवानंदाचे शिष्य स्वामी कृष्णानंद यांनी गाईडला संन्यास दीक्षा दिली आणि गाईडचा स्वामी घनानंद ह्या नावाने पुनर्जन्म झाला.


भारतात काही वर्षे राहून, संस्कृत भाषा आणि वेद-वेदांत ह्यात पारंगत होऊन स्वामी घनानंद मायदेशी परत गेले आणि त्यांनी आफ्रिकन हिंदू मोनास्टरी ह्या नावाने आश्रम सुरु केला. घानामध्ये आज जवळजवळ साडेबारा हजार लोक धर्माने हिंदू आहेत, त्यातले दहा हजार लोक आफ्रिकन वंशाचे आहेत. घानाची राजधानी आकरा येथे स्वामी घनानंदानी बांधलेले सुंदर मंदिर आहे. तिथे सकाळ संध्याकाळ शास्त्रोक्त पूजा चालते. गणेश चतुर्थीला तिथले लोक व्यवस्थित धोतर-बितर नेसून गणपती बसवतात. साग्रसंगीत आरत्या करतात. नवरात्र, शिवरात्र सगळ्या पूजा त्या मंदिरात होतात. अस्खलित संस्कृतात पूजा सांगणारे पुरोहितही आफ्रिकन आणि भक्तिभावाने पूजा करणारे भक्तही आफ्रिकन. मूळ भारतीय वंशाचे काही हिंदूही घानामध्ये आहेत आणि त्यांनीही बांधलेलं एक वेगळं हिंदू मंदिर आहे, पण स्वामी घनानंदानी बांधलेल्या मंदिरामध्ये भारतीय वंशाचे हिंदू लोकही उपासनेसाठी येतात.

 

अर्थात ख्रिस्ती आणि इस्लामी धर्माचं प्राबल्य असलेल्या घानामध्ये हिंदू धर्माचं पालन करणं सोपं नव्हतंच. स्वामी घनानंदानी एका मुलाखतीत सांगितलं होतं की सुरवातीला त्यांना खूप त्रास झाला. त्यांचे स्वतःचेच कुटुंबीय त्यांना समजून घेत नव्हते. पण हळू हळू त्यांची प्रवचनं, विचार ऐकून लोक यायला लागले. आपणहून हिंदू धर्मावरची पुस्तकं वाचायला लागले. स्वामीजी म्हणाले की, मी कुणालाही धर्म बदल म्हणून सांगायला गेलो नाही, मी फक्त वेदांवर, उपनिषदांवर, गीतेवर भाष्य करायचो. हिंदू तत्वज्ञानच इतकं सुंदर आहे की लोक स्वतःहून ह्या तत्वज्ञानाकडे आकर्षित व्हायला लागले. स्वामीजींनी हिंदू धर्मावर चौदा पुस्तके लिहिली आहेत. आज घानामध्ये आफ्रिकन हिंदू मोनास्टरीतर्फे शाळा, अनाथाश्रम, अपंगांसाठी संस्था चालवल्या जातात. दरवर्षी घानामधल्या गावांमध्ये जाऊन आश्रमाचे साधक मोफत वैद्यकीय शिबिरं चालवतात.


स्वामी घनानंदांशी मला बोलायचं होतं, पण तेव्हा त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. माझं दुर्दैव की मला स्वामी घनानंदांशी संवाद साधायची संधी मिळाली नाही. गेल्याच वर्षी स्वामीजींनी महासमाधी घेतली. पण त्यांचे उत्तराधिकारी आणि त्यांचे अनुयायी आजही घानामध्ये हिंदू धर्माची पताका उंच फडकवत आहेत. आज घानामध्ये पाच ठिकाणी आश्रमाच्या शाखा आहेत. अर्जुन दादझी, क्वेसी पशुपती स्टीव्हन्स, ना रुक्मिणी ओपिंतन अशी आफ्रिकन हिंदू नावं अभिमानाने मिरवणारे तरुण तरुणी आज घानामध्ये हिंदू म्हणून जगत आहेत.

 

मी अर्जुनला विचारलं, 'तुला हिंदू धर्म का आवडतो'. 'मी हिंदू आहे कारण मी मुक्त आहे. मी अमुक वेळेसच देवळात जावं, अमुकच पद्धतीने विचार करावा अशी जाचक बंधनं माझ्यावर ह्या धर्माने लादली नाहीयेत. मी जेव्हा डोळे मिटून ध्यान करतो, पूजा करतो तेव्हा मला आतून खूप शांत शांत वाटतं'. अर्जुन म्हणाला. 'तू भारतात आला आहेस का कधी?' मी विचारलं. 'नाही. पण मला खूप इच्छा आहे भारतात यायची. मला हिमालय बघायचाय. ऋषीकेशला गंगेत आंघोळ करायचीय. दक्षिण भारतातली सुंदर देवळं बघायची आहेत.' अर्जुन म्हणाला.

 

अर्जुनची आणि त्याच्यासारख्या अनेक आफ्रिकन हिंदूंची इच्छा लवकर पूर्ण होवो!

 

 

- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121