अवंती: मेधाकाकू, कालपर्यंत आजीकडुन आंब्याच्या आणि आंब्यापासून बनवायच्या आठ - दहा पाककृती शिकले मी आणि ती बनवत असताना तिला मदत सुद्धा केली. काय मस्त समजाऊन सांगते माझी आजी. नुसत्या आंब्याच्या वड्या नाही, तर गुळपोळी सारखी आंब्याची पोळी - खोबरे+आंब्याच्या करंज्या - ताकातला फजिता इथपासून आमरस आटवायची कृती. आजीने सग्गळे सग्गळे शिकवले मला, या आंब्याच्या मोसमात. आंब्याच आईसक्रीम तर तीन-चार वेळा झालंय गेल्या महिन्यात.!!
मेधाकाकू: सही है अवंती, म्हणजे तुझ्या शब्दात मस्त - मस्त.!! म्हणजे आज आपला वर्ग म्हणजे रसनाकौशल्य किंवा खाद्यसंस्कृतीची चर्चा आहे तर. काही हरकत नाही. आपल्याकडे भरपूर तयारी आहे, तर सुरू करूया आजच्या गप्पा. अवंती, “अन्न -वस्त्र- निवारा” या मानवाच्या तीन प्राथमिक गरजा आहेत हे आपल्याला अगदी लहान वयातच शिकवले जाते. वेगवेगळ्या शहरांत–प्रदेशात तुझा प्रवास झाला की, तुझ्या लक्षात येईल की, साधारणपणे जगभरातील बहुतेक सगळ्याच संस्कृतींमध्ये अन्न-धान्य-आहार-जेवण-भोजन या आपल्या प्रत्येकाच्या मूलभूत नियमीत दैनंदिन उपक्रमांची सांगड देवकृपेशी घातली गेली आहे जसे की, “नाम घ्या श्रीहरीचे” म्हणत आपण “उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म” म्हणून, सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार मानून आपले भोजन सुरू करतो, अशी आपली संपन्न खाद्यसंस्कृती. याकडे काही शतकांपासून आपला मराठी समाज कसं पहात आलाय ते ह्या दोन वाकप्रचारातून आपल्या लक्षात येते. एव्हाना आपल्या दोघींच्या लक्षात आलय की, प्रत्येक गोष्टीमध्ये मतमतांतरे असतातच. समाजातला एक जण म्हणतोय :
अधी देव मग जेव.
हा समाज आस्तिक आहे आणि आजचे भोजन ही देवाची कृपा आहे अशी त्याची श्रद्धा आहे. त्याच्याच बाजूला बसलेला दुसरा भोजन भाऊ म्हणतोय:
अगोदर भुक्ति मग भक्ति.
आधी देव वगैरे सगळे ठीक आहे, मला भूक लागलीये. मी आधी जेवतो, देवाचे आभार मानायचे कसे, ते त्या नंतर बघतो मी. कदाचित, समाजातला हा माणूस देव या संकल्पनेला स्वीकारायला तयार नसावा. आचार-विचार स्वातंत्र्य आहेच प्रत्येक नागरिकाला.
अवंती: ओहो...मेधाकाकू, म्हणजे इथेही या विचारांना विरोधक आहेतच की. याला विरोधक असे संबोधन मी वापरणार नाही. कारण तू म्हणालीस तसे, प्रत्येक गोष्टीमधे दोन बाजू, दोन भिन्न मते असणारच आहेत. हा समाजमनाचा- समाजव्यवस्थेचा नियमच आहे की.!!
मेधाकाकू: अवंती, किती समंजस झालीयेस तू. अगदी योग्य धारणा आहे तुझी. याचा मुख्य पाया म्हणजे तुझ्यात निसर्गात: असलेला संयम आणि विरोधी भूमिका असलेल्या समोरच्या व्यक्तिप्रती असलेले तुझे सौजन्य हीच आपली अभिमानास्पद भारतीय-मराठी संस्कृती...!! अवंती, असं दिसतय-जाणवतय मला की, अलीकडे आपल्या या गप्पातून नकळत तू समाज व्यवहार जाणून घेतीयेस...! राजकिय इर्षेपायी, संयम आणि सौजन्य विसरलेली मंडळी आज समाजात वावरतांना दिसतात आपल्याला. मात्र तू, तुझ्या या निसर्गदत्त वैयक्तिक गुणवत्ता जपून ठेवाव्यास असे मला वाटते. आता आपली मराठी समाजस्मृती पुढच्या दोन वाकप्रचारात असेच दोन विरोधाभास असलेले विचार मांडते...!!
अन्न तारी, अन्न मारी, अन्नासारखा नाही वैरी.
अवंती: अरेच्या... अगं मेधाकाकू पुन्हा एकदा हे तर दोन विरोधी विचार एकाच वाक्यात. हे कसे काय आणि तुझा पुढचा वाकप्रचार तर आणखीनच काही वेगळा दिसतोय...!
मेधाकाकू: हं... अवंतीबाई, तीच तर गंम्मत या आपल्या अभ्यासातली. मात्र या शब्दार्थाच्या पलीकडचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे हे नक्की...!! अन्न तारी, अन्न मारी, अन्नासारखा नाही वैरी. आता असे लक्षात घे की, या आणि पुढच्या वाकप्रचारातील सात शब्दात आपल्याला दोन धडे मिळतात. पहिला धडा आहे “विवेकाचा” दुसरा आहे “चातुर्याचा - संतुलित विचार क्षमतेचा”. अन्नाची गरज काय, ते पोषण कसे करते, त्या अन्नाची पोषणमूल्ये काय, ते किती खावे, त्याच्या अती सेवनाचे तोटे अशा सगळ्या गोष्टी समजून घेणे त्या विषयी साक्षर होणे - योग्य काय - अयोग्य काय त्याचा अभ्यास करणे हा पहिला विवेकाचा धडा. तर, शरीराच्या गरजेपेक्षा-जरूरीपेक्षा जास्त आहारामुळे मेदवृद्धी होते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून संतुलित आणि योग्य इतकाच आहार घेणे हा मानसिक भुकेला बळी न पडता चतुर-संतुलित विचारांचा हा दुसरा धडा. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी वेगळं सांगणारा हा वाकप्रचार बघुयात-
अन्नमय प्राण, प्राणमय शक्ती आणि शक्तीमय पराक्रम.
आता त्याच अन्नाच्या-आहाराच्या संदर्भातला वेगळा मुद्दा. या सात शब्दातून आपल्याला जणू ऊर्जा प्राप्त होते. कारण नेमका हाच विचार आपल्या समाजस्मृतीने, या वाकप्रचारात मांडला असावा. उत्तम आरोग्यासाठी आवश्यक अशा चौरस, संतुलित, प्राणदाई आहाराचे महत्व. त्यातून प्राप्त होणारी शक्ती-ऊर्जा आणि त्या सशक्त-ऊर्जेच्या पुरवठ्याने प्रत्येकाला दैनंदिन उपक्रमात मिळणारे यश. असा प्रवास या वाकप्रचारातून, मौखिक परंपरेने आज आपल्यापर्यंत सहज पोहोचतो. चतुर- व्यवहारी- अनुभवी जाणकारांचा हा सल्ला. हे आपल्या मराठी संस्कृतीचे पारंपारिक ज्ञान आणि बुद्धीवैभव. हे समजून घेण्यासाठी फार शिकलेल्या माणसाची गरज नाही. इतके सहज-सोपे आहे हे मार्गदर्शन...!!
अवंती: मेधाकाकू, आजी हेच सांगत होती आज सकाळी. तिने मला शिकवलेल्या आंब्याच्या पाककृती कुठेही लिहीलेल्या नाहीत. आजीची आई, तिची आई, तिची आई असे एका पिढीतून पुढच्या पिढीकडे हे ज्ञान प्रवास करत राहिले कारण आजीच्या तरुणपणापर्यंत ती एकत्र कुटुंबात राहिली. आज तुझ्यामुळे मला हे शिकता येतयं. मात्र विभक्त कुटुंबातल्या मुली-मुलांना ही संधी कधीच मिळणार नाहीये. असे मला सतत जाणवते. असो... आपण आपल्या अभ्यासात सतत पुढे जाणारच आहोत...!!!
- अरुण फडके