हरितायन

    08-May-2017   
Total Views | 4

 
वाचनातून निसर्ग अनुभवायची मजा वेगळीच असते. प्रत्यक्षात जेव्हा आपण वावरतो त्यातून बर्‍याचदा फक्त नेत्रसुखच अनुभवतो पण, हाच निसर्ग जेव्हा एखाद्या प्रतिभावान लेखकाच्या लेखणीतून येतो तेव्हा मनाला जास्त भिडतो, जास्त भावतो. त्यातले बारकावे आपल्यापुढे अलगद उलगडतात. आपल्या अनुभूतींना शब्दरूप येतं. या लेखकांचे किती सूक्ष्म निरीक्षण असतं, त्यांच्या अनुभवांची अभिव्यक्ती किती तलम, किती सुंदर असते याचा बोध होऊन अक्षरश: रोमांच उठतो. आपल्या बघण्यात किती ढोबळपणा होता याची जाणीव होऊन नवीन दृष्टीच मिळते. जणू Deja vu होतो, आपल्या आठवणींना, आपल्या भावनांना शब्द दिल्याचे भासही होतात आणि डोळे पाणावतात.
 
दुर्गाबाई भागवतांचे ‘ऋतुचक्र’ वाचताना असे झाले, डॉ. शरदिनी डहाणुकरांचे ‘वृक्षगान’ वाचताना नेमके हेच जाणवले आणि अगदी अलीकडे कांचन प्रकाश संगीत यांचे ‘हरितायन’ वाचताना याची पुन:प्रचिती झाली.
 
म्हणून ‘हरितायन’ वाचताना, ‘‘कांचनताई असं कसं जमतं तुम्हाला भावनांना शब्द द्यायला?’’ असे फोन केले.
 
कांचनताईंचं निसर्गाशी, वृक्षांशी खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. ही नाती ’हरितायन’ मधून अगदी सहजतेेने उलगडली आहेत. अगदी सहज-साधे रोज दिसणारे दहा वृक्ष आणि एक तुळस-तुकुमराईविषयी लिहिलेल्या आगळ्या वेगळ्या शैलीतलं हे अत्यंत वाचनीय पुस्तक सगळ्या कथा/प्रकरण वृक्षांवर असूनही कुठेच तोच तो पणा जाणवत नाही. त्याचे कारण असे की, प्रत्येक वृक्षाचं एक वेगळेपण त्यांनी अनुभवलं आणि ते जपलं चिंचेविषयी लिहिताना ’आंबट नव्हेच ती’ असे शिर्षक सुरुवातीला जरा अचंबित करते पण वाचता-वाचता चिंचेच्या गोडव्याची प्रचिती येते. एखादी गोष्ट गोड असायला साखरगोड किंवा गाभुळगोडच असावी असे नाही, तर ती तृप्त करणारी गोडीही असू शकते ना? काही वृक्ष स्थिर आणि आश्वासक असतात, काही हळवे, काही गंभीर तर काही मायाळू. एखादा राजबिंडा वृक्ष बघून नजरेचं पारणं फिटावं, हृदयाच्या ऋणातून मुक्त व्हावं आणि सतत भिरभिरणार्‍या मनाला एक निवांत क्षण मिळावा, हे केवळ एका कविमनाच्या सृजनशील लेखिकेकडूनच येऊ शकतं.
 
वाचताना, वाचून झाल्यावर प्रत्येक झाडाकडे -वृक्षाकडे बघण्याची आपल्याला नवीन दृष्टीच मिळते जणू. केवळ त्यांच्या पानाङ्गुलांनी नटलेल्या सौंदर्याबद्दलच नव्हे तर त्यांच्या अंतर्मनातही डोकवावेसे वाटते, त्यांच्याशी भावनिक नातं जोडावं, त्यांच्या शांत-शीतल गार सावलीत जरा बसावे. औदुंबराला विळ्याने केलेल्या घावातून चिक ओघळताना ज्या वेदना होत असतील त्या कांचनताईंना जाणवल्या... आपल्यालाही जाणवतील, Empathy, सहसंवेदना म्हणतात ना ती हीच. ङ्गक्त कुणीतरी आपल्याला त्याची जाणीव करून द्यावी लागते. पुस्तकं आपले आयुष्य समृद्ध करतात ते असे. ‘हरितायन’मध्ये आणखी एक गंमत आहे. गांभीर्य, तत्त्वज्ञान नकळत पाझरतं पण त्याचबरोबर कांचनताईंनी त्यांचं बालपण इतकं जपलं आहे, त्यातून खोडकर-मिश्किलपणा डोकावतो, आणि निखळ आनंदाची लयलूट करतो. ‘जांभूळमाया’ वाचताना खो-खो हसला नाही तर शप्पथ.
 
यात फक्त वृक्षांचेच नव्हे तर माणसांच्या व्यक्तिरेखाही उभ्या झाल्या आहेत. वृक्षांबद्दल जसा प्रेमभाव उद्दिपित होतो, तसाच यात आलेल्या व्यक्तींबद्दलही क्वचित राग, कधी लोभ- मायाही वाटे. चिंचेतल्या प्रकरणातल्या कल्याणकरबाईंनी इवल्या-इवल्या मुलींना मध्यरात्री एकटेच सोडल्याबद्दल राग आला. निशुमाईवर कधी राग तर कधी कीव. सावीचं जाणं चटका लावून जातं आणि आई, जरी कधी कडक वागली तरी तिची माया, तिचे अफाट ज्ञान हे सगळे तिच्याबद्दल केवळ प्रेमभावनाच येते.
 
कांचनताईंची लेखनशैली तर संपन्न आहेच. माहितीचा केवढा खजिना, किती रंगतदार गोष्टी, कविता- गाण्यांचा संचय. त्यामुळे लेखन खूपच समृद्ध झालं आहे. म्हणूनच एखादी कथा वाचली, त्यातून आनंद लुटला एवढ्यापुरती न राहता वृक्षाची संपूर्ण माहिती मिळाल्याचा दुहेरी आनंद मिळतो पण ही माहिती इतकी सहजतेने येते की, आपण नकळत बरंच शिकून जातो. त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवणारी आणखीन एक खुबी somerset  maugham ची आठवण करून देते. कथेच्या सुरुवातीला एखादी गोष्ट घेऊन विषयाबद्दल कुतूहल निर्माण करून, त्याबद्दल गोष्ट गुंङ्गून अगदी शेवटच्या घडीला त्याचा उलगडा करून आनंद देऊन जाणं ही maugham ची कला! बकुळ्या वाचतांना तो ’वाह क्षण’ असाच आला. खरंतर ‘हरितायन’ला कोणत्या पठडीत टाकणे अवघड आहे. यांना निव्वळ गोष्टी किंवा कथा म्हणायचं तर त्यात असंख्य आठवणी आहेत, जीवनातले अनुभव आहेत, पण हे आत्मचरित्रही नाही. ललित लेखन म्हणावं तर त्यातल्या माहितीच्या भांडाराला न्याय मिळणार नाही. म्हणून त्यास एक स्वतंत्र रंजक शैली म्हणणे जास्त इष्ट.
 
‘हरितायन’ वाचनालयातून आणून वाचून परत करण्यासारखं पुस्तक मुळीच नाही. ते आणावं, वाचावं, परत वाचावं, कायम तुमच्या Book Shelf  वर असावं. मग कधीही कोणतेही पान उघडावं, त्यातले जिवंत अनुभव अनुभवावे, सरग्रहण करावा, त्यांच्या बरोबरीने स्वच्छंद ङ्गिरावे, त्यांच्या वृक्षांच्या जादुई विश्वात रमावं आणि त्यांच्या प्रेमाच्या सावलीत जरा अंमळ निवांत विसावावे...!!
 
- अंजना देवस्थळे

अंजना देवस्थळे

लेखिका एमएससी इन हॉर्टिकल्चर असून पेशाने हॉर्टिकल्चर कन्स्लटंट आहेत. हॉर्टिक्लचर अर्थात ‘उद्यानविद्या’ क्षेत्रात त्या अध्यापन करतात, शिवाय या विषयातील तज्ज्ञ सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत असून विपुल लेखनही करतात. ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या त्या कार्यकर्ता असून पर्यावरणीय विषयांचा व्यापक अभ्यास आहे

अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121