मेधाकाकू: अवंती, आमच्याच घरांत इतकी लगबग सुरू आहे ना की, मला कुठलीच गोष्ट वेळेवर करता येत नाहीये अगदी घरभर पसारा झालाय.. या घरातल्या रंगकामामुळे...! आणि तू सुद्धा नव्हतीस चार-सहा दिवस म्हणून मी सकाळचे आवरले की तुमच्याच घरी येऊन बसत होते. आता तुम्ही सगळे आले आहात.... तर कशी झाली तुमची कोकण वारी.. काय काय मजा केलीत... कळू तरी दे मला...!!
अवंती: अरे मेधाकाकू ... एकदम मस्त झाली आमची कोकण वारी. थांब-थांब खूप फोटो काढल्येत तेच दाखवते. अगं... काय मस्त गाव आहे आणि गावांबाहेरचे देऊळ तर सुपर आहे आणि दुसरं म्हणजे मामाच्या दोन्ही मुली म्हणजे मुग्धा आणि स्निग्धा एवढ्या गोड आहेत ना आणि दोघीही डावर्या आहेत. मग जेवताना कुठल्या हातांनी जेवायचे त्याची गंम्मत सुरू असायची...!!
मेधाकाकू: अगं त्या चार-पाच वर्षाच्या होत्याना तेंव्हा आल्या होत्या इथे..... मला आठवतायत त्या दोघी आणि पटकन त्यावरून एक छान वाकप्रचार आठवलाय बघ मला.
कधी उजवा कधी डावा.
अवंती ही म्हण आत्ता आठवली. कारण तुझा मोठा भाऊ आदित्य आणि या दोन बहिणी डाव्या हाताचा वापर करतात आणि यांना आपण ‘डावरे’ असे संबोधन आपण वापरतो. एक लोकश्रुती अशी की, उजवा हात हे यशाचे प्रतीक तर डावा हात अपयशाचे प्रतीक. असा समज किंवा लोकंभ्रम लोकमानसात होण्याचे कारण असावे की, दैनंदिन जीवनात यशापयशाचे चढउतार होत असतातच आणि मग वाममार्ग म्हणजे चुकीचा अपयशाकडे घेऊन जाणारा, आणि म्हणून उजवा हात यशदाई असे हे गणित. परंतु राजकीय आणि सामाजिक विचार धारणांना सुद्धा उजवी किंवा डावी विचारसारणी असे संबोधन वापरले जाते. कम्युनिझम, मार्क्सवाद, माओवाद, लाल बावटा किंवा साम्यवादी अशा राजकीय विचारसरणीना वामपंथी किंवा डावी राजकीय मतप्रणाली असे संबोधन मान्यताप्राप्त आहे... गेल्या शंभर वर्षांचा इतिहास पहिला तर एक लक्षात येते की, अशी डावी राजकीय सत्ता फार यशस्वी झाली नाही कारण वैयक्तिक सत्ता लालसेपायी यातील मूलभूत आर्थिक मांडणीच हवी तशी वाकवली आणि या डाव्या किंवा वामपंथी मंडळींनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला... मात्र एक लक्षात ठेव अवंती, निसर्गदत्त प्रवृत्तीने डाव्या अथवा उजव्या हाताचा वापर रोजच्या जीवनात करणारी मंडळी यांचा या राजकीय प्रणालीशी दूरान्वयेही संबंध नसतो. तुला याचा त्रोटक परिचय देण्याचे कारण असे की, सध्या यांचा हिंसाचार आणि याची फार चर्चा जोरात सुरू आहे...!!
अवंती: मेधाकाकू.... मी खरेच याचा विचार करत होते... रोजच्या वर्तमानपत्रात असे उजवे – डावे काही वाचनात येत होतेच. आता मी तुला यातील अजून काही विचारात राहीनच. पण ही म्हण बघ काय सांगतीये ते...!!
अंगास रक्त लाऊन घायाळात घुसावे.
मेधाकाकू: ओहो... फार वेगळीच भूमिका मांडतोय हा वाकप्रचार. याचा भावार्थ नीट लक्षात घ्यायला हावा की, दांभिक-ढोंगी व्यक्तीने न घडलेल्या प्रसंगाचे अतिशयोक्तीने केलेले वर्णन यातून व्यक्त होते आणि योगायोग असा आहे की, गेल्यावेळेस आपण दोघी ज्या बातमीची चर्चा करत होतो त्या विषयाला हा कालातीत वाकप्रचार किती चपखल वाटतो.
ती बातमी आहे, रेल्वे व्यवस्थापनाने प्रवाश्यांच्या सोयीसाठी काढलेले एक पत्रक, लांबच्या प्रवासात रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या दही... या संदर्भात. हे पत्रक म्हणजे मुरावि म्हणजे मुद्रा राक्षसाचा विनोद किंवा उसंडु म्हणजे उप संपादकाच्या डुलक्या यात मोडणारे. म्हणजे ही निव्वळ चुकीच्या आकडे-शब्द वापराची गफलत परंतु याचा वापर आपल्या प्रचारासाठी करून घेताना स्वघोषित संधीसाधू राजकीय विश्लेषकांनी जे केले त्याला आपण म्हणू शकतो. अंगास रक्त लाऊन हे घायाळात घुसले....!! यातील कोणी कधी रेल्वेने प्रवास केला असेल याची शंका यावी, मात्र या ‘दही’ या पत्रकावरून इतकी दिशाभूल रचली की हा वाकप्रचार सार्थ झाला. घायाळ व्यक्तीला सहाय्य करणे बाजूलाच... पण अंगाला रक्तं फासून घायाळ बनायची आणि त्यातूनही फायदा करून घेण्याची ही हीन प्रवृत्ती...!!
अवंती: अरेच्या.... मेधाकाकू.... काय विलक्षण आहे ही चार-पांच शब्दांची कमाल. यालाच आपण ‘कालातीत’ असे संबोधन आपण वापरतो... बरोबर आहे ना आणि हेच शब्द आपल्याला आपल्याच समाजातील नागरिकांच्या किती वेगवेगळ्या मनोवृत्तीचा परिचय ही करून देतात... हे लक्षात येते. हे मराठी भाषेचे सौंदर्य अफलातून आहे..!!
- अरुण फडके