माय-लेकी

    04-May-2017   
Total Views | 16

 

माझ्या वाचन प्रवासावर नुकताच एक लेख लिहिला होता त्यात माझ्या आवडत्या लेखिका म्हणून इरावती कर्वेंचा आवर्जून उल्लेख केलेला होता. तो लेख वाचून मला एका वाचकाने मेल पाठवली त्यात त्याने मी इरावती बाईंचं नाव घेतलं पण त्यांचीच लेक आणि ख्यातनाम लेखिका गौरी देशपांडे ह्यांना माझ्या यादीतून वगळलंच कसं असा प्रेमळ जाब विचारला होता. ती मेल वाचून मीही क्षणभर विचारात पडले. गौरी देशपांडेंचं लिखाण मी अर्थातच वाचलंय. काही पुस्तकं तर एकाहून जास्त वेळा वाचली आहेत. 'एकेक पान गळावया', 'आहे हे असं आहे', 'निरगाठी आणि चंद्रिके गं, सारीके गं', आणि 'विंचुर्णीचे धडे' ही पुस्तके दोन-तीन वेळा तरी वाचून झालेली आहेत माझी आणि तरीही, वाक्यं आठवायची म्हटली तर 'विंचुर्णीचे धडे' हे एकमेव पुस्तक वगळता माझा मेंदू गौरी देशपांडेंच्या पुस्तकांबद्दल बऱ्यापैकी कोरा आहे. 


तेच इरावतीबाईंच्या अनेक पुस्तकांमधले उतारेच्या उतारे मला पाठ आहेत, आणि खूपदा मी माझ्या आयुष्यातला एखादा उत्कट अनुभव घेत असताना, मला इरावतीबाईंच्या अनेक ओळी माझ्याही नकळत आठवतात. सिक्कीममध्ये एकदा एकटीच फिरत होते. तिथे एखाद्या डोंगराळ, अनवट वाटेवर तिथून जाणारे लोक दगडावर दगड रचून पूर्वजांसाठी छोटासा 'चोरटेन'रचतात. किंबहुना ही पद्धत पहाडी मुलखात सगळीकडे दिसते. मी एकदा स्कॉटलंडमध्ये फिरताना असेच दगड रचलेले पाहिले होते, तेही तिथल्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्याआठवणींसाठीच रचलेले होते. अमेरिकेत न्यू मेक्सिकोमध्ये तिथल्या नेटिव्ह अमेरिकन लोकांच्या पुएब्लोमध्ये देखील असे दगड रचलेले बघितले आहेत. पण जिथे कुठे ते दगड मी बघितले तिथे तिथे मला इरावतीबाईंच्या ओळी आठवल्या. त्या बद्री-केदारच्या तीर्थयात्रेवर गेलेल्या असताना त्यांनी तिथे असे दगड रचलेले बघितले होते आणि त्यांना एक गाणं आठवलंहोतं 'असा पुतूर इमायनी, रचे दगडांच्या टिमायनी'. मला त्याच ओळी नेमक्या आठवल्या प्रत्येक ठिकाणी. पाच-सहा वर्षांपूर्वी मी पुण्याहून सासवडपर्यंत पालखीबरोबर पायी वारीत चालले होते तेव्हाही माझ्या मनात घोळत होते ते इरावतीबाईंचे 'वाटचाल' ह्या दीर्घ लेखातले शब्द. त्या मानाने गौरी देशपांडेचं लिखाण माझ्यासाठी कायम दूरस्थ, परकंच राहिलं, एक 'विंचुर्णीचे धडे' मात्र मला खूप जवळचं वाटलं. 

 

खरंतर इरावतीबाई माझ्या आजीच्या पिढीच्या प्रतिनिधी आणि गौरी देशपांडे माझ्या आईच्या पिढीच्या, पण एक वाचक म्हणून माझं नातं जुळलं ते मात्र इरावतीबाईंच्या शब्दांशी. त्यांचं पहिलं पुस्तक, परिपूर्ती, मी वाचलं ते मी मराठी विषयाला लावलं होतं म्हणून पण ते मला इतकं आवडलं की त्यानंतर मी इरावतीबाईंची मिळतील ती पुस्तकं शोधून आणून वाचली. ती पुस्तकं वाचताना जाणवलं की इरावती थोर मानववंश शास्त्रज्ञ होत्या, अत्यंत सिद्धहस्त ललित लेखिका होत्या, बुद्धिवादी होत्या आणि सश्रद्धही होत्या. त्यांचं लिखाण त्यांच्या आजूबाजूच्या समाजापासून कधीही तुटलं नाही. समाजातल्या ज्या गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत त्याबद्दल त्यांनी योग्य तेथे योग्य शब्दात टीका जरूर केली, पण समाजापासून त्यांनी स्वतःला सर्वस्वी तोडून कधीच घेतलं नाही. ह्याउलट गौरी देशपांडेंचं लिखाण मला फार काल्पनिक आणि स्वप्नरंजनात रमणारं वाटतं. त्यांच्या पुस्तकात दिसणाऱ्या नायिका, त्यांच्या आयुष्यात येणारे पुरुष आणि प्रसंग हे बरेचदा वास्तवापासून तुटलेले वाटतात मला. कदाचित गौरी देशपांडेंचा प्रखर व्यक्तिवाद माझ्या मध्यममार्गी मनाला झेपत नाही म्हणूनही असेल. 

 

इरावतीबाईंनी आपल्या घराबाहेरच्या आयुष्यात कधी तडजोड केली नाही पण आपलं कौटुंबिक गणगोतही तितक्याच जिव्हाळ्याने सांभाळलं. त्यांच्या लिखाणात भेटलेली त्यांची मुलं गौरी,जाई आणि नंदू माझ्या डोक्यात इतकी बसलेली होती की पुढे फार वर्षांनी पुण्यात एका समारंभात आनंद कर्वे दिसले आणि कुणीतरी म्हणालं हे इरावतीबाईंचे चिरंजीव तेव्हा मी पटकन बोलून गेले, 'हां हां, म्हणजे नंदू?' इरावतीबाईंनी रंगवलेल्या व्यक्तिरेखा जशा माझ्या मनात खूप खोलवर रुतून बसलेल्या आहेत. मग ती चार पैशासाठी आपली बुरकुली विकायला साफ नकार देणारी नेरळ स्टेशनवरची कातकरीण असो किंवा फॅमिली कोर्टात उभी राहिलेली नखरेल वेश्या. गौरी देशपांडेंची कुठलीच व्यक्तिरेखा तशी माझ्या मनाला भिडली नाही, त्यातल्या त्यात निरगाठ मधली आई सोडली तर. विंचुर्णीचे धडे मधला गोरक्ष आणि नानी मात्र अजून लक्षात आहेत. 

 

कदाचित इरावतीबाईंसारखी मी ही मध्यममार्गी आहे म्हणून असेल पण गौरी देशपांडेंपेक्षा इरावतीबाईंचं लिखाण मला जास्त ह्या मातीत रुजलेलं, रसरशीत कसदार आणि जिवंत वाटतं. इरावतीबाईंनी सामाजिक चौकट मोडली नाही, पण त्या चौकटीचे एका बाजूचे खिळे उचकटून त्यांनी त्या बाजूचं सहज उघड-जप करणारं फाटक केलं. जे त्या कधीही उघडून बाहेर जायच्या, परत यायच्या, मनात आलं तर उघडं ठेवायच्या, मनात आलं तर बंद करायच्या. गौरी देशपांडेंचं लिखाण वेगळंच होतं. त्यामध्ये स्वतःलाच कंदासारखं सोलत पार आत गाभ्यापर्यंत जायचा निर्ममपणा होता. 'समाज' ह्या चौकटीशी गौरी देशपांडेंना कधीच फारसं काही देणं-घेणं नव्हतं, जे त्यांच्या सर्व व्यक्तिरेखांमधूनही दिसतं. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही त्या स्वच्छंद, मनःपूतच वागल्या. अर्थात तसं वागण्याचा हक्क प्रत्येकाला आहेच पण मग अश्या माणसांनी संसाराचा लिप्ताळा वाढवून ठेवू नये, कारण मग त्या व्यक्तीचीही कुतरओढ होते आणि तिच्या आयुष्यातल्या इतरांचीही, विशेषतः मुलांची. 

 

आपल्या आयुष्याच्या शेवटी श्री. पु. भागवतांना लिहिलेल्या एका पत्रात गौरी देशपांडे म्हणतात 'मला स्वतःला काही मूलभूत प्रश्न पडताहेत.  इरुसारखी आई असणाऱ्या कुणाही मुलीला ते पडणारच. ती जर आयुष्याच्या इतक्या आघाड्यांवर यशस्वी ठरली तर मीच सर्व बाजुंनी इतकी दुबळी, लंगडी का ठरले'? अर्थात ह्या प्रश्नामध्ये ह्या टप्प्यावर आल्यानंतर गौरी देशपांडेंना ज्या वैफल्याने आणि व्यसनाधीनतेने ग्रासलं होतं त्यातून आलेल्या नैराश्याचा भाग खूप मोठा आहे. तरीही मला असं वाटतं की सर्व सामाजिक बंधनं झुगारून स्वतःला हवं तसं अत्यंत व्यक्तिवादी जीवन जगताना देखील गौरी देशपांडेंसाठी यशाचा मापदंड हा समाजाच्या परिघात राहून, घरच्यांच्या पूर्ण सहकार्याने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक असे यश संपादन करणाऱ्या इरावतीबाईंच्याच आयुष्याचा होता.  

 

अर्थात ह्या माय-लेकींपैकी लेखिका म्हणून कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे ठरवायचा अधिकार माझा नाही, पण एक वाचक म्हणून मला इरावतीबाई जितक्या जवळच्या वाटतात तितक्या गौरी देशपांडे वाटत नाहीत. हे मूल्यमापन माझ्यापुरतं आहे आणि ह्यात माझ्या प्रकृतीचा आणि पूर्वग्रहांचाही भाग आहे हे स्पष्टच आहे. परत प्रश्न येतो तो 'विंचुर्णीचे धडे' चा. हे पुस्तक मात्र मला मनापासून आवडतं कारण ह्यात दिसतात त्या गौरी देशपांडे त्यांच्या टोकाच्या व्यक्तिवादापासून थोड्या मागे हटलेल्या आहेत. आजूबाजूच्या मातीत रुजू पाहणाऱ्या आहेत, आपल्या परिघाबाहेरच्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आहेत. विंचुर्णीचे धडेमध्ये मला गौरी देशपांडे कमी आणि इरावतीबाईंची लेक जास्त दिसते, कदाचित म्हणूनच मला ते पुस्तक इतकं आवडत असेल. 

 

 

- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121