'शपथ' हे आपल्या देशाचे राष्ट्रीय खाद्य आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या इथे काहीही झालं की ते खरं आहे का खोटं हे जाणून घेण्यासाठी जर काही उपाय असेल ते ते म्हणजे 'शपथ'. लहान मुलांकडून त्यांची एखादी खोडी पकडण्यासाठी किंवा काहीही जाणून घेण्यासाठी आपण हमखास बोलून जातो, "खा आईची शपथ", "घे विद्येची शपथ".. हे असं एकूणच आपल्याला काही नवीन नाही.
मात्र जेव्हा आपण खरंच खोटं बोलत असतो, आपण चुकीचे असतो मात्र केवळ स्वत:ला बरोबर सिद्ध करण्यासाठी आपण शपथ घेतो, तेव्हा कुठेतरी आपल्या मनात एक अस्वस्थता असते. आणि जर ते एक लहान मूल असेल तर नक्कीच. लहान मुलांच्या मनात काही गोष्टी ठाम बसलेल्या असतात. त्यात 'ज्याची आपण खोटी शपथ खातो तो व्यक्ती मृत्युमुखी पडतो' हे तर अगदी ठासून बसलेलं आहे. याच संकल्पनेवर आधारित ही कहाणी आहे 'विद्या कसम.'
अमित एक छोटा मुलगा. आपल्या वर्गमित्राचा लाल चेंडू त्याला खूप आवडतो आणि तो चेंडू अमित स्वत: कडे ठेवतो. वर्गमित्राच्या दमदाटीनंतर अमित आपल्या गावाकडच्या आज्जीची खोटी शपथ घेतो आणि म्हणतो की मी चेंडू घेतला नाही... मात्र आता त्याचं मन सतत त्याला खात राहतं. जर आपल्या आज्जीला काही झालं तर?.. ज्या आज्जीवर त्याचं इतकं प्रेम होतं तीचीच थोटी शपथ त्याने खाल्ली होती. मग आता?...
त्याच्या शपथेचं काय होतं? त्याच्या आज्जीचं काय होतं? जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा..
या लघुपटात ज्येष्ठ व्यक्तींना त्यांच्या मुलाने आणि सुनेने वाळईत टाकणे, किंवा दुर्लक्ष करणे या प्रश्नाकडेही लक्ष वेधून घेण्यात आले आहे. त्याची आज्जी गावाकडे का असते? ती त्यांच्या सोबत का राहत नाही असे असंख्य प्रश्न अमितच्या मनात असतात..
यूट्यूबवर या लघुपटाला ७,०२८८० व्ह्यूज मिळाले आहेत. इमोशनलफुल्स प्रस्तुत, दिव्या प्रकाश दुबे लिखित आणि संदीप झा दिग्दर्शित या लघुपटाच्या शेवटी एक संदेश दिला आहे... "शेवटी कितीही आनंदी किंवा कित्तीही दु:खी असू देत पण सगळ्यात मोठे सत्य ते असते ज्यावर आपण विश्वास ठेवतो."...
या ओळींचा अर्थ समजून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा...