‘थलायवा’चे राजकीय रागरंग

Total Views |
 
 
‘थलावया’ अर्थात नेता, बॉस आणि सध्या तामिळनाडूसह अवघ्या देशाचं लक्ष लागलयं ते तामिळ सुपरस्टार थलावया रजनीकांतच्या राजकीय पक्षस्थापनेच्या निर्णयाकडे. तेव्हा, रजनीकांत नवीन पक्ष सुरु करणार की भाजपचा तामिळनाडूतील चेहरा ठरणार, याचा ऊहापोह करणारा हा लेख...
 

 
डिसेंबर, २०१६ मध्ये अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ होईल, असा अंदाज होताच. त्यांचा पक्ष अपेक्षेप्रमाणे फुटला असून आता दोन तुकड्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. याचे कारण यातील प्रमुख अडथळा म्हणचे शशिकला तुरुंगात आहेत व त्यांना सहा वर्षे निवडणुका लढविता येणार नाही.
 
तामिळनाडूतील दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे द्रमुक. या पक्षाचे नेते एम. करुणानिधी आता ९३ वर्षांचे झाले आहेत. त्यांचे दोन सुपुत्र स्टालीन व अलेगिरी यांच्यात द्रमुकच्या नेतृत्वावरून संघर्ष होण्याच्या शक्यता आहेत. थोडक्यात म्हणजे, लवकरच तामिळनाडूच्या राजकीय परिस्थितीत जबरदस्त उलथा पालथी होणार आहेत. याचा फायदा घेण्यासाठी भाजप जसा टपून बसला आहे, तसेच अनेक शक्ती आहेत, ज्या या दिशेने प्रयत्न करण्याच्या शक्यता आहेत. यातील एक जोरदार शक्यता सध्या वर्तवली जातेय ती म्हणजे तामिळी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची. त्यामुळे तामिळनाडूचे राजकारण घुसळून निघण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, तामिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत (जन्मः १९५०) यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात, ते हा नेमका निर्णय कधी जाहीर करतील याबद्दल अजून थोडीशी संदिग्धता आहे. पण, आज तरी त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेमुळे तामिळनाडूच्या राजकारणाची हवा गरम झाली आहे, यात शंका नाही.
 
अखिल भारतीय राजकारणाचा विचार केल्यास असे दिसते की, भारतात दोन-तीन प्रकारच्या राजकीय संस्कृती नांदत असतात. भारतातील सांस्कृतिक व भाषिक वैविध्यता बघता हे काही प्रमाणात अटळ आहे. उत्तर भारताच्या व दक्षिण भारताच्या राजकीय संस्कृतीत फार फरक आहे. दक्षिण भारतात खासकरून तामिळनाडूमध्ये चित्रपट क्षेत्र व राजकीय क्षेत्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. एम. जी. रामचंद्रन काय किंवा जयललिता काय किंवा अण्णा दुराई काय किंवा आता द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी काय, या मंडळींनी तामिळ चित्रपट क्षेत्रात नाव कमावले. तसे उत्तर भारत, पश्चिमभारत किंवा पूर्व भारतात नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांनी राजकारणात प्रवेश करून पाहिला, पण त्यांना एक तर साफ अपयश आले (अमिताभ बच्चन) किंवा किरकोळ यश मिळाले (हेमा मालिनी- विनोद खन्ना). ज्यांना यश मिळाले त्यांनासुद्धा मुख्यमंत्रिपद वगैरेसारखी सत्तेची स्थानं मिळविता आली नाहीत. तो मान दक्षिणेतील तामिळनाडू व थोड्या प्रमाणात आंध्र प्रदेशातील एन. टी. रामाराव वगैरेंच्याच नशिबी होता.
 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून तामिळनाडूत (तेव्हाचा मद्रास प्रांत) तामिळी सिनेसृष्टी व राजकीय नेते यांचा घनिष्ठ संबंध राहिलेला दिसून येतो. द्रविड चळवळीतील अनेक नेते सिनेमात होते. १९५२ प्रदर्शित झालेला ’पराशक्ती’ हा चित्रपट कमालीचा लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाची पटकथा अण्णा दुराई यांनी लिहिली होती, तर यात शिवाजी गणेशन यांची प्रमुख भूमिका होती. हे दोन्ही नेते द्रमुक या राजकीय पक्षाचे संस्थापक-सदस्य होते. द्रमुक नेत्यांनी फार सफाईने चित्रपट या माध्यमाच्या लोकप्रियतेचा वापर करून द्रमुकला लोकप्रिय बनविले. पुढे द्रमुकने अनेक चिटपट बनविले, पण कॉंग्रेसच्या हातात सत्ता असलेल्या राज्य सरकारने सेन्सॉर बोर्डाचा वापर करून द्रमुकने बनविलेल्या चित्रपटांत वाट्टेल तशा दुरुस्त्या सुचवयाला सुरुवात केली. यामुळे द्रमुकने बनविलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत असत. तेव्हापासून तामिळनाडूत चित्रपटसृष्टी व राजकारण यांच्यातील नाते घट्ट होत गेले. आजपर्यंत तामिळनाडूच्या सात मुख्यमंत्र्यांपैकी पाच मुख्यमंत्री सिनेसृष्टीशी या ना त्या नात्याने जोडलेले होते.
 
तामिळनाडूच्या चित्रपट क्षेत्रात रजनीकांत यांचे स्थान अढळ आहे. ते खर्‍याअर्थाने ‘सुपरस्टार’ आहेत. दोन दशकांपूर्वी त्यांनी ’मथ्थू’ची केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. तसे पाहिले तर रजनीकांत मराठी माणूस आहे. त्यांचे खरे नाव आहे शिवाजीराव गायकवाड व त्यांचा जन्म बंगळुरू येथे झाला. म्हणून ते कन्नडसुद्धा आहेत. तरुणपणी त्यांनी बंगळुरू शहरातील बस सेवेत कंडक्टर म्हणून नोकरी केली होती. नंतर त्यांनी मद्रास शहरातील ’मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट’ मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यांना १९७५ साली एका तामिळी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. बघता-बघता रजनीकांत तामिळी चित्रपटसृष्टीचे सुुपरस्टार झाले.
 
तामिळी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला. ज्यांना जमले नाही ते अभिनेते थोडासा प्रयत्न करून परत गेले. उदाहरणार्थ, १९८८ साली शिवाजी गणेशन यांनी एक राजकीय पक्ष काढून बघितला होता. त्यांच्या पक्षाने १९८९ साली झालेल्या निवडणुका लढवून बघितल्या, पण पक्षाचे सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यांनी लवकरच पक्ष विसर्जित केला.
 
दक्षिण भारताची राजकीय संस्कृती द्रविडांच्या अस्मितेवर उभी आहे. तामिळनाडू हे राज्य दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य. तेथे १९६७ सालापासून द्रमुक किंवा अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांपैकी एक पक्ष सत्तेत असतो. यापैकी अण्णा द्रमुकच्या जयललिता यांना डिसेंबर, २०१६ मध्ये देवाज्ञा झाली, तर द्रमुकचे करुणानिधी आज ९३ वर्षांचे आहेत. अशा स्थितीत तामिळनाडूमध्ये काय होईल, याबद्दल उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक आहे. द्रमुक किंवा अण्णाद्रमुकमधील यादवीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजप कमालीचा उत्सुक आहे. त्याचप्रमाणे रजनीकांत यांच्यासारखे सुपरस्टारसुद्धा आपले नशीब आजमावून बघण्याची शक्यता आहेच. तसे पाहिले तर रजनीकांत यांनी या अगोदर राजकारणात हातपाय मारून बघितले आहेत. त्यांनी १९९६च्या निवडणुकांत द्रमुक व तामिळ मनिला कॉंग्रेस यांच्या युतीला जाहीर पाठिंबा दिला होता. तो काळ जयललितांसाठी फार वाईट होता. त्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत गुरफटल्या होत्या. ही संधी साधून करुणानिधी यांनी रजनीकांत यांचा पाठिंबा मिळविला होता.
 
आता पुन्हा एकदा रजनीकांत राजकारणात नशीब आजमावून पाहण्याची शक्यता आहे. आता ते ६६ वर्षांचे आहेत. त्यांचे अक्षरशः शेकडो चाहते आहेत. आज त्यांच्या ’काला करिकालन’ या भव्य चित्रपटाची चर्चा आहे. राजकीय क्षेत्रासारख्या पूर्ण वेळ मागणार्‍या कामाला ते कितपत वेळ देऊ शकतील, याबद्दल रास्त शंका घेतल्या जात आहेत. २००८ साली त्यांच्या चाहत्यांनी कोईम्बतूर येथे त्यांच्यासाठी पक्षाची स्थापना केली; पक्षाचे नाव व झेंडा निश्चित केले होते. कोठे माशी शिंकली ते कळले नाही, पण रजनीकांत यांनी पत्रक काढून ‘‘या पक्षाशी माझा काहीही संबंध नाही,’’ असे जाहीर केले. त्यामुळे रजनीकांत यांचा पक्ष जन्मण्याअगोदरच मृत झाला.
 
आता पुन्हा एकदा ते राजकारणात येण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अर्थात, अधिकृत घोषणा होईपर्यंत याबद्दल ठामपणे विधान करता येणार नाही. आजच्या स्थितीत त्यांच्यासमोर दोन ठळक पर्यात आहेत. एक म्हणजे, स्वतःचा पक्ष स्थापन करायचा किंवा दुसरा पर्याय म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा. भाजप त्यांना प्रवेश द्यायला तयार आहे. भाजपला रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून स्वतःचा विस्तार करावयाचा आहे. या बदल्यात रजनीकांत यांना भाजपची पक्षयंत्रणा आयतीच वापरायला मिळेल. आजच्या काळात नवीन पक्ष स्थापन करणे तसे जिकरीचे आहे. गावोगाव कार्यालये स्थापन करणे, पदाधिकारी नेमणे, त्यांच्या कारभारावर सतत नजर ठेवणे वगैरे भरपूर कामं असतात. शिवाय फार म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर पैसा ओतावा लागतो. एवढे करून यश मिळेल की नाही, हे ठामपणे सांगता येत नाही.
               
येथे रजनीकांत यांची तुलना एन. टी. रामाराव (जन्मः १९२३) यांच्याशी करण्याचा मोह आवरत नाही. रामाराव यांनीसुद्धा वयाच्या ६०व्या वर्षी राजकारणात उडी घेतली होती व राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्यांनी १९८२ साली स्थापन तेलुगू देसमपार्टी पुढच्याच वर्षी सत्तेत आला. याचे कारण आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा राजकीय इतिहास खूप वेगळा आहे. तामिळनाडूमध्ये गेली अनेक दशकं केंद्राविरुद्धचे राजकारण जोरात आहे, तसेच आंध्राचे नव्हते. रामाराव यांनी पक्ष स्थापन केला, तेव्हा तो पहिलाच प्रादेशिक पक्ष होता. तामिळनाडूत आजही अनेक छोटे-मोठे प्रादेशिक पक्ष आहेत. अशा वातावरणात रजनीकांत यांनी जर नवा पक्ष काढला, तर त्यांना फार मेहनत करावी लागेल यात शंका नाही. त्याऐवजी भाजपसारख्या पक्षात जाणे केव्हाही श्रेयकर! रजनीकांत कोणता पर्याय स्वीकारतात, हे लवकरच कळेल.
 
- प्रा. अविनाश कोल्हे

प्रा. अविनाश कोल्हे

 
 एम.ए., एल.एल.बी केले असून गेली दोन दशकं मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय शिकवत आहेत. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवर विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन. शिवाय त्यांनी मुंबईतील अमराठी रंगभूमीवर सादर होत असलेल्या नाटकांची परिक्षणं केलेली आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांच्या निवडक परिक्षणांचे पुस्तक ’रंगदेवतेचे आंग्लरूप - मुंबईतील अमराठी रंगभूमी’ प्रकाशित झाले आहे. ते ’चीनमधील मुस्लीम समाजातील फुटीरतेची भावना’ या विषयांवर पी.एचडी. करत आहेत.