स्वायत्त, स्वयंशासी स्थानिक संस्थाच सुकर करतील अंत्योदयाचा मार्ग

Total Views | 7


सन २०१४ च्या जानेवारी–फेब्रुवारी मध्ये नंदुरबार मधील खांडबारा परिसरात मोठया प्रमाणात गारपीट झाली. महाराष्ट्रात इतर भागातही फेब्रुवारी मार्च मधील गारपीटीमुळे खूप नुकसान झाले. सरकारने नुकसान भरपाई फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील व मार्च मधील गारपीटग्रस्तांसाठी जाहीर केली. खांडबारा परिसराला त्यामुळे अशी भरपाई मिळणार नव्हती. त्या परिसरात स्थापन झालेल्या ‘खांडबारा परिसर सेवा समितीने’ हा विषय लावून धरला. या गावातील जलदूताने ठेवलेल्या नोंदी, पेपरातील बातम्या, लोकांकडील फोटो याचे दस्तावेज बनविले गेले. ग्रामसभेत ठराव केले. समितीने स्वतः जाऊन जिल्हाधिकारी व अन्य लोकांना परिस्थिती समजाऊन सांगितली. त्यामुळे सरकारने विशेष बाब म्हणून या भागासाठी जानेवारी-फेब्रुवारीतील गारपीट ग्रस्तांना मदत जाहीर केली. लोकांच्या प्रयत्नांना यश आले. या मदतीमुळे तसेच स्वखर्चाने लोकांनी नष्ट झालेल्या २५० आंबा वाडया पुन्हा उभारल्या.

 

लोकांच तयार झालेल संघटन, त्यांनी स्वयंसेवी पद्धतीने सतत चालू ठेवलेल्या नोंदी, सरकारशी बोलण्यात त्यांचा पुढाकार यामुळे हे शक्य झाल. हे सगळ करण्यात ‘खांडबारा परिसर सेवा समितीचा’ वाटा मोठा होता. लोकांनी संस्था स्वीकारली होती. तिचा उपयोग त्यांना पटला होता.

लोकांच्या पुढाकाराने स्थानिक प्रश्नांची सोडवणूक हे चित्र फारस दिसत नाही. मागे आम्ही डांग जिल्ह्यात फिरत होतो. एका शेताच्या कडेला शेताला पाणी द्यायचा पाईप फुटलेला होता. शेतकऱ्याशी बोललो तर कळल ४-५ शेतकरी जवळच्या तळ्यातून त्याने गव्हाला पाणी द्यायचे. पण एका सरकारी गाडी त्यावरून गेली आणि तो फुटला. १५ फुटाचा पाईप असेल. तर तो दुसृस्त करण्यासाठी ते शेतकरी पार तहसीलदाराला भेटून आले. १५ दिवसापासून पाईप फुटलेला आहे, समोर पाणी आहे आणि गहू वाळतो आहे. आपला विकास या स्थितीला येऊन पोचला आहे. विकासाच्या आजच्या या पद्धतीच चित्र थोडस एस.टी सारख आहे. एस.टी मधे ड्रायव्हर-कंडक्टरचे जे काम असते ते विकासाच्या गाडीत सरकार करतय. त्यामुळे प्रवाशांसारखी जनता निवांत झोपली आहे.  एस.टी जसे काही जण जागे असतात तशी काही गावे असतातच पण तुरळक. त्यामुळे कंडक्टरच उठवतो आणि देतो उतरवून. बर विकास व्हायचाय जनतेचा, पण सरकारला हवी तिकडे गाडी चाललीय. प्रत्यक्षात भारतीय विकास संकल्पनेत विकासाच्या गाडीत ‘समाज’ हा ड्रायव्हर-कंडक्टरच्या जागी असला पाहीजे. त्याने आपल्याला कुठे जायचे हे नक्की करून जाण्यासाठी मदतरूप अधिकारी, शास्त्रज्ञ, नेते यांना गाडीत घ्याव आणि काम झाल की कृतज्ञ भावाने वाटेत सोडून दयाव, इतरांना मदत करण्यासाठी.

पण आज अस चित्र दिसत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय होताना समाजच मन, अनुभव याला कोणतेही स्थान नाही. अगदी साधच उदाहरण आहे, कोल्हापूरी बंधाऱ्यांच. त्यांची उपयुक्तता केव्हाच सिद्ध झालीय. त्यानुसार ते मोठया प्रमाणात बांधले गेले आहेत. पण आज काय स्थिती आहे. कोठेही त्या बंधाऱ्याचे पत्रे बंधाऱ्यात दिसत नाहीत. ते दिसतात कोठेतरी पडलेले, गटरीवर टाकलेले आणि अगदीच नीट ठेवले असतील तर कुणाच्या संडासच दार म्हणून. त्यामुळे बंधारा असून पाणी नाही अशी स्थिती झालीय. हे होण्याचे एकमेव कारण म्हणजे काम करताना लोकांना विश्वासात न घेणे, लोकांसाठी जी रचना उभारली आहे ती चालवण्यासाठी त्यांची संस्थागत रचना न उभारणे. अश्या संस्थागत रचना उभारणे हे काही रॉकेट सायन्स नाहीये. याच आपल्या महाराष्ट्रात बचत गटांचे जाळे मोठया प्रमाणात विणल गेल आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात आणि त्यानंतर विविध सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाण्यात या गटांचा मोठा वाटा आहे.

खांडबारा परिसर सेवा समितीच्या वरच्या उदाहरणात पण गावातील कुटुंबाना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात समुहात आणून त्या द्वारे विकास कामे करण्याच्या धोरणाचा मोठा वाटा आहे. इथे काम करताना डॉ. हेडगेवार सेवा समितीने पिक उत्पादकांचे गट, बियाणे उत्पादक गट, वाडी उत्पादक गट अश्या छोट्या छोट्या गटांत बांधून एकत्र येऊन काम करण्याची सवय लावली. इथल्या पाणी वापर गटांनी तर एक नवीन इतिहास घडवला आहे. एक दोन नाही तर ५० हून अधिक खाजगी विहीर मालकांना आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकी ४-५ शेतकऱ्यांना घ्यायला राजी केले गेले. आर्थिक मदत उभारून त्यांच्या विहिरी खोल केल्या गेल्या. समाजाकडून जर तुम्हाला काही मदत मिळत असेल तर समाजाला त्याची परतफेड करणे आपल कर्तव्य आहे हा भाव सुद्धा यात जपला गेला. नदीवरील बंधाऱ्यातून पाणी घेणारे पण गट तयार करण्यात आले. यातून एकत्र येऊन नियोजन करणे,त्यानुसार संसाधनांचा वापर करणे शक्य झाले.

हे सगळे गट बनविले गेले शेतकरी मंडळाकडून. हे मंडळ होते गावातील जुन्या जाणत्या तसेच उत्साही शेतकऱ्यांचे. शेतीमध्येच रमणारे हे लोक आपल्या शेतीतून काही तरी करून दाखविणारे. त्यामुळे त्यांच्या शब्दाला गावात किंमत होती. अश्या चांगल्या लोकांना एकत्र आणणे पण या प्रक्रीयेत गरजेच आहे. सज्जनांचे संघटन हा समाज सुधारणेचा पाया आहे.

या गटांच्या प्रयत्नातूनच खांडबारा परिसरात परिवर्तन घडले. शेतीमधील उत्पादन काही पटीत वाढले. सिंचनाखालील जमिन दुप्पट झालीच पण अधिकाधिक शेतकऱ्यांची जमिन ओलीता खाली आली. फक्त विहीर खोलीकरण व गट बांधणीतून २२७ कुटुंबाच्या ३७५ एकर जमिनीला संरक्षित पाणी व २८७ एकर जमिनीला रब्बी पिकासाठी पाणी किलाते आहे. बियाणे उत्पादनासारखे किचकट काम यशस्वी झाले, एवढे कि राष्ट्रीय संस्थांनी इथल्या बचत गटांबरोबर करार केले. सन २००७ मध्ये सरासरी १६००० उत्पन्न असलेल्या या शेतकऱ्यांचे उत्पन्न २०१४ मध्ये सरासरी ४०००० झाले होते. जवळ जवळ ८ गावातील काम नसल्याने होणार स्थलांतर पूर्णपणे बंद झाल. ‘खांडबारा परिसर सेवा समिती’ सक्षम होण्यामध्ये या सगळ्याचा मोठा वाटा आहे. आपण काही करू शकतो हा आत्मविश्वास यातून मिळाला.

प्रत्येक व्यवस्था या गटामार्फतच व्हायला हव्या हा आग्रह मात्र कमी ठेवायला हवा. गटांच्या जोडीला काही व्यवस्था ‘एकल’ असतात. त्या तशाच असल्या म्हणजे त्या पूरक होतात. यांना गटाचे पाठबळ हवे मात्र त्या काम स्वतंत्र करतील अशी रचना हवी. हे ओळखून गावांमध्ये जल मापन करणारी ‘जलदूत’ ही व्यवस्था बसविण्यात आली. दररोज पाऊस मोजणे हे या स्वयंसेवकाचे काम आणि हे गावासाठी सेवा भावनेने करायचे. याच्या नोंदीचा उपयोग अवकाळी पावसात झाला. या प्रमाणे गावस्तरीय प्रक्रिया उद्योग पण जो खरा ‘उद्योगी’ आहे त्याला प्रोत्साहन देऊन उभारण्यात आले. त्यातून मोबाईल भात गिरण्या, डाळ मिल सुरु झाली आहे. याचा थेट उपयोग लोकांच्या उत्पन्न वाढीत झाला आहे.


एकदा गटात येऊन काम करायची सवय लागली की नवी क्षितीजे खुणावू लागतात. यातूनच या परिसरात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. भात प्रक्रिया व बियाणे उत्पादन या मधे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. यातून तरुणांना रोजगार, उत्पन्न वाढ, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होणार आहेत. पाणी व्यवस्थापन झाल्या मुळे गेल्या दोन वर्षात १०० हून अधिक भाजीपाला गट तयार झाले आहेत. वैयक्तिक स्तरावर ५ ते १० गुंठेच भाजीपाला घेतला जातो. त्यामुळे वैयक्तिक नुकसान कमी होते. गेल्या वर्षी भेंडी एक्सपोर्ट पण केली गेली. गटात येऊन काम करण्याचे फायदे त्यांना चांगले उमगले आहेत.


शेतकऱ्यांच्या पातळीवर संसाधन गट, गाव पातळीवर शेतकरी मंडळ तर पंचक्रोशीसाठी ‘सेवा समिती’ अशी त्रिस्तरीय रचना यातून तयार झाली. अश्या रचना काही नवीन नाहीत. फार पूर्वी पासून जनजाति-वनवासी भागात अश्या प्रकारच्या रचना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. गडचिरोली सारख्या भागात तर अगदी १००-१०० गावांच्या एकत्रित व्यवस्थाही आहे. बदललेल्या काळाप्रमाणे आपल्याला नविन संस्थात्मक रचना उभाराव्या लागतील.


 

पंडीत दीनदयाळजींनी आपल्या एकात्म मानव दर्शनात स्वयंशासी, स्वायत्त स्थानिक संस्थांचा पुरस्कार केला आहे. खांडबारा हा त्यादृष्टिने एक प्रयोग आहे. असे प्रयोग जागोजागी करून अंत्योदयासाठी समाजालाच प्रयत्न करावे लागतील हे नक्की.

 - कपिल सहस्त्रबुध्दे

कपिल रमेश सहस्रबुद्धे

कपिल सहस्रबुद्धे यांचे पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. तसेच पत्रकारीतेचा डिप्लोमादेखील त्यांनी केला आहे. ते धारणाक्षम विकास विषयाचे अध्ययन करतात. त्याचप्रमाणे योजक संस्थेच्या माध्यमातून भारतीय विकास चिंतनाचा प्रसार करणे व त्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर एकत्रित कार्यक्रम राबविण्यामधे त्यांचा सहभाग असतो.

अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121