पोटदुखी- शारीरिक, मानसिक का काल्पनिक?

Total Views |
 
 

 
 
तान्हुल्यांच्या पोटदुखीचे निदान करणे खूप कठीण असते. कसलाही त्रास होत असल्यास मुल रडतं, भूक लागली बाळ रडतं, शू झाली, थंडी वाजली, कान दुखला, शी झाली, शी होताना खडा होत असल्यास या सगळ्या त्रासांवर बाळाची एकच प्रतिक्रिया असते, ती म्हणजे रडणे. मग पोट दुखतंय याचे नेमके निदान कसे करावे? बरं, पोट दुखणे हे भूकेनेही होते, अजीर्ण असते वेळीही होते आणि पोटात जंत असल्यासही पोटात दुखते.
 
लहान मुलांमध्ये शी-शू झाल्यावर लगेच पोट रिकामे होते आणि भूक लागते. मूल रडू लागते. दूध पाजल्यावरही पोटदुखी थांबते व बाळास बरे वाटून ते खेळू लागते. कडक शी होत असल्यास, खडा होत असल्यास, पोटात गुब्बारा धरल्यासारखे होते. पोट दुखू लागणे, पोट फुगणे, ताठरता आल्यावर जाणवते. बर्‍याच वेळेस पोटाला वरून तेल आणि हिंग लावल्यावर वात सरतो, गुब्बारा कमी होतो आणि पोटदुखी कमी होते, शमते. अजीर्ण असतेवेळी पोट थांबून-थांबून दुखते, पोटात कळा येतात. मूल अस्वस्थ होते, बैचेन होते, काही खायला-प्यायला द्यायचा प्रयत्न केला, तर ते तोंडात घेत नाही. क्वचित प्रसंगी काही खाल्ले की, उलटून पडते. या उलटी वाटे अपाचित अन्न बाहेर पडते, तर मुलाला थोडे बरे वाटते. अजीर्ण असतेवेळी काही खायला-प्यायला देऊ नये, लंघन करावे. पोटाला ओव्याचा अर्क लावाला. पोटात खडा असल्यामुळे दुखत असल्यास पोटावर थोडे तूप चोळावे व बेंबीत तेलाचे थेंब घालावे. फक्त स्तनपानावर बाळ असल्यास सहसा तान्हुल्यांमध्ये जंत होत नाहीत. पण, जर गाईचे दूध, डब्यातील पावडरचे दूध तान्हुल्यांना दिले जात असेल, तर जंत होण्याची शक्यता खूप वाढते. शी वाटे जंत पडतात, बाळाला सतत भूक लागते, पोट भरत नाही. बाळ सतत कुरकुर करत राहते. चेहर्‍यावर पांढरे ठिपकेही दिसू लागतात. नाकाच्या शेंड्याला आणि गुद भागी कंड येतो, पण तान्हुलं खाजवूही शकत नाही, अशा वेळेस ओवा अर्क उपयोगी पडतो.
 
थोड्या मोठ्या मुलांमध्ये (जे वरचे जेवायला लागले आहेत), शेवग्याच्या शेंगा खायला द्याव्यात. शेंगा या उत्तम कृमिघ्न सांगितल्या आहेत. जस-जशी मुलं मोठी होऊ लागतात, तस-तसे त्यांना गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे खायला दिली जातात आणि त्याचं ‘व्यसन’ लागल्याप्रमाणे नंतर ते हट्ट करून, रडून रोज खातात. या सगळ्यात साखरेचे प्रमाण खूप अधिक असते. यामुळे वारंवार जंत होण्याची शक्यता बळावते. जंतांमुळे मुलांची भूक वाढल्यासारखी होते, पण ही खोटी भूक म्हणावी लागेल, याने शरीराला काहीच पोषण मिळत नाही, उलट जंत मात्र पोषित होतात. वारंवार जंत झाल्यास मुलं चिडकी आणि किरकिरी होतात. औषधांनी जंत मरतात, पण त्यांच्या अंड्यांवर काहीच परिणाम होत नाही. अंड्यांमधून जंत बाहेर पडले की, पुन:जंततुघ्न औषध द्यावे लागते. या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे, आठवड्यातून दोन-तीन वेळा शेवग्याच्या शेंगा खाणे हे होय. ओव्याचाही जंतांमुळे होणार्‍या पोटदुखीवर उत्तम परिणाम होतो. मातीत खेळून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत, शारीरिक शुचिता पाळावी; अन्यथा मातीतील जंतांची अंडी हातावाटे, तोंडात प्रवेशित होऊ शकतात. तेव्हा, नखं कापलेली असणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
हल्ली ‘फास्ट फूड’चे प्रमाण लहान मुलांमध्येही वाढले आहे. चटक-मटक, लोणची-पापड इ. खाणे लहान मुलांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळे ‘आव’ होण्याची शक्यता वाढते. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत विविध शारीरिक अंगांची वाढ होत असते. मुलांचे पोट आणि आतडे खूप नाजूक असते. खूप तिखट, मसालेदार व मिरचीचे प्रमाण अधिक खाण्याने अंतस्तवया (mucosal lining colitis, ibs nachos, dry snacks highly processed food, tinned food ) बिघडते आणि ती आवेमार्फत बाहेर पडू लागते. शेम पडल्यासारखे शौचास चिकट होते. आव होताना प्रचंड मुरडा येतो पोटात. लहान वय कोवळं असतं. त्यांची सहनशक्ती आणि प्रतिकारशक्ती दोन्ही कमी असतात. त्यामुळे त्यांना तीक्ष्ण पदार्थांचा त्रास लगेच होऊ शकतो, होताना आढळतो. यातूनच पुढे सारखे त्रास आयुष्यभर जडू शकतात. जेवणातून तूपाचा वापर (भातावर, पोळीला लावून लोणकढं तूप) व्हायलाच हवा. लहान मुलांमध्ये मांसाहार कमी प्रमाणात आणि कमी वेळा करावा. तीक्ष्ण खाल्ल्याने स्वभावही तापट, चंचल आणि रागीट होतो. बिस्किटं आणि कोरडा आहार (वेफर्स) मुळे मलबद्धता होण्याचे प्रमाण अधिक होते. यासाठीही तूपाचा उपयोग उत्तम होतो. मैद्याचे पदार्थ यामुळे त्यात तंतूमय पदार्थ (fibres) कमी असल्याने शौचास बांधून येण्याची क्षमता राहत नाही. खडा होऊ लागतो. दुधातून तूप किंवा काळ्या मनुकांमुळे कोरडेपणा कमी होऊन स्निग्धता मिळते (आतड्यांना) आतड्यांची प्राकृतिक गती (peristaltic movement) अबाधित चालू राहून शौचास साफ होते.
 
मुलांमध्ये अजून एक प्रकारची पोटदुखी आढळते काल्पनिक! एखादे काम, क्लास, शाळा आवडत नसेल, टाळायचे असेल तर पोट दुखायला सुरुवात होते आणि त्याची वेळ निघून गेली, की पोटदुखी आपोआप थांबते. औषधोपचार काहीच लागत नाहीत! यावर औषधापेक्षा त्या मुलाला समजाविणे अधिक महत्त्वाचे आहे. क्वचित प्रसंगी फक्त ‘आवडत नाही’ म्हणून करायचे नाही, असे दिसते. पण, काही वेळेस त्यामागे इतर कारणे असू शकतात. जसे भीती (शिक्षकाची, मित्राची इ.) मारहाण, मानसिक, शारीरिक शोषण इ. तेव्हा अशा पोटदुखीवर संपूर्णत: कानाडोळा करून चालत नाही. त्याच्या मुळापर्यंत जाऊन, त्याचे कारण शोधून ते दूर करण्याचा नक्की प्रयत्न करावा.
 
पोटदुखी म्हणजे असूया (jealousy)  वाटणे असाही एक अर्थ होतो. हा सहसा लहान मुलांमध्ये दिसत नाही, पण, घराघरांतून हल्ली समीकरणे बदलत चालली आहेत. दिसायला सुंदर, बौद्धिकदृष्ट्या हुशार भावंडांचे जर वारंवार कौतुक होत गेले, तर दुर्लक्षित मुलांमध्ये या प्रकारची पोटदुखी होऊ शकते. शाळेतही अव्वल येणार्‍या विद्यार्थ्यांवर ‘खार खाणे’ करणारे अन्य विद्यार्थी असतातच. या पोटदुखीवरही वेळेतच उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी counselling ची मोठी गरज भासते. तेव्हा, पोटदुखी म्हणून सोडून न देता, त्याच्या मुळापर्यंत जाऊन कारणानिशी ती बरी करावी. 
 
- वैद्य कीर्ती देव

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
अग्रलेख
जरुर वाचा
५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात  घरवापसी

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121