आयतचा नुकताच जन्म झाला.. २६ तासांच्या लेबर पेन नंतर आणि गरोदरपणानंतरच्या नैराश्यानंतर नवजात बाळाला स्वीकारणं तिला शक्य झालं नाही, आणि तिने त्या छोट्या बाळाला, छोट्या आयतला नाकारलं. त्याची खंत आजही तिच्या मनात आहे, आणि म्हणूनच तिने आयतच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्धार केला आहे... ही कथा आहे सुजाता सेठिया नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेची. आयत आज तिचं आयुष्य आहे, मात्र एक क्षण असाही होता जेव्ही तिने आयतला नाकारलं होतं.
असं म्हणतात स्त्रियांच्या जन्मापासूनच त्यांच्यात मातृत्वाचा गुण असतो मात्र सुजाताला हे स्वीकारण्यात खूप वेळ लागला. जन्म देण्याची प्रक्रिया ही खूप कठीण असते, ती प्रत्येकाची सारखीच असेल असं नाही. २६ तासांच्या लेबर पेन मध्ये आपण जीवंत राहू की नाही ही शंका असताना, त्यानंतर अचानक बदललेल्या आयुष्याची कल्पना करताना मला या मातृत्वाचा राग आला, नकोसं वाटलं आणि डॉक्टरांच्या हातात असलेल्या त्या चिमुकलीला मी नाकारलं. या शब्दात सुजाताने त्या क्षणाचे वर्णन केले आहे.
मात्र आज दररोज माझ्या तशा वागण्याचं मला वाईट वाटतं, मला अपराधी वाटतं, त्यामुळे मी आयतच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्धार केला आहे. तिचं हसणं, तिचे हाव भाव, तिचं सगळं काही... कदाचित माझ्या या प्रयत्नांनी मी तिला नाकारलं होतं हे ती विसरू शकेल. तिची माफी मागण्याचा माझा हा प्रयत्न आहे, असं ही सुजाता सांगते.
३५ वर्षीय सुजाता पेशाने टी.व्ही.पत्रकार आणि रेडियो वरील संवादिका होती. लग्न झालं आणि ती लंदनला गेली. मात्र विदेशातील जीवशैलीशी जुळवून घेण्यात तिला वेळ लागला, त्यात ती गरोदर असल्याचं समजलं, गरोदरपणातील हार्मोनल बदलांनंतर आयतच्या जन्माच्यावेळी तिला अत्यंत कठीण बाळंतपणातून जावं लागलं. २६ तासांच्या त्या त्रासात तिला हे बाळंतपण, हे बाळ सगळंच नकोसं झालं. आणि तिने आयतला, तिच्या मुलीला नाकारलं. याबद्दल तिला आजही अपराधी वाटतं.
आयतच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण टिपताना तिला होणारा आनंद वेगळाच आहे. "आयत आज माझं सर्वस्व आहे, मी तिच्या शिवाय एक क्षण पण राहू शकणार नाही." असं सांगत फेसबुकच्या माध्यमातून सुजाताने आयतच्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण शेअर केले आहेत.
आज आयत आणि आयतची आई, तिचे वडील त्यांची आज्जी आणि त्यांच्या घरातील त्यांचा लाडका कुत्रा असे सगळेच आनंदात आहेत.