मेधाकाकू: काय अवंती... आज एकदम शांत-शांत बसल्येस.... कसला विचार सुरू आहे एवढा...? उत्साह नाही, बडबड नाही... काहीतरी बिनसलंय स्वारीच आज...!!
अवंती: हं. मेधाकाकू बिनसलंय काहीतरी हे खरय. अगं इंग्लंडमधील मँचेस्टर शहरातील घडलेली घटना कोणालाही दु:ख होईल अशीच आहे ना. संगीताच्या कार्यक्रमाला जमलेल्या त्या २२/२५ नागरिकांची हत्या ही फार गंभीर आहे माझ्यासाठी... दु:ख त्याचेच आहे. अगं पुढच्या आठवड्यात आपले क्रिकेटर जाणारेत इंग्लंडला. आता माला त्याचीसुद्धा काळजी वाटायला लागलीये. खूप काय काय चाललंय इंग्लंडमध्ये ते समजून घेतीये हळूहळू...!! आणि मेधाकाकू बाबांनी दिलेली शेरलॉक होम्सची सगळी पुस्तके वाचून झाली. त्यात लंडनमधील स्कॉटलंड यार्ड या पोलिस दलाचे फार कौतुक वाचलयं मी. आता त्याच देशात असे आत्मघातकी हल्ले. काहीच सुचत नाहीये गं...!!
मेधाकाकू : अवंती. तुझ्या संवेदना समजतायत मला आणि तुला ते तसे वाटणे योग्य आहे. आता ऐक... याच इंग्लंडमधे लपलाय आपल्या देशातील एक फार लबाड आर्थिक गुन्हेगार. त्याचे नाव आहे विजय माल्या...!! खरे म्हणजे, त्याला भारतात परत आणण्यासाठीच्या प्रकरणी १७ मे या दिवशी वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी होणार होती पण आता ती पुढे ढकलून १३ जून रोजी होणार आहे...!! या माल्याने भारतीय बँकाना ८१९१ कोटी रुपयांना गंडा घातलाय आणि तो इंग्लंडला पळून गेलाय..! याला पूरक वाकप्रचार असा....
कर्ज फार त्याला लाज नाही, उवा फार त्याला खाज नाही.
या वाकप्रचाराचा फक्त शब्दार्थच सारे काही स्पष्ट सांगून जातोय आपल्याला. या माल्याचे आणि त्याच्या कर्जबाजारी वृत्तीचे अगदी समर्पक वर्णन...! हा लबाड माल्या किंगफिशर या प्रसिद्ध ब्रॅंडचा एकेकाळचा मालक. मात्र सर्व प्रसिद्धी माध्यमात स्वत:चे फार उथळ आणि भडक व्यक्तिमत्व पैशाच्या जोरावर त्याने जाणीवपूर्वक जपले आणि जोपासले...!! त्याच्या अनेक भडक वक्तव्यातून आणि जीवनशैलीतून त्याचा उथळपणा सतत जगासमोर येत राहिला...!! असे व्यक्तिमत्व असले तरी वरकरणी दिसणारे त्याचे व्यावसायिक यश लोकांना संमोहित करत होते आणि एक दिवस त्याचा फुगा फुटला आणि हा आपल्या सन्माननीय राज्यसभेचा सदस्य असलेला कर्जबाजारी, निर्लज्ज माणूस चक्क देशाबाहेर पळून गेला...!!! माल्याच्या या प्रवृत्तीचे उचित वर्णन आपला हा वाकप्रचार करतोय. आता त्याची परिस्थिती काय झालीये बघ...
ऋण फिटेल पण हीण फिटत नाही. ऋण दिल्याविण न फिटे मरण आल्यावर न सुटे.
अवंती: अरे बापरे... मेधाकाकू.... आपल्या मातृभाषेत काय काय खजिना भरून ठेवलाय... एकदम सही आहे हे मेधाकाकू ....! जबरी फंडा आहे की गं... !!
मेधाकाकू: आता बघ.... याचे ऋण कदाचित फिटेल. ते कसे तर त्याच्या अनेक मालमत्ता जप्त करून त्यांचा कायदेशीर लिलाव करून त्याच्याकडून ही कर्जाची रक्कम वसूल केली जाईलही. मात्र आपले दोन वाकप्रचार सांगतात. ऋण फिटेल मात्र त्याचे हीण म्हणजे त्याच्या चारित्र्याला लागलेला कलंक मात्र कधीही पुसला जाणार नाही. जरी अगदी ऋण फिटायच्या आधी त्याला मृत्यूने गाठले तरीही ऋण फिटत नाही कारण, ते फेडण्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर असतेच..! समाजातील अबाल-वृद्धाना अर्थ नियोजनाचे उचित व्यवहार ज्ञान शिकवताना. जणूकाही धोक्याच्या जागा दाखवणारे हे मार्गातील फलक.
अवंती : मेधाकाकू. शाळेत कधीतरी २/३ मार्कांचा प्रश्न विचारलं जातो. म्हणींचा वाक्यात उपयोग करा. असा...!! असे सगळे शाळेत शिकवले गेले पाहिजे. असे आता मला वाटायला लागलंय...!!
मेधाकाकू : बरोब्बर विचार करतीयेस तू... अवंती... अगं या म्हणी म्हणजे... हसत खेळत शिकवला जाणारा चातुर्य - विवेकाचा धडाच आहे. प्रत्येक व्यक्तीने तरुण वयात शिकायलाच हवा असा... धडा. आता गंम्मत बघ की, इतके मोठे कर्ज देताना बँका आणि अर्थपुरवठा करणार्या संस्थांच्या अधिकार्यांनी याचा काळजीपूर्वक अभ्यास केला असलाच पाहिजे. पण तसे झाले नाही. त्याला कारण एकच...
चांदीचा जोडा लोखंडास नरम करतो.
या म्हणीचा अर्थ इतकाच की, “चांदीचा जोडा” वापरुन म्हणजे पैशाच्या बळावरच माल्याने या अधिकार्यांचे “लोखंड नरम” केले म्हणजे त्यांना त्यांचेच कायदे वाकवायला भाग पाडले गेले. आता त्यांच्यावरही कारवाई सुरू झालीच आहे की. जोवर आहे दामाजी तोवर हाजी हाजी.
आणि आता अशा कोट्यावधीच्या कर्जाऊ रक्कमा देणार्या बँकासुद्धा कर्ज वसूलीसाठी माल्याच्या मागे हात धुऊन लागल्या आहेत. कारण आता माल्याच्या संमोहनातून सुटका झाल्यामुळे त्या फक्त व्यवहार बघतायत...! आपला वाकप्रचार काय सागतोय बघ या बँकांना...
भाडेकर्याची काळजी भाड्यापुरती.
कर्जाऊ... म्हणजे भाड्याने घेतलेले पैसे. भाडे थकल्यावर मालक वसूल करणारच की...! असे बरेच माल्या कुठे कुठे लपून बसलेत. गेल्या काही वर्षात. आता मात्र त्यांचा शोध सुरू झालाय असे खात्रीने वाटतय...!!
- अरुण फडके