“पूजाताई, मागच्या वेळी तू यादव राजांची गोष्ट सांगितलीस. आणि एकदम ३५० वर्षांची उडी घेऊन शिवाजी महाराजांपर्यंत आलीस. मधल्या काळात काय झाले?”, रघूने विचारले.
“मधल्या काळात दोन गोष्टी घडल्या. त्यातली एक गोष्ट आज सांगते.
“ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये समाधी घेतली, त्या पुढे काय झाले ते ऐक! अल्लाउद्दिनने यादवांचे राज्य जिंकले. देवगिरीला तळ ठोकून त्याने दक्षिणेत स्वारी केली. आंध्रच्या काकतीय, कर्नाटकातील होयसळा व मदुराईच्या पांड्य राज्यांवर वारंवार हल्ला केला. या सर्वांकडून तो वार्षिक खंडणी वसूल करत असे. १३२० मध्ये घयसुद्दिन तुघलक दिल्लीच्या तख्तावर आला. त्यावेळी काकतीय राजा, प्रतापरुद्रने खंडणी देणे नाकारले. घयसुद्दिनच्या मुलाने प्रतापरुद्रला कैद करून दिल्लीला नेत असतांना, प्रतापरुद्रने नर्मदेच्या काठी प्राणत्याग केला. १३३० पर्यंत ही चारही समृद्ध राज्ये लयास गेली होती.
“१२९६ मध्ये, वारंगळ येथे विद्यारण्य स्वामींचा जन्म झाला. हे आणि यांचे थोरले बंधू भारतीतीर्थ, शृंगेरी मठाचे आचार्य होते. इस्लामी आक्रमणाने झालेला संहार स्वामींनी पहिला होता. या भूमीला उत्तम शासनकर्ता लाभावा यासाठी ते तळमळत होते. योगायोगाने होयसळांचे सरदार, दोघे बंधू – हरिहर आणि बुक्काराय यांची आणि विद्यारण्य स्वामींची भेट घडली.
“या सोनेरी क्षणी विजयनगर साम्राज्याचे बीज रोवले गेले. १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्काने विद्यारण्यांच्या मदतीने विजयनगरचे राज्य वसवले. विद्यारण्यांनी राजांच्या तीन पिढ्यांना मार्गदर्शन करून एक आदर्श साम्राज्य निर्माण केले. या घराण्यातील महान राजा सांग कोण?”, पूजाताईने विचारले.
“कृष्णदेवराय!”, रघु म्हणाला, “कृष्णदेवराय आणि तेनालीरामची पण एक गोष्ट हवी!”
“कृष्णदेवरायची गोष्ट पुढच्या वेळी! आधी मधली वर्ष भरून काढू.”, पूजाताई सांगत होती.
“या दरम्यान दिल्ली सल्तनतची दक्षिणेवरील पकड हळूहळू सैल झाली आणि बहामनी सरदार स्वतंत्र झाले. १५६५ मध्ये हे बहामनी सरदार - आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बिदरशाह आणि इमादशाह या सर्वांनी मिळून विजयनगरवर हल्ला केला. विजयनगर इतके समृद्ध होते, की ते लुटायला, तोडायला आणि जाळायला ५ राज्याच्या सैन्यांना, ६ महिने लागले. काही काळ विजयनगरच्या राजांनी वेल्लोर मधून राज्य केले. १६३० पर्यंत विजयनगरच्या अधिपत्याखाली असलेले मैसूर, तंजावर, मदुराई इत्यादी राज्ये स्वतंत्र झाली. ही सर्व राज्ये विजयनगरच्या तालमीत तयार तयार झाली होती.
“१६४० मध्ये शहाजी राजे बंगळूर मध्ये होते. तेंव्हा १२ वर्षांचा बालशिवाजी येथे २ वर्ष राहिला. या संस्कारक्षम वयात महाराजांवर विजयनगरचे संस्कार झाले. महाराजांनी या काळात विजयनगरचे अवशेष पहिले असावेत. हिंदवी साम्राज्याचे स्वप्न घेऊन ते पुण्यास आले असे म्हणाले तर त्यात वावगे नाही.“, पूजाताईने मधली ३५० वर्ष भरून काढली.
“इथे ज्ञानेश्वरांची कोणती ओवी लागू पडते?”, रजुने मुद्द्याचा प्रश्न विचारला.
“ज्ञानेश्वरांची ही ओवी इथे बरोबर लागू पडते -
एथ वडील जे जे करती | तया नाम धर्मू ठेवती |
येर ही तेची आचरती | सामान्य सकळ || ३.१५८ ||
हे ऐसे असे स्वभावे | म्हणौनी कर्म न सांडावे |
विशेषे आचरावे | लागे संती || ३.१५९ ||
मोठी माणसे जे करतात, तेच संस्कार समाजावर होतात. घरात सुद्धा असे दिसून येते, की मोठ्या भावंडा सारखे लहान वागते, किंवा मोठ्या जावेसारखेच धाकटी जाऊ वागते. तर आपल्या कोणत्या कर्मातून, कधी आणि कोण प्रेरणा घेईल हे सांगता येत नाही, तेंव्हा कितीही कठीण समय आला, तरी आपण आपले कर्म सोडू नये.