अहिल्येच्या लेकी

    19-May-2017   
Total Views | 57

 

मध्य प्रदेशातलं महेश्वर. नर्मदेच्या तीरावर वसलेलं एक सुंदर, छोटंसं नगर. आज महेश्वर म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतात त्या अहिल्याबाई होळकर. पण महेश्वर खूप जुनं नगर. आज बाहुबली ह्या चित्रपटामुळे माहिष्मती ह्या नगराचं नाव भारतातल्या घराघरात पोचलंय. पण मुळातलं माहिष्मती म्हणजे आजचं महेश्वर. साक्षात दशानन रावणाला युद्धात हरवणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाची ही नगरी. अजूनही महेश्वर मध्ये कार्तवीर्य अर्जुन मंदिर आहे. ह्याच नगरीत पंडित मंडनमिश्र आणि आदी शंकराचार्य ह्या दोघांमध्ये तो प्रसिद्ध शास्त्रार्थ झाला होता.  त्या वादात मध्यस्थ म्हणून काम पाहिलं होतं ते मंडनमिश्रांच्या सुविद्य पत्नी उभयभारती देवी ह्यांनी. ह्या वादात हरल्यानंतर मंडनमिश्र ह्यांनी आधी कबूल केल्याप्रमाणे गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारला आणि आदी शंकराचार्यांचे ते पट्टशिष्य झाले. पुढे हिंदू धर्माला एका सूत्रात बांधण्यासाठी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चार भागात चार धर्मपीठे स्थापन केली. त्यातल्या शृंगेरी मठाचे ते प्रथम शंकराचार्य झाले. अगदी आजही ती परंपरा अखंडित चालू आहे. असे म्हणतात की आदी शंकराचार्य आणि मंडन मिश्र ह्यांच्यामधील शास्त्रार्थ महेश्वर जवळच्या मंडलेश्वर नावाच्या गावातल्या गुप्तेश्वर महादेव मंदिरात अखंडपणे कित्येक महिने सुरु होता. अशी ही थोर विद्वानांच्या आठवणींनी पावन झालेली माहिष्मती नगरी आज मात्र एका शुभ्रवसना आईच्या, अहिल्याबाईंच्या, नावाने अखंड उसासे टाकते आहे. 


उज्जैन येथे भरणाऱ्या विचार महाकुंभ ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रण पाहिलं आणि मी पहिलं काम केलं ते म्हणजे इंदूरला राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला, रश्मी मांडपेला विचारलं, 'बायो, इंदूरला येतीये, अहिल्याबाईंच्या महेश्वरला नेशील ना?' कुणा जिवलगाने दिलेलं मोरपीस जपून पुस्तकाच्या पानांमध्ये ठेवावं तसं मनात जपून ठेवलेलं अहिल्याबाईंचं महेश्वर. तिथल्या घाटाच्या पायऱ्यानां गुदगुल्या करणारी नर्मदा, तिथेच विणलेल्या महेश्वरी साडीइतकाच नितळ, झुळझुळीत वाहणारा नर्मदेचा तो विशाल प्रवाह, सारं काही न प्रत्यक्ष बघताही मनात खोल रुतून बसलेलं. 

 

अहिल्याबाईंच्या पाऊलखुणा तर भारतभर सापडलेल्या. अगदी दक्षिणेकडच्या एका टोकाच्या रामेश्वरम पासून ते उत्तरेच्या बद्रीनाथापर्यंत सगळीकडे ह्या आईचा मायेचा पदर पसरलेला. औरंगाबाद जवळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराजवळ एक सुरेख दगडांनी बांधून घेतलेली पुष्करिणी आहे. अहिल्येनेच बांधवून घेतलेली. निमुळत्या, निरुंद होत खाली खाली उतरणाऱ्या पायऱ्या आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर इवली दगडी मंदिरं. खाली पाण्याचा काळसर, निळा चमकता चौकोन. अश्याच एका सरत्या संध्याकाळी त्या पुष्करिणीच्या पायऱ्या मोजीत बसले होते. माझी मुलं जवळच खेळत होती. त्यांच्या उंच, हसऱ्या आवाजांनी ती पुष्करणी भरून गेली होती. तेवढ्यात वरून एक सावली सावकाश पायऱ्या ओलांडत खाली येताना दिसली. मी मागे वळून बघितलं, तर एक अगदी म्हाताऱ्या बाई सावकाश पायऱ्या उतरत येत होत्या. साधं, स्वच्छ, धुवट, दुधाच्या साईच्या रंगाचं पिवळट पांढरं लुगडं, डोक्यावरून घेतलेला पदर. सुरकुतलेल्या कपाळावर गोंदण, कुंकू नाही आणि आयुष्यातले सगळे हिशेब चुकते केल्यासारखा शांत चेहेरा. माझ्या मनातली अहिल्याच जणू सजीव होऊन थकलेली पण कृतार्थ पावले टाकत तिनेच बांधलेल्या त्या पुष्करिणीपाशी आपल्या सरत्या जीवनाचे अर्घ्य द्यायला येत होती. अंगावरून सरसरून काटाच आला माझ्या.


किती भोगलं होतं ह्या देवीसारख्या स्त्रीने आयुष्यात. किती लोकापवाद सोसले होते. नवऱ्याची व्यसने, बाहेरख्यालीपणा, मुलाचं बेबंद वागणं, डोळ्यादेखत झालेला दोन्ही मुलांचा मृत्यू, राघोबादादांसारख्या उद्दाम माणसाची मुजोरी आणि एक कर्तबगार स्त्री वैधव्याने खचून न जाता हिमतीने राज्यकारभार करतेय हे न सहन होऊन लाख तोंडातून वळवळणाऱ्या विखारी, विषारी जिभा. सगळे लोकापवाद सोसून ती जगत होती, केवळ मुलांसारख्या असलेल्या तिच्या प्रजेसाठी. अहिल्याबाईंचा नवरा खंडेराव युद्धात पडला, तेव्हा त्याच्या इतर बायकांबरोबरच त्यादेखील सती जायला निघाल्या होत्या, पण अहिल्येची कर्तबगारी आणि कुवत तिचे सासरे मल्हारराव होळकर पुरती ओळखून होते. त्यांनी तिला गळ घातली आणि अहिल्या रचलेल्या चितेवरून मागे फिरली. 

 

अठराव्या शतकातला मध्यभारत. त्या काळातलं विधवेचं जीणं म्हणजे जिवंत प्रेताचं शरीराने जगात वावरणं. पण अहिल्याबाईंनी  त्या काळात राज्य चालवलं. उत्तम राज्यकर्ती, प्रजेच्या कल्याणाकरता सतत झटणारी राणी, मुत्सद्दी राजकारणी म्हणून नावलौकिक मिळवला. राघोबादादा विधवा स्त्रीला मनाजोगता दत्तक घेऊ देईनात म्हणून थेट माधवराव पेशव्यांना पत्र लिहून अधिकार मिळवले. पण पुढे राघोबादादा इंग्रजांच्या कैदेत असताना हीनदिन झालेल्या, अन्नवस्त्राला महाग झालेल्या आनंदीबाईला ह्याच अहिल्येने 'मी नणंद, तुम्ही भावजय' असे म्हणून मोठ्या मनाने महेश्वर दरबारी बोलवून तिला मदत केली. तिचं इवलं राज्य तर अहिल्येने उत्तम प्रकारे सांभाळलंच, पण अहिल्याबाईंच्या पदराची सावली फार मोठी होती. देशभरातल्या साध्या-भोळ्या, गोरगरीब हिंदू रयतेसाठी तिने जितके काम केले तसे काम क्वचितच दुसऱ्या कुठल्या भारतीय राजा किंवा राणीने केलं असेल. 

 

धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी देशभरात हिंदू मंदिरे उध्वस्त केली होती. त्यांनी घातलेले घाव केवळ दगडांच्या भिंतीवर पडले नव्हते तर त्या घावांनी हिंदूंची मनेही छिन्न-विछिन्न करून टाकली होती. जेव्हा अहिल्यादेवीने मुसलमानी आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या सोमनाथ आणि काशीला नवीन शिवालये बांधण्याचा घाट घातला तेव्हा ती नुसती दगड-मातीची मंदिरे उभारत नव्हती, ती उभारत होती पराभवाने चेपलेली हिंदू मने. गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या हिंदू समाजमनाला अहिल्या फिरून एकवार सामर्थ्याचा फणा काढायला चुचकारत होती, समजावत होती, शिकवत होती, डिवचत होती. 

 

आज भारताचा नकाशा बघितला तर अहिल्येच्या पाऊलखुणा तुम्हाला देशभर दिसतील. तिने बांधलेल्या नदीवरच्या घाटांवर अजूनही भारतातले लोक स्नानाला जातात. अहिल्येने जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांमध्ये आजही दर्शनासाठी रांगा लागतात, क्षेत्राच्या ठिकाणी तिने बांधलेल्या धर्मशाळा अजूनही थकलेल्या, गांजलेल्या हिंदू यात्रेकरूंना आश्रय देतात. हे सगळं प्रचंड काम तिने केलं ते अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत, ते ही स्वतः व्रतस्थ राहून. आपल्या वैयक्तिक गरजा अत्यंत कमी करून, आपल्या खासगी मिळकतीतला पैसा न पैसा वापरून अहिल्याबाईनी धर्मासाठी हे डोंगराएवढं काम केलं. औरंगझेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वतः टोप्या विणून आणि कुरणाच्या प्रती हाताने लिहून स्वतःच्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खूप ऐकलेत, पण अहिल्याबाई कित्येक वर्षे एकभुक्त राहिली, ती राणी असताना काठ-पदर नसलेल्या साध्या पांढऱ्या सुती साडीखेरीज कधी तिच्या अंगाला दुसरं वस्त्र लागलं नाही. एका रुद्राक्षांच्या माळेखेरीज तिने कधी दुसरा दागिना अंगावर ल्यायला नाही. तिचा महेश्वर मधला वाडा 'राजवाडा' म्हणून घेण्यासारखा कधी भव्य-दिव्य दिसला नाही. हे सगळं करून अहिल्याबाईंनी जो पैसा वाचवला तो सगळाच्या सगळा देवळांची बांधकामं, नदीवरचे घाट, धर्मशाळा इत्यादी धर्मकार्यात खर्च केला हा इतिहास किती जणांना माहित आहे?

 

अश्या ह्या अहिल्येच्या घरी जाण्याचं आवताण म्हणजे माझ्यासाठी माहेरचा आहेरच होता.

 

उज्जैनमधल्या विचार महाकुंभ परिषदेचं सूप वाजलं त्याच रात्री मी बाड-बिस्तरा घेऊन रश्मीच्या घरी मुक्कामाला गेले. फेबुवरच्या आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी असलो तरी प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटत होतो. पण रश्मीने आणि तिच्या कुटुंबातल्या सगळ्यांनीच मला इतकं मस्त सामावून घेतलं की मला जरादेखील अवघड वाटलं नाही. तिच्या घरी तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या गप्पा ऐकणं हा एक फार मजेशीर अनुभव होता. रश्मी मोदी समर्थक तर तिचा नवरा टोपीधर समर्थक. त्यामुळे त्यांच्या घरी 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही परिस्थिती. त्या दिवशी तर आम्ही दोघी एका बाजूला आणि बिचारे प्रवीण एका बाजूला असा डाव रंगला होता. रश्मीच्या लेकीला हे नेहमीचंच असावं कारण आमच्याकडे बघून 'झाले सुरु हे लोकं परत' अश्या अर्थाने मान हलवत ती तिच्या कामाला निघून गेली.

 

दुसऱ्या दिवशी सकाळीच महेश्वरला निघायचं होतं. रश्मीने आधीच ड्रायव्हर सांगून ठेवला होता. सकाळी नऊ वाजता निघालो. नऊच वाजले होते तरी ऊन नुसतं रणरणत होतं . रात्री गप्पा मारताना प्रवीण शबे-मालवाचं गुणगान करत होते. शबे-मालवा सुंदर असेल कदाचित पण हे धूप-ए-मालवा मात्र वेगळंच प्रकरण होतं. गाडीत एसी फुल केला होता तरी भट्टीत भाजून निघाल्यागत वाटत होतं. जीवाची नुसती काहिली काहिली होत होती. मध्य प्रदेश मधले मुख्य रस्ते खूप चांगले आहेत, त्यामुळे गाडी मस्त तरंगत जात होती. मालवा म्हणजे सगळा सपाट प्रदेश. आपल्याकडे पुण्याबाहेर कुठेही पडलं तरी दूरवर डोंगरांच्या रांगा दिसतातच पहारेकऱ्यासारख्या. इथे मात्र जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सपाट शेती, मधूनच दिसणारी धाब्याची घरे आणि एखादं बाभळीचं झाड, आणि मधूनच सरळ भांग पाडल्यासारखा वाटणारा सरळसोट रस्ता. महेश्वर इंदूरपासून जवळ-जवळ शंभर किमी आहे पण जेमतेम दीड तासात आम्ही गावात पोचलो सुद्धा.

 

महेश्वर आलं ह्याची पहिली खुण दिसायला लागते ती म्हणजे महेश्वरी साड्या विकणारी दुकानं. अहिल्याबाईनी मुद्दाम गुजरातमधून कापड विणणारे कारागीर आणून त्यांना महेश्वर गावात जागा दिली. सर्वतोपरी सहाय्य केलं. आजही इथे महेश्वरी साड्या घरोघरी विणल्या जातात. महेश्वरी लुगडी म्हणजे जुन्या काळातल्या मराठी स्त्रीचा एक जिव्हाळ्याचा विषय. खरंतर महेश्वरी लुगडं म्हणजे काही पैठणीसारखं महावस्त्र नव्हे. महेश्वरच्या त्या अहिल्याराणीच्या व्यक्तिमत्वा इतक्याच महेश्वरी साड्याही साध्या, अनलंकृत पण डौलदार. अंगभर बारीक, नाजूक चौकड्या आणि साधा जरीच्या तीन पट्ट्यांचा पदर. बुट्टी असली तर असायची. काठ मात्र नाजूक आणि दोन्ही बाजूंना सारखेच दिसणारे. ह्या काठांना तिथले विणकर बुगडी असं म्हणतात. काठांचे डिझाईन्स बरेचसे महेश्वरच्या किल्ल्याच्या कोरीव काम केलेल्या पट्ट्यांवर बेतलेले. 


रेशम आणि सुती कापडाचं मिश्रण वापरल्यामुळे महेश्वरी साडीचा पोत अतिशय तलम, झुळझुळीत आणि वापरायला हलका असतो. एकेकाळी कुठल्याही मराठी स्त्रीच्या कपाटात एकतरी महेश्वरी साडी असायचीच. पण पुढे यंत्रमागावर विणलेली कापडं आली आणि महेश्वरी साडीचं नष्टचक्र सुरु झालं. साडीला मागणी कमी झाली तशी नवीन पिढी विणकामाचा परंपरागत व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे लागली. एक काळ असा आला की महेश्वरी साडीचं अस्तित्वच धोक्यात आलं. पण होळकर राजघराण्यातल्याच सॅली होळकर नावाच्या परदेशी सुनेने ही कला टिकवण्याचा चंग बांधला आणि रेहवा ही विणकरांची सहकारी संस्था जन्माला आली. सध्या महेश्वरच्या किल्ल्यातल्याच एका भागात रेहवाचे हातमाग चालतात. बहुतेक विणकर स्त्रिया आहेत. त्या भल्या मोठ्या वाड्यात सारखा येणारा तो हातमागाचा आवाज संगीतासारखाच भासतो. रेहवाच्या विणकरांनी महेश्वरी साडीत बरेच नवीन प्रयोग केले. नवीन रंगसंगती वापरल्या, वेगळे डिझाईन्स आणले. आज महेश्वरी साडी आधुनिक स्वरुपात लोकांचं लक्ष वेधून घेतेय. रेहवा सोडल्यास महेश्वर मध्ये आज कमीत कमी पंचवीस-तीस तरी वेगवेगळ्या विणकर संस्था आहेत ज्या महेश्वरी साड्या बनवून विकतात पण घेताना पारखून घेणं आवश्यक आहे कारण सगळ्या महेश्वरी ह्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या साड्या ह्या हातमागावर विणलेल्या असतातच असं नाही. यंत्रमागावरच्या महेश्वरी साड्यांचाही सुळसुळाट झालेला आहे सध्या महेश्वरमध्ये.

 

महेश्वर तसं एकदमच छोटं, आटोपशीर गांव आहे. आम्ही किल्ल्याच्या शोधात कुठे तरी भलतीकडेच वळण घेतलं आणि एका आश्रमासमोर गाडी थांबली. सुदैवाने आमचा सारथी मुकेश तिथल्या महंतांना ओळखत होता. त्यांनी योग्य रस्ता दाखवला. परत गाडीत परत शिरता शिरता मुकेश म्हणाला, 'इस आश्रम में हर दिन भंडारा होता है. आप चाहे तो हम यहां भोजन कर सकते है'. आम्ही अशी संधी थोडीच सोडतो. गेलो मंदिरात. शांत, सुरम्य परिसर. चांदीची पूर्णाकृती सुंदर मूर्ती असलेलं हनुमानाचं मंदिर होतं. तिथे अखंड राम धून चाललेली. बाजूलाच जेवणाची व्यवस्था. दर्शन घेतलं आणि पोटभर जेवलो. छान, चविष्ट जेवण होतं. डाळ-भात, वांग्याची भाजी आणि जिलबी. 'आज यहाँ लिखा था', पुढ्यात वाढून आलेल्या ताटाला नमस्कार करत रश्मी म्हणाली. खरंच, पुढचा घास कुठे वाढून ठेवलेला असतो सांगता येत नाही, फक्त पुढ्यात येईल त्या अनुभवला आनंदाने सामोरं जायची तुमची तयारी हवी.

 

जेवण आटोपलं. तिथल्या महंतांचे आभार मानून किल्ल्याकडे निघालो. मुकेशने एका वळणावर गाडी लावली. बाजूलाच दोन-तीन मंदिरांचा समूह होता. सुंदर दगडी बांधणीची मंदिरे, पण आधुनिक काळाला अनुसरून लोकांनी त्यांना भयाण रंग फासले होते, त्यामुळे मंदिरं आईसक्रीमच्या कोनसारखी रंगीबेरंगी दिसत होती. त्या तिथल्या तळपत्या उन्हात चपला काढून ठेवून तिथल्या तव्यासारख्या तापलेल्या फरशीवरून अनवाणी चालणं हे एक दिव्यच होतं. माझी कांगारुसारखी टणाटण उड्या मारत फरशीवरून चालण्याची कसरत बघून रश्मी हसायला लागली 'ये निमाड की धूप है मेरी जान, ४४ डिग्री तापमान आहे इथे', रश्मी म्हणाली.

 

त्या तसल्या पांढऱ्या चकचकीत, काळ्या चष्म्याआडून देखील डोळे दिपवणाऱ्या उन्हात दोन म्हाताऱ्या बायका भिंतीला टेकून गप्पा मारत बसल्या होत्या. 'नर्मदे हर', एक म्हणाली. 'नर्मदे हर' मी जवाब दिला, आणि तिच्या कटोऱ्यात थोडे पैसे ठेवले. ती हसली आणि पुन्हा गप्पांत गर्क झाली. नर्मदा शंकराची लेक. त्याच्या स्वेदबिंदूतून जन्मलेली. त्यामुळे नर्मदा तीरावरची बहुतेक सगळी मंदिरे शंकराची. थोडं पुढे गेले आणि दुसरं एक दगडी बांधणीचं मंदिर लागलं आणि त्याच्या पलीकडे पहिल्यांदा दिसली ती नर्मदा, जिला डोळा भरून पाहण्यासाठी मी आसुसले होते. नर्मदेचं ते प्रथम दर्शन घडलं तेव्हा मनात कायकाय ओथंबून आलं ते शब्दात नक्की सांगता नाही येणार, पण कितीतरी भावना मनात कल्लोळून आल्या. कधीतरी शाळेत असताना गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं तेव्हापासून नर्मदा तीराचं दर्शन घ्यायचा ध्यास लागला होता. ती इच्छा आज इतक्या वर्षांनी अशी अवचित पूर्ण होत होती.


महेश्वरमध्ये नर्मदेचं पात्र खूप रूंद, सुंदर आणि शांत आहे, वाळत घातलेलं महाप्रचंड निळसर रंगाचं रेशमी महेश्वरी लुगडंच जणू. वाऱ्याने खालीवर होणाऱ्या तिच्या लाटा म्हणजे जणू त्या वस्त्रावरच्या नाजूक चुण्या. देवळाच्या तटबंदीवरून खाली बघताना नर्मदा खूप शांत, निवांत दिसते, त्यात पाण्यावर तरंगणाऱ्या रंगीत बोटी. त्या देवळातून किल्ल्याकडे आलो. किल्ल्यालगतच एका मोठ्या प्रांगणात अहिल्याबाईची छत्री आहे. दोनमजली छज्जा असलेली भव्य ईमारत, तिला महिरपींच्या खिडक्या आणि त्या प्रत्येक खिडकीतून दिसणारी नर्मदेची सुबक फ्रेम. आम्ही पोचलो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. कुटुंबेच्या कुटुंबे नर्मदास्नानाकरता आली होती ती त्या ओवरीत बसून जेवत होती. तिथेच दोन-चार गलेलठ्ठ धीट बकऱ्या निर्धास्तपणे फिरत होत्या. काही लोक त्यांना रोटीचे तुकडे भरवत होते. मी फोटो काढायला लागले तर बकरीला रोटी खिलवणारा माणूस हसून म्हणाला, 'कहांसे आई आप?' 'पुणेसे' मी म्हटलं. 'आईये, हमारे साथ थोडा भोजन किजिये' त्याने आग्रह केला. त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी सरकून लगेच मला जागा करून दिली. मला भारत फिरताना लोकांनी केलेला असा मोकळा-ढाकळा पाहुणचार खूप आवडतो. आमचं जेवण झालं नसतं तर नक्कीच मी त्यांच्या आग्रहाला मान दिला असता. पण नुकतंच पोट फुटेस्तोवर जेवण केलं होतं त्यामुळे त्यांचा आग्रह नम्रपणे नाकारून मी घाटाच्या पायऱ्या उतरायला लागले.


महेश्वरचा घाट अतिशय सुंदर आहे. खूप कोनात दुमडलेल्या डौलदार पायऱ्या. थोड्या थोड्या अंतरावर नर्मदेतल्याच गोलाकार दगडांच्या स्वयंभू पिंडी आणि प्रत्येक पिढीपुढे बसलेला आज्ञाधारक नंदी. बाजूला होळकर घराण्यातल्या राजस्त्रियांच्या छत्र्या. दुर्गाबाईं भागवतांच्या अहिल्याबाईंवरच्या लेखात म्हंटलंय की दररोज ह्या छत्र्यामधल्या स्त्री प्रतिमांची पूजा करून त्यांना नित्य नवी महेश्वरी साडी नेसवली जाते. पण कालौघात तो रिवाज आता मागे पडला असावा कारण मी आत डोकावून बघितलं तर संगमरवरी प्रतिमांना कधी-काळी नेसवलेल्या साड्या धुळीने माखलेल्या, कोळीष्टकांनी मढलेल्या स्थितीत होत्या.

 

तश्याच पायऱ्या उतरून आम्ही पाण्यापर्यंत आलो. नर्मदेच्या प्रवाहाला मनोभावे नमस्कार करून मी खाली वाकले आणि ओंजळभर पाणी हातात घेतलं. पाठीवरून फिरणाऱ्या आईच्या मायेच्या स्पर्शासारखा वाटला मला त्या पाण्याचा प्रेमळ स्पर्श. डोळ्यात टचकन पाणीच उभं राहिलं एकदम. रश्मीला मी न सांगताही माझी मनःस्थिती समजली. काहीही न बोलता ती माझ्या जवळ सरकली आणि तिने मला खांद्यावर हलकेच थोपटलं. बराच वेळ तिथे नर्मदेच्या प्रवाहात पाय बुडवून आम्ही दोघी तश्याच शांत, निःशब्द बसून राहिलो. सगळ्या गुण-दोषांसकट आम्हाला स्वीकारणारी साक्षात नर्मदेसारखी आई पुढ्यात असताना शब्दांची गरज कुणाला भासणार?


बराच वेळ तिथेच बसून राहिलो दोघी. उठावंसंच वाटेना. वरचं रणरणतं ऊनही आता आम्हाला जाणवत नव्हतं. बऱ्याच वेळानंतर रश्मी म्हणाली, 'चल, सहस्त्रधाराला जाऊया'. नर्मदेच्या पैलतीरावर सहस्रधारा नावाचं छोटं तीर्थ आहे. तिथे जायला महेश्वरच्या घाटावरून बोट घेता येते. आम्ही दोघी बोटीत बसलो. पाण्यावरून बोट तरंगत चालू लागली. नर्मदामाईचा विशाल, शांत प्रवाह डोळे निववत होता. दोन्ही काठावरचे मंदिरांचे कळस बघत बघत सहस्त्रधारा तीर्थाकडे आलो. रश्मी बोटीतच बसून राहिली. मी खाली उतरले. बोट जिथे लावली होती तिथून काही अंतरावर नर्मदेचा प्रवाह खंडित होऊन दगडांवरून दहा-बारा फूट खाली कोसळत होता. त्या पाण्याचा धीर-गंभीर वेदघोषासारखा आवाज सतत आमच्या साथीला होता. मी पाण्यात हात घालून चार-दोन दगड उचलले. पाण्याने घासून घासून अगदी पिंडीसारखा आकार झाला होता त्यांचा. 'नर्मदा का हर कंकर, शंकर', आमचा बोटवाला म्हणाला. नर्मदेत सापडणाऱ्या शिवपिंडीला 'बाणलिंग' म्हणतात आणि धर्मशास्त्रानुसार ह्या पिंडीला पूजा-अर्चा करण्यासाठी प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. मी मनोभावे नमस्कार करून एक-दोन पिंडी माझ्या पर्समध्ये ठेवल्या. 


परत महेश्वरला आलो. आता बघायचा होता तो अहिल्याबाईंचा राहता वाडा. 'राजवाडा' म्हणण्याइतका तो वाडा भव्य खचितच नाही. एखाद्या साधारण बऱ्या स्थितीतल्या मोठ्या कुटुंबाचा वाडा असावा तसा तो वाडा आहे. आल्या-गेल्याचं मनापासून स्वागत करणारा, कुटुंबवत्सल. वाड्याच्या एका चौकातच अहिल्याबाईंची गादी आहे. साधी. पांढऱ्या चादरीने आच्छादलेली. मागे टेकायला लोड. इथेच बसून ती राज्यकारभार करायची.  छोट्या मोठ्या तक्रारी घेऊन आलेल्या रयतेची विचारपूस करायची, त्यांचे अश्रू पुसायची. तिची झोपायची खोली पहिल्या मजल्यावर आहे. तिथून सर्व काळ नर्मदा दिसते. नियतीने फार मोठा अन्याय केलेल्या अहिल्याबाईंची जिवाभावाची सखी होती नर्मदा. ह्याच नर्मदेच्या तीरावर पुढे त्यांनी चिरनिद्रा घेतली. एका साध्या आईचं ते साधं घर, अजिबात बडेजाव नसलेलं. त्या घराच्या ओवरीत बसताना माझं लक्ष तिथे ठेवलेल्या अहिल्याबाईंच्या तैलचित्राकडे गेलं. त्यांचे ते मायाळू, स्निग्ध, करूण, गाईसारखे डोळे जणू आम्हाला आईच्या मायेने कुरवाळत होते. का कुणास ठाऊक डोळे भरूनच आले माझे पटकन. अहिल्याबाईंचा अदृश्य मायेचा हात माझ्या पाठीवरून फिरत होता.     

 

- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121