१६ मे २०१४ हा दिवस समस्त भारतीयांच्या कायमच्या लक्षात राहील. तीन वर्षांपूर्वी ह्याच दिवशी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते आणि भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३३३ जागांवर न भूतो असा दणदणीत विजय मिळवून सत्तेत आली होती. त्याआधी १० वर्षे सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष ५० देखील जागांची मजल गाठू शकला नाही. भारतातले सगळ्यात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये तर केवळ मोदी लाट नव्हे तर मोदी वावटळ आली होती आणि त्या वावटळीत काँग्रेसचे फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच दोघे कसेबसे तगून राहिले, बाकीच्यांची पार दाणादाण उडाली.
२६ मे रोजी नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला होता. १६ मे ते २६ मे हा दहा दिवसांचा काळ देशभरातल्या भाजप मतदारांसाठी मंतरलेला काळ होता पण नरेंद्र मोदींचा आत्यंतिक वैयक्तिक द्वेष करणारे स्वघोषित 'लिबरल' मात्र ह्या काळात पूर्ण बावचळलेले दिसत होते. 'हा असा निकाल येऊच कसा शकतो, नरेंद्र मोदी ह्या देशाचे पंतप्रधान होऊच कसे शकतात' असं परत परत हे लोक अविश्वासाच्या स्वरात बोलून दाखवत होते. ह्या स्वघोषित लिबरल लोकांचे १६ मे २०१४ पूर्वीचे ट्विट व विधाने वाचली तर आजही प्रचंड करमणूक होते. काँग्रेसचे ज्येष्ठ वाचाळवीर नेते मणिशंकर अय्यर ह्यांनी तर 'एकविसाव्या शतकात मोदी भारताचे पंतप्रधान होणे शक्य नाही. त्यांनी फार तर आमच्या काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात चहा विकावा, आमची त्याला तयारी आहे' अश्या अर्थाचे वक्तव्य केले होते. हेच मणिशंकर अय्यर मग मोदी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानसारख्या शत्रू देशात जाऊन तिथल्या राज्यकर्त्यांकडे, 'इन्हे हटाईये, हमें लाईये' असे म्हणून निर्लज्जपणे तोंड वेंगाडत होते.
बऱ्याच लेखक, विचारवंत वगैरे स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी 'मोदी जर ह्या देशाचे पंतप्रधान झाले तर आम्ही देश सोडून जाऊ' अश्या धमक्या दिल्या होत्या. कमाल खान नावाच्या कुणा अभिनेत्याने 'मोदी पंतप्रधान झाले तर मी माझे लिंग बदलून करण जोहर बरोबर लग्न करेन' असे हास्यास्पद ट्विट केले होते. 'मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन' अशीही धमकी त्याने दिली होती. कन्नड लेखक यू आर अनंतमूर्ती ह्यांनीही 'मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन' असे विधान केले होते. पुढे मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मोदींच्या एका चाहत्याने त्यांना इस्लामाबादचे वन-वे तिकीट पाठवले होते त्यावेळी सारवासारव करताना अनंतमूर्ती ह्यांनी 'मी ते विधान भावनेच्या भरात केले होते' वगैरे मखलाशी केली.
कृष्ण प्रताप सिंग ह्या आम आदमी पक्षाच्या समर्थकाने, 'वाराणसीमध्ये मोदी जिंकले तर मी अंगावरचे सर्व कपडे काढून १७ मे २०१७ ला राजपथावर विवस्त्र पळेन' असे आपल्या ट्विटमधून जाहीर केले होते. त्याने खरंच त्याची धमकी खरी करून दाखवली की नाही हे माहित नाही.
काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधींचे आद्य स्तुतिपाठक संजय झा ह्यांनी तर 'माझे हे ट्विट सांभाळून ठेवा, २०१४ मध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि आम्ही आरामात पूर्ण बहुमताने सरकार बनवू' अशी ट्विटरवरून दर्पोक्ती केली होती. तर राहुल गांधींच्या काही कट्टर समर्थकांमध्ये राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असू शकेल, त्यांना कुठली कुठली मंत्रीपदे मिळू शकतील ह्यावर ट्विटरवरून गहन चर्चा झाली होती.
इंटरनेट ही एक अशी जागा आहे जिथे कुठलीच गोष्ट पूर्णपणे नष्ट होत नाही. अर्धवट माहितीवर आधारित आचरट ट्विट करणाऱ्या ह्या सगळ्या लोकांची वक्तव्ये आजही इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि ती वाचणे अत्यंत मनोरंजक आहे. स्वतःला 'लिबरल' म्हणजे 'उदारमतवादी' म्हणवून घेणाऱ्या ह्या सर्व लोकांची मते आणि मने कशी अंध द्वेषाने काळवंडलेली आणि पूर्वग्रह दूषित आहेत हे खरोखरच मुळापासून बघण्यासारखे आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळाला तीन वर्षे पुरी झाली. २०१९ ची निवडणूक आता फार दूर राहिलेली नाही. जसजशा निवडणूका जवळ येतील तसतसा ह्या लोकांचा आक्रस्ताळेपणा आणि टोकाचा आंधळा मोदीद्वेष परत वाढत जाईल आणि परत एकवार नग्न धावण्याच्या, लिंग बदलण्याच्या, देश सोडण्याच्या वल्गना केल्या जातील आणि परत एकवार देशाचे फुकटात घाऊक मनोरंजन होईल!
श्री समर्थ रामदास आज असते तर ह्या असल्या विचारवंतांबद्दल बोलताना नक्कीच म्हणाले असते,
अकारण ट्विट करी, विवेक सांगता न धरी
जो बहुतांचा वैरी, तो येक लिबरल!
- शेफाली वैद्य
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..