काय चाललंय काय?

    14-May-2017   
Total Views | 3


 

उत्तर प्रदेश विधानसभेची मतमोजणी चालू असताना आणि अंतिमनिकाल हाती आलेले नसतानाही, भाजपला अपूर्व बहुमत मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले होते. अशावेळी निकाल असे कशामुळे लागले किंवा मतदाराने असा एकतर्फी कौल कशामुळे दिला, त्याचा माध्यमातून ऊहापोह आवश्यक होता. पण बहुतेक वाहिन्या आणि माध्यमांतून आता मोदींना रोखण्यासाठी सर्वच पक्षांना एकत्र यावे लागणार आणि ते कसे एकत्र येणार, त्याची चर्चा सुरू झालेली होती. इतक्यात मायावतींनी विजय भाजपचा झालेला नसून मतदान यंत्रातील गफलतीने मोदींनी सत्ता बळकाविल्याचा आरोप तत्काळ केला होता. हळूच त्याला कॉंग्रेसनेही समर्थन देण्याची भूमिका घेतली होती. मग त्याचवेळी मतमोजणी झालेल्या पंजाबमध्ये, कौतुकाच्या आमआदमी पक्षाचा बोर्‍या वाजल्याचेही स्पष्ट झाले आणि केजरीवाल यांना आपली अब्रू झाकण्यासाठी तेच कोलित हाती लागले. साहजिकच एकूण विधानसभा निकालांवरची पहिली प्रतिक्रिया मतदान यंत्रांनी गडबड केल्याची होती. आपण पराभूत झालो, तर कशामुळे, मतदाराने आपल्याला झिडकारले त्याची कोणाही मोदी विरोधकाला फिकीर नव्हती. त्यापेक्षा त्यांना आपल्या पराभवावर पांघरूण घालण्यात रस होता. उलट समोरचे सत्य नाकारण्याने विषय निकालात निघत नाही, हे ओळखलेल्या माध्यमांतील पुरोगाम्यांना मोदी पुन्हा लोकसभा जिंकतील, अशा भयगंडाने पछाडलेले होते. साहजिकच त्यांना सर्व पक्षांनी मोदींविरोधात एकत्र येण्याची घाई झालेली होती. पुढे त्याच निकालाची पुनरावृत्ती दिल्लीच्या तीन महानगरपालिकांमध्ये झाली आणि माध्यमांतील जाणत्या पत्रकारांनी आपल्या परीने भारतातील तमामपुरोगामी पक्षांची आघाडी करूनही टाकली होती. तसे झाले असते तर एव्हाना भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोक्याला हात लावून बसायची पाळी आली असती. पण दीड महिन्यात चित्र कुठल्या कुठे भरकटले आहे.

 

उत्तर प्रदेशच्या निकालांना दीड महिना होत असताना आणि भाजपने दिल्लीत निर्विवाद मते मिळविली असताना, विरोधकांची एकजूट होण्यापेक्षा एक एक पुरोगामी पक्षात रणधुमाळी माजलेली आहे. रविवारी दिल्लीत नव्या राजकारणाचा प्रयोग करणारे केजरीवाल यांच्या आमआदमी पक्षाला ग्रहण लागले आणि बुधवारी मायावतींनी आपल्या उत्तर प्रदेशातील प्रमुख असलेल्या बसपाला सुरुंग लावणारी कारवाई केली. आपापल्या दारुण पराभवासाठी मतदान यंत्रावर तुटून पडलेल्या या दोन्ही एकखांबी पक्षीय नेत्यांच्या निरंकुश नेतृत्वाला आव्हान देत त्यांचीच पापे बाहेर काढणारे दोन मोठे सहकारी चव्हाट्यावर आलेले आहेत. आमआदमी पक्षातले केजरीवालांचे मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर तोफा डागत रविवारी आघाडी उघडली. त्या भडिमाराला तोंड देण्याचीही हिंमत केजरीवाल चार-पाच दिवस करू धजावलेले नाहीत. दुसरीकडे मायावती यांनी बुधवारी आपल्या ज्येष्ठ सहकार्यालाच पक्षातून हाकलून लावले आणि त्याच्यावर बेनामी संपत्तीचा आरोप केला होता. पण गुरुवारी या सहकार्याने पत्रकार परिषद घेऊन मायावतींच्या पापाची टेपच ऐकवली. थोडक्यात पुरोगामी आघाडीतले दोन मोठे महत्त्वाचे पक्ष आतूनच उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. त्यांच्या नेत्यांचे खरे चेहरे लोकांसमोर आणण्याचे कार्य त्यांच्याच सहकार्‍यांनी हाती घेतले आहे. पण, त्यातला विरोधाभासही लक्षात घेण्यासारखा आहे. मायावतींनी मतदान यंत्रामुळे मते पळवली गेल्याचा आरोप केला होता. तो खरा असेल, तर नसीमुद्दीन यांनी मुस्लीममते मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत त्यांना हाकलण्याचे कारण काय? पाण्याचा उत्तमपुरवठा ‘आप’ सरकारने केला म्हणून दिल्लीकरांनी त्या पक्षाला पालिकेत दिलेली मते यंत्राने पळवली असतील, तर कपिल मिश्रा या पाणीमंत्र्याला नाकर्ता ठरवून हाकलण्याचे कारण काय?

 

विरोधक हे आपल्याच कर्माने आपला खोटेपणा जगासमोर कसा मांडत आहेत, त्याचे हे दोन प्रमुख नमुने आहेत. एका बाजूला आपल्याला मतदाराने नाकारलेले नाही, तर यंत्राने गडबड केल्याचा दावा आहे. पण, त्याचवेळी आपल्या कामात राहिलेल्या त्रुटीसाठी अन्य कुणा सहकार्‍यांच्या डोक्यावरही पराभवाचे खापर फोडले जाते आहे. सर्वच आमदारांनी पाणीपुरवठ्यात गफलत असल्याची तक्रार केल्यामुळे कपिल मिश्राला हाकलण्याचा निर्णय झाल्याचा दावा केजरीवालचे उजवे हात सिसोदियांनी केलेला आहे. त्यात तथ्य असेल, तर मग पाण्यासाठीच मतदाराने पक्षाला नाकारल्याची कबुली दिली जात नाही काय? मग मतदान यंत्राविषयीचा आरोप निव्वळ बिनबुडाचा नाही काय? दुसरीकडे मायावतींची कहाणी आहे. मतदान यंत्रात गफलत केल्याचा पहिला आरोप त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी कुठला पुरावा दिला होता? मुस्लीमबहुसंख्य असलेल्या मतदारसंघात भाजपला इतकी मते मिळालीच कशी? मुस्लीमभाजपला मते देऊच शकत नाहीत. मुस्लिमांची मते आपल्यालाच मिळणार, यानुसार मायावतींनी यंत्रावर आक्षेप घेतला होता ना? म्हणजेच मुस्लिमांची बहुतांश मते बसपाला मिळाल्याची खात्री असल्यानेच त्यांनी यंत्रावर आरोप केला होता ना? त्यामध्ये तथ्य असेल, तर आता नसीमुद्दीन सिद्दिकी या सहकार्‍याला हाकलण्याचे कारण काय? याच नेत्यावर मुस्लीममते मिळविण्याची जबाबदारी होती आणि तो मुस्लीममते मिळवू शकला नाही, हा आक्षेप घेत त्याची बसपामधून हकालपट्टी झालेली आहे. त्याच्या हकालपट्टीचे कारण खरे मानायचे, तर मतदान यंत्रातील गफलत हा निव्वळ कांगावा ठरतो ना? अशी एकूण प्रत्येक पुरोगामी पक्षाची दुर्दशा आहे. आपण मतदारापासून का दुरावलो किंवा त्याने आपल्याला का नाकारले; त्याचा विचारही कोणाला करावा, असे वाटलेले नाही. मोदींच्या लोकप्रियतेची मिमांसाही करण्याची बुद्धी झालेली नाही आणि अशा दिवाळखोरांच्या एकजुटीवर माध्यमातले पुरोगामी मोदींच्या पराभवाचे इमले उभारू बघत आहेत.

 

एकूणच राजकीय विश्र्लेषक व पुरोगामी पत्रकारांची ही शोकांतिका झालेली आहे. त्यांना राजकारणात उडी घेण्याची हिंमत नाही. राजकारणातले बदलते प्रवाह जाणून घेण्याची त्यांची तयारी नाही. मोदी-शाहांनी निवडणुकीचे तंत्र बदलून टाकले आहे, त्याचा यांना सुगवाही लागलेला नाही. आघाड्या करून वा कागदावर आधीच्या मत टक्केवारीची बेरीज-वजाबाकी मांडून, रणनीती आखण्याचे दिवस आता संपले आहेत. अन्य पक्षांतले जिंकू शकणारे उमेदवार पळवून वा नेते फोडून निवडणुका जिंकण्याची रणनीती या जोडगोळीने भंगारात काढली आहे. अनेक पक्षांची मोट बांधून आघाड्या उभारून मोदी पराभवाचे गणित मांडण्यापेक्षा, विविध पक्षांतले बेबनाव कमी करून, आहेत त्या पक्षांनी आपापली संघटना सुदृढ करण्याला प्राधान्य दिले तरी खूप होईल. पक्ष म्हणजे संघटना आणि संघटना म्हणजे जनतेपर्यंत जाऊन भिडणारा कार्यकर्ता, हे बलस्थान केले तरच मोदी वा भाजपला पराभूत करता येईल. पण ती लांबची गोष्ट आहे. नुसते रोखण्यात हे पक्ष यशस्वी झाले, तरी त्याला उत्तमसुरुवात म्हणता येईल. पण त्यातले काहीही होताना दिसत नाही; उलट ज्यांना एकत्र जुंपून पुरोगामी पत्रकार मोठी आघाडी बनवायला आसुसले आहेत, त्यांच्या घरात, कुटुंबात व पक्षातच एकमेकांच्या उरावर बसण्याची स्पर्धा लागलेली आहे. पुरोगामी मित्रांनो, हे काय चाललंय काय? अशाने मोदी व संघ संपविण्याचे तुमचे बेत तडीस कसे जाणार? जरा पुढाकार घ्या आणि अशा केजरीवाल, मायावती व मुलायम-अखिलेशना एकजुटीचे महात्म्य तरी समजावून सांगा ना?

-भाऊ तोरसेकर

 

 

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121