“पूजाताई, आज ज्ञानेश्वरांच्या काळातील राजाची गोष्ट सांग!”, रघूने मागणी केली.
“विलासी राजा, संकटात सापडलेली सुंदर राजकन्या, शूर राजपुत्र, विद्वान मंत्री, प्रख्यात गायक, महायोद्धा आणि क्रूर राक्षसाची गोष्ट सांगू?”, पूजती म्हणाली.
“भन्नाटच गोष्ट आहे! सांग ना!”, रजू म्हणाली.
“गोष्टीपेक्षाही थरारक असा हा इतिहास आहे, ऐक! १३ व्या शतकात महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. हे राजे कृष्णाचे वंशज होते. यदुकुलातील या यादव राजांची राजधानी होती देवगिरी. तेथून जवळच प्रतिष्ठान नगरी होती. प्रतिष्ठान म्हणजे, दक्षिणेची काशी अर्थात पैठण.
“साहित्य – कला – संगीत – विज्ञान यांच्या उत्कर्षाचा काळ होता. यादव राजा सिंघाणाने भास्कराचार्यांचे गणित व astronomy च्या अभ्यासा करिता विद्यापीठ स्थापन केले होते. पैठणी वस्त्रोद्योग भरभराटीस आला होता. मराठी भाषेत ‘विवेकसिंधू’, ‘लीळा चरित्र’ अशा ग्रंथांची निर्मिती झाली होती. यादवांच्या राजदरबारातील गायक शारंगदेव यांनी लिहिलेला ‘संगीत रत्नाकर’ हा ग्रंथ आजही संगीताच्या अभ्यासासाठी वाचला जातो.
“देवगिरीला एक विद्वान मंत्री लाभला होता, हेमाडपंत. याने राज्यकारभाराच्या व्यवहारासाठी मोडी लिपी तयार केली. पुढची अनेक शतके ही लिपी वापरात होती. हेमाडपंतांनी मंदिरे बांधण्याची एक नवीन पद्धत विकसती केली होती. महाराष्ट्रातील अनेक मंदिरे या ‘हेमाडपंती‘ पद्धतीने बांधली आहेत.
“यादवकुलातील रामदेवराय देवगिरीचा राजा झाला त्याच सुमारास ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. रामदेवारायाच्या कारकिर्दीत ज्ञानेश्वरांनी नेवास्याला गीता सांगितली. ज्ञानेश्वर, नामदेव आदि संत उत्तर भारताची तीर्थायात्रा करून परत आल्यावर, ईस. १२९६ मध्ये ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याच वर्षी दिल्लीच्या तख्तावर अल्लाउद्दिन खिलजी विराजमान झाला.
“लवकरच अल्लाउद्दिनने चितोडवर हल्ला केला. चितोडचा पराभव झाल्यावर राणी पद्मिनीने जौहार केला. त्या नंतर अल्लाउद्दिनने गुजरातच्या वाघेला राज्यावर स्वारी केली. वाघेला राजा करणदेवच्या पत्नीला, कमलदेवीला अल्लाउद्दिनने पळवून आणले, व त्याच्या जनानखान्यात आणखी एका बायकोची भर पडली. इकडे रामदेवरायाने राजा करणदेव व राजकन्या देवलदेवीला आश्रय दिला. अल्लाउद्दिनने गुजरात पाठोपाठ यादव राज्यावर स्वारी केली. जराही न लढता, राजा रामदेवराय खिलजीला बिनशर्त शरण गेला आणि शेवटपर्यंत खिलजीचा मांडलिक होऊन राहिला.
“रामदेवरायाने स्वतःची मुलगी, राजकन्या जत्यपाली खिलजीला दिली. तर शरणार्थी राजकन्या देवलदेवी खिलजीच्या मुलाने, खिझ्र खानने पळवली. खिझ्र खानच्या खुनानंतर कुत्बुद्दिनने देवलदेवीला ताब्यात घेतले, आणि कुत्बुद्दिनचा खून करून खुसरो खानने देवलदेवीला आपल्या बायकांच्या ताफ्यात जमा केले. या रक्ताने माखलेल्या लालसेमधे अल्लाउद्दिन खिलजीच्या कवीला काय ‘romance’ दिसला ते त्यालाच ठावूक. त्या कवीने, अमीर खुसरोने, देवलदेवी आणि खिझ्र खान यांच्या ‘प्रेम कहाणी’ वर काव्य रचले.”, पूजाताई म्हणाली.
“आजकाल अशा काल्पनिक ‘प्रेम कहाणी’ वर पिक्चर काढतात! असो. पुढे?”, प्रकाश मामा म्हणाला.
“खिलजीने देवगिरीच्या दरबारातील गायक आणि पंडितांना आपल्या बरोबर दिल्ली दरबारी नेले. विद्याहरण म्हणतात ते हेच. रामदेवरायच्या दरबारातील महान गायक, गोपाल नायकला दिल्लीला नेण्यात आले. गोपाल नायक आणि अमीर खुसरो यांच्या मधील जुगलबंदीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहे.
“अल्लाउद्दिनने देवगिरीची किती संपत्ती लुटली असेल याला तर अंतच नाही. इतकेच नाही तर, दक्षिणेकडील होयसळा व काकतीय राज्यांवर हल्ला करण्यासाठी रामदेवरायाचीच मदत घेतली.
“राजा रामदेवरायचा मुलगा वीर शंकरदेवरायने खिलजी विरुद्ध बंड पुकारले तेंव्हा रामदेवरायाने खिलजीकडे त्याबद्दल तक्रार केली. खिलजीने शंकरदेवरायचे बंड मोडले. रामदेवरायाच्या मृत्युनंतर शंकरदेवराय पुन्हा खिलजीशी लढला, पण त्या लढाईत शंकरदेवराय मारला गेला. नंतर रामदेवरायचा जावई हरपालदेव याने देखील खिलजी विरुद्ध बंड पुकारले, पण हरपालदेवचे अतोनात हाल करून त्याला भर चौकात फासावर लटकवण्यात आले.
“ज्ञानेश्वरांनी समाधी घेऊन केवळ २० वर्ष झाली होती. या २० वर्षात जिथे सोन्याचा धूर निघत होता त्या महाराष्ट्राची पुरती दैना झाली.”
“पूजाताई, ज्ञानेश्वर राजा रामदेव बद्दल काही म्हणतात का?”, रजुने विचारले.
“ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी, कुठे लिखाण केले, कधी लिहिले, कोणी लिहिले हा तपशील सांगतांना, रामदेवरायाचा उल्लेख आहे. एका ओवीत ज्ञानोबा म्हणतात -
तेथ यदुवंश विलासु | जो सकळकळानिवासु |
न्यायाते पोषी क्षितीशु | श्रीरामचंद्र || १८.१८०५ ||
“यदुवंशी राजा रामदेव रायाकडे सर्व कलांना निवास मिळाला आहे. या न्यायी राजाने संगीत, स्थापत्य, विज्ञान, साहित्य या सर्वांना आश्रय दिला आहे. शब्दप्रभू असलेले ज्ञानेश्वर, राजा बद्दल किती बोलू शकले असते? पण, या राजासाठी ज्ञानोबा एकच शब्द वापरतात – विलासी! सुज्ञाने तेवढ्यावरून ओळखावे.”
”पुढे काय झाले, पूजाताई?”, रघूने विचारले.
“पुढे? पुढची ३५० वर्ष अशीच अंधारात गेली. त्यानंतर सिंधखेड राजा येथील, यादवांच्या म्हणजेच जाधवांच्या घराण्यातील जिजाबाईंच्या पुत्राला राज्याभिषेक झाला! आणि यादव कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या कृपेने, महाराष्ट्राच्या भाग्यात असाही दिवस आला, जेंव्हा रामदास स्वामींनी इथल्या राजाचे वर्णन ‘पुण्यवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, यशवंत, कीर्तिवंत, जाणता राजा’ असे केले!”