अतिथी देवो भव |

    12-May-2017   
Total Views |

 
’अतिथी देवो भव |’ अर्थात पाहुणा देवासमान असतो, असं सांगणारी आपली संस्कृती. कोणी पाहुणा आपल्याकडे जेवायला आल्यास सारे घर त्यासाठी राबायचे. शाकाहारी घर असेल तर श्रीखंड-पुरी, आमरस-पुरी असा बेत असायचा. मांसाहारी असेल तर मासे किंवा चिकन ठरलेलंच. सकाळी यजमान बाजारात जाऊन खास बेत असेल त्याचं वाण सामान घेऊन यायचे. यजमानबाई पाहुण्यांच्या आवडीनुसार बेत तयार करायच्या. खरं तर या भोजनामध्ये यजमानांचे पाहुण्यांप्रति असलेले ममत्व आणि आदर दिसत असल्याने हे भोजन एरव्हीच्या भोजनापेक्षा जास्तच रुचकर होई. भोजन केल्यानंतर पाहुण्यांनी तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर यजमानांना आपली पितरं स्वर्गात पोहोचल्याचंच जणू समाधान मिळे. कल्पना करा, असा एखादा पाहुणा आपल्या घरी आला, त्याच्यासाठी आपण साग्रसंगीत भोजन तयार केले आणि त्याने आपल्याला भोजनासाठी मानधन दिले तर??? ही कल्पना प्रत्यक्षात साकारलीय तीन मराठी तरुणांनी ‘ऑथेन्टिक कुक’च्या माध्यमातून.
 
 


अमेय, अनिश आणि प्रियांका हे तीन मित्र. एमबीए केलेले. तिघेही मराठी मध्यमवर्गातून आलेले. तिघांना फिरण्याची खूप आवड. एकदा लडाखला फिरायला गेले असता ‘ऑथेन्टिक कुक’ची आयडिया पहिल्यांदा त्यांना सुचली. आपण हॉटेलमध्ये जेवतो, पण त्याला घरच्या जेवणाची चव नसते. घरचं जेवण शेवटी घरचंच असतं. त्याला तोड नाही. मात्र, पर्यटकांना, फिरस्त्यांना हे घरचं जेवण कसं मिळणार? खाण्याची इच्छा असेल तरी त्यांना देणार कोण? यासाठी काय करता येईल? या विचारातूनच ‘ऑथेन्टिक कुक’चा जन्मझाला. ही संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी जवळच्याच मित्रांची निवड केली. एका मित्राच्या आईने उत्तमपद्धतीने जेवण तयार केलं. त्या मित्राच्या आईसाठी अनोळखी असलेले अमेयचे मित्रच पाहुणे म्हणून आले. त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणासोबत गप्पागोष्टी देखील झाल्या आणि ‘ऑथेन्टिक कुक’चा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. हळूहळू इतर मित्र, नातेवाईकांसोबत इतर ठिकाणी हे प्रयोग राबविले गेले. त्याला यश मिळालं आणि मग सप्टेंबर २०१५ मध्ये याला व्यावसायिक जोड देण्यात आली. सुरुवातीला ङ्गेसबुक आणि इन्स्टाग्रामया सोशल मीडियाचा आधार घेऊन प्रचार करण्यात आला. लोक ती जाहिरात पाहून यायला लागले. भोजनाचा आस्वाद देणार्‍या यजमानांची संख्या वाढली. सुरुवातीला फक्त मुंबईपुरतीच मर्यादित असणारे ‘ऑथेन्टिक कुक’ मुंबईबाहेरदेखील पसरू लागले. मुंबई, पुणे, बंगळुरु, जयपूर, गोवा, कोचीन, चेन्नई, उदयपूर आणि दिल्ली अशा नऊ शहरांत ‘ऑथेन्टिक कुक’चं जाळं पसरलंय. गेल्या दीड वर्षांत यजमानांची संख्या ८५ वर पोहोचली आहे. या यजमानांकडून १८०० हून अधिक लोकांनी जवळपास २७० हून अधिक भोजनांचा आस्वाद घेतला आहे. कोळी, पारशी, पाठारे-प्रभू, सीकेपी, आसामी, बंगाली, राजस्थानी, मारवाडी, तामिळ अय्यंगार, आंध्रा ब्राह्मण, केरळ, अँग्लो इंडियन अशा विविध प्रांतांच्या, संस्कृतीच्या भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी ‘ऑथेन्टिक कुक’ आपल्याला देते. लोकप्रियता, विश्वासार्हता आणि व्यावसायिकता या अनुषंगाने १३ हजार हॉटेल्सच्या यादीत ‘ऑथेन्टिक कुक’चा १५ वा क्रमांक येतो. हा क्रमांक रेटिंग देणार्‍या ग्राहकांनी ‘ऑथेन्टिक कुक’ला दिलेला आहे. ‘बुकिंग डॉट कॉम’ ही पर्यटकांसाठी निवारा उपलब्ध करून देणारी जगातील सर्वांत मोठी ऑनलाईन कंपनी आहे. ही वेबसाईट जगातील ४० भाषांमध्ये उपलब्ध असून जगभरातील २२७ देशांमध्ये १२ लाख ४३ हजार ९७९ इतकी मालमत्ता आहे. प्रत्येक दिवशी तब्बल १२ लाखांहून अधिक खोल्या ‘बुकिंग डॉट कॉम’वरून ऑनलाईन बुक केल्या जातात. ‘ऑथेन्टिक कुक’ लवकरच या वेबसाईटसोबत करारबद्ध होणार आहे. गुणवत्तेच्या निकषांवर भारतातील अनेक कंपन्यांमधून ‘ऑथेन्टिक कुक’ची निवड केली गेली आहे. ऑथेन्टिक कुक ही ‘बुकिंग डॉट कॉम’सोबत करारबद्ध होणारी पहिलीच भारतीय कंपनी असेल. नजीकच्या काळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत कामकरण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.
 

   
‘‘जर तुम्हाला कोणासोबत मैत्री करायची असेल तर त्याच्या घरी जा आणि त्याच्यासोबत भोजन करा. ज्या व्यक्ती त्यांचं अन्न देतात त्या व्यक्ती त्यांचं हृदयदेखील तुम्हाला देतात.’’ अमेरिकन कामगार नेता आणि नागरी हक्क कार्यकर्ता सीझर चावेझ यांचं हे वाक्य. ‘ऑथेन्टिक कुक’च्या वेबसाईटवर हे वाक्य आपल्याला वाचायला मिळतं. एखाद्या माणसाला जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, या भारतीय वाक्याचंच हे विस्तारित स्वरूप. खर्‍या अर्थाने ‘ऑथेन्टिक कुक’ची टीमभारतीय खाद्यसंस्कृती नव्याने प्रचलित करू पाहतेय.
 
-प्रमोद सावंत
 

प्रमोद सावंत

लेखक ‘युक्ती मीडिया कन्स्लटन्सी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संज्ञापन व पत्रकारिता विषयात मास्टर्स केले आहे. ते ‘डिक्की’चे सदस्य असून उद्योग, उद्योजकता यांचा गाढा अभ्यास व त्यासंबंधी लिखाणात त्यांचा हातखंडा आहे.