मोर, सावित्री आणि श्रीदेवीचे आत्मभान

    11-May-2017   
Total Views | 23


 

 

दोन-तीन वर्षांपूर्वी श्रीदेवीचे पुनरागमन असलेला 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट खूप गाजला होता. गोष्ट तशी साधीच. चाळीशीतली मध्यमवर्गीय गृहिणी, तिच्या परीने घरगुती लाडू करण्याचा उद्योग चालवणारी छोटी उद्योजिका. पण तिचं घरात 'असणं' घरातल्या सगळ्यांच्या इतकं अंगवळणी पडलेलं की मुलं आणि नवरा ह्या सगळ्यांच्या नजरेत नुसते तिचे छोटे छोटे दोष कुसळासारखे खुपणारे. तिचे गुण त्यांनी पूर्णतः गृहीत धरलेले. त्या चित्रपटाच्या शेवटी एक प्रसंग आहे. तिने केलेले लाडू सगळ्यांना देत तिचा नवरा मोठ्या फुशारकीने म्हणतो, 'माझी बायको लाडू इतके छान करते ना की केवळ लाडू करण्यासाठीच तिचा जन्म आहे असं वाटावं'. त्याच्या जवळ बसलेल्या श्रीदेवीचा चेहेरा खर्रकन उतरतो. तिची भाची तिला नंतर म्हणते, 'केवळ लाडू वळण्यासाठीच तुझा जन्म नाही झालेला मावशी'.  

हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता, विशेषतः मध्यमवयीन स्त्रियांमध्ये. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच मी एका लंच पार्टीला गेले होते. बरोबर सगळ्या बायकाच होत्या. काही गृहिणी, काही नोकरदार तर काही स्वतःचा छोटा का होईना, पण काही तरी उद्योग करणाऱ्या. सगळ्याच जणी बऱ्यापैकी आर्थिक सुस्थितीतल्या. लेखिका मंगला गोडबोलेंच्या शब्दात सांगायचं तर पिठामिठाचे प्रश्न न पडलेल्या. काहींची मुलं कॉलेजमध्ये जाणारी, तर काहींची शाळेत. सगळ्या जणींनी तो चित्रपट बघितला होता आणि सगळ्याच जणींची प्रतिक्रिया जवळ जवळ सारखीच होती, 'आम्ही घरासाठी, संसारासाठी, मुलांसाठी इतकं करतो. पण आम्हाला इतकं गृहीत का धरलं जातं?' एकजण म्हणाली, 'वीस वर्षं गेली सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात, तरीही मला कशाचं वाईट वाटतंय ते कुणाला समजतही नाही बघ, आणि माझ्या आयुष्यात थोडाच कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस येणार आहे आता जो मला आत्मभान मिळवून द्यायला मदत करेल?'

मी हसले, म्हटलं, 'अग इतकं जर तुला कळतंय तर मग तुला आत्मभान मिळवून द्यायला दुसरं कुणीतरी पाहिजेच कशाला ग? तुझं तू मिळव ना आत्मभान. स्वतःच  मिळवायचं असतं म्हणून तर त्याला आत्मभान म्हणतात ना? तुला तुझ्या आयुष्यात कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस यायला हवाय ना? मग तूच बन की तो फ्रेंच माणूस. चित्रपटात तो श्रीदेवीसाठी काय करतो तर तिचं सगळं म्हणणं टीका न करता ऐकून घेतो. तिचं कौतुक करतो. ती किती सुंदर आहे, हुशार आहे ते तिलाच पटवून देतो. तिला स्वतःकडे नव्याने बघायला लावतो. हे सगळं तुझं तू सुद्धा करू शकतेस ना?' 

पु. शि. रेगेंच्या सावित्री ह्या पुस्तकातली राजम्मा चिमुकल्या सावूला लच्छी आणि मोर ही गोष्ट सांगते. त्यातल्या छोट्या लच्छीला मोर सतत आपल्या अंगणात नाचावा असं वाटत असतं. पण मोर स्वच्छंदी असतो. तो अट घालतो की लच्छीच्या अंगणात मोर नाचायला हवा असेल तर लच्छीने स्वतः आधी आनंदाने नाचायला हवं, तरच मोर येईल. लच्छी मग आनंदी राहण्याचा प्रयत्न करते कारण तिला तो मोर हवा असतो. पण मोर कधी येणार ते काही सांगता येत नाही. शेवटी मोराची वाट बघणं हे कारणच गळून पडतं आणि लच्छी स्वतःच मोर बनून आनंदविभोर होते. 'आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं, आपल्याला जे जे हवं ते आपणच व्हायचं' हा त्या गोष्टीतला गाभा. तो एकदा समजला की मग आत्मभान आपसूकच येतं. 

स्त्रियांच्या बाबतीत तर हे कळणं खूप महत्वाचं असतं, कारण आयुष्याच्या एका वळणावर बऱ्याच बायका एकाकी पडत जातात. विशेषतः घर-संसारासाठी म्हणून करियर सोडणाऱ्या किंवा नोकरी-उद्योग केला तरी करियर मंद आंचेवर ठेवणाऱ्या स्त्रियांना चाळीशीच्या आसपास एकदम रिकामपण खायला उठतं. नवरा त्याच्या कामात प्रगती करत असतो, मुलं त्यांच्या व्यापात गढून जातात, संप्रेरकांमुळे शरीरातही बरेच बदल घडत असतात आणि मग उगाचच चिडचिड झाल्यासारखं वाटतं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे डोळे भरून येतात. घरातलं कुणी आपल्याला समजूनच घेत नाही असं वाटतं आणि त्या सगळ्या भावनांच्या हिंदोळ्यावर सतत झुलत असताना स्वतःवरचं लक्ष कमी कमी होत जातं. 

अशा वेळी मग मन एकतर सतत भूतकाळातल्या चुकांचा धांडोळा घेत राहतं, 'छे, मी इतक्या लवकर लग्नच करायला नको होतं', इथपासून ते 'उगाच प्रमोशन नाकारलं, बदलीच्या भीतीने. ती बढती घेतली असती तर आज कुठल्या कुठे पोचले असते', इथपासूनच्या आयुष्यातल्या सगळ्या खऱ्या-काल्पनिक हुकलेल्या संधींची उजळणी होते. त्यातून पदरी काहीच पडत नाही, फक्त नैराश्य वाढतं. आपल्याच निर्णयक्षमतेवरचा स्त्रियांचा विश्वास उडतो आणि आहे ती परिस्थिती अजूनच वाईट भासायला लागते. भूतकाळात सतत वावरल्याने नैराश्य पदरी येतं तर सतत भविष्याची चिंता केली तर छातीत धडधड, उगाच भीती वाटणे, रात्री झोप न लागणे, कसल्यातरी अनामिक भीतीच्या दडपणाखाली सतत वावरणे. मुलांच्या शिक्षणाचं पुढे काय होईल, घराचं कर्ज कसं फिटेल, घरी कुणाला आजार असला तर पुढे काय होईल असल्या चिंता मग बाईला सतावायला लागतात. एका बाजूने भूतकाळातल्या चुका आणि दुसऱ्या बाजूने भविष्यातल्या काल्पनिक समस्यांची भीती ह्या दुहेरी कात्रीत सापडून बहुतेक बायका मग आपलं वर्तमान पार विसरून जातात. स्वतःकडे, स्वतःच्या आवडी-निवडींकडे, आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अजूनच रितं, भकास वाटून घेतात. 

आपल्या मनाच्या अंगणात नाचणारा मोर तर हवा असतो पण त्यासाठी आपणच मोर व्हायचं असतं हे मात्र बऱ्याच बायका पार विसरून जातात. आपल्या नवऱ्यावर, मुलांवर, इतर सुहृदांवर प्रेम करताना आपण आधी आपल्यावरच प्रेम करणं गरजेचं असतं. दुसऱ्यांना भरभरून देताना आपण आपल्याला समृद्ध करत रहायचं असतं, नाहीतर आपल्याजवळ आहे ते इतरांना देऊन देऊन कधी ना कधीतरी रितेपणाचा अनुभव मनाला ग्रासून राहणारच असतो.  

चाळिशीतल्या स्त्रीचे आत्मभान हा विषय खरा तर आतापर्यंत चावून चोथा झालेला, तरीही आजूबाजूला बघताना आयुष्यातली दोन-तीन दशकं घरातल्या इतरांसाठी खपूनसुद्धा आयुष्यातल्या ह्या टप्प्यावर आपण उपेक्षिल्या जातोय म्हणून खंतावणाऱ्या अनेक बायका दिसतात. बरोबरच्या मैत्रिणी खूप पुढे निघून गेल्या आहेत पण आपण मात्र काहीच धड नाही करू शकलो असं वाटून असुरक्षित वाटून घेणाऱ्या बऱ्याच स्त्रिया अवतीभोवती दिसतात. आयुष्यातल्या जमाखर्चात बाकी साऱ्या नात्यांची बेरीज करता करता त्यांनी स्वतःबरोबरचं नातं मात्र वजा केलेलं असतं आणि हे आयुष्याच्या ज्या टप्प्यावर जाणवतं तेव्हा दिनक्रमात जाणून बुजून बदल करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी झालेली असते. मग नुसती चिडचिड वाढत जाते. 

भूतकाळातल्या चुका आणि भविष्यकाळाची चिंता ह्या द्वंद्वामध्ये बळी जातो तो बिचाऱ्या वर्तमानाचा. ते जाणून वागता यायला हवं. पु.शिंच्याच सावित्रीच्या शब्दात सांगायचं तर 'फार पुढं पाहू नये आणि मागचं रंगवू नये. जें झालं आहे तें तसंच दूर ठेवलं पाहिजे. बरोबर वागवण्यानं त्याच्या छटा फिकट होतात.' दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःलाही वेळ देता यायलाच हवा. मुलांच्या निकोप वाढीविषयी आई जितकी जागरूक असते, तितक्याच कसोशीने तिने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचीही वाढ जोपासायला हवी, मग कुणा देखण्या फ्रेंच हिरोची गरज लागत नाही आत्मभान जागवायला. 

 

- शेफाली वैद्य 

 

 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121