"पूजाताई! आज ज्ञानेश्वरीतील विज्ञान कथा सांग ना!”, रघुने पूजाताईला गळ घातली.
"उम्म ... हां! ज्ञानेश्वरीतील जलचक्राची आणखीन एक ओवी सांगते!”, पूजाताई म्हणाली, “पण त्यासाठी आपण जाणार आहोत १३ व्या शतकात.
“१३ व्या शतकाच्या सुरवातीला, पर्शिया मध्ये रुमी हा सुफी संत - कवी प्रसिद्धीस आला होता. याने पर्शियन, अरेबिक, तुर्की आणि ग्रीक भाषेत देखील काव्य रचले. त्याने देवाला उद्देशून लिहिलेल्या रुबयात आणि गझला अत्यंत हळुवार आणि गहन आहेत. त्याची ही एक कविता ऐक -
पहिली प्रेम कहाणी ऐकताच,
माझे डोळे तुला शोधू लागले.
किती वेडा होतो मी,
कारण मला नंतरहून कळाले,
की मी आंधळा होतो!
ठार आंधळा!
अरे! प्रियकर कधी कुठे भेटतात का?
ते तर युगानुयुगे एकमेकात राहतात!
“रूमीच्या कविता आजही खूप प्रसिद्ध आहेत. अगदी अमेरिका पासून ते बांगलादेश पर्यंत!”, पूजाताई म्हणाली.
“पूजाताई! ते जलचक्र सांग न!”, रघु म्हणाला.
“हं! तर सांगायचं काय की, रूमीच्या काळातील महाराष्ट्रातील संत-कवी म्हणजे ज्ञानदेव. ज्ञानदेवांनी संस्कृत गीता मराठीत आणली. काव्यात गुंफली. सुंदर उपमांनी आलंकृत केली. सर्वसामान्यांना कळतील असे दृष्टांत देऊन समजावली. त्या उदाहरणां मधील एक वैज्ञानिक उदाहरण आपण आज पाहू.
“मागे आपण बोललो होतो की युरोप मध्ये ग्रीक काळापासून अशी समजूत होती की, जमीन समुद्रावर तरंगते. समुद्रातील पाणी जमिनी खालून झीरपते आणि तोच नदीच्या पाण्याचा स्रोत आहे. १६ व्या शतकात बर्नर्ड पालीस्सीने water-cycle चा शोध लावला.
“पण ४०० वर्ष आधी, भारतामध्ये ‘समुद्र - वाफ - ढग - पाऊस - नदी – समुद्र’ हे जलचक्र माहीत होते. या ओवीत ज्ञानोबा म्हणतात -
मेघ सिंधूचे पाणी वाहे | तरी जग तयाचेची पाहे |
का जे उमप ते नोहे | ठाकते कोण्हा || १८.१७०६ ||
“त्याचा अर्थ असा की - मेघ समुद्राचे पाणी वाहून आणतो. समुद्रापासून कित्येक कोसांवर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वर्षाव करतो. दर वर्षी नेमाने गोड पाणी आणणाऱ्या मेघाचे किती कौतुक आहे! लोक आतुरतेने मेघाची, पावसाची वाट पाहतात.
“त्या अथांग, अमित आणि खारे पाणी असलेल्या समुद्राचे कोणी इतके कौतुक करते का? त्या अमर्याद समुद्राच्या पाण्याचा कुणाला उपयोग होत नाही! पण समुद्रात जन्मलेले मेघातील पाणी प्राण्यांसाठी जीवन ठरते.
“त्या मेघा प्रमाणे, गीता समुद्रा सारखे अथांग असलेले ब्रह्मज्ञान, आपल्या पर्यंत गोड करून आणते. ब्रह्मज्ञान जर शब्दांत बांधले नसते, श्लोकात ओवले नसते, तर आपण निर्गुण ब्रह्माचे श्रवण, प्रवचन कसे केले असते?”, पूजाताई म्हणाली.
“ताई, आपण असच ज्ञानेश्वरी बद्दल ही म्हणू शकतो नाही का? की ज्ञानेश्वरी गीतेचे तत्वज्ञान वाहते आणि आपल्या पर्यंत गोड करून आणते. आपल्यासारख्या गीता न कळणाऱ्याला ज्ञानेश्वरीच अधिक उपयुक्त ठरते!”, रघु म्हणाला.
- दीपाली पाटवदकर