’रामायण’ अजिबात न वाचता कित्येकजण त्यावर अधिकारवाणीने (?) बोलतात आणि श्रीरामांवर प्रश्न विचारतात तेव्हा काय बोलावे, असा प्रश्न पडतो. त्यांना रेडिमेड उत्तरे हवी असतात आणि तीसुद्धा त्यांना पटतील, म्हणजे त्यांच्या मतांना साथ देणारी अशीच! मुळात काही वाचन न करता केवळ सोशल माध्यम आपल्या हाती आहे म्हणून काहीही मते व्यक्त करावीत असे नाही ना. ‘‘अभ्यासे प्रकट व्हावे| नाहीतरी झाकोनी असावे|’’ असे समर्थ उगाच म्हणत नाहीत. तथापि, अशा लोकांना समर्थही नीटसे ठाऊक नसतात आणि माहिती करून घेण्याची बहुधा इच्छाही नसते. यामुळे आपले हसे होते हे त्यांच्या लक्षात येत नाही.
नुकतेच प्रशांत भूषण नामक विधिज्ञ असेच काही श्रीकृष्णावर बरळले. अशा लोकांची मुक्ताफळे ऐकून घेणे ही हिंदूंमधील उदारतेची आणि क्षमाशीलतेची परिसीमा आहे, असे वाटत नाही का? आणि तरीही हिंदूंना असहिष्णू म्हणणारे महाभाग आपल्याकडे आहेत. देव-देवतांवर वाटेल तसे बोलणारे कधी अन्य धर्माच्या श्रद्धास्थानांबद्दल का बोलत नाहीत? खरे तर या प्रश्नातच उत्तर आहे. एका शब्दात सांगायचे तर, घाबरतात. ती भीती त्यांना हिंदूंबद्दल वाटत नाही.
श्रीरामांवर आक्षेप घेणारे मूळ रामायण वाचत नाहीत तर त्यावर आधारित लिहिलेली पुस्तके वाचतात. अशी पुस्तके वाचण्यापूर्वी लेखक कोण आहे आणि त्याचा नेमका हेतू काय आहे, हे लक्षात घ्यायला नको का? त्यातून त्याने जे आक्षेप घेतले असतील त्याचे निराकरण करायला मूळ ग्रंथ उपलब्ध आहे ना! पण तो वाचायचा म्हणजे अभ्यास करायला लागतो. त्यापेक्षा समोरच्यावर प्रश्न ङ्गेकणे सोपे असते. त्याने उत्तर दिले, तर त्यातून अनेक उपप्रश्न काढणे आणखी सोपे असते. कारण हा धंदा करणार्या लोकांना सत्य नको असते. त्यांना केवळ समाजात बुद्धिभेद निर्माण करायचा असतो.
हरेः पदाहतो श्लाघ्य: न श्लाघ्यं खररोहण|
स्पर्धाडपि विदुषा युक्ता न युक्ता मूर्खमित्रता।।
सिंहाच्या पंजाचा तडाखा खाल्ला तरी (एक वेळ) प्रशंसनीय आहे, पण गाढवावर स्वार होणे प्रशंसनीय नाही. विद्वान माणसाशी स्पर्धा करणे योग्य आहे, पण मूर्खाशी मैत्री करणे अजिबात योग्य नाही.
त्यामुळे अशा मूर्खांना उत्तरे देत बसणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. तथापि मुद्दाम काही प्रश्नांची उत्तरे देतो. ज्यामुळे किमान ज्यांना उत्सुकता असेल त्यांना मूळ ग्रंथ कसा नीट वाचावा ते समजेल.
श्रीरामांना विवाह होताच वनवासात जावे लागले, असे खुळेपणाने मानले जाते. बालकांड संपते तेच मुळी विवाहानंतर. श्रीरामांनी १२ वर्षे सुखाने संसार केला या वाक्याने, हे रामायण वाचले तर कळेल. अन्यथा आनंदच आहे. तसेच वनात जाताना लक्ष्मणाला नेण्याचे कारण काय? असाही प्रश्न याच अज्ञानातून विचारला जातो. रामायणातील लक्ष्मणाचे वर्णन यांना ठाऊक नसते.
लक्ष्मणोलक्ष्मिसंपन्न: बहिः प्राण इवापर|
(लक्ष्मीसंपन्न असलेला लक्ष्मण म्हणजे श्रीरामांचा बहिश्चर प्राण होता.)
इथे ‘लक्ष्म’ या शब्दाचा आणखी एक अर्थ शोभा असाही होतो. श्रीरामांमुळे ज्याचे जीवन शोभित झाले आहे असा तो लक्ष्मण होय. सध्याच्या युगात भावंडांचे प्रेम पाहता राम-लक्ष्मण प्रेम हे स्वप्नवत वाटावे. श्रीरामांची विजयपताका ज्या ध्वजदंडावर लहरते आहे तो ध्वजदंड म्हणजे लक्ष्मण होय, असेही वर्णन वाल्मिकींनी केले आहे. रामस्य दक्षिणो बाहू, असे त्याचे सार्थ वर्णन आहे. आजच्या भाऊबंदकीच्या काळात हे आश्चर्य वाटण्याजोगे आहे. त्यामुळे रामांना वनवासात जाण्याची आज्ञा होताच लक्ष्मण खवळला होता. त्याला शांत करणारे केवळ श्रीराम होते. राम त्याला वनात येऊ नकोस असे वारंवार सांगतात, पण एवढे एकच म्हणणे मानायला तो ठामपणे नकार देतो आणि वनात जातो. यात रामाचे काय चुकले? पण वृथा आरोप करणार्यांना त्याचे काय? त्यांना भारतीय संस्कृतीमधील हा बंधूधागा जाणून घ्यायचा नसतो.
हे उत्तर मिळाले की, लगेच अशा लोकांना ऊर्मिलेचा उमाळा दाटून येतो. तिच्यावर अन्याय होणे हा पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग नाही काय? असा प्रश्न लगेच तयार असतो. यांना भारतात कधीही स्त्रीप्रधान वा पुरुषप्रधान अशी संस्कृती नव्हती हेच ठाऊक नसते. हे शब्दसुद्धा पाश्चात्त्यांकडून आपण उसने घेतले आहेत. भारतीय संस्कृतीत दोघांना यथायोग्य मान आहे. आजही बाहेरची कामे पुरुष करतो, तर घरातील मंगलकार्य, सण, कुळधर्म आदींमध्ये स्त्रियांचा पुढाकार असतो आणि त्या सांगतील ती कामे घरातील पुरुष मुकाट्याने करतो. कारण त्यातील जास्त ज्ञान त्यांना आहे याची ती कबुली असते. ऊर्मिला स्वत: तक्रार करत नाही, पण तिची वकिली करणारे मात्र हिरिरीने बाजू मांडत राहतात, हे पाहून मौज वाटते. तिचा रामायणात विशेष उल्लेख का नाही? असा आणखी एक प्रश्न येतो. याला उत्तर इतकेच आहे की, ते ‘रामायण‘ आहे म्हणजे रामचरित्र आहे. त्यात अन्यांचा जेवढ्यास तेवढा इतकाच उल्लेख येणार. शिवरायांच्या सेवकांच्या घरच्या माणसांचे काय झाले? आणि त्यांचा उल्लेख शिवचरित्रात का नाही? असे विचारण्यासारखे आहे. याला उत्तर तेच आहे की, ते शिवचरित्र आहे म्हणून.
वनात लक्ष्मण जेवलाच नव्हता हे कसे? असा एकाने प्रश्न विचारला. यावर काय बोलावे? असा ‘रामायणा‘त कोठेही उल्लेख नाही. म्हणून मूळ ग्रंथ वाचावा हे योग्य होय. आज ‘रामायणा‘चे उत्तम अनुवाद उपलब्ध आहेत. मात्र अधिकारी व्यक्तीने आणि संस्कृत जाणकाराने ते केले आहेत ना, इतके पाहून घ्यावे. अन्यथा मराठीत इंग्रजी ‘रामायण‘-‘महाभारता‘चे अनुवाद आणले जात आहेत. त्यांचा मुळातील ग्रंथ समजून घेण्यासाठी काडीचाही उपयोग नाही.
मग एखादा वालीपुत्र पुढे सरसावतो. रामांनी वालीला आडून मारले हे चुकले नाही का? असे विचारतो. रामायणात खुद्द वाली रामांना टाकून बोलतो आणि जाब विचारतो. त्यावेळी राम त्याला धर्म समजावून सांगतात आणि म्हणतात, स्वत:च्या कृत्याने तू लोकनिंदेस पात्र ठरला आहेस. तू कामाच्या मागे लागून धर्मवंचक होऊन राजमार्ग भ्रष्ट झाला आहेस. आपल्या कन्येशी, बहिणीशी अथवा धाकट्या भावाच्या पत्नीशी जो विषयवासनेने रत होतो, अशा पुरुषाला शास्त्रकारांनी वधदंड सांगितला आहे. रामांचे आणखी बरेच बोलणे आहे. सर्वच येथे विस्तारभयास्तव देता येत नाही. श्रीरामांचे बोलणे ऐकून वाली आपली चूक मान्य करतो आणि योग्य दंड मिळाला असे म्हणतो. वाली जे मान्य करतो ते या वालीपुत्रांना मान्य नाही हे अजब म्हणायला हवे.
शंबूक वध, सीतेचा त्याग वगैरे गोष्टी उत्तरकांडात आहेत आणि बरेच विद्वान त्या कांडाला प्रक्षिप्त मानतात त्यामुळे त्याचा येथे ऊहापोह करत नाही. एकूण अशा शंकासुरांना रामरायाने सद्बुद्धी द्यावी, इतकीच इच्छा व्यक्त करतो.
- डॉ. सच्चिदानंद शेवडे