चैत्रातील चैत्रांगण

    07-Apr-2017   
Total Views | 2

 

महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात तृतीयेला चैत्रगौर बसवली जाते. पितळ्याच्या पाळण्यात गौरीची स्थापना करायची आणि अक्षय तृतीयेपर्यंत पुजायची. गौरीला कैरीची डाळ, पन्हे, खीर, आंब्याचा नैवेद्य दाखवायचा, मोगऱ्याचा गजरा अर्पण करायचा. महिनाभरात बायकांना हळदी कुंकूवाला बोलावून भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरायची, डाळ पन्हे द्यायचे आणि एकत्र येऊन, गप्पा गोष्टींतून वसंत ऋतूचे आगमन साजरे करायचे असा हा सोहोळा.


एखाद्या गोष्टीला खूप साज शृंगार केला की म्हणतात ना की ‘काय चैत्र गौरेची आरास वाटतीये’, त्यातली ही चैत्रगौर. ह्या हळदी कुंकुवाला बायका गौर विविध प्रकारांनी सजवतात.  पानं, फुलं ह्यांची आरास, तोरणं मखर, पाळणा, कलिंगड, टरबूज किंवा इतर फळे कापून त्याचे सुंदर आकार, शोभिवंत वस्तू, नैवेद्य म्हणून विविध पदार्थ हे सगळं पुढे मांडलं की गौर ती एवढीशी दिसते आणि त्यापुढे ही भली मोठी सजावट म्हणून असं म्हणत असावेत.


ह्या महिन्यातच अंगणात ‘चैत्रांगण’ ही रांगोळी काढायची पद्धत आहे. पूर्वी अर्थातच घराभोवती मोठं अंगण असायचं, शेणाने सारवलं जायचं, सडा घातला जायचा आणि मग पांढऱ्या शुभ्र रांगोळीने रोजच रांगोळी काढली जायची. पण चैत्र महिन्यातली ही जरा वेगळी. ही ठिपक्याविना रांगोळी. आता काही घरांना मोठं अंगण नसतं. आपल्या फ्लॅटमधल्या फरशांवर रांगोळी खूप नीट दिसतही नाही. पण अजूनही बायका गौरीभोवती किंवा घरातला एखादा कोपरा रंगवून ही रांगोळी काढतात.

 

‘संकलित’

 
३३ शुभचिन्हांनी ही रांगोळी काढतात मात्र काढायला सुरुवात केली की त्यापेक्षाही जास्त अशी सुमारे ५० पर्यंत प्रतीके आपल्याला सहज आठवतात. मध्यभागी मखरात बसवलेल्या दोन गौरी म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा, बाजूला दोन पंखे, त्यांची आयुधं, गोपद्म, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, कमळ अशी चिन्हे काढली जातात. सूर्य, चंद्र, समई तसेच कुंकुवाचे करंडे, आंबा आदि फळे काढली जातात. रांगोळीमध्ये विविध आयुधे जसे की गदा, चक्र, त्रिशूळ, धनुष्य तसेच शंकराचे डमरू, चर्मवाद्य, सनई ही वाद्ये, कासव, नाग, गरुड, मोर, गाय, हत्ती हे प्राणी, ह्यांनादेखील स्थान आहे. मखरात तसेच पाळण्यात बसलेल्या गौरींबरोबरच मोरावर आरूढ सरस्वती, आधी पुजला जाणारा गणपती, शंकराची पिंड अशा देवी देवतांच्या प्रतिमा तर आहेतच.


आपण बघतो ह्या सगळ्या प्रतिमांना हिंदू धर्मात आणि संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक प्रतिमा ही एक प्रतिक आहे. प्रत्येकाला एक प्रगल्भ अर्थ आहे. सिंधू नदीच्या काठावर प्रगत होत होत चाललेला एक समाज निसर्गातल्या सर्व उर्जेची पूजा करायाला लागला आणि हिंदू संस्कृती उदयास आली. जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश ह्या पंचमहाभूतांना आपण समर्पित आहोत. निसर्गातल्या सगळ्या गोष्टींची आपण पूजा केली, त्यांच्या उपयुक्ततेला स्मरून कृतज्ञ भाव ठेवले. मग ती नदी असो वा गोमाता.  आकाश असो वा धरा!



सुफळतेचे प्रतिक म्हणून नारळ वा वृक्ष, गतीचे द्योतक स्वस्तिक त्याचे चार बाहू म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष, किंवा चार वेदही, ब्रह्मा, विष्णू व महेश ह्याचं प्रतिनिधित्त्व करणारे अ, उ आणि म अर्थात ओम, पंच महाभूतांचे प्रतिक असलेला माती आणि पाण्यापासून बनलेला अग्निसंस्करीत मातीचा दिवा, नकारात्मक उर्जा दूर ठेवणारी विविध वाद्ये, घंटा, श्री हे लक्ष्मीचे नाव जिच्यामुळे घरात समृद्धी, ऐश्वर्याचा वास राहतो, लक्ष्मीचे पावले म्हणजे घरात राहणारा ईश्वराचा संचार, करंडा म्हणजे सौभाग्य, फळे, पाने, फुले समृद्धी तुरा, कोयरी कलात्मकता, वर्तुळ म्हणजे पूर्णत्व, बिंदू म्हणजे निर्माणाची शक्ति असलेले बीज, मोर, गरुड आदी देव देवतांची वाहने म्हणजे ईश्वरी संचार अशी कितीतरी प्रतीके रांगोळीतून चितारली जातात. रांगोळी ही अशा सकारात्मक उर्जेला आकर्षून घेते, देवदेवतांचे स्वागत करते आणि त्यामुळे घरात ईश्वरी वास राहतो अशी श्रद्धा आहे.


भारतात वेगवेगळ्या भागात थोडीफार वेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जाते. बंगालमध्ये रांगोळीला अल्पना, बिहारमध्ये अरिपना, राजस्थानमध्ये मदना, गुजरातमध्ये रंगोली, महाराष्ट्र व कर्नाटकात रांगोळी, उत्तर प्रदेशात चौकपुराना, केरळ व तामीळनाडूत कोलम तर आंध्र प्रदेशात मुग्गू म्हणतात. दगडाची पांढरी कणीदार पूड रांगोळीसाठी वापरली जाते. मात्र तांदळाची बारीक पूड, पाने, फुले, तांदूळ आदि धान्य, कोळशाची पूड, मीठ, पाण्यावरची रांगोळी अशा कितीतरी माध्यमांनी रांगोळी काढली जाते. आजकाल कुंदन, रंगीबेरंगी खडे असेही वापरले जातात. मात्र संपूर्ण भारतात आजकाल मोठ्या कार्यक्रस्थळी दिसणारा आकर्षक रंगांमध्ये हाताच्या पाचही बोटांनी काढला जाणारा रांगोळी प्रकार संस्कार भारतीने ही प्रतीके वापरून खूपच लोकप्रिय केलाय. आजकाल लग्न, कार्ये, कार्यक्रम अशा ठिकाणी संस्कार भारतीची रांगोळी काढायला आवर्जून आमंत्रित केले जाते, ठिकठिकाणी अशी रांगोळी शिकवणारे वर्गही असतात.


प्रतीके आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. पूजा अर्चा, सण समारंभ, उत्सव तसेच रांगोळीच्या माध्यमातून ती जपली जाताहेत. माझ्यासाठी ही प्रतीकं प्रत्यक्ष प्रतिमेतून आपल्या विचारात येतात. त्यांनी घरात सुख, समृद्धी, शांती लाभते हा विश्वास, ही सकारात्मक भावना आपल्या मनात निर्माण होते, त्या विश्वासातून आपली कर्म होत राहतात जी आपलं आयुष्य प्रत्यक्ष समृद्ध करतात.

संस्कार भारतीच्या पद्धतीने चैत्रांगणच पण रांगोळीने न काढता चित्ररूपी काढायचा माझा हा एक वेगळा प्रयत्न. जवळपास चाळीस शुभचिन्हे ह्यात वापरली आहेत मात्र हा अपारंपारिक!

 

- विभावरी बिडवे 

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121