तीस वर्षांचा तरणाबांड जवान. सहा फूट उंच, देखणा, बलदंड. चांगला खेळाडू. डोक्यात अनेक कल्पना घेऊन वावरणारा. नित्य उत्साहाने निथळत असलेला. शाळेत शिक्षक व्हायचं त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलेलं. त्याचा उत्साह संसर्गजन्य, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय होता. त्यांच्या बहिणीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं होतं. एकदा बहिणीचं लग्न झालं की वर्षभरात त्याचे घरवाले त्याच्याही लग्नाचा बार उडवून देणार होते. लग्न त्यानेच ठरवलेलं होतं. त्याच्या बरोबर बी.एड करणाऱ्या एका मुलीसोबत त्याने प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या होत्या. किती स्वप्ने बघितली होती दोघांनी मिळून त्यांच्या भावी संसाराची. दोन्हीकडच्या आई-वडिलांचाही पाठिंबा होता लग्नाला. सगळं कसं छान चाललं होतं. कुठेच काही उणं नव्हतं. त्याचं उज्ज्वल भविष्य सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं त्याच्या डोळ्यांसमोर चकाकत होतं.
त्या भविष्याची सप्तरंगी स्वप्ने डोळ्यात खेळवत तो त्याच्या बहिणीच्या लग्नाआधीची काही तयारी करायला म्हणून जवळच्याच गावातल्या त्याच्या काकांकडे गेला होता. परतता परतता त्याला संध्याकाळ झाली. बस त्याच्या गावात पोचली तेव्हा सूर्य अस्ताला गेला होता. घरा-घरात दिवे लागत होते. छोटंसं गांव ते. रस्त्यावर दिवे नसलेलं. त्याच्या स्टॉपवर बस थांबली. तो उतरला. बसस्टॉप शेजारीच एक-दोन दुकानं होती पण तीही आता बंद व्हायच्या मार्गाला लागलेली. फक्त दोघे-चौघे लोक होते रस्त्यावर. बाकी सगळीकडे सामसूम. तो त्याच्या लांब टांगांनी झपाझप त्याच्या घराकडे चालायला लागला. तेवढ्यात एक जीप वेगात येऊन त्याच्या पुढ्यात थांबली. सात-आठ जणांचं टोळकं मोठमोठ्याने घोषणा देत, लाल बावटे फडकावत जीपमधून खाली उतरलं, हातात नंग्या तलवारी, विळे, करवत घेऊन. त्यातल्याच एकाने पिशवीतून गावठी बॉम्ब काढून फेकले. मोठा आवाज झाला, धूर पसरला. आजूबाजूचे लोक ओरडत घाबरून दूर पळाले. तोपर्यंत बाकीच्या लोकांनी ह्याला घेरलं होतं आणि जमिनीवर आडवं पाडून त्याचे हात-पाय घट्ट धरून ठेवले होते. त्याच्याच गावातले होते ते तरुण. एका-दोघांना तर तो चांगला ओळखत होता. लहानपणी त्यांच्यासोबत खेळला देखील होता, पण आता त्याच्या राजकीय विचारसरणीने त्याला त्या लोकांपासून दूर केलं होतं. तो ओरडू नये म्हणून एकाने त्याचं तोंड घट्ट दाबून ठेवलं होतं. त्या हातांना येणारा माश्याच्या कालवणाचा वास त्याच्या नाकपुड्यात ह्यापुढे आयुष्यभर घर करणार होता.
त्याला जमिनीवर तसा असहाय्य झोपवून त्यांनी त्यांची करवत सरसावली आणि त्याचे दोन्ही पाय त्या तिथे भर बाजारात गुढघ्याखाली निर्ममपणे कापून काढले. त्या प्राणांतिक वेदना त्याने कश्या सहन केल्या ते तोच जाणे. त्याचे पाय कापून त्यांनी दूर फेकले आणि भळाभळा रक्त वहात असलेल्या जखमेवर निर्विकारपणे जवळ पडलेली शेण-माती फासली. जखम चिघळावी आणि तुटलेले पाय परत बसवता येऊ नयेत म्हणून. ते क्रूरकर्म करून विजयोन्मादाने घोषणा देत, हातातले लाल बावटे गर्वाने अजूनच उंच धरत ते आले तसे जीपमधून निघून गेले. तो तसाच तिथे मातीत वेदनांनी तडफडत पडून राहिला. जीप गेल्यानंतर आजूबाजूला लपलेली माणसे दबकत दबकत परत आली. एकाच गावातले होते सगळे. तो कोण होता हे सगळ्यांनाच माहिती होतं. कुणी त्याच्या घरी कळवायला धावलं, तर कुणी पोलिसांना बोलवायला गेलं. त्याचे पाय असे भर बाजारात कापून टाकले गेले होते कारण त्याने गुन्हाच तसा केला होता. कम्युनिस्ट विचारांची कास सोडून तो राष्ट्रीय विचारांकडे वळला होता, आणि केरळमधल्या कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या कन्नूर जिल्ह्यात तो गुन्हा अक्षम्य होता.
त्याच्यावरच्या हल्ल्याची बातमी कळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले त्याचे सहकारी धावत पळत तिथे आले. एकाने त्याचे इथेतिथे पडलेले तुटलेले पाय शोधून काढले. दुसऱ्याने बर्फ आणला. तोपर्यंत पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली होती. आतापर्यन्त प्रचंड रक्तस्त्राव आणि वेदनांनी त्याला ग्लानी आलीहोती. पण त्याच्याबरोबरचे स्वयंसेवक सारखे त्याच्या कानात पुटपुटत होते, 'अच्चन, तू काळजी नको करूस. तू बरा होशील'. ते शब्द ऐकता ऐकताच कधीतरी त्याची शुद्ध हरपली.
दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली ती अनावर वेदनांनी. त्याने डोळे उघडले. तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्या खाटेशेजारी त्याचे आई-वडील होते, संघातले त्याचे मित्र होते. काल काय झालं होतं ते त्याला आठवलं आणि त्याने आपल्या पायांकडे एक दृष्टिक्षेप टाकला. त्याच्या गुढघ्यावर पांढरेशुभ्र बॅंडेज होते आणि खाली? खाली काहीच नव्हते. काल जिथे पाय होते तिथे आज होता केवळ एक रिकामा अवकाश आणि एक असह्य, जीवघेणी, कधी न संपणारी कळ. वेदना केवळ त्याच्या पायात नव्हती तर ती आता त्याचं अवघं आयुष्य व्यापून राहिली होती. केवळ बारा तासाच्या आत त्याच्या डोळ्यातली सगळी सप्तरंगी स्वप्ने विरून तिथे कायमचा अंधःकार पसरला होता.
'कसं वाटतंय रे आता'? त्याच्या आईने भिजल्या स्वरात त्याच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. त्याने काही न बोलता भिंतीकडे नजर फिरवली. उत्तर देण्यासारखं राहिलंच काय होतं आता त्याच्या आयुष्यात? त्याच दिवशी संध्याकाळी त्याची होणारी वाग्दत्त वधू त्याला भेटायला आली. काहीही न बोलतामूकपणे त्याच्याकडे नुसतं बघत राहिली ती. तिच्या नजरेतली हळुवार काळजी त्याला कळत होती तरीही तिच्याकडे पाठ फिरवून तो मूक पडून राहिला. तिच्याशी एक शब्द देखील बोलला नाही. तरीही ती येतच राहिली त्याला भेटायला. रोज. तो तिच्याकडे बघायचाही नाही, तरीही तिने हॉस्पिटल मध्ये यायचंकाही थांबवलं नाही. शेवटी कधीतरी त्याने तिला स्पष्ट सांगितलं. 'आपलं लग्न मोडलं असं समज. बिनपायाचा नवरा काय कामाचा?' डोळ्यात तुडुंब भरलेले अश्रू घेऊन त्या दिवशी ती गेली. दुसऱ्या दिवशी परत यायला. कठोर शिवाचं मन वळवणाऱ्या अपर्णेचा निग्रह होता तिच्यात. तो आपल्या निर्णयावर ठाम होता. आधीच स्वप्नाळू, आशावादी तो राहिलाच नव्हता आता. आता हॉस्पिटलच्या खाटेवर पडून होता तो एक वेदनेने, रागाने तळमळणारा माणूस. त्याने आपल्या आई-वडिलांना तिच्या आई-वडिलांशी बोलायला सांगितलं. त्याचे आई-वडील गेले सुद्धा तिच्याकडे तिला तिच्या निर्धारापासून प्रवृत्त करायला. पण ती सावित्रीची लेक होती. तिने त्यांना एकच प्रश्न विचारला, 'हे लग्न झाल्यावर घडलं असतं तर मला हाच उपदेश केला असता का तुम्ही'?
ह्या आघाताने तो केवळ शरीरानेच नाही तर मनानेही तुटून गेला होता. नैराश्याच्या गर्तेत खोल खोल बुडत चालला होता. महिनेच्या महिने तो रोज खाटेवर झोपून वरच्या आढ्याकडे शून्यपणे नजर लावून पडायचा तासचे तास. कधी उद्वेगाने आपल्या मित्रांना विचारायचा, 'का आणलंत तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये? तिथेच रक्तस्त्राव होऊन मरू का नाही दिलंत'? आत्महत्येचे विचार तर कितीदा तरी त्याच्या मनात डोकावून गेले. पण त्याचे संघामधले मित्र खंबीर होते. ते दररोज हॉस्पिटल मध्ये यायचे, त्याच्या शेजारी बसायचे. त्याच्याशी बोलायचे. त्याच्या मनाला उभारी आणण्याचा प्रयत्न करायचे. त्याची होणारी बायकोही यायची. त्यांच्या पुढच्या आयुष्याबद्दल बोलायची. आधी बोलायची तशीच. डॉक्टरही खूप चांगले होते त्या हॉस्पिटलमधले. त्याचे घरचेही त्याची पाठ सोडायचे नाहीत. त्यांच्या सगळ्यांच्या जिद्दीचा विजय झाला. त्याच्या नैराश्याने तिच्या प्रेमापुढे, त्याच्या मित्रांच्या आपुलकीपुढे, त्याच्या घरच्यांच्या विश्वासापुढे हात टेकले. हळूहळू तो परत माणसात यायला लागला. त्याच्या मनाला उभारी यायला लागली.
आता डॉक्टरांनी त्याला जयपूर फूट बद्दल सांगितलं. त्याच्या पायाचं माप घेऊन त्याच्यासाठी खास कृत्रिम पाय बनवण्यात आले. पण ते पाय लावून चालणं सुरवाती सुरवातीला एक दिव्यच होतं. त्याच्या गुढघ्यांची कातडी सोलवटायची. प्रत्येक पाऊल उचलताना प्राणांतिक वेदना व्हायच्या. कृत्रिम पाय काढलेतरी ठणकणाऱ्या पायांमुळे रात्र रात्र त्याला झोप लागायची नाही. पण त्याच्या जवळच्या माणसांचं प्रेम त्याला प्रत्येक वेळेला सावरून घ्यायचं, नवी उमेद द्यायचं. हळूहळू तो कृत्रिम पाय वापरून चालायला शिकला, जिनेही चढा-उतरायला शिकला. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तब्बल एक वर्षाने तो कामावर परत रुजू झाला. त्याच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाडक्या 'माशे'ला उभं राहून अभिवादन केलं. पुढे त्याचं लग्न झालं. त्याच्या सावित्रीने तिच्या सत्यवानाला नैराश्याच्या पाशातून सोडवून आणलं होतं.
१९९२ सालची ही गोष्ट. केरळ मधल्या संघ स्वयंसेवक सदानंदन मास्टर ह्यांची. ते अजूनही केरळ मध्येच शिकवतात. त्यांना तिथले लोक 'चालता-बोलता हुतात्मा' म्हणून ओळखतात. संघाचे ते केरळमधले एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपतर्फे तिकीटही मिळालं होतं. मास्तरजींना एक मुलगीही आहे. ती इंजिनीयरींग करते. सदानंदन मास्टरजींवर ज्या कम्युनिस्ट गुंडांनी हल्ला केला होता त्यांच्यावर खटला भरला गेला. त्यांना तुरुंगातही जावं लागलं. सुटून आल्यावर त्यांच्यापैकी काही जणांनी येऊन सदानंदन मास्टरजींची डोळ्यात अश्रू आणून माफीही मागितली. सदानंदन मास्टर म्हणतात, 'मी त्यांना माफ केलं. कारण दोष त्यांचा नव्हता. ज्या हिंस्त्र, असहिष्णू विचारसरणीचे ते पाईक होते त्या साम्यवादी विचारांचा तो दोष होता. त्या विचाराला मी आजन्म विरोध करत राहीन'.
आज सदानंद मास्टर अखंड कार्यरत आहेत. शाळेत तर ते शिकवतातच, पण संघाच्या सेवाकार्यात त्यांचा भरभरून सहभाग असतो. त्यांच्याशी बोलताना जाणवतो तो त्यांचा दुर्दम्य आशावाद आणि त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन. शारीरिक अडचणींवर मात करून सदानंद मास्टर आज कितीतरी लोकांसाठी एक प्रेरणास्रोत बनलेत. आज जागतिक आरोग्य दिन आहे. ह्या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे, 'नैराश्य घालवण्यासाठी संवाद साधा'. अर्थपूर्ण नाती आयुष्यात असली की जीवनाकडे कसं खंबीरपणे बघता येतं. आंतरिक शक्तीच्या जोरावर कसल्याही कठीण परिस्थितीवर मात कशी करता येते ह्याचं सदानंदन मास्टर हे एक उत्तम उदाहरण आहेत.
- शेफाली वैद्य