शिकारी खुद यहा शिकार हो गया

    30-Apr-2017   
Total Views | 19

 

'घी देखा बडगा नही देखा'! अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांना आता या हिंदी म्हणीचा अर्थ थोडाफ़ार लक्षात येऊ लागला असेल. मांजर डोळे झाकून दूध पिते. पण म्हणून जगाने डोळे मिटलेले नसतात. जगाला मांजराची ती चोरी दिसत असते आणि एकेदिवशी त्या मांजराच्या पाठीत बडगा बसतो. तशीच काहीशी अवस्था आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची झाली आहे. कारण दिल्लीकरांनीच दोन वर्षाचा अनुभव घेतल्यावर त्या मुख्यमंत्र्याच्या पाठीत बडगा हाणला आहे. दोन वर्षापुर्वी दिल्लीत ठाण मांडून दिल्लीचा कायापालट करणार असल्याचे सांगत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीकरांना भुरळ घातली होती. म्हणूनच पंतप्रधान मोदीची जादू मागे पडून दिल्लीकरांनी केजरीवाल यांना अपुर्व बहूमत बहाल केलेले होते. आधी अपुर्ण बहूमतामुळे त्यांना कॉग्रेसच्या पाठीब्यावर सरकार स्थापन करावे लागले होते. तेव्हा त्यांनी कॉग्रेस-भाजपा आपल्याला कामच करू देत नसल्याची तक्रार करत राजीनामा दिल्याचे नाटक रंगवले होते. प्रत्यक्षात त्यांना तेव्हा थेट पंतप्रधान होण्याचे वेध लागलेले होते. म्हणूनच त्यांनी देशभर आपल्या कुणाही पाठीराख्याला उभे करून अनामत रक्कम जप्त करून घेण्याचा विक्रम साजरा केला. मग त्यांना पुन्हा दिल्लीची सत्ता उपभोगण्याचे डोहाळे लागले. तडकाफ़डकी राजीनामा देण्याबद्दल माफ़ी मागून पुढली पाच वर्षे दिल्लीतच राहुन काम करण्याची मिनतवारी करीत, त्यांनी दिल्लीचा कौल मागितला आणि दिल्लीकराने तो दिलाही. पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. या न्यायाने केजरीवाल काही दिवसातच दिल्ली सोडून अन्य राज्यात पक्षविस्तार करण्यासाठी फ़िरू लागले आणि दिल्लीच्या कारभाराचा त्यांनी पुरता विचका करून टाकला. मात्र त्याविषयी जाब विचारला, मग कांगावा करण्यापलिकडे काही केले नाही. त्याची किंमत आता मोजावी लागते आहे. पण आता बाहेरचे लोक नव्हे तर पक्षातले सहकारीच जाब विचारू लागले आहेत.

दिल्ली वार्‍यावर सोडून पंजाब-गोवा काबीज करायला निघालेल्या केजरीवालना तिथल्या मतदाराने दणका दिलाच होता. तेव्हा आपल्या पाठीराख्यांना समजावणे त्यांना भाग होते. सहाजिकच आपण कमी पडलो नसून, दिल्लीच्या महान कारभारामुळे आपल्याला देशभर मागणी असल्याचे नाटक रंगवणे भाग होते. मग मतदाराने का नाकारले, त्याचे उत्तर नव्हते. म्हणून भाजपाने मतदान यंत्राचा घोटाळा करून आम आदमी पक्षाला सत्तेपासून वंचित ठेवल्याचा कांगावा करण्यात आला. पण पंजाबचीच पुनरावृत्ती दिल्लीच्या राजौरी गार्डन पोटनिवडणूकीत झाली. तिथे आप उमेदवाराला तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली व डिपॉझीटही जप्त झाले. त्याचा खुलासा देताना आधीचा स्वपक्षीय आमदार राजिनामा देऊन पंजाब विधानसभा लढवायला गेल्याने मतदार रागावल्याचा खुलासा करण्यात आला. तो खरा असेल, तर दिल्लीला वार्‍यावर सोडून पळालेल्या मुख्यमंत्र्याची वा त्याच्या पक्षाची पालिका मतदानात दिल्लीकर पाठ थोपटणार होता काय? झालेही तसेच! सतत दिल्लीबाहेर राहून पक्षाचा विस्तार करण्यात वेळ घालवलेल्या केजरीवाल यांच्या पक्षाला, दिल्लीकराने चांगलाच धडा शिकवला. तसे होणार याची खात्री असल्यानेच केजरीवाल यांनी आधीपासून यांत्रिक मतदानाला विरोध केला होता आणि कागदी मतदानाची मागणी केली होती. मग एक्झीट पोल आल्यावर त्यातही गफ़लती असल्याचे सांगुन झाले. पराभवाची कमालीची खात्री असल्याखेरीज इतका कांगावा करणे शक्य नव्हते. पण केजरीवाल यांच्या निकटवर्तियांनाही आता त्यात तथ्य वाटेनासे झाले आहे. म्हणूनच गडबड यंत्रात नसून पक्षाच्या कार्यशैलीत गफ़लत असल्याचे आवाज पक्षातूनच उठू लागले आहेत. दिल्लीचा मतदार नाराज असल्याचे पक्षाचे आमदार व दुय्यम नेतेही सांगू लागले आहेत. वास्तविक पक्षात गडबड नसून नेतृत्वामध्ये गफ़लत आहे.

वाटेल ती आश्वासने द्यायची आणि सुचेल त्या थापा मारायच्या, अशा वागण्यामुळे दिल्लीकराला हा पक्ष व त्याचा नेता भुरटा-भामटा असल्याचा अनुभवच आला आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आंदोलनातून जन्माला आलेल्या या पक्षाच्या सरकारमधील निम्मे मंत्र्यांना भ्रष्टाचार व गुन्ह्यासाठी अधिकारपदे सोडावी लागली आहेत. अर्ध्याहून अधिक आमदारांवर फ़ौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील राजकीय स्वरूपाचे गुन्हे समजू शकतात. पण पैसे खाणे, लाच मागणे, पैशाची अफ़रातफ़र. आर्थिक घोटाळे, सरकारी पैशावर मौजमजा अशा स्वरूपाचे गुन्हे अन्य राजकीय पक्षांपेक्षाही भयंकर आहेत. कारण अन्य राजकीय पक्षातील हीच विकृती संपवायला आम आदमी पक्षाचा अवतार झालेला आहे आणि त्यानेच अल्पावधीत कुठल्याही पक्षाला लाजवणारा भ्रष्टाचार करून दाखवला आहे. त्यात सहकारी नेत्यांना कार्यकर्त्यांनाही सहभागी करून घेण्याची चतुराई केजरीवाल यांनी केलेली असली, तरी पराभवाला उत्तर नसते. जोवर नेता जिंकून दाखवत असतो, तोपर्यंतच त्याची पक्षातली हुकूमत चालत असते. पराभवाची घसरगुंडी सुरू झाली, मग नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जातात. त्याला थातूरमातूर उत्तरे देऊन सुटका होत नसते. ७० पैकी ६७ आमदार निवडून आणले म्हणूनच पक्षात केजरीवाल यांची निर्विवाद हुकूमत होती. आता ती किमया संपली आहे. मतदारांची दिशाभूल करणे निकालात निघाल्यावर कार्यकर्त्यांची फ़सगत करण्यात आली होती. पण लागोपाठच्या पराभवांनी कार्यकर्ताही बिथरला आहे. पालिका निकालानंतर तोच पाठीराखा व कार्यकर्ता सवाल करू लागला आहे. म्हणून तर संजय सिंग वा कपील मिश्रा अशा सहकार्‍यांनी आपापल्या पदा़चे राजिनामे देऊ केले आहेत. यंत्रातील गफ़लतीमुळे पराभव झाला असेल, तर हे नेते कसली जबाबदारी घेऊन राजिनामे टाकत आहेत? कशाला पळ काढत आहेत?

आपली कुठेतरी चुक झाली आहे, मतदार नाराज झाला आहे, याची कबुली देत अनेक नेते कार्यकर्ते पुढे येऊ लागले आहेत. त्यांना केजरीवाल पक्षातून हाकलूनही लावू शकतात. पण कोणाकोणाला हाकलून लावणार आहेत? शेवटी पाठीशी कोणीच राहिला नाही, तर पक्ष तरी शिल्लक उरणार आहे काय? जिंकण्याची शक्यता नसेल वा पराभवच नक्की असेल, तर कोणीही पक्षात शिल्लक उरणार नाही. कारण यंत्रातल्या मतदानानेच केजरीवालना प्रचंड यश दिले होते आणि त्यानेच पराभवाचेही दर्शन घडवले आहे. म्हणूनच आता उघडे पडायची वेळ आली आहे. अन्य राज्यात जाऊन पक्षाचा विस्तार वा निवडणूका लढवण्याच्या गमजा संपल्या आहेत. विरोधकांना वा पत्रकारांना टोलवाटोलवी करून पळ काढला होता. पण आता पक्षातूनच प्रश्न विचारले जात आहेत. जर विजयाचे श्रेय केजरीवाल यांचे असेल, तर पराभवाचे खापर यंत्राच्या माथी कसे मारता येईल? तिथेच आता पक्षाला आतून उकळ्या फ़ुटू लागल्या आहेत. कारण अनेकांना पक्षाचे भवितव्य धोक्यात असल्याचे जाणवू लागले आहे. त्यांची तोंडे दाबून गप्प बसवता येणार नाही. कारण त्यांनीच केजरीवाल नावाची प्रतिमा उभी केलेली आहे. तेच सहकारी व पाठीराखे सवाल करू लागले, तर पळून पळणार तरी कुठे व कुठपर्यंत? दिल्लीकरांचे प्रेम बघितले आता रागही केजरीवालनी बघितला आहे. आता पाठीराख्यांचा क्षोभ अनुभवण्याची वेळ जवळ येत चालली आहे. त्यापुर्वीच संजय सिंग वा कपील शर्मा असे सहकारी हात झटकून मोकळे होऊ लागले आहेत. आता एका बाजूला पक्ष टिकवणे व दिल्लीचा कारभार लोकाभिमुख करण्याची दुहेरी जबाबदारी या मुख्यमंत्र्यावर आलेली आहे. आपणच रचलेल्या सापळ्यात ह्या शिकार्‍याची शिकार होऊ घातली आहे. सत्तेची गंमत अनुभवली, आता त्या सत्तेची विषारी फ़ळे चाखण्याची वेळ आली आहे.

- भाऊ तोरसेकर 

 

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121