आजच्या पिढीला हमीद दलवाई यांचे नाव माहिती असण्याची फारसे कारण नाही. ते जाऊन आता चार दशके उलटली. एकीकडे संघ आणि हिंदुत्वनिष्ठांना विरोध करणारा आणि समाजवादी मुशीतून तयार झालेला हा माणूस दुसरीकडे खऱ्या अर्थाने मुस्लीम समाजसुधारक होता. त्यांची पुस्तके वाचली तरी त्यांच्याबद्दलचा आदर दाटून येईल. काही मते न पटणारी असू शकतात तथापि कित्येक मते पटतात. त्यांनी मुस्लीम स्त्रियांचा माणूस म्हणून विचार केला हे महत्वाचे होय. खोट्याला खोटे म्हणण्याची हिम्मत दाखवली. तलाकपिडीत स्त्रियांच्या निमित्ताने त्यांनी ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ स्थापन केले. त्यांचे पहिले आंदोलन हे तलाकपिडीत स्त्रियांसाठी होते. त्यावेळी त्यांना अनेक समाजवादी मंडळींनी साथ दिली पण हमीदभाईंच्या मृत्यूनंतर हे सर्व लोक सुरक्षित वळचणीला जाऊन पोचले. त्यासाठी कोणतीही वैचारिक दिवाळखोरी पत्करली आणि केवळ भाजप विरोध इतकेच सूत्र ठेवले. हा द्वेषात्मक विरोध इतका पराकोटीचा होता की चाळीस वर्षांपूर्वी जनता दल नामक कडबोळे बनवून हाती सत्ता आल्यावर त्यांनी तत्कालीन विसर्जित जनसंघ नेत्यांना त्या कडबोळ्यातून बाहेर पडण्यास बाध्य केले आणि सत्ता गमावली. त्यानंतर जनसंघी नेत्यांनी भारतीय जनता पक्ष जन्माला घातला.
१९८० च्या काळात संघाने समान नागरी कायदा हा विषय हाती घेतला. खरे तर स्वातंत्र्योत्तर काळात हा विषय समाजवादी मंडळींनी मांडायला आणि त्याचा हिरिरीने पुरस्कार करायला सुरुवात केली होती. हळूहळू ते सगळे ‘पुरोगामी’ झाले. मग संघाने तो विषय घेताच यांनी ‘यू टर्न’ घेतला आणि समान नागरी कायद्याचा पुरस्कार म्हणजे दुसऱ्या धर्माच्या अंतर्गत ढवळाढवळ करणे आहे, असे प्रतिपादन सुरु केले. खरे म्हणजे त्यांनी या मुद्द्यावर संघवाल्यांचा पाठींबा मिळवायला हवा होता अथवा त्यांना पाठींबा द्यायला हवा होता. तथापि संघ करतो ते सर्व चूक असे यांनी ठरवून टाकले होते. असे एकदा ठरवून टाकले की आपण नेमके काय करत आहोत त्याचे भान सुटते. तेच समाजवाद्यांचे झाले. हा मुद्दा आपलाच होता याचा विसर पडून त्यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली.
त्यामुळे हमीदभाईंनी जी मते मांडली होती त्यालाही विरोध करणे हे समाजवाद्यांच्या दृष्टीने अपरिहार्य झाले. आज हमीद दलवाई असते तर त्यांना आपली मते भाजपसारखा हिंदुत्ववादी पक्ष मान्य करतो आहे हे पाहून आनंद झाला असता. पुरोगाम्यांना मात्र दु:ख होते आहे. संघद्वेष हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम झाला आहे. त्यांना मुस्लीम समाजात सुधारणा होण्यापेक्षा मुल्ला-मौलवी यांना खुश करणे जास्त महत्वाचे वाटते आहे. तसे केल्याने आपण वैचारिक गुलाम होतो आहोत याचे भानही सुटले आहे ही त्या चळवळीची शोकांतिका नव्हे काय?
यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिसेवते |
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ||
जो निश्चित व शक्य असणाऱ्या अशा गोष्टी करायच्या सोडून अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबाबतीत नक्की पूर्ण होणाऱ्या गोष्टी न केल्यामुळे, काळानुसार त्या नाहीशा होतात आणि अध्रुव म्हणजे अशक्य गोष्टी घडूच शकत नसल्यामुळे वेळ, श्रम व पैसा वाया जावून नुकसान होते.
त्यामुळे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड याचे कायदेशीर स्थान काय आहे, हा प्रश्न ते उपस्थित करू इच्छित नाहीत. आता त्या बोर्डानेच तीन तलाकची प्रथा आम्ही बंद करू असे म्हटले आहे. त्याचे कारण काय, याची पुरोगाम्यांना मीमांसा करावी असे वाटत नाही. बोर्डाला ही जाग आली कारण आता हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. अशावेळी आम्हीच ते करू हे म्हणणे धूर्तपणाचे असते आणि दुसरीकडे सरकार व न्यायालयाच्या विरोधात काही करता येणार नाही याची कबुलीसुद्धा असते. आम्ही ती प्रथा बंद करू असे म्हणणे म्हणजे सरकार त्यात हस्तक्षेप करू शकते, याचे दु:ख आहे. पूर्वी सेक्युलर म्हणवणारे सरकार होते, तेव्हा आमच्या धर्मात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भाषा हेच बोर्ड वापरत होते. ते आता एकदम बॅकफूटवर का गेले आहे, याचा विचार पुरोगाम्यांना करायचा नाही. कारण पुरोगाम्यांची दुखरी नस हीच आहे की, जे काम सेक्युलर म्हणविणाऱ्या लोकांनी केले नाही ते आज मोदी सरकार करते आहे.
हिंदुत्ववादी सरकार आले की मुस्लिमांचे जिणे हराम होणार आहे अशी भीती याच दिवाळखोरांनी सतत घातली. आता तर चित्र उलटे दिसते आहे असे पाहिल्यावर यांचे धाबे दणाणले आहे. मोदी हे मुस्लीम विरोधी आहेत, म्हणून एकही मुस्लीम उमेदवार त्यांनी उत्तरप्रदेशात दिला नाही, असे शिरा ताणून ओरडणाऱ्यांचा आता घसा बसला आहे. मुस्लीम महिलांना मोदीच तारणहार वाटत आहेत. आता त्याच महिला तीन तलाकच्या विरोधात मोठ्या संख्येने पुढे येत आहेत आणि उघडपणे व्यक्त होत आहेत. बहुधा हेच या पुरोगामी दिवाळखोरांचे दु:ख असावे.
तलाकचा प्रश्न हा केवळ एकट्या मुस्लीम महिलेचा नसतो तर तो तिच्या कुटुंबाचा म्हणजेच पर्यायाने संपूर्ण मुस्लीम समाजाचा असतो. आपणाला तलाकपिडीत स्त्रिया सतत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर सध्या दिसत आहेत. त्यांच्या कडेवर आणि हाती धरलेली कच्ची बच्ची असतात, डोळ्यात पाणी भरलेला बाप असतो, चिंताक्रांत मुद्रेने भाऊ उभा असतो आणि रडणारी आई असते. म्हणजे एक कुटुंब उध्वस्त होऊ शकते, ही गोष्ट मोदींनी हेरली. पण पुरोगामी विचारजंतांना ती दिसत नाही.
काव्यगत न्याय बघा, उद्दामपणे वागणारे आणि हमीद दलवाईंना वाळीत टाकणारे धर्माचे ठेकेदार हे आज मुस्लीम महिलांच्या दमदार आवाजापुढे नमते घेत आहेत. हा विजय एका परीने हमीदजींचा आहे. त्यांनी ज्या सुधारणेचे बी पेरले त्याला आता फळ धरू लागले आहे. सामाजिक न्यायाचा हा विजय आहे. पण या लढाईत हमीद दलवाई यांचे साथीदार सोडाच पण हमीद हे नाव धारण करून सामाजिक न्यायाच्या बाबतीत बोलणारे देखील गप्प आहेत. मोदी नामक हिंदुत्वनिष्ठ हे करतो आहे ही तर या मंडळींची पोटदुखी नसेल?
जाता जाता इतकेच सांगतो की, अशा सुधारणा हिंदुत्वनिष्ठ माणूसच करू शकतो, कारण तो समोरच्याला आधी माणूस समजतो. याला इतिहासाची साक्ष आहे. हिंदू राज्यकर्त्यांनी कधीही अन्य धर्मियांवर अत्याचार आणि जुलूम केले नाहीत. धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. म्हणून मोदी आणि योगी यांच्यावर लोकांचा विश्वास बसतो आहे.
टेहळणी
डॉ.सच्चिदानंद शेवडे
drshevde@gmail.com