कोठून येते उदासीनता ही

    03-Apr-2017   
Total Views | 1

 

अकरा वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी तिळी मुलं सातव्या महिन्यात जन्मली होती. जेमतेम तीन पौंड पण वजन भरलं नव्हतं एकेका बाळाचं. मुलं इस्पितळात होती. इन्क्युबेटर मध्ये ठेवलेली. त्यांच्या त्या क्षीण, इवल्याश्या शरीरानां चार-पाच नळ्या जोडलेल्या होत्या. हृदयाची गती मोजायला जो मॉनिटर होता तो दर पाच दहा मिनिटांनी ठणाणा करायचा, मग नर्स डॉक्टर धावून यायचे. मी खोलीत बसून असले तरी मुलांकडे असहाय्यपणे बघत राहण्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हते. एका भयंकर भीतीने ग्रासून टाकलं होतं मला. सारखी छाती धडधडायची. कुठूनही फोनची रिंग वाजली की मला अनावर रडू यायचं. वाटायचं की फोन हॉस्पिटलमधूनच असेल आणि काहीतरी वाईट बातमी घेऊन आलेला असेल. असं वाटायचं की मी एका कधीही न संपणाऱ्या कृष्णविवरात कायमची अडकलेली आहे, कुठेही प्रकाशाचा एकही कवडसा यायला मार्ग नाहीये. एकदमच हातपाय गळून गेल्यागत झाले होते. रात्र रात्र झोप लागायची नाही, झोपेची गोळी घेऊन देखील. चुकून कधी डोळा लागलाच तर एकदम दचकून जागी व्हायचे. वाचन, सिनेमे, आईस्क्रीम खाणे, चालायला जाणे, संगीत ह्या सगळ्या माझ्या आवडीच्या गोष्टींमधला माझा रस पार निघून गेला होता. मुलं माझ्यावर अवलंबून होती म्हणून मला स्वतःची काळजी घेणं भाग होतं, पण काहीच करू नये असं वाटायचं. दिवसाचे दिवस माझ्या तोंडावर हास्याची स्मितरेखा देखील उमटत नव्हती, किंबहुना मी आयुष्यात परत कधी हसूच शकणार नाही असं टोकाचं काहीतरी वाटायचं सतत. हे आयुष्य संपवून टाकावं असं वाटायचं सतत. फार फार काळेकुट्ट दिवस होते ते. 

 

त्याच दिवसात माझे वडील अचानक गेले. मुलांमुळे मी भारतात येऊ शकले नाही त्या वेळी. त्या दुःखाने तर मी पुरतीच खचून गेले होते. तिथल्या डॉक्टरनी 'क्लिनिकल डिप्रेशन'चं निदान केलं. माझा आजार शारीरिक नव्हता तर मानसिक होता. नवऱ्याचा भरभक्कम आधार, माझ्या घरच्यांचं माझ्या मनाच्या त्या नाजूक अवस्थेला समजून घेणं आणि माझ्या पिल्लांना आई म्हणून असलेली माझी गरज ह्या तीन गोष्टीनी मला ह्या आजारावर मात करायला मदत केली. डॉक्टरांनी दिलेली 'सेरोटोनिन इनहीबिटर' ही  डिप्रेशन वरच्या औषधाची बाटली माझ्या ड्रेसिंग टेबलवर होती, पण मी अंगावर पाजत होते त्यामुळे मला ती औषधे घ्यायची नव्हती. शेवटी व्यायाम, ध्यान, घरच्यांची मायेची पाखर आणि माझी स्वतःची इच्छाशक्ती हे सगळं पणाला लावून मी ही लढाई जिंकले. तब्बल तीन महिने लागले मला त्या कृष्णविवरातून प्रकाशाची पहिली तिरीप दिसायला. पूर्ण पाहिल्यासारखं वाटायला जवळ जवळ वर्षभर जावं लागलं. ती न उघडलेली औषधांची बाटली अजून माझ्या कपाटात आहे. मुद्दाम ठेवली आहे मी ती. जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून माझी चिडचिड होते, कुठे काहीच बरोबर घडत नाहीये असं एखादवेळी वाटतं तेव्हा तेव्हा मी माझं कपाट उघडून ती न उघडलेली औषधांची बाटली बघते. डिप्रेशनविरुद्धच्या माझ्या लढाईतल्या विजयाची ती बाटली खूण आहे.    

 

क्लिनिकल डिप्रेशन किंवा नैराश्य हा मनाचा आजार कुणालाही होऊ शकतो आणि कधीही. त्याचा शिक्षणाशी, सांपत्तिक परिस्थितीशी, कशाशीही संबंध नाही. मागे चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिला जडलेल्या ह्या नैराश्याच्या आजाराबद्दल बोलताना म्हटले होते की 'सगळं तसं ठीक चाललं होतं तरी मला कशातच रस वाटत नव्हता. खूप उदास, एकटं, निराश वाटायचं सतत.' माझ्या ओळखीचे एक डॉक्टर महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात प्रॅक्टिस करतात. त्यांचे बहुतेक पेशंटस सामान्य परिस्थितीतले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पेशंट्समध्ये, आणि त्यातही स्त्रियांमध्ये नैराश्य ह्या रोगाचे प्रमाण लक्षणीय आहे.  

 

२०१५ मध्ये तब्बल पाच कोटी भारतीयांना नैराश्यानं घेरलं अशी आकडेवारी आहे. अर्थात भारतासारख्या देशात मानसिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बघता खरे आकडे ह्याहून कितीतरी पटींनी जास्त असू शकतात. कारण अजूनही आपल्याकडे मनोविकारांवर खुलेपणी बोलले जात नाही. घरातली एखादी व्यक्ती जर मनोविकारांनी ग्रस्त झाली तर चांगल्या शिकलेल्या घरांमधूनही अगदी आजसुद्धा ती बातमी लपविण्याकडेच कल असतो. घरातल्या सदस्याला मनोविकारतज्ञाकडे न्यावे लागले ही बातमी लोक सहसा जाहीर करीत नाहीत. समाज काय म्हणेल? आपल्या संपूर्ण कुटुंबालाच वेडसर ठरवण्यात येईल का ही भीती अजूनही आपल्याकडे बऱ्याच लोकांना सतावत असते.  

खरं तर शरीराचे जसे असंख्य आजार असतात तसेच मनाचेही असतात. क्लिनिकल डिप्रेशन, म्हणजे नैराश्य, एन्गझायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर वगैरे अनेक प्रकारचे मनोविकार असतात. प्रत्येकावरची उपचार पद्धती वेगळी असते. आज मनोविकारांवर अनेक औषधे आहेत. काही कारणामुळे मेंदूत होणारे रासायनिक बदल हे मनोविकारांना जन्म देतात आणि काही ठराविक औषधे ठराविक प्रमाणात घेतली तर हे मेंदूतले रासायनिक बदल आपण थांबवू शकतो हा आधुनिक वैद्यकशास्त्रातला एक खूप महत्वाचा शोध आहे. अर्थात 'डोपामिन, सेरोटोनिन इनहिबिटर्स वगैरे नावाने ओळखली जाणारी ही औषधे अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे योग्य त्या प्रमाणातच घ्यावी लागतात आणि त्यांचे दुष्परिणामही तेव्हढेच असतात, त्यामुळे मनोविकारतज्ञाकडे पेशंटला नेऊन त्याच्या सल्ल्यानुसारच औषधे देणे महत्वाचे असते. 

 

पण फक्त औषधे घेऊन मनोविकार बरे होते नाहीत. मानसिक रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी सगळ्यात महत्वाचा असतो त्याच्या/तिच्या जवळच्या लोकांनी दिलेला मानसिक आधार. मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागताच रुग्णाला कुणाशी तरी मन मोकळं करता आलं पाहिजे आणि त्या व्यक्तीने देखील 'असं काय वेड्यासारखा वागतोस, काही झालेलं नाहीये तुला' वगैरे म्हणून रुग्णाला उडवून न लावता त्याला/तिला आधार दिला पाहिजे, जरूर पडेल तेव्हा प्रशिक्षित डॉक्टरकडे नेलं पाहिजे. औषधाइतकेच शारीरिक व्यायाम, ध्यान, व्यवस्थित जेवण, हवी तेव्हढी झोप आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्थपूर्ण नातेसंबंध हे मानसिक आजार जडलेल्या व्यक्तीसाठी महत्वाचे असतात. 'शेअरिंग' म्हणजे योग्य व्यक्तीजवळ व्यक्त होणे ही नैराश्याने ग्रासलेल्या माणसाची सगळ्यात मोठी गरज असते. नुकत्याच झालेल्या 'मन की बात' ह्या आपल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी नेमक्या ह्याच मुद्द्यावर भर दिला. 

 

यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना 'नैराश्य' किंवा 'डिप्रेशन' ह्या रोगासंबंधात जनजागृती करणे हीच आहे. आपल्या लोकसभेतही नुकतंच 'मेंटल हेल्थकेअर बिल' पास झालंय. आत्महत्या आणि स्वतःला इजा करून घेण्याचे विचार सतत मनात येणे आणि त्याप्रमाणे कृती करणे ह्या घटना नैराश्य ह्या आजारात घडण्याची खूप शक्यता असते. पूर्वी असे प्रयत्न झाले तर तो गुन्हा मानला जायचा. ह्या नवीन विधेयकाच्या तरतुदीअंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरणार नाही. मनोविकारांचे बळी ठरलेल्या व्यक्तींच्या रास्त हक्कांसाठी ह्या विधेयकात खास तरतूद करण्यात आली आहे. एकदम टोकाचे मनोविकार असल्याखेरीज रुग्णांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करायची गरज नसते. त्यांच्या घरात राहून उपचार घेणे हा मनोरुग्णांचा हक्क आहे आणि त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार रुग्णाला असला पाहिजे अशीही तरतूद ह्या विधेयकात आहे. अर्थात कायदा कितीही चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी कितपत होते त्यावर त्या कायद्याचा प्रभाव ठरतो. भारतासारख्या देशात, जिथे अजून शारीरिक रोगांवरचे उपचारच सर्व जनतेपर्यंत पोचले नाहीत तेथे हे मेंटल हेल्थकेअर बिल कितपत यशस्वी होईल हा प्रश्न उरतोच. पण ह्या विधेयकाच्या निमित्ताने निदान मनोविकरांकडे बघण्याचा समाजाचा आणि सरकारचा दृष्टिकोन व्यापक होईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.  

 

- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121