नृत्य : सकारात्मक व्यक्तिमत्व घडवणारी कला.. 

    29-Apr-2017
Total Views | 8



नृत्य म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते एक सुंदर दृश्य. नृत्य म्हणजे भाव, नृत्य म्हणजे शिस्त, नृत्य म्हणजे व्यायाम, नृत्य म्हणजे स्वत:च्या सगळ्यात सुंदर अंतर्मनाला सादर करणे. नृत्य ही एक अशी कला आहे ज्यामध्ये केवळ शारीरिक ऊर्जा आणि शक्ती आवश्यक नसून त्यासोबत मनही तेवढच जोडलेलं असलं पाहीजे. मनाच्या "इनव्हॉल्व्हमेंट" शिवाय नृत्य करणे शक्यच नाही. आणि त्याचमुळे नृत्याचा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावर खूप प्रभाव पडतो. नृत्यकला शिकल्याने आपल्या व्यक्तिमत्वात अनेक प्रकारचे सकारात्मक बदल होतात. आज जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने आपण त्याच बद्दल जाणून घेणार आहोत...
 
१. स्वत:ला व्यक्त करण्याची क्षमता : नृत्य हे कुणालाही इम्प्रेस करण्यासाठी नाही तर स्वत:ला एक्सप्रेस करण्यासाठी करावं. म्हणजेच नृत्य एक असं माध्यम आहे, ज्यामध्ये स्वत:ला पूर्णपणे व्यक्त केल्याशिवाय रसिक प्रेक्षकांवर त्याचा पूर्ण प्रभाव पडत नाही. नृत्यकला शिकत असतना आपण स्वत:ला व्यक्त करणं शिकतो. आनंद, दु:ख, राग, उत्सुकता हे भाव रोजच्या आयुष्यातही वेळोवेळी व्यक्त करणं खूप गरजेचं असतं. नृत्यकलेमुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एका महत्वाच्या गुणाची भर पडते. रोजच्या आयुष्यातही स्वत:ला व्यक्त करता आलं तर अनेक समस्या सुटू शकतात.
 
२. आत्मविश्वासात वाढ : जेव्हा कुठलीही कला चार चौघात, प्रेक्षकांसमोर सादर केली जाते. तेव्हा ती सादर करत असताना प्रचंड आत्मविश्वासाची गरज असते. नृत्यकला आपल्यात तो आत्मविश्वास जागवते. आपल्या दैनंदिन आयुष्यात सगळ्यांसोमत बोलत असताना किंवा आपल्या इतर कुठल्याही कामात या आत्मविश्वासाचा खूप उपयोग होतो. 
 
३. इतरांसमोर स्वत:ला मांडण्याची क्षमता : बरेचदा असं होतं, स्वत:बद्दल काहीतरी सांगायची वेळ आली की नेमक्या पद्धतीनं ते मांडता येत नाही. नृत्यात तसं नसतं. प्रत्येक गोष्ट नेमक्या पद्धतीने लोकांसमोर मांडणं नृत्य आपल्याला शिकवतं. नृत्य सादर करत असताना आपली वेशभूषा, आपली रंभूषा, घुंगरु हे सगळं नीटनेटकं असणं खूप आवश्यक असतं. आणि त्यामुळेच आपल्याला नीटनेटक्यापणे स्वत:ला मांडण्याची सवय होते. यामुळे रोजच्या आयुष्यातही आपण स्वत:ला इतरांसमोर छान आणि वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करु शकतो.
 
४. शिस्त : आयुष्यात शिस्त ही खूप आवश्यक असते. ती नसेल तर आयुष्य विखुरतं. नृत्याचंही तसंच आहे. नृत्य जर त्याच्या नियमांशिवाय केलं तर आपले सादरीकरण निरर्थक होवू शकते. जे प्रेक्षकांनाही आवडणार नाही. नृत्य करत असताना रियाजाच्या वेळा पाळाव्या लागतात, नृत्याच्या नियमांनुसारच ते सादर करावं लागतं. हे सगळं जगत असताना आपल्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची शिस्त आपोआपच निर्माण होते. आणि संपूर्ण आयुष्यात ती आपल्याला खूप उपयोगी पडते.
 
५. प्रत्येकाचा आदर करणं : नृत्य सादर करण्याच्या प्रक्रियेत केवळ एक नृत्यांगना किंवा नृत्य करणारी व्यक्तीच सामिल नसते, तर त्याच्यासोबत तबल्यावर साथ करणारे, पेटीवर साथ देणारे, पढंत करणारे, नृत्य समूहातील इतर नृत्य करणारे, असे सगळेच सामिल असतात. तेव्हा हे सगळं करत असताना अहंकार निर्माण होत नाही, आणि झाला तरी तो फार काळ टिकत नाही. त्यामुळे नृत्य करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकाचं महत्वं कळतं. समूहात राहण्याची सवय होते. "मी एकटाच सर्वेसर्वा" ही भावना निर्माण होत नाही. या गुणांमुळे व्यक्ती स्वत:च्या जीवनातही सगळ्यांचा आदर करणारी, इतरांच्या कामाची किंमत करणरी आणि इतरांना मान देणारी बनते. हा गुण कुणाच्याही व्यक्तीमत्वात असणे खूप आवश्यक आहे. 
 
नृत्य करताना, नृत्य शिकताना आपण आपल्या रोजच्या आयुष्यातही बरंच काही शिकत असतो. ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व सकारात्मक होत जातं. आणि पुढील आयुष्यात त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. खऱ्या अर्थाने नृत्यकला आपले व्यक्तीमत्व घडवते. त्यामुळे तुम्ही कुठलेही नृत्य शिकत असाल तर ते मुळीच सोडू नका. आजच्या जगात पर्सनॅलिटी डेव्हेलपमेंटचे क्लास लावायची वेळ आली असताना, नृत्यकला ही स्वत:मध्येच पर्सनॅलिटी डेव्हेलपमेंटचं एक संपूर्ण विद्यापीठ आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ घ्या...
 
हसत रहा, नाचत रहा... आनंदी रहा..
महा MTB तर्फे जागतिक नृत्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
- निहारिका पोळ 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121