जी कधी क्षय होत नाही, ती अक्षय तिथी.
पंचांगात - सूर्योदयाला जी तिथी असते ती दिवसाची तिथी. आज सूर्योदयाआधी सुरु झालेली तिथी, उद्याच्या सूर्योदयानंतर संपली तर ती तिथी वृद्धिंगत होते. आणि आज सूर्योदयानंतर सुरु झालेली तिथी जर उद्याच्या सूर्योदयाआधी संपली तर ती क्षय होते. या नियमाला अपवाद आहे अक्षय तृतीया!
अक्षय तृतीयेला केलेले कोणतेही कार्य क्षय होत नाही, लोप पावत नाही. अक्षय तिथीला केलेली गुंतवणूक वृद्धिंगत होत राहते आणि आज लावलेले रोप फुलत राहते, असा अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला जातो!
अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. साडेतीन मुहूर्तां पैकी एक. हे साडेतीन मुहूर्त आहेत – कलीयुग प्रारंभ दिवस म्हणजेच युगाब्द वर्षाचा पहिला दिवस - चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पडावा), कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळीतला पडावा), अश्विन शुद्ध दशमी (दसरा) आणि सत्य व त्रेता युगाचा प्रारंभ दिवस - वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया).
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विष्णूने ६ वा अवतार धारण केला. चैत्र आणि वैशाख महिन्यातील शुद्ध पक्ष विष्णू जयंतीने भरले आहेत. चैत्र शुद्ध तृतीयेला मत्स्य जयंती, वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती, वैशाख शुद्ध चतुर्दशीला नरसिंह जयंती, वैशाख शुद्ध तृतीयेला परशुराम जयंती, चैत्र शुद्ध नवमीला राम जयंती, तर वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंती!
परशुराम म्हणजे विष्णूचा ६ वा अवतार, आणि ७ चीरंजीवां पैकी एक. कल्की या विष्णूच्या शेवटच्या अवतारातील गुरु परशुराम असणार असे वर्तविले आहे. कामधेनुच्या रक्षणार्थ ज्याने हातात परशु घेतला तो परशुराम! अन्याया विरुद्ध लढला तो परशुराम! कुरुक्षेत्रावरील २१ लढायांमध्ये जो अजिंक्य ठरला, तो परशुराम! आणि पृथ्वीपती झाल्यावर सर्वस्व दान देऊन निष्कांचन झाला, तो परशुराम!
अशा दानशूर परशुरामाच्या जयंतीला, अक्षय तृतीयेला, दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. वैशाखातल्या रणरणत्या उन्हात काय दान द्यायचे? तर – पाणी, माठ, छत्री आणि चपला. सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सोय आजच्या मुहूर्तावर करायची प्रथा आहे. पशु – पक्ष्यांची देखील तहान भागवण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम.
सर्व जीवांची तहान पुरवण्यासाठी, परम पावनी, अक्षय वाहिनी, सुजल धारिणी गंगा - अक्षय तृतीयेला पृथ्वीवर अवतरली! भगीरथ राजाने महत् प्रयासाने गंगेला पृथ्वीवर पाचारण केले. गंगा पृथ्वीकडे निघाली, पण तिचा अतिप्रचंड ओघ पृथ्वी कसा सहन करेल? गंगेचा ओघ कोण धारण करेल? तेंव्हा भगीरथाने शंकराची प्रार्थना केली. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी सदा तत्पर असलेल्या शंकराने, गंगेला आपल्या डोक्यावर धारण केले. शंकराच्या जटामधून वाट काढत बाहेर येईपर्यंत गंगेचा ओघ सुसह्य झाला होता. मग सर्व प्राणीमात्रांना जीवन दान देणारी नदी, हिमालयापासून गंगासागारापर्यंत संथपणे वाहू लागली!
अक्षय तृतीयेला वृक्षारोपण करायची प्रथा आहे. आयुर्वेदिक औषधी झाडे अक्षय मुहूर्तावर लावली असता, ती उत्तम वाढतात आणि औषधी पाला कमी पडत नाही अशी समजूत आहे. वर्षा ऋतूच्या आगमनाच्या आधी शेतजमिनीची मशागत, आज पूर्ण करायची अशी प्रथा आहे.
अक्षय तृतीयेला विष्णू सहित लक्ष्मीची पूजा करतात. विविध रूपातील लक्ष्मी - पृथ्वी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी आज पुजली जाते. पुरीच्या जगन्नाथाची रथयात्रा देखील अक्षय तृतीयेला सुरु होते.
महाभारत काळी सुद्धा अक्षय तृतीया एक महत्वाची तिथी होती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला वेद व्यासांनी गणेशाला महाभारत सांगण्यास सुरवात केली. त्या पुढे तीन वर्षांनंतर महाभारत लिहिण्याचे काम पूर्ण झाले. अक्षय मुहूर्तावर सुरु केलेल्या महाभारताचा महिमा काळा बरोबर वाढतच आहे!
पांडवांना वनवासात असतांना, अक्षय पात्राचे वरदान मिळाले होते, ते सुद्धा अक्षय तृतीयेला. ही ‘द्रौपदीची थाळी’ दिवसातून एकदा, सूर्याच्या उष्णतेवर अन्न शिजवत असे.
अशा सोनेरी मुहूर्तावर, सोने खरेदी बरोबरच आपण - Solar Cooker, Solar Drier वापरण्याचा, वृक्षारोपणाचा आणि जलदानाचा संकल्प करू!
- दिपाली पाटवदकर