
भाजपच्या दिल्ली महानगरपालिकेतील विजयापेक्षा तेथे ’आप’च्या झालेल्या पराभवाची चर्चा अधिक होत आहे व ती स्वाभाविकही आहे. मनमोहन सिंग सरकारचा निवडणुकीत प्रत्यक्ष पराभव होण्यापूर्वी त्या सरकारला अखेरची घरघर लागली होती. त्यावेळी अण्णा हजारेंच्या उपोषणाने सरकार हादरून गेले होते. त्या आंदोलनाचा राजकीय फायदा उचलण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केला. त्यात चुकीचेही काही नव्हते. ज्यांचा आजवर राजकीय पक्षांशी कोणताही संबंध आलेला नाही, असे शेकडो कार्यकर्ते अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरले होते. उपोषण संपल्यानंतर त्यांना देण्यासाठी कोणताही कार्यक्रम अण्णांकडे नव्हता.राजकीय पक्ष निर्माण करून केजरीवाल यांनी या कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. देशात मूल्यात्मक परिवर्तन झाले पाहिजे, अशी जनभावना निर्माण झाली होती. त्यामुळे सामाजिक कामकरण्याची नैसर्गिक प्रेरणा असलेले अनेक उच्चशिक्षित कार्यकर्ते केजरीवालांच्या मागे उभे राहिले. भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधाचे केजरीवाल हे प्रतीक बनले. ’आप’च्या स्थापनेसोबतच प्रसारमाध्यमांमधल्या प्रसिद्धीमुळे ’आप चळवळ’ देशाचे राजकीय भविष्य ठरविणारी चळवळ बनली. केजरीवाल हे प्रेषिताच्या भूमिकेत आले.
या घडामोडीदरम्यान भाजपने मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करताच देशाचे राजकीय चित्र एकदम बदलले. केजरीवाल यांच्याऐवजी मोदी परिवर्तनाचे प्रतीक बनले. ’आप’ला एवढी प्रसिद्धी मिळत असताना आपल्यावरील प्रसिद्धीचा रोख मोदींच्यावर जावा, ही गोष्ट केजरीवाल यांना सहन करता आली नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्याच वेळी ’आप’ला जे यश मिळाले, त्यामुळे केजरीवालांचा रथ जमिनीवर काही ङ्गुटांवरून चालू लागला. बाकी पक्षांना पक्ष रुजविण्यासाठी अनेक वर्षे खस्ता खायला लागल्या; यापैकी काहीही करायला न लागता आपल्याला एवढे यश मिळते, त्यामुळे आपण नियतीपुत्र आहोत यावरच्या त्यांच्या विश्वासाला प्रत्यक्ष प्रमाण मिळाले. त्याचा त्यांना एवढा भ्रम झाला की, लोकसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळालेल्या दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून उमेदवारी घेण्यापेक्षा त्यांनी मोदींच्या विरोधात वाराणसीहून निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. पण त्यानंतर मोदी लाटेला तोंड देत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जो अभूतपूर्व विजय मिळविला, त्यामुळे त्या अपयशावर पांघरूण टाकले गेले. लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये ’आप’ला जे यश मिळाले, त्यामुळे आगामी काळात ’आप’च प्रमुख विरोधी पक्ष बनणार, असे वातावरण तयार झाले.
इतक्या कमी काळात ’आप’ला मिळालेले यश ही एक क्रांतिकारी घटना होती. पण त्यानंतर पक्षाची वाढ होण्याऐवजी त्याची अधोगती सुरू झाली. वास्तविक पाहाता इतर पक्षातील हायकमांड व्यवस्थेला आपण आव्हान देत आहोत, असे ’आप’ने जाहीर केले होते. प्रत्यक्षात यश मिळाल्याबरोबर ’आप’मध्ये केजरीवाल या एका व्यक्तीचे हायकमांड बनले. ’क्रांती आपली पिल्ले खाते,’ अशी म्हण आहे. त्याला अनुसरून या पक्षाचे संस्थापक प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचा बळी गेला. मोदी यांनी गुजरातच्या प्रशासनाची छाप पाडून जनमानसात आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण केला होता. तसेच केजरीवाल यांनाही करता आले असते. दिल्लीमध्ये त्यांनी आपले प्रशासन कौशल्य दाखविले असते, तर एक समर्थ पर्याय म्हणून त्यांची प्रतिमा उभी राहिली असती. चांगल्या लोकशाहीत अशा पर्यायाची गरज असतेच. पण तसे करण्याऐवजी नायब राज्यपालांशी भांडणे व प्रत्यक्ष कामाऐवजी भरमसाट प्रसिद्धी करणे हेच दिल्लीच्या ’आप’ सरकारचे एकमेव कामबनले. त्यातच मोदींना पर्याय म्हणून उभे राहाण्याकरिता मोदींच्या प्रत्येक गोष्टीबद्दल टीका केली पाहिजे, असा समज त्यांनी करून घेतला. टीका करताना खर्या-खोट्याचा विवेकही त्यांनी बाळगला नाही.
’आप’च्या भवितव्याच्या दृष्टीने पंजाबची निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. अकाली दलाच्या कारभाराबद्दल एवढा असंतोष होता की तेथे सत्ता परिवर्तन होणे अपरिहार्य होते. लोकसभेच्या निवडणुकीत पंजाबमधून ’आप’चे चार खासदार निवडून आले होते. सिद्धूसारखा चेहरा ’आप’कडे येण्याच्या मनःस्थितीत होता. पण आपल्या लोकप्रियतेमध्ये केजरीवाल यांना कोणीही प्रतिस्पर्धी नको होता. त्यामुळे सिदू कॉंग्रेसमध्ये गेले. केजरीवालांनी आपल्याभोवती अतिरेकी गट उभे करायला सुरुवात केली. त्यामुळे पंजाबची आजवरची शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच मोदींच्या कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचा केजरीवाल यांचा पोरकटपणा सुरूच होता. त्यामुळे अकाली दलाच्या विरोधात असलेला पण सारासार विचारबुद्धी असलेला मोठा वर्ग ’आप’ ऐवजी कॉंगे्रसच्या मागे गेला. तोंडी आलेला घास आपल्या कर्माने कसा मातीत ङ्गेकावा याचे पंजाब हे उत्तमउदाहरण आहे. पण यातूनही ’आप’ला कोणतेही शहाणपण आले नाही. आपल्या अपयशाबद्दल आत्मचिंतन करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक मशीन्सच्या विरोधात त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. पंजाबचा पराभव हा केजरीवाल यांच्या मनाचा संकुचितपणा व चुकीची धोरणे यांचा परिणामहोता. पण स्वतःला ‘प्रेषित’ समजणार्या कोणत्याच व्यक्तीला आपण चूक करतो, असे वाटत नाही. केजरीवाल यांची स्थिती वेगळी नाही.
दिल्ली महानगरपालिकेत ’आप’चा झालेला पराभव ही केजरीवाल यांच्या नेतृत्वाच्या समाप्तीची नांदी आहे. खूप मोठ्या अपेक्षेने सुरू झालेल्या पण अकस्मात संपलेल्या राजकीय प्रयोगांचा हा एक इतिहास आहे. आसाममध्ये प्रफुल्लकुमार महंत यांना असेच एका आंदोलनानंतर तरुणपणी मुख्यमंत्रिपद मिळाले. पण त्यांनीही लोकांचा अपेक्षाभंग केला. आज ‘आसामगण परिषद’ अस्तित्वात आहे, पण महंत यांचा प्रभाव संपला आहे. महाराष्ट्रातील राज ठाकरे यांचे उदाहरणही तसेच आहे. आपल्यासंबंधी अपेक्षा निर्माण करणे सोपे असते व त्याला प्रसारमाध्यमेही हातभार लावत असतात. प्रतिमा तयार करणे व आपणच तयार केलेल्या प्रतिमांचे भंजन करणे यावर प्रसारमाध्यमांचा व्यवसाय चालत असतो. तो त्यांचा नेहमीचा खेळ असतो. त्या खेळात जाण्यापूर्वी आपल्यापाशी टिकून राहण्याची क्षमता असलेले घटक कोणते आहेत याचा विचार करावा लागतो. एवढे टीकेचे प्रहार सोसूनही मोदी टिकले व त्यांना एकदा यश मिळाल्यानंतर ते कमी झाले नाही, तर वाढत गेले याचे कारण यशानंतर त्या नशेत न राहाता आलेल्या सत्तेचा उपयोग करून लोकांचा विश्वास संपादन केला. वास्तविक गेल्या दिल्ली महानगरपालिकेतील भाजपची सत्ता हे कार्यक्षमतेच्या दृष्टीने आलेले मोठे अपयश होते. त्यामुळे सर्व विद्यमान नगरसेवकांना तिकिटे न देण्याचा निर्णय पक्षाला घ्यावा लागला. याचा निवडणुकांवर किती परिणामझाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण असे असूनही भाजपला जो विजय मिळाला, याचे कारण भाजपच्या नेतृत्वाने निर्माण केलेला विश्वास. तोच केजरीवाल यांना निर्माण करता आला नाही, कारण राक्षसी महत्त्वाकांक्षेपलीकडे त्यांच्यापाशी लोकांना देण्यासारखे काही नव्हतेच.
- दिलीप करंबेळकर