अवंती: मेधाकाकू, आता माझे मस्त वाचन चाललं आहे आणि आपल्या कुटुंबापुरताच पुस्तकदिन सुद्धा आम्ही वेगळ्या रीतीने साजरा केला, तेही सांगायचं आहे. अग काही महिन्यांपूर्वी वाचकदिनाच्या दिवशी तूच एक छान कल्पना सांगितली होतीस, शाळेत वर्गात शिकवताना. पुस्तकातले असो किंवा वर्तमानपत्रातले असो, नुसते शब्द वाचू नका तर, प्रत्येक वाक्यामधे शब्दार्थाच्या पलीकडला काही वेगळा अर्थ लपलाय का ते शोधायचा प्रयत्न करा. आणि पुस्तकदिनाच्या दिवशी बाबा आणि मी असे दोघांनी मिळून अगदी हेच केलय. आता बघच तुला यात काय काय सापडते ते आणि हो या निवडलेल्या सगळ्या म्हणी आहेत... वाकप्रचार नव्हेत कारण यात सापासारख्या प्राण्याच्या स्वभाव वैशिष्ठ्यांचा वापर मानवी व्यवहारांच्या तुलंनेसाठी केला आहे.
मेधाकाकू: अरे वा अवंती... आज तेरी काकू खूश हुई.. याला दोन करणे आहेत... पहिले असे की ऐकलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन त्याचा वापर करायचा आणि दुसरे म्हणजे काल जे केलं त्यापेक्षा एक टक्का का होईना थोडे जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. या दोन्ही गुणवत्ता प्राप्त करण्याची तुझी जिद्द फार आवडली मला. आता सांग पटापटा ... माझी उत्सुकता वाढल्ये आता...!!
अवंती: मेधाकाकू, ह्या तीन म्हणी बघ, एक मुद्दा कसा स्पष्टपणे मांडतायत ते..!!..ते मला समजाऊन घ्यायचे आहे.
मेधाकाकू: असे बघ कालच्याच भारतभरच्या वर्तमानपत्रातून जागरूक नागरिकाला समजलेली एक गंभीर घटना...!!..छत्तीसगड या राज्यातील सुकमा जिल्ह्यातील जंगलात, समाजविघातक संघटनेतील भ्याड लोकांनी आपल्या केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर केलेला हल्ला आणि त्यात झालेला सहवीस जवानांचा झालेला मृत्यू...!!
साप मारावा पुरा नाहीतर सूड घेईल खरा.
काही शतकांपासून प्रचलित असलेल्या या म्हणी आजही तोच सल्ला देतात...! समाज विघातक घटकांना वेळेत नष्ट करणे योग्य, अन्यथा ते नुकसानकारक ठरतात. गेल्या दोन दशकात, जगातील सर्वात शक्तिशाली देश रशियाची झालेली शकले यामुळे अनेक नवे देश निर्माण झालेच पण त्या देशातील कम्युनिस्ट राजवट आणि त्यांच्या ध्येय-धोरणांचा संपूर्ण पराभव झालेला आपण अनुभवला... आपल्या देशात मात्र यांची पिलावळ शिल्लक राहिली आणि स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे झाली तरीही कुठल्याही प्रकारच्या विकासाला हिंसाचाराने विरोध करत राहिली...! पूर्वीच्या राज्यकर्त्यांना हे जहरी सर्प नष्ट करता आले नाहीतच उलट या प्रवृत्तींची जाणीवपूर्वक जोपासना केली गेली. जी गोष्ट मध्यभारतातील नक्षल विचारांची तीच गोष्ट आज काश्मीर खोर्यातील अलगतावादी समाजात घडते आहे, एकाच पद्धतीने, अगदी जाणीवपूर्वक आखणी केल्याप्रमाणे.
नागास दूध पाजले शेवटी प्राणास मुकले.
वरच्या म्हणीप्रमाणेच यातही तोच मथितार्थ स्पष्ट वाचता येतोय आपल्याला. दुष्टास माणुसकीने वागविले तरी तो आपल्याला फसवतोच... मात्र आपल्या देशातील या परिस्थितीला अजूनही काही परिमाणे आहेत. स्वत:च्या उन्मादात वावरणारे हे स्वयंघोषित बंडखोर, प्रत्यक्षात, आपल्या देशात जाणीवपूर्वक अस्वस्थता निर्माण करू पाहणार्या विदेशी संघटनाच्या धनशक्तिवर नाचणारी बाहुली आहेत...!!
मेधाकाकू: या पुढच्या म्हणीत मात्र हाच मुद्दा वरच्यापेक्षा वेगळ्या रीतीने मांडला गेलाय.
अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील सर्पावर कोणी टाकणार नाही.
अधेला म्हणजे एक बिनविषारी साप यामुळे याच्यावर कोणीही ऊठसूट धोंडा मारते. पण जहरी सर्प किंवा नाग दिसला की सगळे दूर पळतात कारण यांचा विषारी दंश आणि वेगाने हल्ला करण्याचा स्वभावधर्म सर्वांनाच परिचित असतो...!!..आता याक्षणी आपले पोलीसदल आणि लष्कर अधेला सर्पासारखे झालेले दिसते आहे, कुठलाही प्रतिकार करताना दिसत नाहीये. मात्र आता यांना कोब्रा नागासारखे आपला विखार आणि अचूक हल्ला करायचे कौशल्य दाखवायची वेळ आलेली आहे असे समाजमन सांगते आहे. पूर्ण जगात इतके संयमी लष्कर आणि सैनिक मात्र काश्मिरातच आज आपण पाहतो आहोत...!!...
अवंती: मेधाकाकू, साप आणि नागाच्या निसर्गदत्त गुणवत्ता आणि स्वभाववैशिष्ठ्ये दोन्ही बाजूंनी मांडणारी ही आपली मराठी भाषा या चार-सहा शब्दांची अशी अजब आणि विलक्षण मांडणी या म्हणीच्या माध्यमातून करते, चहुबाजुने व्यवहाराचा अभ्यास करायला शिकवते आणि हे सर्व तुझ्यामुळे माला समजून घेता येते...!!..ही उन्हाळी सुट्टी माझ्या कायम आठवणीत राहणार आहे.
मेधाकाकू: अवंती अगदी योग्य दिशा आहे तुझ्या समजुतीची...!..फक्त शब्दार्थाकडे न बघता या म्हणींचे भिंग, दैनंदिन जीवनात घडणार्या महत्वाच्या आणि गंभीर घटनांना लाऊन बघायचा प्रयत्न आपण नेहमी करायचा...!!...यातून चातुर्य – विवेक – विश्वास या मूलभूत मानवी गुणवत्ता आणि प्राणी-पक्ष्यांच्या अंगभूत वैशिष्ट्यांची तुलना, आपल्याला वर्तमान परिस्थितीचे आकलन करून घेण्याची ऊर्जा आणि क्षमता देते...!!
- अरुण फडके