एकीकडे मुलीच्या लग्नामध्ये हुंडा द्यायला पैसे नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नव्हे तर वडिलांच्या डोक्यावरचे ओझे कमी व्हावे, म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीने आत्महत्या केल्याची घटनाही हल्लीच घडली. आजच्या काळामध्येदेखील या घटना कानावर पडल्या की मन सुन्न होते. दुसरीकडे लग्नातील वायफळ खर्चाला कात्री लावत काही तरुण जोडपी सामाजिक कार्यासाठी स्वेच्छेने आर्थिक साहय्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आता या दोन घटनांमधून कोणती घटना समाजासाठी हितकारक आणि कोणती घातक आहे, याचा जरा गांभीर्याने विचार करायला हवा.
मुला-मुलींचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यानंतर त्यांचे दोनाचे चार हात करण्याची चर्चा सुरू होते. आता लग्न म्हटलं की, आपल्यात देवाणघेवाण करण्याची एक पद्धत खूप पूर्वीपासून चालत आली आहे. अर्थात या पद्धतीमध्ये काळानुसार काही बदल झाले असले तरी समाजाचे वातावरण दूषित करणार्या काही परंपरा न सोडण्याचा अट्टाहास केला जातो. त्यातलीच एक पद्धत म्हणजे हुंडा. खासकरून ग्रामीण भागामध्ये अजूनही या परंपरेला प्रिय मानणारी मंडळी समाजामध्ये वावरत आहेत. आजही ग्रामीण भागात मुलगी कमी शिकली असली तरी किंवा उच्चशिक्षित असली तरी हुंडा घेण्याची प्रथा मात्र सुरूच आहे. ग्रामीण भागामध्ये समाजामध्ये आपली प्रतिष्ठा जपणे याला गरजेपेक्षा जास्तच महत्त्व दिले जाते. बरं ही इकडची प्रतिष्ठेची व्याख्यादेखील वेगळी असते. लोकांनी आपल्याला नावं ठेवू नये, या भीतीपोटी इथे कित्येक गोष्टी मन मारून कराव्या लागतात. घरामध्ये कितीही दारिद्र असले, उपासमार करावी लागली तरी छोटे-मोठे घरगुती समारंभ मात्र मोठ्या थाटामाटात करावे लागतात. वेळप्रसंगी कर्ज काढून, कोणाकडूनही आर्थिक साहय्य घेऊन आपली खोटी प्रतिष्ठा जपण्याचा अट्टाहास असतो. लोकांची हीच मनोवृत्ती घातक असते. परंतु, तरीदेखील ही तिकडची जणू काही परंपरा होऊन बसली आहे.
आज घराघरात हुंड्याचे समर्थक असल्यामुळे सर्व आया-बहिणी सासर आणि माहेरच्या तावडीत सापडून हतबल झाल्या आहेत. हा सर्व प्रकार फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कर्जाला बळी पडणार्यांना सहन करावा लागतो असा समज असेल, तर तोही चुकीचा आहे. उच्चशिक्षित आणि श्रीमंतांच्या घरांमध्येदेखील हे प्रकार सर्रास घडतात. आपल्याकडे लग्न ठरविताना मानपान, दागिने, बस्ता तसेच इतर अनेक गोष्टींसाठी पाण्यासारखा पैसा मोजला जातो. आजही काही ठिकाणी लग्नाचा सर्व खर्च मुलीच्या कुटुंबीयांना करावा लागतो. त्यामध्ये मानपान ही एक महाभयंकर पद्धत असते. यामध्ये काही राहून गेेले तर मुलाकडच्या मंडळींचे टोमणे ऐकावे लागतात. मग अशा वेळेस पैशाचे कशाही प्रकारे नियोजन करून मुलाकडच्या मंडळींना खुश करण्याची कसरत करावी लागते. या मानपानाच्या कारणास्तव भरमंडपामध्ये लग्न मोडल्याचे प्रकारदेखील घडतात. ताजे उदहारण द्यायचे झाले तर अलीकडेच लग्नाच्या जेवणामध्ये किती रसगुल्ले द्यायचे यावरून मुलगा आणि मुलींकडच्या मंडळींमध्ये वाद झाला. यामध्ये मुलीच्या वडिलांचा अपमान झाल्याने मुलीने लग्न मोडले. लग्नासारखे पवित्र बंधन या अशा कारणांमुळे तुटते ही बाब खरंच गंभीर आहे. पूर्वी शिक्षणाअभावी तसेच समाजाच्या दबावामुळे परंपरा जोपासण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, काही ठिकाणी मार्ग चुकीचा असल्याचे माहिती असूनदेखील त्याच मार्गाने जाण्याचा वेडेपणा केला जात आहे. आजही काही सुशिक्षित मुलगे हुंड्याला समर्थन देत असतात. केवळ आईवडिलांची मर्जी सांभाळण्यासाठी काही मुले हुंड्याची अपेक्षा करतात. हुंड्याची अत्यंत वाईट रूढी भारतीय समाजात खोलवर रुजली आहे. हुंड्याच्या हव्यासामुळे आजवर अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत. आज शहरी भागामध्ये प्रेमविवाह वगळले, तर रीतसर लग्न जमविण्यासाठी वधू-वर सूचक मंडळ किंवा नातेवाईक, मित्रमंडळींची मदत घेतली जाते. ग्रामीण भागामध्ये वधू-वर सूचक मंडळाचे जाळे इतके सध्या पसरलेले दिसत नाही. त्यामुळे तिथे काका, मामा, आत्याच्या ओळखीने लग्ने जमवली जातात. एकदा मुलामुलीच्या घरच्यांनी होकार कळविल्यानंतर लग्नाची बोलणी करण्यासाठी बैठक बोलावतात. मग यामध्ये एखादा मध्यस्थ किंवा नात्यातील माणूस हुंड्याची रक्कमनिश्र्चित करण्यासाठी मदत करतो. कायद्याने असे लोकसुद्धा गुन्हेगारच ठरतात. त्यांनाही हुंडा देणार्या आणि घेणार्याइतकीच किंवा दोन वर्षांपर्यंत कारावास आणि रु. दहा हजारपर्यंत दंड होऊ शकतो.
आज हुंड्याचा जो अक्राळ-विक्राळ राक्षस आपल्यासमोर आ वासून उभा आहे त्याला केवळ आपली विचारसरणीच जबाबदार आहे. हुंडा हा काही कुठल्या एकाच जातीत ठाण मांडून बसलेला नाही. ही प्रथा म्हणजे साथीचा आजार आहे. या आजाराची जसजशी अधिकाधिक लोकांत लागण होत गेली तसतसे या आजाराने विक्राळ रूप धारण केलेले आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन हुंडा घेण्याचा किंवा देण्याचा प्रकार उघडकीस आला तर त्याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींनी हुंड्याला बळी न पडता वेळप्रसंगी घरच्यांचा विरोधात जाऊन आवाज उठवला पाहिजे. आज शहरात अनेक सामाजिक संस्था, एनजीओ कार्यरत आहेत. गरज पडल्यास त्यांची मदत घेतली पाहिजे. अन्याय करणार्यांपेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, ही बाब डोळ्यांसमोर ठेवली तर हुंड्याची प्रथा नष्ट व्हायला फारसा वेळ लागणार नाही, हे निश्चित!
-सोनाली रासकर