माओवादी आणि जिहादी - एकाच नाण्याच्या दोन बाजू

    27-Apr-2017   
Total Views | 3

 


सध्या एकूणच देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. काश्मीरमध्ये फुटीरतावादी जिहादी नंगानाच करत आहेत तर छत्तीसगढमध्ये माओवादी परत सक्रिय झालेत. 

छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यामध्ये सुकमा येथे माओवादी नक्षलवाद्यांनी गेल्या सोमवारी सीआरपीएफच्या तुकडीवर जबरदस्त हल्ला केला. त्यात २६ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. १५० जवानांची ही तुकडी सुकमा येथे रस्त्याचे काम चालले आहे त्याच्यावर देखरेख करण्यासाठी म्हणून तैनात होती. ते जेवायला बसलेले असताना त्यांना बेसावध गाठून त्यांच्यावर ३००च्या जमावाने हल्ला केला. हल्ल्यातून वाचलेल्या एका जवानाच्या जबानीनुसार जो जमाव जवानांवर हल्ले करायला आला होता त्यात बायका-मुलं सगळ्यात पुढे होती. साहजिकच प्रतिकार करताना जवानांचे हात बांधले गेले. राहुल पंडिता नामक लेखकाच्या एका ट्विटमध्ये त्याने म्हटलंय की, ह्या हल्ल्यात कामी आलेल्या जवानांची छायाचित्रे त्याने बघितलेली आहेत आणि त्या छायाचित्रात जवानांच्या मृतदेहांनां भयानक रीतीने विद्रूप करण्यात आलंय. ह्या हल्ल्याचे नेतृत्व करणारा जो हिडीम नावाचा माओवादी होता त्याच्यावर अश्या अनेक हल्ल्यांमध्ये भाग घेण्याचा आरोप आहे. २०१० मध्ये बस्तरमधल्या चिंतलमारमध्ये असेच भयानक हत्याकांड झाले होते त्यात सीआरपीएफचे तब्बल ७६ जवान धारातीर्थी पडले होते. त्या नृशंस हत्याकांडातही ह्याच हिडीमचा हिडीस सहभाग होता.

   

गेल्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीमधल्या रामजस कॉलेजमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती त्यात त्यांनी 'काश्मीर मांगे आझादी' ह्याचबरोबर 'बस्तर मांगे आझादी' अश्याही घोषणा दिल्या होत्या. बस्तर आणि काश्मीरमध्ये केवळ ह्या घोषणांचंच साम्य नाही, तर दोन्ही ठिकाणी ह्या फुटीरतावादी संघटना काम करतात त्यांचं ध्येय एकच आहे, भारताचा समूळ विध्वंस. 


काश्मीरमधले इस्लामी जिहादी त्यांच्या बायकापोरांकडून आपल्या सैन्यावर दगडफेक करवतात. शस्त्रधारी दहशतवादी बायकामुलांचा ढालीसारखा वापर करून त्यांच्या आडून आपल्या सैनिकांवर हल्ला करतात. साहजिकच आपल्या सैनिक जशास तसे प्रत्युत्तर देता येत नाही, आणि समजा दिले तर मीडियामधून गदारोळ उडतो की, मानवी हक्कांचे उल्लंघन होतेय. नेमकी हीच पद्धत बस्तरमधले माओवादीही पोलिसांवर किंवा सीआरपीएफ वर हल्ला करण्यासाठी वापरतात. आघाडीची फळी बायका-पोरांची असते आणि शस्त्र सज्ज माओवादी मागून येतात. सीआरपीएफने दिलेल्या प्रत्युत्तरात जर पुढच्या फळीतल्या कुणाला गोळी लागलीच तर शहरातले छुपे नक्षल लगेच मानवाधिकार हे अमोघ बाहेर काढतात. बळी गेलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांच्या अधिकाराबद्दल कुणी बोलत नाही पण माओवादी, काश्मीरमधले जिहादी ह्यांच्या मानवाधिकारांचा मात्र सतत उल्लेख केला जातो. 

 

बस्तरमधले माओवादी आणि काश्मीरमधले जिहादी ह्यांच्यामधले दुसरे मोठे साम्य म्हणजे त्यांचा भौतिक प्रगतीला असलेला विरोध. रस्ते बांधणी, पूल बांधणी वगैरे पायाभूत विकास कार्याला दोन्हीकडचे फुटीरतावादी कसून विरोध करताना दिसतात. हुरियतचे गिलानी ह्यांनी अमरनाथपर्यंत जाणाऱ्या प्रस्तावित पक्क्या रस्त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. एप्रिलमध्ये काश्मीरमध्ये चेनानी बोगद्याचे उदघाटन करायला पंतप्रधान मोदी गेले होते तेव्हा काश्मीरमधल्या जिहाद्यांनी सर्व दळणवळण ठप्प केले होते. बस्तरमध्ये माओवादी रस्ते बांधणाऱ्या कामगारांवर, ठेकेदारांवर हल्ले करतात, त्यांची मशिनरी जाळतात. काश्मीरमध्ये गेल्या एका वर्षात जिहाद्यांनी ३२ सरकारी शाळा जाळून टाकल्या तर २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या गृहमंत्रालयाच्या एका अहवालानुसार माओवाद्यांनी २६० शाळा उध्वस्त केल्या होत्या. शिक्षणाला माओवादी आणि जिहादी, दोघेही घाबरतात कारण दोन्ही कडच्या संघटनांमध्ये भरती होते ती अशिक्षित, रिकाम टेकड्या, भविष्यहीन तरुणांची. एकीकडे दोन्हीकडचे फुटीरतावादी विकासकामांना विरोध करताना दिसतात आणि दुसरीकडे तेच लोक आमच्याकडे विकास होत नाही म्हणून आम्ही मागासलेले आहोत आणि म्हणून आमच्या तरुणांना नाईलाजाने हिंसेकडे वळावे लागते असे लंगडे समर्थन करताना दिसतात. 

 

काश्मीरमधले जिहादी आणि बस्तरमधले माओवादी ह्यांच्यामधले सगळ्यात मोठे आणि सगळ्यात साम्य आहे ते म्हणजे दोहोंचेही नैतिक समर्थन करणारी मंडळी एकच आहेत. युनिव्हर्सिटी आणि शाळा-कॉलेज मध्ये सभ्यतेच्या मुखवट्याखाली वावरणारे शहरी नक्षलवादी आणि मीडियामधली त्यांची प्यादी. माओवादी आणि जिहादी ह्यांच्या भयंकर, नृशंस हिंसेचे उदात्तीकरण करणे आणि त्या कृत्यांना नैतिकतेचा मुलामा देणे हे ह्या लोकांचे नेमून दिलेले काम आहे. त्याबद्दल त्यांना परदेशातून लाखो डॉलरची मदतही मिळत असते. म्हणूनच बुरहान वणी सारख्या दहशतवाद्याला तो 'गरीब हेडमास्तरचा मुलगा' होता असा साळसूद मुलामा दिला जातो आणि भारतीय सैन्याने जीपला बांधून मिरवलेला एखाद्या दगडफेक्यासाठी रात्रंदिवस न्यूज स्टुडियोमधून सहानुभूतीचे रतीब घातले जातात. म्हणूनच बस्तरमधल्या शामनाथ बाघेल नावाच्या आदिवासी माणसाच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचा गंभीर आरोप असलेल्या नंदिनी सुंदर सारख्या नक्षल समर्थक बाईला पत्रकार राजदीप सरदेसाई आपल्या शो मध्ये विशेषज्ञ म्हणून राजरोसपणे बोलावू शकतो आणि ती बाईही निर्लज्जपणे आपण 'माओवाद्यांना समजून घेतलं पाहिजे' अशासारखी साळसूद वाक्ये देशभरातल्या दर्शकांच्या तोंडावर फेकते. 

 

ह्या शहरी नक्षल समर्थकांची लॉबी अत्यंत शक्तिशाली आहे. देशात आणि परदेशातही राजकीय व्यवस्था ह्या लोकांनी वाळवीसारख्या पोखरून ठेवलेल्या आहेत. ह्यांची माणसे सरकारात आहेत, मीडियामध्ये आहेत, विद्यापीठातून तर ह्यांची सद्दीच आहे. मानवाधिकार ह्या गोंडस नावाखाली ह्यांचे देशविघातक उद्योग चालतात, आणि ह्यांचे उपद्रव मूल्य एव्हढे आहे की सरकारे ह्यांना घाबरून असतात. बस्तर मध्ये २०१५-२०१६ मध्ये कल्लुरी नावाचे पोलीस महानिरीक्षक नेमले गेले होते. त्यांनी अत्यंत कठोर पावले उचलून बस्तरमधला माओवाद बराचसा आटोक्यात आणला होता. पण त्यामुळे शहरी नक्षलवाद्यांनी त्यांना हटवण्याचा विडाच उचलला होता. शेवटी मानवाधिकार लॉबीच्या प्रयत्नांना यश आले आणि कल्लुरी ह्यांची बस्तरमधून उचलबांगडी करण्यात आली. ज्या बाईने हे सारं घडवून आणलं ती बेला भाटिया नावाची TISS मधली प्राध्यापिका सध्या छत्तीसगडमध्ये सरकारी खर्चाने ऐश करते. तिला राहायला रायपूरमध्ये रमणसिंग सरकारने फुकट घर दिलंय आणि दहा पोलीस तिच्या संरक्षणासाठी रात्रदिवस तैनात असतात. आपले जवान मात्र जंगलात माओवाद्यांच्या हल्ल्याला तोंड देत असतात. तिकडे काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या मुलांना हिरो बनवले जाते आणि पोलिसांनी त्यांना काबूत आणायला पेलेट गनचा उपयोग केला की त्याविरुद्ध अत्यंत थंड डोक्याने मीडियामधून वातावरण तापवले जाते. आपल्या जवानांचे प्राण वाचवण्यासाठी ज्या तरुण सैन्य अधिकाऱ्याने त्या दगडफेक्याला जीपला बांधायचा अभिनव प्रयोग केला त्याला प्रसारमाध्यमांमधून खलनायक ठरवले जाते.   

 

जर ही परिस्थिती बदलायची असेल आणि भारताला भेडसावणाऱ्या ह्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल तर काश्मीर आणि बस्तरमध्ये बळाचा वापर करणे अपरिहार्य आहेच, पण त्याचबरोबर ह्या शहरी नक्षलवाद्यांना नामोहरम करण्याची राजकीय इच्छाशक्ती केंद्र आणि राज्य सरकारकडे असली पाहिजे. कश्मीरमधल्या जिहाद्यांना आणि बस्तरमधल्या माओवाद्यांना नैतिक आणि बौद्धिक रसद पुरवणारी ही खोटी मानवाधिकार लॉबी जोपर्यंत आपल्या शाळा-कॉलेजेस मधून, मीडियामधून  सक्रिय आहे तोपर्यंत सैन्य बळाचा वापर हे देशांतर्गत सुरक्षेच्या समस्येचे केवळ एक तात्कालिक निराकरण असेल. कारण आपल्या सैन्यावर बंदुका चालवणारे हात जरी बस्तर आणि काश्मीर खोऱ्यात असले तरी त्यांना दारुगोळा पुरवणारी डोकी मात्र आपल्यामध्येच आहेत. अगदी आपल्या अवतीभवती.

- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121