गेल्या काही काळात देशात नक्षलवादाची मुळं वाढली आहेत. कालच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २६ जवान शहीद झाले आहेत. काही दिवस जातात आणि पुन्हा एखाद्या नक्षलवादी हल्ल्याची बातमी समोर येते. आता पर्यंत देशात अनेकदा असे हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये अनेक पोलिस जवानांनी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांनी, आणि सामान्य माणसांनी आपला जीव गमावला आहे. नक्षलवादाची सुरुवात झाली ती १९६७ मध्ये पश्चिम बंगालच्या 'नक्सलवबाडी' या गावातून. मात्र आता नक्षलवाद कर्करोगाप्रमाणे पसरतच चालला आहे.
गेल्या काही काळात झालेल्या सगळ्यात भीषण हल्ल्यांचा हा आढावा..
१. २४ एप्रिल २०१७ : काल सुकमा येथील चिंतागुफा क्षेत्रात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलातील २६ जवान शहीद झाले आहेत. रस्ता निर्माण कार्याची सुरक्षा करत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला ज्याला पोलिस जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले मात्र या हल्ल्यात २६ जवान शहीद झाले.
२. ३१ मार्च २०१६ : दंतेवाडा जिल्ह्यात मेलावाडा येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरूंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात सीआरपीएफचे ७ जवान शहीद झाले होते. दुपारी सीआरपीएफचे जवान गस्त घालून परतत असताना हा स्फोट घडवण्यात आला होता.
३. ११ मार्च २०१४ : छत्तीसगड येथील सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १५ जवान शहीद होते, तसेच यामध्ये एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. नक्षलवाद्यांनी सुकमाच्या जेरम घाटीमध्ये सीआरपीएफच्या शोधमोहिमेवर हल्ला केला. सुकमा हे नक्षलवादी हल्ल्यांसाठी प्रसिद्ध क्षेत्र आहे.
४. २६ मे २०१३ : सुकमा येथेच २०१३ मध्ये सगळ्यात मोठा नक्षलवादी हल्ला झाला होता. काँग्रेसच्या परिवर्तन रॅली वर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. २०० नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात काँग्रेसची तत्कालीन अक्ख्या एका फळीचा अंत झाला. यामध्ये विद्याचरण शुक्ल यांचाही समावेश होता. नक्षलवाद्यांचे मुख्य लक्ष्य होते सलवा जुडुम विरोधात काम करणारे काँग्रेसचे प्रमुख नेते महेंद्र कर्मा. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर ६५ गोळ्या झाडल्या, त्यांच्या शरीरावर ७८ जखमांचे व्रण होते, तसेच त्यांना संपवल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्या मृत शरीरावर नाचही केला. छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातील काँग्रेससाठी हा अत्यंत भयानक हल्ला होता. यामध्ये काँग्रेसच्या प्रमुख २७ नेत्यांना आपला प्राण गमवावा लागला.
दहशतवाद हा देशाच्या बाहेरील लोक करतात, मात्र नक्षलवाद हा देशाला पडलेलं विदारक स्वप्न आहे. यामुळे आज पर्यंत कितीतरी जवान शहीद झाले आहेत. त्यांचा जीव मोलाचा आहे. पुढे असे अनेक जीव वाचवायचे असतील तर यावर नक्कीच कठोर उपाय कारवाई करणे आणि दूरदर्शी उपााय काढणे आवश्यक आहे.