गेल्या रविवारी दिल्लीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या. त्यांचा निकाल उद्या लागणार आहे, पण एक्झिट पोलचे आकडे जर आपण बघितले तर एकूण रागरंग असाच दिसतोय की आम आदमी पार्टीचा ह्या निवडणुकीत दारुण पराभव होणार आहे. इंडिया टुडे-एक्झिट पोल ने भाजपला २७२ मधल्या २१७ जागा दिलेल्या आहेत तर एबीपी न्यूजच्या एक्झिट पोल ने २१८. आम आदमी पक्ष तीस देखील जागा मिळवू शकणार नाही असे भाकीत दोन्ही एक्झिट पोलने केलेले आहे. त्यामुळे साहजिकच आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. केजरीवाल ह्यांचे उजवे हात असलेले आशिष खेतान ह्यांच्या 'अंतर्गत सर्वे' मध्ये मात्र आप भरघोस मते मिळवून जिंकतो आहे. अर्थात खेतान ह्यांचा 'अंतर्गत सर्वे' एक विरंगुळा म्हणूनच घ्यायचा असतो हे गोव्याच्या अनुभवावरून सगळ्यानांच कळून चुकलेले आहे. गोव्यातही आपच्या 'अंतर्गत सर्वे' ने आम आदमी पक्षाला चाळीस पैकी पस्तीस जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र एक सोडल्यास त्यांच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम गोव्यात जप्त झाली.
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाची काय परिस्थिती होणार आहे ह्याचा साधारण अंदाज केजरीवाल ह्यांना आलेला आहे आणि म्हणूनच ते दिवसेंदिवस अधिकाधिक बेतालपणे बरळत आहेत. 'भाजपला मत देणाऱ्या मतदारांच्या मुलांना डेंग्यू-चिकुनगुनिया होईल' असे भीक नाकारलेल्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांसारखे शिव्याशाप द्यायला सुद्धा केजरीवाल ह्यांनी मागेपुढे बघितलेले नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने इतके पातळी सोडून वर्तन केलेले आहे. पण केजरीवाल ह्यांची गोष्टच निराळी असल्यामुळे ते असले भाकड शिव्या-शाप नित्य देत असतात. सध्या त्यांनी इव्हीएम मशीनविरुद्ध विलापकल्याण रागातला बडा ख्याल आळवून आळवून गायला सुरवात केली आहे आणि त्यांना साथ करत आहेत त्यांचे विश्वासू साथीदार आशुतोष आणि आशिष खेतान.
केजरीवाल ह्यांची मजल 'दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम्ही हरलो तर आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू' अश्या धमक्या देण्यापर्यंत पोचलेली आहे. हे म्हणजे पिचवर बॅटिंग करायच्या आधीच एखाद्या शाळकरी रडीखाऊ कॅप्टन ने, 'आम्ही मॅच हरलो तर आम्ही पीच उखडून टाकू हं' अश्या धमक्या देण्यासारखं आहे. जेमतेम दोन वर्षांपूर्वी ७० मधल्या ६७ जागा जिंकून न भूतो न भविष्यती अश्या पाशवी बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची ही अधोगती खरोखरच थक्क करणारी आहे. केजरीवाल ह्यांनी जेव्हा २०१४ मध्ये दिल्ली जिंकली तेव्हा आपली 'भगोडा' ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की 'पांच साल केजरीवाल'. पण केजरीवाल ह्यांची सत्तालालसा जबरदस्त आहे. दिल्लीसारख्या छोट्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाने त्यांचे समाधान होण्यासारखे नाही. त्यांची नजर आहे ती पंतप्रधानपदावर. राहुल गांधी ह्यांना राजकीय भविष्य नाही हे काँग्रेसमधले काही मूठभर लोक सोडले तर बाकी सगळ्यांना धडधडीत दिसतंय. त्यामुळे २०१९ मध्ये मोदींना सक्षम पर्याय म्हणून स्वतःची प्रतिमा घडवणे हा अरविंद केजरीवाल ह्यांचा एकमेव उद्देश्श्य आहे. केवळ त्यासाठीच दिल्लीचा कारभार मनीष सिसोदिया ह्यांच्यावर सोडून केजरीवाल गेली दोन वर्षे भारत दिग्विजयाच्या स्वप्ने बघत आहेत. नाहीतर दिल्लीसारख्या एका छोट्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने केरळमध्ये मल्याळम वृत्तपत्रात पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात देण्याचे कारण काय?
पण केजरीवाल ह्यांच्या दुर्दैवाने आणि देशाच्या सुदैवाने, काही संमोहित झालेले आपवाले सोडले तर केजरीवाल ह्यांना स्वीकारणारे देशात फार लोक दिसत नाहीत, आणि आता खुद्द दिल्लीत देखील त्यांचा मुलामा उडतो आहे. त्यांच्या पक्षाच्या २१ आमदारांवर निलंबनाची तलवार आहे. बाकीच्या काही आमदारांवर बायकोला मारहाण करण्यापासून ते खोटी डिग्री सादर कारण्यापर्यंतच्या केसेस चालू आहेत. मुख्य म्हणजे दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल ही खुद्द केजरीवाल ह्यांच्या लोकप्रियतेची आणि त्यांच्या दिल्लीमधल्या सरकारची परीक्षा आहे अशी कुजबुज माध्यमांमधून सुरु झालेलीच आहे. केजरीवाल ह्यांचेच एकेकाळचे सहकारी आणि आम आदमी पक्षाचे एक संस्थापक योगेंद्र यादव ह्यांनी तर ह्या निकालाला केजरीवाल ह्यांच्या लोकप्रियतेचा रेफरेंडम असे स्वच्छपणे म्हटलेच आहे. केजरीवाल ह्यांच्यासाठी दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे आम आदमी पक्षांतर्गतच्या त्यांच्या अढळ स्थानालाच धक्का लावणारा सुरुंग बनू शकतो हे सत्य अरविंद केजरीवाल ह्यांनाही चांगलेच ठाऊक आहे आणि म्हणूनच ते सातत्याने इव्हीएमच्या नावाने खडे फोडत आहेत.
ह्या निवडणुकांच्या निकालाचा पुढच्या वर्षी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांशीही निकटचा संबंध आहे. दिल्लीतून तीन सदस्य राज्यसभेत पाठवले जातात. सध्या ह्या तिन्हीही जागांवर काँग्रेसचे सदस्य निवडून गेलेले आहेत. जनार्दन द्विवेदी, परवेझ हाश्मी आणि करण सिंग ह्या काँग्रेसच्या तिन्ही खासदारांची मुदत जानेवारी २०१८ मध्ये संपतेय. 'आप'चे दिल्ली विधानसभेतले पाशवी संख्याबळ बघता त्यांचे २१ सदस्य निलंबित झाले नाहीत तर ह्या तिन्ही जागा 'आप' लाच मिळतील हे निश्चित आहे. जेव्हा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण आम आदमी पक्षात होते तेव्हा ह्या तीन पैकी दोन सीटवर त्यांनी अधिकार सांगितला असता हे जाहीर आहे. पण योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांच्यासारख्या स्वतंत्र राजकीय अस्तित्व असलेल्या माणसांचं पक्षांतर्गत प्रबळ होणं केजरीवाल ह्यांच्यासारख्या सत्तापिपासू माणसाला सहन होण्यासारखं नव्हतं म्हणून त्यांना पक्षातून हाकलण्यात आलं. आता जे उरलेसुरले शिलेदार केजरीवाल ह्यांच्याबरोबर आहेत त्यापैकी आशिश खेतान आणि आशुतोष हे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेची स्वप्ने पडू लागणे अगदी साहजिक आहे. सध्या आशिश खेतान आणि आशुतोष हे दोघेही न्यूजरूम मध्ये शिरा ताणूनताणून अरविंद केजरीवाल ह्यांच्या आक्रस्ताळेपणाला साथ देत आहेत त्याचे कारण हेच आहे.
अर्थात एक्झिट पोलचे आकडे जर खरे निघाले आणि आपची दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण वाताहत झाली तर आशिश खेतान आणि आशुतोष ह्यांचे राज्यसभेचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यात बऱ्याच अडचणी येऊ शकतात. आम आदमी पक्षामधल्या एका गटाला केजरीवाल ह्यांची घटती लोकप्रियता दिसतेच आहे. अरविंद केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभा निवडणुकीत आप परत निवडून यायची शक्यता किती आहे हे पक्षामधले असंतुष्ट लोक स्वतःशी आजमावत असणारच. सध्या तरी हा असंतोष कुजबुजीच्या पातळीवरच आहे, पण दिल्ली महानगरपालिका निकालानंतर ती कुजबुज वाढू शकते आणि त्याचा परिणाम जानेवारी मध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवर निश्चितच होऊ शकतो. हे राजकारण पुढे कसे उलगडेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
- शेफाली वैद्य