पुस्तकांची दुनिया

    23-Apr-2017   
Total Views |

आज २३ एप्रिल. जागतिक ग्रंथ दिन. त्यानिमित्त घेतलेला माझ्या मराठी वाचन प्रवासाचा हा एक छोटासा धांडोळा. मी कधी पुस्तकं वाचायला लागले ते मला आठवत देखील नाही, पण शाळेत पाऊलदेखील टाकायच्या आधीच माझे आजोबा माझ्याकडून मराठी वर्तमानपत्रांचे मथळे दररोज वाचून घ्यायचे हे पक्कं आठवतंय. मुळात घरात सगळेच वाचायचे. आजोबा, पापा, आई, मोठे भाऊ, सगळ्यांच्या हातात दिवसातून कधी न कधी तरी एखादं पुस्तक किंवा मासिक दिसायचंच. त्यामुळे लहान मूल जसं एखाद्या वयात पडत, अडखळत का होईना, पण आपोआप चालायला शिकतं, तशी मी वाचायला शिकले. 

 

घरात ढीगभर पुस्तकं, मासिकं होती, खूप वेगवेगळ्या विषयांवरची आणि कुठलंही पुस्तक उचलून बघायची, चाळायची, वाचायची आम्हा मुलांना पूर्ण मुभा होती. तेव्हा घरी दर महिन्याला स्त्री-किर्लोस्करचे अंक यायचे. त्यातली स्त्री अंकात 'बालविभाग' असायचा. तो वाचता वाचता कधीतरी मुख्य मासिकही वाचायला लागले. सगळं समजत नसलं तरी कळत नकळत त्यातून भाषा घडत गेली. दर दिवाळीला चार-पाच तरी दिवाळी अंक पापा आणायचेच. त्यात आमच्यासाठी म्हणून किशोर हमखास असायचा. मग भावांचे आणि माझे क्लेम पडायचे, आधी कुणी तो अंक वाचायचा ह्यावरून. 

 

सुरवातीचं पुस्तकांचं वाचन हे 'जादूचा शंख', 'जादूची अंगठी' वगैरे पुस्तकांपुरतंच मर्यादित होतं, कारण गोव्यात तीच सहजतेने मिळायची. पुढे काकांनी एकदा भा. रा. भागवतांची पुस्तकं मुंबईवरून पाठवली आणि एक नवंच विश्व माझ्यापुढे खुलं झालं. फास्टर फेणे ह्या मुळाशी ओळख झाली ती आजवर टिकून आहे. माझ्याकडे आजही फास्टर फेणेचा संपूर्ण संच आहे आणि आजही मी त्यातली पुस्तकं अधून-मधून काढून वाचते. त्यातला भाबडेपणा, आदर्श, नर्मविनोद सगळं मला अजूनही आवडतं. एकीकडे हे 'मुलांच्या' पुस्तकांचं वाचन चालू असतानाच अभिजात साहित्याचीही हळूहळू ओळख होत होती. 

 

नक्की किती वर्षांची होते ते आठवत नाही, पण दुसरी-तिसरीत असताना कधीतरी हातात 'पु. ल. - एक साठवण' आलं. माझ्या मोठ्या काकांनी ते माझ्या आजोबांना भेट म्हणून दिलं होतं. 'पु. ल. - एक साठवण' हे मी वाचलेलं पहिलं 'मोठ्या माणसांचं' पुस्तक! हाती आलेलं पुस्तक वाचल्याशिवाय खाली ठेवायचं नाही ह्या न्यायाने ते पूर्ण पुस्तक वाचून काढलं. काही विनोद कळले, बरेचसे डोक्यावरून गेले. पण आपण वाचतोय हे काहीतरी खूप छान आहे, भारून टाकणारं आहे ही जाणीव त्याही वेळेला होती. त्यानंतर मी ते पुस्तक अक्षरशः शेकडो वेळेला वाचून काढलं. इतकं की त्यातली पत्रं देखील मला पाठ आहेत. अजूनही ते पुस्तक माझ्या संग्रही आहे. पानं पार खिळखिळी झालीत त्याची, बांधणी सुटी झालीय, पण माझ्या आजोबांनी स्वतःच्या हाताने त्या पुस्तकाला घातलेलं जाड ब्राऊन पेपरचं कव्हर अजून तसंच आहे. माझ्या पुस्तक संग्रहातलं पहिल्या मानाचं पुस्तक आहे ते. पु. लंनी माझ्या बालमनावर केलेलं गारुड इतकी वर्षे झाली तरी तसूभरही कमी झालेलं नाही. त्यानंतर मी हळूहळू पुलंची सगळी पुस्तकं जमवायला सुरवात केली. एखाद्या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या पैश्यातून पुलंची पुस्तकं विकत घ्यायची हा माझा नेम कॉलेजला जाईपर्यंत चालू होता.  

 

ह्याच दरम्यान कधीतरी गो. नि. दांडेकरांचं पडघवली हातात पडलं. त्यातल्या कोकणाच्या चित्रणाने तर वेडच लावलं होतं. त्यावेळेला माझ्या गावात, कुंकळळीलाही एकूण वातावरण तसंच होतं. तांबड्या मातीचे वळणा-वळणाचे नागमोडी रस्ते, उंच झाडांनी वेढलेल्या काळोख्या, निरुंद पाणंदी, फुलझाडांनी आणि मेंदीच्या झुडुपांनी भरून गेलेल्या कुंपणाच्या वई, आणि अस्सल कोंकणी घरगुती जिव्हाळा. पडघवली मधल्या अंबेसारख्या नऊवारी लुगडी नेसणाऱ्या, केसांत अबोलीची, शेवंतीची भरगच्च वेणी माळणाऱ्या बायका घरोघरी होत्या. पडघवलीचा शेवट वाचताना मी हमसून हमसून रडले होते, त्या वेळी आमच्या वाड्यावरची सगळी घरं नांदती होती तरी! आजकाल नुसतंच उदास, खिन्न वाटतं पडघवली वाचताना. पडघवलीतली शेवटची वाताहत थोड्याफार फरकाने गोवा-कोकणातल्या प्रत्येकच गावाच्या वाट्याला आली आहे. आजकाल पडघवली उघडलं की माझ्या डोळ्यासमोर कुंकळळीच्या आमच्या वाड्यावरच्या जुन्या घरांची परवड येते. उगाचच घशात दुखल्यासारखं होतं. पडघवलीनंतर झपाटल्यासारखी गोनीदांची हाताला सापडतील ती सगळी पुस्तकं वाचून काढली. मृण्मयी, माचीवरला बुधा, कादंबरीमय शिवकाल, कुण्या एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत. कादंबरीतल्या व्यक्तिरेखा जितक्या महत्वाच्या असतात तितकंच कादंबरीचं 'सेटिंग' महत्वाचं असतं, किंबहुना, साहित्यकृती ज्या पार्श्वभूमीवर घडते ती पार्श्वभूमी सुद्धा कादंबरीतली एक महत्वाची व्यक्तिरेखा असू शकते हे गोनीदांची पुस्तकं वाचून कळलं. अजूनही माझ्या मनातलं जे कोकण घोळतंय ते गोनीदांच्या सिद्धहस्त लेखणीने रेखाटलेलं, राजमाची बघताना आठवला तो माचीवरला बुधा! 


गोनिदांनंतर माझ्या वाचन प्रवासातला पुढचा महत्वाचा मैलाचा दगड म्हणजे व्यंकटेश माडगुळकर. बाळळीच्या सरकारी वाचनालयातून आणून बनगरवाडी वाचली आणि एक नवीन विश्वच उलगडत गेलं माझ्या डोळ्यांपुढे. धुळीने भरलेल्या सपाट माळरानांची, मातीच्या घरांची, लिंबाखालच्या पाराची, पाण्यासाठी मैल मैल वणवण करणाऱ्या बायकांची, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची, कुरकुरत चालणाऱ्या गांवगाड्याची, रखरखीत अश्या जात वास्तवाची. मला ह्यापूर्वी सर्वस्वी अनभिज्ञ असलेली अशी ग्रामीण दुनिया माडगुळकरांच्या पुस्तकांनी दाखवली. मुळापासून हादरूनच गेले होते बराच काळ. 

 

बाळळीच्या त्या छोट्या सरकारी वाचनालयाचा माझ्या वाचन प्रवासात खूप मोठा वाटा आहे. नाथमाधवांची  सोनेरी टोळी, स्वराज्याची स्थापना, स्वराज्याचा कारभार, स्वराज्याचे परिवर्तन आणि वीरधवल ह्यासारखी पुस्तके, रणजित देसाईंचं 'श्रीमान योगी', ह. ना. आपटेंचं 'पण लक्षात कोण घेतो' ह्या सारखी पुस्तके मी तिथूनच मिळवून वाचली. सावरकरांचे काळे पाणी हे ही त्याच वाचनालयातून मिळवलेले पुस्तक.  

 

नंतर एक दिवस जी. ए. कुलकर्णी भेटले. माझ्या एका काकांनी मला मी दहावीत असताना काजळमाया हे जीएंचं पुस्तक भेट म्हणून दिलं. त्यातली पहिली गोष्ट वाचली आणि पुस्तक बंद करून पेटीत ठेवून दिलं. जीएंच्या कायम दुःखाने, निराशेने काळवंडलेल्या, नियतीच्या इशाऱ्यांवर अपरिहार्यपणे नाचणाऱ्या गूढ व्यक्तिरेखा काही त्या वयात मला झेपण्यासारख्या नव्हत्या. पण त्यांची लिहिण्याची शंभर नंबरी चोख शैली मात्र खोलवर भिडून गेली. एखाद्या जुन्या पेटीत नीट घडी करून ठेवलेली आजीची गर्भरेशमी पैठणी उलगडली की तिच्या पदरावरची अस्सल जर कशी आपले डोळे क्षणभरच, पण लखकन दिपवून जाते, तशी. त्यानंतर बरीच वर्षे जी. ए हातातही घेतले नाहीत. पुढे कधीतरी वयाच्या विशीत मुंबईत काम करत असताना काजळमाया संपूर्ण वाचून काढलं, तेव्हा मात्र जी. ए. कुलकर्णी ह्या माणसाने जे वेड लावलं ते आजतागायत टिकून आहे. त्यानंतर मी त्यांची सगळी पुस्तकं झपाटल्यासारखी वाचून काढली. त्यांचा पत्रव्यवहार वाचला. त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेली पुस्तकेही वाचून काढली. पण अजूनही तिन्हीसांजेला मला जीए वाचवत नाहीत. त्यांच्या त्या सगळ्या नियतीने शापलेल्या व्यक्तिरेखा अतृप्त आत्म्यांसारख्या मनाच्या सांदीकोपऱ्यात येरझाऱ्या घालत राहतात. विचारांची नसती जळमटं लोंबकळायला लागतात मग. मन उदास उदास होऊन जातं. 

 

चिं. त्र्यं. खानोलकरांचंही तसंच. गणुराया आणि चानी पहिल्यांदा वाचलं तेव्हा दोन्ही कथा फार विरुद्ध टोकाच्या वाटल्या. चानी ही माझ्यामते मराठीतली सर्वोत्कृष्ट 'कमिंग ऑफ एज' कहाणी आहे. कोवळ्या वयातला, कोकणातल्या छोट्या गावातला दिनू आणि त्याची 'मैत्रीण' असलेली स्वच्छंद भटकणारी, निळ्या डोळ्यांची, चित्रांमधून स्वतःच्या व्यथेला व्यक्त करणारी, गावाने तिरस्कृत केलेली चानी ह्यांच्यामधल्या अनोख्या भावबंधांची ही गोष्ट. दिनूला जेव्हा हळूहळू सत्य उलगडत जातं तेव्हा त्याच्या स्वत:बद्दलच्या, गावाबद्दलच्या, नीती-अनीती बद्दलच्या कल्पना पार ढवळून निघतात. चानी मधलं कोकणाचं वर्णन अत्यंत सुंदर आहे. रात्र काळी, घागर काळी, आणि कोंडुरा ह्यांच्यासारखी खानोलकरांची पुस्तके वाचताना त्यांची असामान्य प्रतिभा जाणवल्याशिवाय रहात नाही. 

 

पुढे बीए करताना पहिल्या वर्षाला मराठीला इरावती कर्व्यांचं 'परिपूर्ती' होतं. ते पुस्तक इतकं आवडलं की त्यानंतर मिळेल तिथून इरावतीबाईंची पुस्तकं वाचण्याचा सपाटाच लावला. त्यांचं साधं, सरळ, कधी कधी एकदम अंगावर आल्यासारखं वाटणारं गद्य मला प्रचंड आवडतं. त्यांचा वाटचाल हा लेख वाचून पंढरीच्या वारीबरोबर पायी जायचा निश्चय केला तो अजून पूर्ण व्हायचाय. ह्याच दरम्यान दुर्गा भागवतांचं 'पैस' वाचलं. त्यातला ज्ञानेश्वरांवरचा लेख पार लोभावून गेला. दुर्गाबाईंचं जे मिळेल से साहित्य वाचत गेले मग. त्यांना प्रत्यक्ष भेटायला मला खूप आवडलं असतं, पण तो योग काही नव्हताच आयुष्यात. माझ्या आयुष्यातले बरेचसे प्रवास हे दुर्गाबाईंच्या पाऊलखुणा ढुंढाळत केलेले आहेत. अत्यंत परखड तरीही ललित ढंगाने जाणारं सहज सुंदर लिखाण ही दुर्गाबाईंची खासियत. 

 

माझ्या त्या गोव्यातल्या छोट्या गावात दुर्गाबाईंची पुस्तके मिळवून वाचणं सोपं नव्हतं. ह्याला-त्याला सांगून, लायब्रऱ्या ढुंढाळून कधीतरी सहा-सात महिन्यातून एखादं पुस्तक हाती लागायचं. पैसनंतर वाचलं ते व्यासपर्व. व्यासपर्वने मला महाभारतावरची वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली भाष्ये शोधून वाचायचं व्यसनच लावलं. व्यासपर्वनंतर ऋतुचक्र हाती लागलं. हे तर आधीच्या दोन्ही पुस्तकांपासून वेगळंच होतं, सौंदर्यासक्त होतं. एका अत्यंत संवेदनाशील, आनंदलोलुप लेखणीतून उतरलेलं  ऋतुचक्र मला पुरतंच वेड लावून गेलं. अजूनही मला काही वाचायला सुचत नसलं तर मी सरळ ऋतुचक्र हातात घेते, कुठलेही पान उघडते आणि वाचायला सुरु करते. एक सिद्धार्थ जातक कथांचे व्हॉल्युम्स सोडल्यास दुर्गाबाईंची बाकीची जवळजवळ सगळीच पुस्तके आता माझ्या संग्रही आहेत. एक लेखिका म्हणून तर त्या मला महान वाटतातच पण मनाशी जपून ठेवलेल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दुर्गाबाई मला माणूस म्हणून खूप भावतात. ह्या नाजूक, फ्रेल वाटणाऱ्या बाईमध्ये सरकारला हलवण्याची ताकद होती. मागे मी एक निसर्गवर्णनपार लेख लिहिला होता तो वाचून एका बऱ्यापैकी वाचन असलेल्या गृहस्थाने मला 'तुझा लेख वाचून दुर्गाबाईंच्या ऋतुचक्रमधल्या लेखाची आठवण झाली' असा मेसेज पाठवला होता. मी दुर्गाबाईंसारखी कधीच लिहू शकणार नाही, पण त्यांची ती आयुष्यभर एखाद्या व्रतासारखी जपलेली कट्टर तत्त्वनिष्ठा - तेव्हढी तरी माझ्यात रुजावी असं फार फार वाटतं!

 

कवितांच्या वाटेला मी ठराविक मोठी स्टेशने सोडली तर फारशी कधीच गेले नाही, म्हणजे वाचले खूप कवी पण मुद्दाम विकत घेऊन संग्रही ठेवले ते कवितासंग्रह फक्त चार कवींचे. कुसुमाग्रज, विंदा, बोरकर आणि इंदिरा संत. विंदाचंही मला सगळ्यात आवडलेलं पुस्तक म्हणजे 'पिशी मावशी आणि तिची भुतावळ', लहान मुलांसाठी असल्या तरी अत्यंत उच्च दर्जाच्या कविता आहेत त्याच्यात. बोरकरांच्या प्रत्येक कवितेत मला गोव्याच्या मातीचा सुगंध येतो म्हणून मला त्यांची कविता आवडते. 

 

अजून काही आवडलेली पुस्तके म्हणजे पु. शि. रेगेंचं सावित्री. प्रकाश संतांची सगळीच पुस्तके, ह. मो. मराठेंची बालकांड आणि पोहरा, अरुणा ढेरेंचं 'काळोख आणि पाणी', राम पटवर्धन ह्यांनी पाडस ह्या नावाने अनुवाद केलेली मार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेची 'द इयर्लिंग' ही कादंबरी. ही कादंबरी मी मूळ इंग्रजीतही वाचलेली आहे, पण पटवर्धनांचा अनुवाद खरोखरच अप्रतिम आहे. १९३८ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातल्या एका ग्रामीण कुटुंबाचे चित्र रेखाटलेले आहे. तिथली ती बोलीभाषा, तिथले सांस्कृतिक संदर्भ ह्या सगळ्याला धक्का न पोहोचू देता त्या कादंबरीचा मराठी वाचकांना आपलासा वाटेल असा अनुवाद करणं हे खरोखरच सोपं काम नाहीये. पण पटवर्धनांनी ते शिवधनुष्य खूप सहज पेललंय. ह्याच कादंबरीचा भा.रा. भागवतांनी 'हरीणबालक' या नावाने अनुवाद केलाय. तोही वाचण्यासारखाच आहे. 

 

अशी ही माझी पुस्तकांची दुनिया. आईच्या मायेसारखी उबदार, बापाच्या मिठीसारखी सुरक्षित!

- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121