विस्मृतीत गेलेल्या म्हणी वाकप्रचार भाग १३

    21-Apr-2017   
Total Views | 1


 

मेधाकाकू: मग काय अवंती, या मोसमात आंब्याची चव आणि स्वाद कसा वाटला... हापूस आणि पायरीचा...!! आणि तुझे वाचन कुठपर्यंत आलयं...! मला बाई भारीच उत्सुकता तुझ्या वाचनाची आणि नवीन काय सुचते त्याची. आज मात्र मीच काही म्हणी आणि वाकप्रचार निवडलेत. आपल्या गप्पांसाठी...!! अनेक शतकांपासून आपला भारतीय समाज देऊळ या संकल्पनेकडे कसे बघतोय त्याचा उत्तम परिचय म्हणी आणि वाकप्रचार यातून आपल्याला आज मिळतो.

 

देऊळची सहाण व धर्मशाळेचे उखळ.

अवंती... १९७०-८० च्या दशकात डॉ प्रकाश जोशी आणि त्यांचे घुमक्कड सहकारी यांनी आपल्या देशाच्या ७२०० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीची साहसयात्रा खुश्कीच्या मार्गाने पायी चालत तीन टप्यामध्ये पूर्ण केली होती...!! गुजरातेतील वेरावळ पासून सुरू झालेली ही साहसयात्रा कन्याकुमारीपर्यंत जाते, त्याचे  तापशीलवार वर्णन ‘मावळमौजा’ आणि ‘पश्चिमवेळा’ या दोन पुस्तकात डॉ जोशींनी केले आहे...!!

त्यांच्या मुक्कामाच्या प्रत्येक नव्या गावात, वेशीबाहेर असलेल्या मंदिरात त्यांची रात्रीच्या मुक्कामाची आणि जेवण्याची व्यवस्था, उत्तम आदरातीथ्यासह झाल्याचे वर्णन या पुस्तकात त्यांनी केले आहे. आजच्या आपल्या वाकप्रचारात याचा उत्तम संदर्भ मिळतो. प्रत्येक देवळात पूजेची तयारी करण्यासाठी जी सहाण असते तिचा योग्य वापर गावातला प्रत्येक गावकरी करतो.  रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत फक्त एकच ऊखळ असते आणि त्याचा वापर गृहिणी गटागटाने एकत्र येऊन आपल्या कांडण-कुटण्याच्या कामासाठी करतात...!! ही सर्व समाजाची सोय आहे...!

अवंती: काकू – काकू – काकू एक मिनिट.... ‘ऊखळ’ असा शब्द वापरलास का तू...?? म्हणजे काय ते सांग की....!! ‘ऊखळ’.... मस्त आहे गं हा शब्द...!! 

मेधाकाकू: अवंती... २५ वर्षांपूर्वी पर्यंत ग्राइंडर-मिक्सर मशीन वापरात नसे तर ऊखळ या मोठ्या लाकडी भांड्यात ऊंच लाकडी मुसळाने धान्य बारीक करणे किंवा हळकुंडापासून हळद आणि मिरच्या कुटुन मिरचीचे तिखट बनवले जायचे आणि सगळ्या गावाचे सार्वजनिक ऊखळ असायचे...! तर आपला वाकप्रचार याच्या पुढचे वर्णन करतो...!! गावातले देऊळ जणू काही सार्वजनिक सहाण आहे आणि धर्मशाळा म्हणजे ऊखळ आहे... जेणे करून गावकरी – पै पाहुणे आणि पांथस्थ या सार्वजनिक सुविधांचा वापर करू शकतील. थोडक्यात इतकेच की, आपल्या समंजस समाजाने देऊळ आणि धर्माचे अवास्तव स्तोम कधी केले नाही... या उलट देऊळ समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे एक प्रभावी साधन बनवले...! याचा अभ्यास न करता आजचे स्वयंघोषित विद्वान पत्रकार येत्या काही दिवसात मंदिराचा वाद पुन्हा निर्माण करून समाजमनात संभ्रम निर्माण करतील...!!

अवंती: अरे व्वा ... काकू.... मग तर मी जाणारच आहे मामाच्या गावाला कारण तू वर्णन करतीयेस, तसे त्या गावात आहे का ते मला पहायचे आहे आणि हो.... कस्तुरीने म्हणजे मामाच्या मुलीने मला जे फोटो पाठवलेत ते मस्तच आहेत... !! ओके.. ओके... काकू आपण पुढे जाऊया...!!! 


देव नाही देव्हारी आणि धुपाटणे उड्या मारी.

मेधाकाकू: आता वरची म्हण जरा वेगळा मुद्दा मांडते...!! असे बघ.... की मंदिरात देवाची योग्य पद्धतीने प्रतिष्ठापना केली जाते आणि त्या मूर्तीमध्ये देवाचा निवास असतो अशी श्रद्धा आसते...!! आता ज्या देवळात किंवा मंदिरात देवाचे असे वास्तव्य नाही तिथे रोजच्या पूजा-पाठाचे उपचार केले जात नाहीत..!! मात्र हा वाकप्रचार म्हणतो, देव्हार्‍यात देव नाही पण इथे धुपाटणेच उड्या मारताय. धुपाटणे म्हणजे पूजेच्या आणि आरतीच्या वेळी कोळश्यावर धूप घालून ओवाळायचे भांडे. याला फार महत्व नसते..! आता इथे रूपक आहे ती देवळाचा वाद निर्माण करून त्याला विरोध करणारे महाभाग...!! सामान्य माणसाकडे अजूनही शाबूत असलेला विवेक... या विद्वान पत्रकारांच्या बुद्धीतून नाहीसा झालाय आणि तेच धुपाटणे आज उड्या मारताय...!! अवंती तुला माहित्ये का? ‘अयोध्या’ या शहराच्या नावाचा अर्थ...? ‘अयोध्या’ म्हणजे शत्रूचा कुठलाही योद्धा प्रवेश करू शकाणार नाही. प्रजेवर हल्ला करू शकणार असे अभेद्य संरक्षण व्यवस्था असलेले शहर पण आज आपलेच असमंजस नागरिक आपल्या शेजारच्या शत्रूला सहकार्य करून आपल्यावर हला करतायत. आपण जागरूक नागरिकांनी ही परिस्थिती योग्य रीतीने समजून घ्यायला हवेत...!!

 

अवंती: मेधाकाकू... तुझे सांगणे मी नेहमीच समजून घेते आणि आजचा मुद्दाही माझ्या लक्षात आलाय. मी सगळे वाचेन या विषयातले !! पण तो समंजस समाज आज का दिसत नाहीये आपल्याला... इतकेच विचारायचे आहे मला...!!!

 

- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121