कैलासची फिनिक्स भरारी!

    21-Apr-2017   
Total Views |
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेकडो वर्षे माणूसपण नाकारलेल्या समाजाला त्यांनी माणुसकीचा अधिकार प्राप्त करून दिला. एवढंच नव्हे, तर ’स्वातंत्र्यानंतर एकवाक्यते अभावी या देशाचे तुकडे पडतील,’ असं भाकीत करणार्‍यांना आपला भारत देश एकसंध ठेऊन भरभराटीकडे नेताना दाखविला तो बाबासाहेबांच्या राज्यघटनेने. धर्मांतराची घोषणा झाल्यानंतर बाबासाहेब देशाच्या मुळावर उठलेत की काय असा प्रश्न पडलेल्यांना ’’मी प्रथम आणि अंतिमत: म्हणूनच भारतीय राहीन,’’असे ठणकावून सांगितले. याच मातीतल्या गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म स्वीकारून त्यांनी आपलं भारतीयत्व जपलं. बाबासाहेबांमुळे भारतीय, विशेषत: दलित समाजातील तरुण शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सजग झाला. मात्र, आर्थिकदृष्ट्या हा दलित समाज अजूनही चाचपडतोय. दलित समाजाच्या तुलनेने अत्यल्प असणारे पारशी किंवा जैन समाज हे निव्वळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांच्याबाबतीत खैरलांजी वा जवखेडा प्रकरण झालं नसावं. मात्र, काही दलित तरुणांनी आता उद्योजकतेची कास धरली आहे. निव्वळ नोकरी न करता आता ते इतरांना नोकरी देऊ लागले आहेत. अशाच उद्योजकांपैकी एक म्हणजे कैलास खरात.
  
अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वाधिक दलितांवर अत्याचार होणारा जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध. साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून याची वेगळी ओळख आहे. सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ याच जिल्ह्याने रोवली. मात्र, अलीकडच्या काळात हा जिल्हा गाजतोय ते दलितांवरील अत्याचारानेच. याच जिल्ह्याच्या एका खेडेगावातील दलित समाजातील लहान मुलगा लहानपणी टीव्ही पाहण्यासाठी दुसर्‍यांच्या घरी जायचा. शनिवारी १२ वाजता येणारा शक्तिमान त्याला प्रचंड आवडायचा. शाळेतून धावत पळत कसाबसा तो घरी यायचा. घरात वह्या-पुस्तकं तशीच ठेवायचा आणि शक्तिमान बघण्यासाठी धूम ठोकायचा. ‘आमच्याकडे आज पाहुणे येणार आहेत,’ असं म्हणत ज्यांच्याकडे टीव्ही असायचा ते दरवाजा बंद करायचे. पण हा पठ्‌ठ्या हार मानायचा नाही. भावाच्या खांद्यावर चढून बंद खिडकीला असलेल्या फटीतून हा शक्तिमान बघायचा. थोडा वेळ हा, तर थोडा वेळ त्याचा भाऊ अशा संगनमताने शक्तिमान पाहिला जाई. आपल्या घरी टीव्ही नाही आणि आपल्याला चोरासारखं टीव्ही पाहावा लागतो, हे शल्य मनाशी टोचायचं. एक दिवस आपण पण अशीच मालिका बनवायची आणि टीव्हीवर ऍक्टिंंग करायची असं त्याने त्याच वेळी मनाशी ठरवून टाकलं. मालिका तर त्याने अजून बनवली नाही मात्र ज्या दूरदर्शनवरून त्याची आवडती मालिका प्रक्षेपित व्हायची त्याच दूरदर्शनच्या पेस्ट कंट्रोलिंगचं कंत्राट आज त्याच्या पॉवर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कंपनीकडे आहे. हा जिगरबाज उद्योजक म्हणजे कैलास शंकर खरात.

 
 
अहमदनगरच्या पिंपळगावच्या देपामधला कैलास खरात. २० जानेवारी १९९० ला कैलासचा जन्मझाला. सात भावंडांपैकी एक. कैलास तीन वर्षांचा असतानाच त्याचे बाबा, शंकर खरात यांचं निधन झालं. प्रपंचाचा सारा भार कैलासच्या आईवर म्हणजेच लक्ष्मीबाई आणि मोठा भाऊ, गोरख या दोहोंवर आला. पोटापाण्यासाठी कैलासची आई, मोठा भाऊ आणि लहान बहीण दूर गावात वीटभट्टीवर मजुरीसाठी जाऊ लागले. तीन बहिणींची कशीतरी लग्नं झाली होती. कैलास आणि त्याचा दुसरा एक भाऊ योगेश हे दोघेच घरी असायचे. घरची परिस्थिती बेताचीच होती. एक दिवस तर असा यायचा की निव्वळ पाणी पिऊन झोपावं लागायचं. मात्र कैलासला शिक्षणाची प्रचंड आवड होती. तसा अभ्यासात तो हुशारही होता. गावच्याच श्री हनुमान विद्यालयात तो शिकत होता. त्याची मेहनत आणि हुशारीमुळे तो सगळ्याच शिक्षकांचा आवडता होता. आठवीपर्यंत खाकी हाफ पॅण्ट, पांढरा हाफ शर्ट, पांढरी पॅण्ट असा एकच ड्रेस त्याच्याकडे होता. बनियान आणि अंडरवेअर हे काय असतं हे त्याला कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं. चप्पल तर फारच दूरची गोष्ट! विकास बोधक या शिक्षकांचा कैलासवर विशेष लोभ होता. त्यांनी कैलासला हरप्रकारे मदत केली. या दोन भावांच्या शिक्षणाचा खर्च, वह्या-पुस्तकं, गणवेश आदी सगळ्यांचा खर्च बोधक सर करायचे. सरांनी दिलेला ५ रुपयांचा पेन अजूनही कैलासने जपून ठेवलाय. बालकामगार म्हणून कैलास सहावीत असल्यापासून राबलाय. सुट्‌ट्यांच्या दिवशी, शनिवारी, रविवारी गवंड्यांच्या हाताखाली कामाला जाणे, कांदे काढायला जाणे, ईरवाड काढणे, भुईमूग काढणे, जंगलातून अनवाणी पायाने सरपण आणणे, पाणलोट क्षेत्राचे खड्डे खोदणे ही सारी कामे त्याने १३-१४ वर्षांचा असतानाच केलेली आहेत. सहावीला असताना पहिल्यांदाच गवंड्याच्या हाताखाली कामाला गेला. दिवसभर ओल्या सिमेंटमध्ये ते कोवळे पाय राहिल्याने तळव्यांना भेगा पडून रक्त आले होते. २००७ ला दहावी झाल्यानंतर कैलास भावासह कल्याणमध्ये बहिणीकडे राहायला आला. पुढे शिकायची खूप इच्छा होती. स्वप्नं तर कलेक्टर व्हायचं होतं. त्याने अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेशदेखील घेतला. मात्र ऍप्रन, प्रयोगासाठी लागणारं साहित्य घ्यायला पैसे नसल्याने कैलासने कॉमर्सला प्रवेश घेतला. २०११ मध्ये त्याने पदवी संपादन केली. पदवी मिळवणारा कैलास हा त्यांच्या कुटुंबातील पहिलाच सदस्य. त्याच वर्षी बँकेची परीक्षा पास होऊन त्याला बँकेत नोकरी मिळाली. सरकारी नोकरी मिळाल्याने घरातले सगळेच खुश झाले. आता आपले सुखाचे दिवस सुरू झाले, असे कैलाससह त्याच्या घरच्यांनाही वाटू लागले. मात्र, बँकेची हीच नोकरी कैलासच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. झालं असं की, कैलास ऑफिसमध्ये काम करत असताना पाहायचा की ऑफिसचं झुरळं, मुंग्या, पालीसारख्या किटकांपासून संरक्षण करणारी अर्थात पेस्ट कंट्रोलचं काम करणारी मुलं दिवसांतून फक्त दोन तासांसाठी यायची. मात्र, त्या दोन तासासाठी त्यांना लाखाच्या आसपास पैसे मिळायचे. आपण २६ दिवस राबतो आणि आपल्याला पगार मिळतो फक्त २० हजार रुपये. हे कुठेतरी कैलासला खटकलं. जर आपल्याला मोठ्ठं व्हायचं असेल, तर उद्योगधंद्या शिवाय पर्याय नाही हे त्याने ओळखलं. पेस्ट कंट्रोलिंगचं काम शिकण्यासाठी त्याने पेस्ट कंट्रोल कंपनीत पार्ट टाईम नोकरी करायला सुरुवात केली. हळूहळू ओळखी वाढल्या. सुरुवातीची तीन वर्षे त्याने अशीच लहान सहान कामे केली. २०१४ मध्ये ‘पॉवर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’ नावाची कंपनी सुरू केली. दिनेश कांबळे या मित्राच्या सोबतीने कैलासने ‘सिग्नी फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी सुरू केली. शून्यातून सुरू केलेल्या कैलासकडे आज ३० कामगार कार्यरत आहेत. इंडियन रेअर अर्थ लिमिटेड, दूरदर्शन केंद्र, टाटा पॉवर अशा नामांकित संस्थांना ते सेवा देतात. १ एप्रिलला त्यांनी पुण्यात कंपनीची शाखा सुरू केली आहे. पुण्यातील जवळपास २० हॉटेल्सचे कंत्राटदेखील त्यांना मिळाले असून ’ऑर्किड’सारख्या नामांकित हॉटेलचा यामध्ये समावेश आहे. ५० लाखांची सध्या ते उलाढाल करतात. पुढच्या वर्षी हा आकडा एक कोटींच्यावर जाईल.
 
कैलासच्या आयुष्यात अनेक हृदयद्रावक प्रसंग घडले. हा त्यापैकी एक आहे. कैलासची आई, भाऊ वीटभट्टीवर कामाला जात. या वीटभट्ट्या दुसर्‍या लांबच्या गावात असत. त्यामुळे घरी कैलास आणि त्याचा भाऊ योगेश हे दोघेच असत. दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होती. घरी खायला काहीच नव्हतं. सोमवारी इतिहासाचा पेपर. पोटासाठी या दोघा भावांनी शेजारी चाललेल्या घराच्या बांधकामावर मजुरी केली. योगेशने चार तास कामकेले, तर दहावीचा शनिवारी पेपर देऊन उरलेले चार तास काम कैलासने पूर्ण केले आणि आठ तासाचा पगार या दोघा भावांच्या हाती आला. आलेल्या पगारातून मग त्यांनी जेवणाचं सामान आणून जेवण केलं. शालेय जीवनापासूनच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्याने कुठे कालव्याच्या कामावर रोजंदारीवर जा, तर कुठे रस्त्याच्या बांधकामावर मजूर म्हणून कामकर असे सगळे संघर्षाचे, मेहनतीचे अनुभव घेतले आहेत. परिस्थितीला शरण न जाता कैलास आणि त्याचा भाऊ ठामउभा राहिला म्हणूनच आज ५० लाखांचं का होईना, पण स्वत:चं उद्योजकीय साम्राज्य उभारू शकला.
 
कैलास तीन वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. आपले बाबा कसे आहेत हे त्याला ठाऊक नाही आणि ते कसे दिसतात हे समजण्यासाठी त्यांचा फोटो देखील नाही. परिस्थितीमुळे फोटो कधी काढताच आला नाही त्यांना. ही सल मात्र कैलासला सतत बोचत राहते. या सर्वांवर मात करून पुढे भरारी घेण्याचा कैलासचा निर्धार आहे. भविष्यात ५०० कोटींची उलाढाल असलेली कंपनी, भारतभर कंपनीच्या शाखा आणि वरळी सी ङ्गेसला स्वत:चं घर हे कैलासचं स्वप्न आहे. कैलासची सामाजिक जाणीव वाखाणण्यासारखी आहे. स्वत:ची दीड एकर जमीन टाटा ट्रस्टला देण्याचा त्याचा मानस आहे. या जागेवर मुलांसाठी वसतिगृह उभारले जावे, ही त्याची इच्छा आहे. गरिबीमुळे आपल्याला शिकता आले नाही, पण इतर मुलांवर ही परिस्थिती येऊ नये, ही त्यामागची त्याची भावना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कैलासचं स्फूर्तीस्थान. व्यवसायात कधी नाऊमेद झाला की, कैलास बाबासाहेबांचं चरित्र वाचतो. त्यातून मिळालेली ऊर्जा त्याला व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करते. राखेतून जन्मघेऊन गगनभरारी घेणारा फिनिक्स पक्षी ऐकिवात आहे. पण कैलास खरातच्या रूपाने हा फिनिक्स पक्षी महाराष्ट्राच्या क्षितिजावर गगनभरारी घेण्यास सज्ज झाला आहे.
 
-प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

लेखक ‘युक्ती मीडिया कन्स्लटन्सी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संज्ञापन व पत्रकारिता विषयात मास्टर्स केले आहे. ते ‘डिक्की’चे सदस्य असून उद्योग, उद्योजकता यांचा गाढा अभ्यास व त्यासंबंधी लिखाणात त्यांचा हातखंडा आहे.