जेव्हा भारतीय वंशाच्या मंडळींना परदेशात वांशिक अन्याय/अत्याचारांना सामोरे जावे लागते, तेव्हा आपल्या देशात त्याविरोधात साहजिकच गदारोळ उठतो. ’’पाश्चात्त्यांना वांशिक श्रेष्ठत्वाच्या भावनेने पछाडलेले आहे, ते आम्हा भारतीयांना तुच्छ लेखतात,’’ वगैरे अपेक्षित आरोप होतात. यात तसे गैर काही नाही. मात्र, जेव्हा भारतीय लोक असेच अत्याचार बिगर गोर्या व बिगर–पाश्चात्त्य समाजातील लोकांवर करतात, तेव्हा या मंडळींना गप्प राहण्यावाचून पर्याय नसतो. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरात राहणार्या नायजेरियन वगैरे आफ्रिकी खंडातील लोकांना असा त्रास वारंवार सहन करावा लागतो. एवढेच नव्हे, तर अलीकडे अशा घटनांमध्ये सातत्याने वाढही होताना दिसते. ही निश्चितच चिंतेची बाब आहे, यात शंका नाही.
मागच्या महिन्यात दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा येथे आयेशा मोहम्मद या नायजेरियन तरुणीला तिने घाईघाईने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधून रातोरात परांगदा व्हावे लागले होते. तेव्हापासून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आफ्रिकन विद्यार्थ्यांना भितीच्या सावटात वावरावे लागत आहे.
सोमवार, दि. ३ एप्रिल २०१७ दिल्लीतील एका मॉलमध्ये एका गटाने पाच नायजेरियन विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्या अगोदर मनिष खरी या १७ वर्षांच्या तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. मनिषचे वडील करणपाल खरी यांना संशय होता की, त्यांच्या मुलाच्या खुनामागे त्यांच्या शेजारी राहणार्या नायजेरियन विद्यार्थ्यांचा हात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पाच नायजेरियन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण चौकशीअंती पोलिसांना करणपाल खरी यांच्या आरोपात काही तथ्य आढळले नाही. म्हणून त्यांनी त्या पाच नायजेरियन विद्यार्थ्यांना सोडून दिले होते. त्यानंतर जेव्हा ते पाच नायजेरियन विद्यार्थी मॉलमध्ये गेले, तेव्हा मनिषच्या जातीतल्या लोकांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला.
असाच प्रकार मागच्या वर्षी दिल्लीतच एका कांगो देशातील विद्यार्थ्याबद्दल घडला. मसुंदा ऑलिवर हा विद्यार्थी लोकांनी केलेल्या मारहाणीत मारला गेला होता. अलीकडे तर असे प्रकार देशातील अनेक महानगरांत घडतात. यामुळे भारताची प्रतिमा जगात मलिन होत असते. मग महात्मा गांधींचा भारत असहिष्णू होत आहे, असे आरोप सर्रास केले जातात, ज्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. हे प्रकार थांबलेच पाहिजे. मात्र, त्याआधी असे प्रकार का होतात, हे समजून घेतले पाहिजे.
यात आधी स्थानिक भारतीयांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मते, हे आफ्रिकेतून आलेले विद्यार्थी बेशिस्त असतात, रात्री-अपरात्री पार्ट्या करतात, ज्याचा शेजार्यांना त्रास होतो. यातून त्यांच्याबद्दल स्थानिकांच्या मनात द्वेषभावना निर्माण होते. स्थानिकांच्या भाषेत आफ्रिका खंडातून आलेल्या या विद्यार्थ्यांना ‘हबशी’ म्हणतात. हे आफ्रिकन ड्रग्ज घेतात, भांडकुदळ असतात वगैरे आरोप तर नेहमीचे आहेत. मध्ये काही काळ तर ते नरभक्षक आहेत अशासुद्धा अफवा पसरल्या गेल्या. या प्रतिमा एवढ्या घट्ट झालेल्या आहेत की, पोलीस स्टेशनच्या पातळीवर काम करणारे हवालदार व पोलीस सब इन्स्पेक्टर वगैरेंच्या मनातसुद्धा आफ्रिकन विद्यार्थ्यांबद्दल गैरसमज असतात.
एका वस्तुस्थितीला मात्र नाकारता येणार नाही. ते म्हणजे, जेवढे गैरसमज आफ्रिकन समाजाबद्दल युरोप व अमेरिकेत आहेत, त्याच्या कितीतरी पट घातक गैरसमज भारतात आहेत. भारतीय समाजाला गोर्या कातडीच्या माणसांबद्दल जेवढे प्रेम व आदर वाटतो, तितकाच काळ्या कातडीच्या लोकांबद्दल राग व प्रसंगी घृणा वाटते, ही सामाजिक सत्यपरिस्थिती कुणालाही नाकारून चालणार नाही. आजही आपल्या समाजातील एखादी व्यक्ती अमेरिका किंवा युरोपला गेली, तर त्या व्यक्तीकडे आदराने बघितले जाते. पण एखादी व्यक्ती जर आफ्रिका खंडातील नायजेरिया, दक्षिण आफ्रिका वगैरे देशांत गेली, तर त्याबद्दल एकही कौतुकाचा शब्द उच्चारला जात नाही. एवढेच नव्हे, तर जर एखाद्या भारतीय मुलाने जर युरोप किंवा अमेरिकेतून गौरवर्णीय सून आणली तर त्याचे केवढे कौतुक होत असते; पण जर चुकून त्या भारतीय तरुणाने श्वेतवर्णीय सून आणली तर हाहाःकार उडेल. यातच भारतीयांची गोर्या आणि काळ्या कातडीबद्दलची मानसिकता दिसून येते.
या स्थितीत लवकर व अमूलाग्र बदल झाला पाहिजे. भारतातील आफ्रिकन विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे; अन्यथा याचा विपरीत परिणाम भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंधांवर होऊ शकतो. आज भारत व आफ्रिका यांच्यातील व्यापारी संबंध तेजीत आहेत. यात दरवर्षी वाढ होत आहेत. भारत-आफ्रिका यांच्यातील व्यापार १९९० साली एक अब्ज डॉलर्स एवढा होता. हाच व्यापार २०१५ साली ७१ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. दुसरी पण तितकीच महत्त्वाची आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे. आज भारतात सुमारे ५४ लाख परदेशी आहेत. त्यापैकी आफ्रिकेतून आलेल्यांची संख्या ४० हजार एवढी आहे. या ४० हजारांपैकी २५ हजार विद्यार्थी आहेत. भारतात असलेल्या ५४ लाख परदेशी लोकांच्या तुलनेत ४० हजार हा आकडा अगदी लहान असला तरी यात वाढ होणे शक्य आहे. ज्या प्रमाणात यात वाढ होईल त्या प्रमाणात भारत-आफ्रिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होत जातील. या व्यापारी संबंधांची जितकी गरज आफ्रिकेला आहे, तेवढीच गरज भारतालासुद्धा आहे, याचे भान सरकारने ठेवावे व त्याप्रमाणे आपल्या देशात आलेल्या आफ्रिकेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खास काळजी घ्यावी.
याप्रकारे जर भारतात आफ्रिकी विद्यार्थ्यांवर होत असलेले हल्ले थांबले नाही, तर चीन याचा फायदा घ्यायला टपलेला आहेच. चीन अशा हल्ल्यांचे भांडवल करून आफ्रिका खंडातील देशांमध्ये स्वतःची प्रतिमा उजळ करून घेऊ शकतो. अभ्यासकांनी हे दाखवून दिले आहे की, गेली तीन वर्ष भारताच्या विरोधात या प्रकारच्या बातम्या आफ्रिकी वृत्तपत्रांतून प्रकाशित होत आहेत. अशाप्रकारे जर आफ्रिकी जनतेच्या मनात भारताची प्रतिकूल प्रतिमा निर्माण झाली, तर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. वास्तविक पाहता, गेली काही वर्षे भारतात शिक्षणासाठी येणार्या आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. उदाहरणार्थ २०१३ सालचा विचार केल्यास असे दिसते की, त्यावर्षी भारतात आलेल्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी १३ टक्के विद्यार्थी हे केवळ आफ्रिकेतून आले होते.
भारत आजही पेट्रोलच्या पुरवठ्यासाठी आखाती देशांवर अवलंबून असतो. असे असले तरी भारताच्या पेट्रोलच्या एकूण आयातीपैकी १७ टक्के पेट्रोल आफ्रिकेतून येते. यात वाढ होण्याची शक्यता आहे. पण आफ्रिकी विद्यार्थ्यांवर जर असे हल्ले होत राहिले, तर याचा प्रतिकूल परिणाम नक्कीच होईल. शिवाय आफ्रिका खंडात सुमारे दहा लाख भारतीय आहेत. त्यांचीही सुरक्षा धोक्यात येऊ शकते. याचा अर्थ असा की, भारतात शिक्षणासाठी आलेल्या आफ्रिकी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांना अनेक आयाम आहेत. म्हणूनच सरकारने याचा बंदोबस्त करण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने योजल्या पाहिजे. यासाठी आपल्याला ऑस्ट्रेलियाकडून बरेच शिकण्यासारखे आहे.
ज्याप्रकारे आफ्रिकी देशांतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी भारतात येतात, त्याचप्रमाणे भारतातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जातात. जशा आपल्या समाजाच्या आफ्रिकी विद्यार्थ्यांबद्दल तक्रारी असतात, तशाच ऑस्ट्रेलियन समाजाच्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल असतात. ज्याप्रकारे आपल्या देशातील काही लोक कायदा हातात घेऊन आफ्रिकी विद्यार्थ्यांवर हल्ले करतात तसेच प्रकार ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होत होते. यावर ऑस्ट्रेलियन सरकारने उपाय केले. त्यांनी ऑस्ट्रेलियात येणार्या भारतीय विद्यार्थ्यांना काही दिवसांचे प्रशिक्षण दिले व ऑस्ट्रेलियात कसे वागायचे, हॉटेल्समध्ये कसे खाण्याचे पदार्थ मागवायचे, बसने कसा प्रवास करायचा वगैरे शिकवले. यामुळे जी छोटीमोठी व अनावश्यक भांडणं व्हायची, ती थांबली.
भारत सरकारने अशाच प्रकारची उपाययोजना करावी. आफ्रिकेतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतात कसे वागावे वगैरेंचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. दुसरीकडून भारतीयांनासुद्धा आपल्या देशांत आलेल्या विद्यार्थ्यांशी कसे वागायचे याचेसुद्धा प्रशिक्षण द्यावे. याप्रकारे दोन्ही घटकांना गुण्यागोविंदाने नांदता येईल.
यातही आपल्यावर जास्त जबाबदारी आहे. आफ्रिकेतून आलेले हे विद्यार्थी जेव्हा परत मायदेशी जातील तेव्हा भारताची काही एक प्रतिमा घेऊन जातील. ही प्रतिमा जर अनुकूल असेल, तर आणखी आफ्रिकी विद्यार्थी भारतात येत राहतील व याद्वारे भारत-आफ्रिका संबंध दृढ होत जातील. ही प्रतिमा जर प्रतिकूल असेल, तर मात्र याचा आपल्या देशाला खचितच त्रास होईल. संयुक्त राष्ट्रसंघासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताला आफ्रिका खंडातील देशाची मदत हवी असते. या सर्वांचा एकत्रित विचार करून आपल्याला या समस्येची गंभीर दखल घ्यावी लागेल.
- प्रा. अविनाश कोल्हे