देशाच्या शीर्ष भागाची एकूण अवस्थाच मोठी विचित्र झाली आहे. एकीकडे दगडफेकीचे समर्थन केले जाते, तर दुसरीकडे उर्वरित भारतातील जनता ३७० वे कलम रद्द करावे, असे म्हणते. काश्मीरची अवस्था अश्वत्थाम्यासारखी झाली आहे. स्वत: पाप करायचे आणि मग जखम भरण्यासाठी तेलाची भीक मागत फिरायचे. आपल्या जवानांवर दगड फेकायला किती पैसे मिळतात, हे आता उघड होऊ लागले आहे, तरीही देशाच्या मुळावर उठलेल्या मानवाधिकार संघटनेचे लोक न्यायालयात जाऊन वा अन्य मार्गाने आमच्या सैनिकांचेच हात धरीत आहेत.
कुठवर हे सहन करायचे? आता अगदी काट्याचा नायटा झाला आहे, असे दिसत असूनही हे उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे का? हे प्रश्न सुबुद्ध नागरिकांना नक्कीच अस्वस्थ करीत आहेत. पॅलेट गन्स वापरायच्या नाहीत. कारण, बिच्चार्या तरुणांच्या डोळ्यांना इजा होतात. मुळात गन्समधून गोळ्या या पायावर झाडल्या जातात, चेहर्यावर नव्हे. ज्या अर्थी त्या जखमी तरुणांच्या चेहर्यावर गोळ्या लागल्या त्या अर्थी ते खाली वाकले होते. पायातील वहाण ठीक करायला वाकले नसतील ना. इतक्या धामधुमीत माणूस वहाण टाकेल आणि पळेल. याचा दुसरा अर्थ असा की, ते जवानांवर दगड मारण्यासाठी खाली वाकले होते. मग गोळ्यातील छर्रे चेहर्यावर लागणारच! त्यासाठी गन्स न वापरणे म्हणजे रोगापेक्षा भयंकर इलाज असे नव्हे काय? देशातील नेत्यांना अकारण मारणार्या जवानांबद्दल कणव वाटत नाही काय? त्यांनी कुठे कुठे लक्ष ठेवायचे आणि नियम पाळायचे? एखाद्या अतिरेक्याच्या विरुद्ध ऑपरेशन करताना तिकडे लक्ष केंद्रित करायचे की, त्या अतिरेक्याला ‘कव्हर’ देण्यासाठी आलेल्या दगडफेकी जमावाला काबूत ठेवायचे? पुढे पूर आला की, याच दगडफेकी लोकांना वाचवायला जवानच पुढे होतात. जवानांच्या मानसिकतेचा काही विचार होतो आहे, असे यातून दिसते आहे का?
त्यातून एका बुद्धिवंत जंताने मध्यंतरी अक्कल पाजळली की, ‘‘पगार मिळतो म्हणून जवान लढतात.’’ एका परीने ते खरे आहे, पण केवळ तेवढेच कारण आहे का? जीव धोक्यात घालण्यापेक्षा अन्यत्र नोकरी मिळू शकत नाही का? मग अशी धोक्याची नोकरी करणार्या जवानांचा उत्साह वाढविण्याऐवजी वातानुकूल खोलीत बसून चहा अथवा चिल्ड बिअरचे घुटके रिचवत अशी बिनडोक विधाने करून प्रसिद्ध होऊ पाहणार्या लोकांना काय म्हणावे?
नुकत्याच दोन घटना घडल्या. एकाच दिवशी त्यांची वृत्ते आली. एक होते, फारूख अब्दुल्लाचे विधान. हा माणूस आता निवडणूक लढवतो आहे. तो म्हणाला की, ‘‘काश्मिरी तरुणांना टुरिझमचे काही पडले नाही. ते त्यांच्या भूमीसाठी दगड हातात घेऊन लढत आहेत.’’ यावर भाजप प्रवक्ता म्हणाला की, ‘‘निवडणुकीतील ती भाषा आहे, लक्ष देऊ नका, एकदा ते जिंकलेे की त्यांची भाषा बदलेल.’’ म्हणजे निवडणुकीत देशद्रोही वक्तव्य केले, तर चालते असा याचा दुसरा अर्थ होतो. फारुखचे बोलणे गांभीर्याने घेण्यासारखे आहेे, असे जर दिल्लीला वाटत नसेल तर कठीण आहे.
दुसरे वृत्त आले, ते चेतन चिता हा बहादूर जवान इस्पितळातून घरी आला. १४ फेब्रुवारी हा दिवस आजकाल कशासाठी साजरा केला जातो ते सांगायला नको. आपल्याकडे तरुणांना त्या दिवशी प्रेमज्वर चढतो म्हणे! त्या दिवशी ३५व्या सीआरपीएफमधील हा तरुण अधिकारी श्रीनगरात अतिरेक्यांशी लढत होता. ‘लष्कर-ए-तोयबा’चे अतिरेकी आल्याची खबर मिळताच ही पलटण पुढे सरसावली. त्यात सर्वात पुढे हा चिता होता. नावच चिता, मग तो मागे कसा असेल? एकाएकी अतिरेक्यांनी जो हल्ला केला, त्यामध्ये चिता सापडला. त्याच्यावर ३० राऊंड फायर केल्या गेल्या. अतिरेक्यांच्या तब्बल नऊ गोळ्या त्याच्या अंगात शिरल्या, पण बहाद्दराने रायफल सोडली नाही. त्या अवस्थेत १६ राऊंड फायर करून अतिरेक्यांना संपवून तो खाली पडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला इस्पितळात हलविण्यात आले. गोळ्या किती आणि कुठे लागल्या आहेत, तेच नेमके कळत नव्हते. दिल्लीत आणेपर्यंत तो कोमात गेला. आता तो वाचणे कठीण आहे, असे डॉक्टरांना वाटणे साहजिक होते. त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
एक गोळी त्याच्या उजव्या डोळ्याला फोडून मेंदूला इजा करून गेली होती. चार गोळ्या पायात घुसल्या होत्या. डाव्या डोळ्यात गोळीचे छोटे कण गेले होते. दोन गोळ्या दोन्ही हातात घुसल्या होत्या. दोन पार्श्वभागात घुसल्या होत्या. डॉक्टरांसाठी ही केस म्हणजे आव्हान होते.
उत्तमः क्लेशविक्षोभं क्षमः सोढूं न हीतरः|
मणिरेव महाशाणघर्षणं न तु मृत्कणः।।
(श्रेष्ठ पुरुषच (शारीरिक व मानसिक) क्लेशांचे आघात सहन करण्यास समर्थ असतो. इतरांना (क्षुद्र माणसांना) ते जमणार नाही, जसे उत्कृष्ट रत्नच मोठ्या दगडावरचे घर्षण सोसू शकते, मातीचे ढेकूळ ते सहन करू शकत नाही.)
अखेर लहान-मोठ्या अशा तब्बल ११ शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर कैक दिवस कोमात राहून हा पट्टा मृत्यूशी झुंजत होता. ५१ दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तो घरी आला तेव्हा घरच्यांसाठी दिवाळी होती. स्ट्रेचरवर असलेल्या या वीराला पत्रकाराने विचारले, ‘‘कसे आहात?’’ यावर चिता उद्गारला, ‘‘आय ऍम रॉकिंग, रॉकिंग मीन्स टॉप ऑॅफ द वर्ल्ड!’’ असे उत्तर चटदिशी दिलेे. ते ऐकून आपली छाती अभिमानाने भरून यावी.
असे जवान आहेत म्हणून हा देश शत्रूपासून वाचला आहे. भारतीय शौर्याचे हे खरेखुरे प्रतीक आहे. याच जवानांच्या भरवशावर आपण रात्री शांतपणे निजू शकतो. दिवसा आपली सर्व कामे निर्वेधपणे पार पाडू शकतो.
युनान रोम मिस्र, सब मीट गये जहांसे,
कुछ बात हैं के हस्ती, मिटती नहीं हमारी...!!!
हेच खरे आहे. अशा वीराला लक्ष लक्ष प्रणाम. ही दोन व्यक्तिचित्रे नीट लक्षात ठेवा. कुठे आणि कुठे चेतन चिता!
- सच्चिदानंद शेवडे