जगाच्या पाठीवर : बाबूजींच्या 'स्ट्रगल'चे दिवस

    15-Apr-2017
Total Views | 6


प्रत्येक ऋतू अनुभवांची, जाणिवांची एकेक साखळीच घेऊन येतो. आत्ताच आलेल्या चैत्राचेच उदाहरण घ्या ना. चैत्र महिना येतो तो वेगवेगळे रंग घेऊनच... निसर्ग कूस बदलत असतो.... मग त्याच्या सोबतीनेच उत्सव प्रिय हिंदू माणूस सण-उत्सवांची सुरवात करतो. आधी गुढीपाडवा येतो, पाठोपाठ येते रामनवमी... आणि गेली पन्नास वर्षे रामनवमी सोबतीने घेऊन येते ते म्हणजे अवीट गोडीचे गीतरामायण. गीतांच्या एकेका ओळीवर, सुरांच्या लकेरीवर आपण मनोमन नमन करतो ते मराठी संगीतातील राम-लक्ष्मणांना - अर्थातच सुधीर फडके उपाख्य बाबूजी आणि ग.दि.माडगूळकर उपाख्य गदिमांना !! प्रत्येक चैत्र मला न चुकता या दोघांकडे घेऊन जातो. मला तर बाबूजींची गाणी ऐकताना कळत नकळत डोळ्यासमोरून येत असतं ते त्यांनी प्रचंड खस्ता खात केलेली वाटचाल.. त्यांच्या 'स्ट्रगल'ची कहाणी मांडणारं पुस्तक म्हणजे 'जगाच्या पाठीवर'.

बाबूजींचं जीवन अनंत अडचणींना टक्कर देत पुढेच जात राहिलं. चित्रपटातल्या सारख्या चित्रविचित्र प्रसंगांनी भरलेलं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. वडिलांची वकिलीची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरु असतानाच अनपेक्षितपणे बाबूजींच्या आईवर काळाने झडप घातली आणि तेव्हापासून कुटुंबाच्या दैन्य, दु:ख आणि दारिद्र्याला सुरुवात झाली. वडील खचले, वकिली बंद पडली. चोरीचे आळ घेतले गेले. पण अशा कठीण परिस्थितीही संगीत-तपस्या त्यांनी सुरूच ठेवली. साक्षात अब्दुल करीम खाॅंसाहेब यांचीही वाहवा मिळवली. त्यातच गोड गळ्याची देणगी बाबूजींना लाभलेली असल्यामुळे त्यांनी गाण्याच्या शिकवण्या केल्या. मुंबईत नशीब आजमावण्याचाही प्रयत्न केला पण त्यांचा श्वास असणारे तंबोरा, तबला गहाण पडले. मनात नैराश्याने थैमान घातले. इतका गुणी कलाकार पण घराअभावी फुटपाथवर झोपण्याची वेळ आली. मामांना पैसे परत न दिल्याने तिथलेही दरवाजे बंद झाले, मित्रांनीही पाठ फिरवली. एकापाठोपाठचे दणके हे वाचकांनाच असह्य होतात तर प्रत्यक्ष बाबूजींची अवस्था काय झाली असेल? दैवाने इतकी टोकाची परीक्षा घेतली की ते आत्महत्येच्या बिंदूपर्यंत जाऊन पोचले पण एका अनामिक शक्तीने त्यांना पुन्हा खेचून आणले. कलकत्त्याला करिअर स्थिरस्थावर होत असताना पुन्हा अनपेक्षितपणे वळण आलं आणि कोल्हापुरात गदिमांशी ओळख झाली. इथेच बाबूजींचं आत्मकथन विराम घेतं.

पक्षी उड्डाण करायला सक्षम झालाय आणि त्याला नवं क्षितिज खुणावतंय अशा आशावादी अवस्थेत पुस्तक थांबल्याबद्दल साहजिकच चुटपुट लागते, कारण अत्यंत बिझी अशी कारकिर्द, गीतरामायणाची जडणघडण, गोवा मुक्ती संग्राम ही आयुष्यातली अती महत्त्वाची पर्वं अप्रकाशितच राहिली आहेत. अपूर्ण शिल्पसुद्धा काहीवेळा मोहवून टाकतं तसं या पुस्तकाचं आहे. पुस्तकातल्या घटना इतक्या नाट्यपूर्ण आहेत त्यामुळे वाचून झाल्यावर चुटपुट लागून राहणं अगदी स्वाभाविक आहे. अर्थात यामागे कारण आहे ते म्हणजे एक एका नियतकालिकात लिहिलेल्या लेखमालिकेचे संकलन आहे आणि या विशिष्ट टप्प्यावर ती मालिका थांबली ती दुर्दैवाने काही कारणाने पुन्हा सुरूच होऊ शकली नाही हे आपले दुर्दैवच (ही उणीव थोड्याशा प्रमाणात भरुन निघाली आहे ही बाबूजींच्या अर्धांगिनी ललिताबाईंच्या आठवणींची छोटीशी पुरवणी जोडल्यामुळे).


बाबूजींची लेखनशैली साधी-सरळ आहे. खरंतर त्यामुळेच हे कथन प्रांजळ वाटतं. काही ठिकाणी लक्षात राहील असं वाक्य ते लिहून जातात, एवढंच नाही तर ते स्वत:वर क्रूर विनोदही करतात. उदाहरण द्यायचंच झालं तर मुंबईतल्या हलाखीच्या स्थितीविषयी देता येईल. त्यांनी मदतीसाठी दुर्गा खोटेंकडे हात पसरले, पण त्या वेळी संगीतक्षेत्रातील दिग्गजांच्या सांगण्यामुळे दुर्गाबाईंनी असमर्थता दर्शविली. बाबूजींनी लिहिलंय, "खाॅंसाहेबांच्या कानावर माझी कीर्ती कुठुन गेली कुणास ठाउक ? याबाबतीतही मी चांगला कीर्तिमान होतो याचा प्रत्यय आला".

बाबूंजीच्या मोठ्या मनाची साक्षही या पुस्तकातून पटते. कारण, ज्यांनी मदत केली त्यांचे उल्लेख इथे आठवणीने केलेले आहेत मात्र ज्यांच्याकडून त्यांना वाईट अनुभव आले त्यांच्याविषयी लिखाणात कुठेही कटुता नाही. मुंबईत स्ट्रगलरचं आयुष्य जगत असताना त्यांचा मुक्काम रा. स्व. संघाच्या कार्यालयात होता. परंतु काही काळाने तिथली व्यवस्था पाहणाऱ्या एका स्वयंसेवकाने एके दिवशी त्यांना तिथून अक्षरशः बाहेर काढले. परंतु 'दोष आहे तो त्या व्यक्तीचा पण संघटनेची शिकवण उदात्तच आहे' हे समजून घेण्याइतकी प्रगल्भता त्यांच्यामध्ये तरुण वयातच आली होती.

पुस्तकाची मांडणी अगदी सुटसुटीत आहे. प्रत्येक प्रकरणाला वेगळं नाव, त्यातही प्रत्येक घटनेला छोटी उपशीर्षकं आहेत. त्यामुळेच वाचनात खंड पडला तरी नंतर पुन्हा सुरुवात करताना ते पटकन सापडू शकतं.

एक छान गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रकरणं संपल्यावर पावलाचं चिन्ह आहे. जणू बाबूजींचा जगाच्या पाठीवरचा प्रवासच. परंंतु खटकते ती एकच गोष्ट - ती म्हणजे या पावलांची दिशा. इथे छापलेलं आडवं पाऊल आहे ते डाव्या दिशेने जाणारं (बोटं डावीकडे न् टाच उजवीकडे) सर्वसाधारण संकेतानुसार विचार करता ही ऋण दिशा आहे. यापेक्षा बाजू बदलून बोटं उजवीकडे न् टाच डावीकडे अशा स्वरुपात छापलं तर प्रगतीच्या दिशेने पुढे जाणारे पाउल आहे असं सूचित होईल.

ह्याशिवाय पुस्तकाचं महत्त्व आणखी एका गोष्टीमुळे वाढलंय. ह्या पुस्तकातील दुर्मिळ छायाचित्रे जी बाबूजींचा जीवनपट उलगडत नेतात. अशाप्रकारच्या सकस आणि सुबक मांडणीची परंपरा असल्यामुळेच राजहंस हे मराठीतील एक अग्रणी प्रकाशन आहे.

पुस्तक : जगाच्या पाठीवर - अपूर्ण आत्मचरित्र
लेखक : सुधीर फडके
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या : २२४
किंमत : २६०

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121