अवंती: मेधाकाकू....परीक्षा संपली बरेका..आता तू निवांत हो...! आता परीक्षा-परीक्षा परीक्षा असा घोष बंद कर... आता.... सुरू झाली सुट्टी...!!
मेधाकाकू: अरे व्वा.... याला म्हणतात लब्बाड मुलगी... म्हणजे परीक्षेची काळजी मला एकटीलाच होती असे वाटेल की ऐकणार्याला... मग आता सुटणार तर तुमची गाडी सुसाट... काय काय आणि कुठे कुठे फिरून येणार या मनातल्या गाडीतून...!!
अवंती: आता पहिले दहा दिवस मी भरपूर वाचन करणारे... आई-बाबांनी भरपूर पुस्तके काढून ठेवल्येत माझ्या मेजावर... फास्टर फेणे आहे, बोक्या सातबंडे आहे, शेरलॉक होम्स आहे, तोतोचान आहे, चिकन सूप सिरिज आहे..!! आता फक्त वाचन.. पण आज तू काही तरी द्यायचय मला... आपल्या दर आठवड्याच्या अभ्यासात मला अजूनही एक प्रश्न आहे... म्हण आणि वाकप्रचार यातला फरक मला समजाऊन सांग पुन्हा एकदा...!!
मेधाकाकू: अरेच्या का बरे.... ओके ओके कूल ... आले लक्षात... म्हण आणि वाकप्रचार हे अगदी आंब्यांसारखे आहेत बघ..!!..एक हापूस तर एक पायरी.. दोन्ही तितकेच लाडके - स्वादिष्ट – दिसायला सुंदर आणि सुवासिक, तरीही ते एकमेकांपेक्षा वेगळे आहेत हे आपल्याला कोणीही न सांगता समजते...कारण प्रत्येकाचा स्वाद आणि माधूर्य खास वेगळे...!!...तर या म्हणी आणि वाकप्रचारांचे अगदी तसेच आहे... आता ऐक आणि समजून घे...!
म्हण म्हणजे काय .... !!
म्हण म्हणजे जणूकाही चार-सहा शब्दातल्या बोधकथा, दृष्टांतकथा, नीतीकथा किंवा उपमा. म्हणी, एखाद्या परिस्थितिचे, प्रसंगाचे किंवा व्यक्ति विशेषाचे वर्णन अगदी सोप्या उपमा आणि दृष्टान्त देऊन करतात. एखाद्या व्यक्तिवर किंवा दैनंदिन जीवनातील कुटुंब आणि समाज व्यवहारांवर टिप्पणी करताना; निसर्ग, प्राणी, पक्षी, कीटक, फळे, भाज्या, शेत, अवजारे, जमीन, पाणी, हवा, वस्तु आणि माणूस यांची गुण आणि अवगुण वैशिष्ठ्ये आणि त्यातील साधर्म्य किंवा विरोधाभास याचा वापर मोठ्या खूबिने म्हणींमध्ये केला जातो. प्रत्यक्ष शब्दार्थापेक्षा म्हणीचा भावार्थ आणि गूढार्थ समजून घेणे आवश्यक असते. शतकापूर्वीच्या समाजाच्या श्रद्धा, लोकभ्रम आणि गृहीतकांचा परिचय या म्हणीतूनच होतो. सामाज श्रूती आणि व्यवहार याचा परिचय म्हाणींच्या माध्यमातून आपल्याला होत असतो आणि अशा समाजातील विविध प्रवृत्ति आणि प्रकृतीच्या घटकांच्या मानसिकतेचे विश्लेषण आपल्या करता येते..!..उदाहरणार्थ...
अवलादिचे शिंगरु अवलादिवरच जाईल.
जातिवंत अरबी घोड्याचे शिंगरु जातिवंतच निपजते. माता-पित्याची गुणवत्ता मुलांच्यात येतेच.…!!..
यात समाजाला अनुभवाने प्राप्त झालेली आणि समजलेली घोड्याची गुणवत्ता उपमास्वरूप वापरली आहे.
उंदराला मांजर साक्ष.
तरफदारी करण्यासाठी तुमच्या शत्रूला कधीही बोलावू नका कारण तो कधीही तुमच्या बाजूने बोलणार नसतो.
उंदीर – मांजर यांचे मैत्र जगजाहीर आहेच हे वेगळे सांगायला नकोच... यात दिसते थोड्याशा उपहासाने केलेली नेमकी तुलना.. !!
वाकप्रचार कशाला म्हणतात ... !!!
वाकप्रचार म्हणजे दंतकथा किंवा कल्पित गोष्ट.... !! म्हणीप्रमाणे यात प्राणी – पक्षी – व्यक्ति किंवा वस्तु यांचा संदर्भ वापर केला जात नाही. मानवाच्या दैनंदिन जीवनात अनुभवलेल्या धारणा–भावना—समजूती--श्रद्धा किंवा अनुभव एखाद्या परिस्थितीला उपमा किंवा तुलना म्हणून वापरल्या जातात. वाकप्रचार नेहमी तुलना करण्यासाठी वापरले जातात. यात कुठलाही बोध किंवा उपदेश नसतो...मात्र चार-सहा शब्दात ठासून भरलेले चातुर्य दिसते हे मात्र नक्की ... उदाहरणार्थ...
सरली सुगी आणि बैस उगी.
उगी बसणे म्हणजे आराम करणे. आता सुगीचे दिवस सरले आहेत, सगळी कामे झाली आहेत, आता जरा आराम कर असे काही अनुभवाने शेतकर्याला या वाकप्रचारातून सुचवले आहे.
शेतीप्रधान देशातील वरिष्ठांचे अनेक पिढ्यांचे अनुभवाचे बोल...या वाकप्रचारात दिसतात...!!
माशाचे पोराला पोहायला शिकवायला नको.
मथितार्थ: अनावधाने सुद्धा एखाद्या विषयातील निष्णात, प्रवीण आणि कुशल व्यक्तिला नवशिके समजू नये.
एखाद्याची गुणवत्ता न ओळखता घेतलेला निर्णय...!!
अवंती: एकदम सहीये काकू....!!
मेधाकाकू: थोडक्यात इतकेच लक्षात घे ... म्हण किंवा वाकप्रचार यातला फरक तसे पहाता सूक्ष्म आहे हे खरेच... पण एकदा फरक काय आहे किंवा कुठे आहे हे समजून घेतले की प्रत्येकवेळी असा प्रश्न पडणार नाही तुला... यात दिसणारा किंवा न दिसणारा मुद्दा काय असेल किंवा कशाचा धृष्टांत देऊन त्याची तुलना कुठल्या घटनेशी किंवा प्रवृतीशी किंवा अनुभवाशी केली आहे ते प्रथम समजून घ्यावे... मात्र एखाद्या विषयाचा प्राथमिक अभ्यास पुन्हा एकदा करायची ही तुझी सवय, तुला नेहमीच यशस्वी करेल.... तर आता हापूस आणि पायरीची चव घेत घेत आणि फास्टर फेणे आणि शेरलॉकच्या साहस कथा वाचताना तुझी सुट्टी आनंदात जावो अशा शुभेच्छा....!!
- अरुण फडके