अन्वी.. काय हे ऊठ लगेच उठ.. परत मोबाईल घेवून बसलीस.. थांब बाबाला येऊच दे.. सोनल आतूनच ओरडली. आजकल हे दृश्य रोजचंच होतं. अन्वी असेल जेमतेम तीसरीत. तरी सुद्धा सतत तिला आईचा मोबाईल लागायचा. आई, आज्जी, बाबा सगळ्यांचं ओरडून झालं होतं.. काय करायचं सोनलला काही केल्या कळत नव्हतं..
आई दोनच मिनिट ना प्लीज.. ए आई आमच्या क्लासच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला काही आलंय का? बघू का मी.. सोनल थक्क झाली. हिला आता व्हॉट्सअॅप मॅसेजेस वाचता यायला लागले म्हणजे कित्ती डेंजर नाही का... ती थबकली.. थांब हा अन्वी.. लगेच फोन इथे दे आणि झोपायला जा. लहान मुलांनी खेळू नये फोनशी कितीदा सांगू मी.. अगं आई पण तू पण तर फोन घेवून बसतेस ना.. अन्वी ने उलट उत्तर दिलं आणि सोनलचा पाराच चढला.. आईला चिडलेली पाहून अन्वीही लगेच झोपायला गेली.
तितक्यात विशाल आला.. हाय सोना.. गेली का अन्वी झोपायला.? थकलेल्या विशालने विचारलं. हो आत्ताच गेलीये.. आपल्याच तंद्रीत सोनलने उत्तल दिलं. काय झालं गं? विशालने सोनलला जवळ घेत विचारलं. ए विशाल आपण अन्वी समोर खूप जास्त व्हॉट्सअॅप वापरतो का रे? काळजीच्या स्वरात सोनलने विचारलं. विशालही विचारात पडला. घडलेला सगळा प्रसंग सोनलने विशालला सांगितला. सोनलला आता जाणवलं होतं. मुलं आपलं अनुकरण करतात त्यामुळे त्यांना शिकवण द्यायची असेल तर आधी आपण परफेक्ट असणं गरजेचं आहे.
दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलावर बाबा आई आणि अन्वी बसले होते.. "बाबा आजपासून घरात सगळे असताना, जेवणाच्या टेबलावर आणि अन्वीसोबत खेळताना व्हॉट्सअॅप नॉट अलाउड हाँ." आईनं फतवा काढला.. आणि अनु मी आणि तू ही मोबाईल नाही वापरायचा हाँ.. बाबा आला की, आपण त्याच्या मोबाईल वर १० मिनिट गेम खेळू त्याहून जास्त नाही.. आपण कित्ती काय काय भारी करु शकतो.. जेवण झालं की सोसायटीत फिरायला जात जावू, क्राफ्ट ड्रॉइंग करत जावू मज्जा ना.. आईनं अन्वीला विचारलं..
पण आई गेम नक्की हाँ.. असं म्हणत अन्वी बाटलीत पाणी भरायला पळाली..
आई बाबा कडे बघत स्माइल करत होती..
त्या दिवशी पासून अन्वी सकट आई आणि बाबालाही शिस्त लागली..
- निहारिका पोळ