“अग आई! ओळख मला आज शाळेजवळ कोण दिसलं असेल?”, शाळेतून आल्या आल्या रघुने विचारले.
“पूजा ताई?”
“नाही! अजून एक chance!”
“निखील काका?”
“नाही!”
“हरले बाबा! सांग बरे कोण भेटलं?”, आईने विचारले.
“प्रकाश मामा!”, रघु म्हणाला.
“हो?! मग? काय म्हणाला दादा?”, आईने विचारले.
“काहीच नाही! त्याचे लक्ष नव्हते माझ्याकडे.”, रघु म्हणाला, “मी किती हातवारे केले, शुक शुक म्हणलं. पण त्याला कळलंच नाही!”
“हाक मारायची मग. कितीही गोंगाटात आपल नाव ऐकलं की बरोबर लक्षात येते.”, आई म्हणाली.
“हे खरे आहे. मला तर कोणी ‘बघू’ म्हणले तरी ‘रघु’ म्हणलय असे वाटून मी कान टवकारतो.”, रघु म्हणाला.
नीला आजी म्हणाली – “प्रतिभा अगदी खरे बोललात बघ! अमुक ठिकाणी अमकी व्यक्ती भेटू नये असे वाटत असतांना नेमकी ती व्यक्ती दिसते! आणि तिच्या एक दोन हाकांकडे जरी लक्ष नाही असे दाखवले, तरी तिसऱ्या हाकेला का असेना ‘ओ’ द्यावेच लागते!
“अगदी तसच आपल्या हाकेने भगवंताचे लक्ष वेधून घेता येते. भगवंत म्हणतो – जो माझे नाव घेतो, तिथे मला यावेच लागते! एकवेळ मी वैकुंठात सापडणार नाही. सूर्याच्या बिंबात सापडणार नाही. योग्याच्या ध्यानात सुद्धा कदाचित मी सापडणार नाही. पण जिथे माझ्या गोड नामाचा सतत जय घोष होतो, तिथे मी नक्की सापडतो! देवाच्या नावात, वैकुंठ भूमीवर उतरवयाची ताकद आहे!”
-दिपाली पाटवदकर