काल एका ओळखीच्या ज्येष्ठ नागरिक बाईंनी एक व्हिडियो पाठवला. त्यांच्या सिनियर सिटीझन क्लब तर्फे भरवण्यात आलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या ग्रुपने 'राम जन्मला ग सखे राम जन्मला' ह्या गीत रामायणातल्या सुंदर गाण्यावर नृत्य केलं होतं. नृत्यात भाग घेणारे, नाच बसवणारे, संगीत योजना, नेपथ्य, कॉस्च्युम्स बसवणारे, स्टेजची व्यवस्था सांभाळणारे सगळेच आजी-आजोबा आणि प्रेक्षागारात मात्र मुलं-नातवंडं. ते दृश्यच किती देखणं होतं. नाच करणाऱ्या आजी-आजोबांचा उत्साह तर अगदी बघण्यासारखा होता. असं देखणं, जीवनात रस घेणारं, उमदं वार्धक्य पाहिलं की खूप छान वाटतं.
आजकाल आयुर्मान वाढलेलं आहे, राहणीमानही बरंच वाढलेलं आहे त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झालेली वृद्ध जोडपी बरीच दिसतात. त्यांच्या हातात पैसे असतात, मन आणि शरीर दोन्ही मध्ये जोश असतो आणि मुख्य म्हणजे काहीतरी नवीन करायची ऊर्जा असते. ह्या वयात काहीतरी नवीन शिकणारी, काहीतरी नवीन करणारी, सतत कार्यरत असलेली माणसं खूप देखणी दिसतात. ते देखणेपण नुसतं शारीरिक नसतं तर त्या देखणेपणाला आयुष्याच्या बऱ्या-वाईट अनुभवांची रुपेरी, प्रसन्न किनार असते. काही वर्षांपूर्वी मी एकदा ट्रेनमधून जाताना एक वृद्ध जोडपं पाहिलं होतं. दक्षिण भारतीय होते दोघं. सत्तरीच्या घरातले असावेत ते दोघंही. संबंध चोवीस तास ते कबुतरांसारखे एकमेकांच्यात गर्क होते. एकमेकांची काळजी करायची त्यांची आयुष्यभराची सवय ट्रेनमध्ये देखील त्यांना निवांतपणे बसू देत नव्हती. कुठलंही स्टेशन आलं की ते आजोबा पटकन उठायचे आणि बायकोला तमिळमध्ये विचारायचे, 'तुला चहा हवाय का? काही खायचंय का?', तर ती जराशी उघड्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली की लगेच नवऱ्याला विचारायची, 'थंडी वाजतेय का? शाल देऊ का?' मला थोडंसं तामिळ येत असल्यामुळे मला ते बोलतात ते कळत होतं. रात्री झोपायची वेळ झाली तशी दोघंही लगबगीने उठली आणि बर्थवर अंथरुण घालू लागली. चादर नीट हवी तशी, चुण्याविरहित पसरून झाल्यावर आजोबा आजींना म्हणाले, 'हं, झोप आता, बर्थ रेडी केलाय मी तुझा'. पलीकडे आजी तेच काम आजोबांसाठी करत होत्या! मला ते सहजीवन फार गोड आणि हृद्य वाटलं. म्हातारपणी त्यांचे हात पाय थकले होते पण मन मात्र अजून टवटवीत होतं.
आपल्या संस्कृतीत वार्धक्याला नेहमीच मान दिला गेलाय. माझ्या लहानपणी गोव्यातल्या आमच्या गावातली जी माझ्या आजोबांची पिढी होती ती म्हातारपणी देखील स्वतःचा आब राखून होती. केविलवाणं, गलितगात्र, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेलं वार्धक्य मी फार कमी पाहिलं. लोक त्यांचं वय मानाने मिरवीत, त्यात लपविण्यासारखं, अपराधी वाटून घेण्यासारखं त्यांना काही वाटत नसे. घरातही त्यांचं स्थान आदराचं असे, आणि मुख्य म्हणजे त्या पिढीच्या शब्दाला गावात किंमत होती. रस्त्यात टिवल्याबावल्या करत उभं राहिलेल्या गावातल्या कुठल्याही तरुण माणसाला गावातल्या वृद्धांचा नाही म्हटलं तरी धाक वाटायचा. एखाद्या व्यक्तीच्या अपरोक्ष क्वचित कधी कुणाच्या वयाची खिल्ली उडवली गेली जात असे पण तोंडावर कुणा म्हाताऱ्या माणसाचा अपमान करायला कुणी सहसा फारसं धजावत नसे. अर्थात तेव्हा म्हातारी माणसंही स्वतःचं वार्धक्य एखाद्या किताबासारखं मिरवायची. सतत तरुण दिसण्याची केविलवाणी धडपड फारसं कुणी करत नसे. आजकल चित्र बदलतंय. हल्लीच माझ्या एका मैत्रिणीची काकू मला सांगत होती, तिने म्हणे काहीतरी खाऊन रस्त्यात वेष्टन टाकणाऱ्या एका तरुण मुलाला त्यावरून हटकलं, तर त्याने दिलगिरी तर व्यक्त केली नाहीच पण तो बरोबर असलेल्या त्याच्या मैत्रिणीला हेटाळणीच्या स्वरात म्हणाला, 'ये मेनॉपॉजल आंटी लोग को आखिर प्रॉब्लेम क्या होती है यार?' त्या काकूंना ते खूप लागलं होतं. एकदम दुखावलेल्या स्वरात त्यांनी मला विचारलं, 'असा कसा उद्धटपणे बोलला ग तो, त्याच्या आईला नसेल का झाला मेनॉपॉज'?
कवी बा. भ. बोरकरांनी आपल्या एका लेखात म्हटले आहे की आपल्या मुलांवर प्रेम करणे ही प्राणीमात्रात आढळणारी एक नैसर्गिक उर्मी आहे, अर्थात माणसांमध्येही ती दिसते. त्यात अनोखे असे काहीच नाही, पण आपले आई-वडील आणि अन्य वडीलधारे यांचा मान ठेवणे आणि तत्परतेने त्यांची सेवा करणे अंगवळणी पडायला संस्कारिता लागते, कृतज्ञता बुद्धीचा भरपूर विकास व्हावा लागतो. खरेच आहे ते. पौर्वात्य संस्कृतीमधून नेहमीच वार्धक्याचा आदर केलेला आहे, किंबहुना कोकणात म्हातारा ह्या शब्दाला 'जाणटॉ' म्हणजे जाणता हा शब्द आहे. अनुभवांचे ऊन-पावसाळे सोसून जो शहाणा झालेला आहे, जाणता झालेला आहे तो असा माणूस. म्हातारा-म्हातारी हे शब्द देखील बहुधा महा-थेर आणि महा-थेरी ह्या शब्दांपासून आलेले असावेत. थेर म्हणजे पाली भाषेत जाणता माणूस आणि थेरी म्हणजे वृद्ध स्त्री. किंबहुना मराठी भाषेत म्हाताऱ्या माणसांसाठी उपहासाने वापरण्यात येणारे शब्द म्हणजे थेरडा आणि थेरडी हेदेखील ह्याच शब्दांपासून आलेले आहेत असं मी कुठे तरी वाचलंय.
आजकाल अर्थातच परिस्थिती बदललेली आहे. पूर्वी कुटुंबे एकत्र असायची त्याच वृद्धांना स्वतःचं असं एक स्थान असायचं. पण हल्ली बदललेल्या समाजजीवनामुळे बऱ्याच वृद्धांना म्हातारपणी एकेकटं राहावं लागतंय. पैसे आहे, आरोग्य आहे, पण वेळ खायला उठतोय ही बऱ्याच शहरी, संपन्न वृद्धांची परिस्थिती आहे. मुलं नोकरीमुळे, शिक्षणामुळे परदेशी राहण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळेच रिटायरमेंट लिविंग वगैरे सारख्या कल्पना आपल्याकडेही उदयाला आलेल्या आहेत. समवयस्क लोकांबरोबर एकत्र राहणं, पण ते देखील वृद्धाश्रमात राहिल्यासारखं केविलवाणेपणाने नाही तर स्वतःचा आब राखून, स्वतंत्रपणे सर्व सुखसोयींनी युक्त अश्या घरकुलात राहणं बरेच लोक प्रिफर करत आहेत. अर्थात जोडीदार बरोबर असेपर्यंत असं एकटं, स्वतंत्र जगणं खूप छान वाटू शकतं, पण कधी ना कधीतरी दोघांमधला एक पुढे जातो आणि मग मागे रहाणाऱ्या व्यक्तीला बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेताना खूप त्रास होतो.
गेल्या वर्षी मी नटसम्राट बघायला गेले होते थियेटरमध्ये. मधला दिवस होता आणि त्यात सकाळचा शो, त्यामुळे गर्दी बेताचीच होती, पण जो प्रेक्षक वर्ग बघायला आला होता त्यातली जवळ-जवळ ऐंशी टक्के डोकी पांढरी होती. चित्रपट सुरु झाला आणि थोड्या वेळाने एक वृद्ध जोडपं आत आलं. सिनेमागृहातल्या त्या थंड अंधारात दोघेही चाचपडत येत होते, आजोबांच्या हातात काठी होती आणि आजी त्यांचा हात धरून त्यांना सांभाळून चालवत होत्या, पण त्यांनाही पायऱ्यांचे अंदाज येत नव्हते. माझी सीट दरवाजाच्या बाजूलाच होती म्हणून मी पुढे होऊन आजींचा हात धरला. त्यांचीही आसने माझ्या रांगेतच होती. इंटरव्हल मध्ये त्या आजींनी आजोबांना अतिशय स्निग्ध स्वरात विचारलं, 'बाहेर जाऊ का? तुम्हाला टॉयलेटला जायचंय का?', आजोबांनी नाही म्हटलं आणि त्यांनी आजींना विचारलं, 'औषध घ्यायचंय ना? खायला काही आणू का तुझ्यासाठी बाहेर जाऊन?' मला खूप हृद्य वाटलं ते नातं. पडद्यावरची मेधा मांजरेकरांची कावेरी आणि नाना पाटेकरांचे बेलवलकर एकमेकांना आधार देत होते आणि पडद्याखाली माझ्या रांगेतली कावेरी आणि तिचे गणपतराव! पडद्यावरची कावेरी गेली तेव्हा आजींनी माझ्याकडे तोंड करून डोळ्यांच्या कोपऱ्यातलं पाणी हलकेच निपटून टाकलं. आजोबा मात्र कोरड्या डोळ्यांनी बेलवलकरांचा पडद्यावरचा आकांत बघत होते, फक्त हातातल्या काठीवरची पकड मात्र अधिकच घट्ट झाली होती. माझ्या मनात आलं, ह्या जोडप्यातल्या कुणा तरी एकाला पुढे कधीतरी काही काळ एकटं राहावं लागेलच, ती वर्षं किती कठीण असतील मागे राहणाऱ्यासाठी?
माझ्या सासूबाई, आई आणि आजेसासूबाई अश्या तिघींच्याही वाट्याला हा एकटेपणाचा भोग आलाय, सासूबाई तर पन्नाशीच्या पण नव्हत्या सासरे गेले तेव्हा, पण तिघींनीही हे एकटेपणाचं आव्हान नुसतं सुजाणपणे स्वीकारलेलंच नाहीये तर खंबीरपणे पेलून त्यातही आनंद शोधलाय. आईने वयाच्या ७२ वर्षी योगाभ्यास सुरु केला. आज तिने पंच्याहत्तरी ओलांडली आहे तरीही ती सलग पन्नास सूर्यनमस्कार घालू शकते. सासूबाईनी स्वतःला संगीताला वाहून घेतलंय. त्या संगीत शिकवतात, शिकतात, त्यांच्या सिनियर सिटीझन क्लबमध्ये चक्क कराओकेवर गाणी गातात. शास्त्रीय संगीताची बैठक असूनदेखील त्या आधुनिक सिनेसंगीताला कमी लेखत नाहीत. त्या म्हणतात की सतत नवीन शिकत राहिल्यामुळे त्यांचं मन सदैव ताजंतवानं राहतं. माझ्या आजेसासूबाईं तर आता नव्वदीला आलेल्या आहेत, तरी रजनीकांतचा प्रत्येक नवा चित्रपट आवर्जून बघतात. स्वतःचे, मुलीचे आधुनिक फॅशनचे कपडे स्वतः मशीनवर बसून शिवतात, वेगवेगळ्या पाककृती करून बघतात. ब्रेस्ट कॅन्सर सारख्या प्रबळ रोगाशी लढून विजयी झालेल्या आहेत त्या. त्यांचा एकुलता एक मुलगा हाता-तोंडाशी येऊन देवीच्या रोगाने गेला होता. खूप सोसलंय त्यांनी तरीही मी त्यांना कधीच दुर्मुखलेलं, वैतागलेलं बघितलेलं नाही. त्या सदैव प्रसन्नच दिसतात. शिवाय साथीला संगीतासारखा अक्षय्य साथ देणारा जोडीदार आहेच! त्या जेव्हा गायला बसतात तेव्हा त्यांचा सुरकुतलेला चेहेरा एका आंतरिक तेजाने झळाळून आलेला दिसतो. खूप सुंदर आहेत त्या. असं, इतकं देखणं, समंजस वार्धक्य मलाही यावं असं मला मनापासून वाटतं.
आपल्या घराच्या, कुटुंबाच्या छोट्या परिघाबाहेरचा एखादा छंद किंवा अभ्यासाचा विषय असला तर वार्धक्य सुसह्य होतं, सुंदर होतं असं मला दिसून आलंय. माझ्या एका मित्राच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्युनंतर स्वतःला कामात बुडवून घेतलंय. ते म्हाताऱ्या माणसांसाठी फुकट क्लिनिक चालवतात, एकटे प्रवास करतात आणि दररोज नियमाने पळायला जातात. शेवटलाच काय पण आयुष्यातला प्रत्येकच दिस गोड व्हावा असं वाटत असेल तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे, आणि स्वतःहून, स्वतःच्या कुटुंबातून मोठ्या असलेल्या एखाद्या गोष्टीत आनंद शोधणं!
- शेफाली वैद्य