
सुट्ट्या लागल्या! शिबिरं, क्लासेस ह्यापेक्षा अधिक ह्या सुट्टीत मला माझ्या मुलीसाठी काही चांगल्या आठवणी निर्माण करायच्या आहेत. पालक म्हणून ती माझी जबाबदारी आहे. मी आवर्जून अशा ह्या काही गोष्टी तिच्यासाठी करतीये, करणार आहे. तुम्ही ह्यातल्या काय काय करता? चला आपण मिळून उजळणी करूयात.
- खेळ - खाण्यापिण्याच्या वेळा नीट पाळून मुलांना भरपूर खेळू देऊया. दुपारी नका खेळू, पसारा नका करू, एक धड खेळा, बैठा खेळच खेळा अशा कुठल्याच सूचना नकोत. असे मुक्त खेळ किती दुर्मिळ झालेत. ग्राउंडवर आखीव रेखीव, तेच बनवलेले नियम, तसाच आखलेला खेळ खेळतात; तेही स्पर्धेसाठी. एवढं करून किती राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातात? त्यापेक्षा त्यांना सुचेल तसं खेळूद्या, त्यांचे नियम बनवूद्या, नवीन खेळ निर्माण करुद्या. मग स्पर्धेत बक्षीस नाही आणणार कदाचित पण हरणं, जिंकणं, भांडणं, समायोजन ह्याचा उपयोग आयुष्यभरासाठी होईल.
- बैठे खेळ - आपण त्यांच्याबरोबर खेळूया. अगदी मैदानी नाही पण कितीतरी जुन्या नवीन गोष्टी आपण त्यांच्याबरोबर करू शकतो. नाव, गाव, फळ, फुल, फुली गोळा, अद्याक्षरी म्हणजे शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर दुसऱ्या शब्दात शेवटी यायला पाहिजे हे खेळूया. वेगवेगळ्या पद्धतीने पत्ते, कॅरम, व्यापार, हाउजी हे तर आपण खेळतोच पण कधीतरी त्यांच्या स्टाईलने भातुकली, ट्रेजर हंट, दम शेराज, स्लायफॉक्स, डार्क रूम, ऑग वगैरेपण खेळायला हरकत नाही. त्यांच्याचकडून माहिती करून घेऊयात आणि खेळुयात. अगदी पोलीस पोलीस, डॉ. डॉ. शाळा शाळा अशा खेळातून मुलं व्यक्त होत असतात त्याला तोड नाही! काहीच नाही सुचलं तर दार बंद करून एखादं गाणं लावूयात आणि मस्त मुक्त डान्स करूयात. मुलांची एनर्जी आणि आपलं साचलेपण नक्की बाहेर पडेल!
- क्राफ्ट – अक्षरशः शेकडो गोष्टी आहेत ह्यामध्ये करण्यासारख्या. मात्र एक खूप मोठा नियम आहे. कापणं, चिकटवणं ह्याकामी मुलांना खूप मदतीची आवश्यकता असते आणि पालकांना त्यांच्याबरोबर बसून वेळ द्यावा लागतो. आपण मुलांना टी.व्ही. बंद करा सांगतो पण टी.व्ही. बंद करून पुढे काय करा हे सांगत नाही. त्यांच्याबरोबर बसुया, त्याना युट्यूब व्हिडीओ दाखवूया, टाकाऊ गोष्टीतून काही करूया, साबणाचे फुगे, पेपर मॅशेपासून कासवासारखे प्राणी, बोर्नव्हीटा सारख्या डब्यांपासून उपयुक्त बॉक्सेस, पाण्याच्या बाटल्या, पिना ह्यांपासून असंख्य गोष्टी होतात. ओरिगामीवर इंदू टिळक ह्यांची खूप छान पुस्तकं आहेत. अनिल अवचटांचं एक मजेदार ओरिगामी म्हणून पुस्तक आहे. त्यात बघून मुलं त्यांच्या त्यांच्या सुद्धा अनेक गोष्टी करू शकतात. त्यामधले निरनिराळे पंखे आणि भिरभिरी बनवण्यात आणि खेळण्यात मुलांचे २-३ तास आरामात जातात. मिस्टर मेकर, मॅजिक ट्रिक्स, आर्ट अॅटॅक, लाईफ हॅक्स ह्यांचा तर खजिना आहे उपलब्ध.

- रेसिपीज – मुलींना तर आईच्या कामात लुडबुड करायला आवडतेच. पण मुलांनाही थोडी सवय लावता येईल. गॅसशिवाय किंवा फक्त मायक्रोव्हेवमध्ये करता येतील अशा कितीतरी रेसिपीज आहेत. कैरीची डाळ, सलाड्स, बर्फ कुटून गोळे, वेगवेगळे ज्युसेस एकत्र करून मॉकटेल्स, सँडविचेस, बिस्किट्स किंवा ब्रेडची एकावर एक थर रचत वेगवेगळे सॉस घालून फ्रीजमध्ये सेट केलेली पुडिंग्स, कुल्फी स्टँडमध्ये नारळाचं पाणी आणि रंगीबेरंगी फळे घालून सेट केलेली पारदर्शक कुल्फी आणि जरा विचार केला तर अजूनही खूप गोष्टी आपण आठवू शकू.

- शहरदर्शन - महाग ट्रिप्सना, रिसॉर्ट्समध्ये तर मुलांना घेऊन जातोच पण आपल्याच शहरातील, गावातील गोष्टी त्यांना किती दाखवतो? पुण्याचंच उदाहरण घेतलं तर किती मुलांना आपण शिंद्यांची छत्री, आगाखान पॅलेस, राजा केळकर म्युझीअम, चिंचवडचं सायन्स पार्क दाखवलंय? प्रत्येक गावात, शहरात काही ना काही ऐतिहासिक स्थळ नक्कीच असतं. साधे डबे घेऊन जाऊन, फारशी पैशांशिवाय ट्रीप, त्याचीही मजा असते, मुलांबरोबर आपणही ती घ्यायला पाहिजे.

- आकाशदर्शन - मुलांना खूप गोष्टीत स्वारस्य असतं. पुण्यातली ज्योतिर्विद्या परिसंस्था नसरापूर जवळ आकाशदर्शनाची रात्रीची शिबिरं ठरवते. टेलिस्कोपमधून ग्रह दाखवले जातात. राशी, नक्षत्रे ह्यांची माहिती दिली जाते. मुलांचा लाडका नाईट ओव्हर होतो त्यानिमित्ताने. जी गोष्ट एका भल्या मोठ्या लेक्चरने होत नाही ती साध्य होते ती म्हणजे जिज्ञासा, कुतूहल वाढीला लागतं मग ज्ञान तर काय कुठूनही मिळवता येतं. लग्गेच बघा एखादं शिबीर शक्य आहे का. मीही बघते. कदाचित भेटू तिथे. आणि हे जवळ नसेल तर किमान गच्चीवर जाऊन काही नक्षत्र तर बघू शकतो!

- निसर्ग फेरफटका – बागेबरोबरच जवळच्या टेकड्या, तळी, बोटॅनिकल गार्डन्स बघुयात. निसर्ग असलेल्या ठिकाणी, फोटो नकोत, इथून तिथे अशी धावपळ नको. अगदी पुणे विद्यापीठ, पाषाण तलाव, तळजाई टेकडी. मुलांसोबत पानं, बिया गोळा करूयात, त्यांचं वर्गीकरण करूयात, पेरून बघुयात, शाळेतल्या पुस्तकात असलेल्या गोष्टी क्रीपर्स आणि क्लाइम्बर्स मधले फरक समजून घेऊयात, देशी विदेशी झाडं, त्यांचा पानगळतीचा, फुटीचा, बहरण्याचा हंगाम ह्याचं नुसतं निरीक्षण करूयात. कुठे एखादा वेगळा पक्षी दिसतोय का बघुयात. मोराचा आवाज ऐकुयात.

- भूगोल - थोडं शहर गावाच्या बाहेर जाऊन आवर्जून शैक्षणिक सहलीसारखं मुलांना डोंगर, दरी, नाले, ओढे, नद्या, खाड्या, पठारं, बेट, भूशीर, वेगवेगळे दगड, मातीचे रंग ह्याचं भौगोलिक पद्धतीने त्यांच्याबरोबर निरीक्षण करूयात आणि त्याची चर्चा करूयात. व्याख्या पाठ करण्यापेक्षा एकदा बघितलेल्या गोष्टी कायम लक्षात राहतात.
- सरकारी कार्यालये –एखाद्या पोस्ट ऑफिस मध्ये, बँकेत किंवा नगरपालिका कार्यालयात मुलांना घेऊन जाऊयात. पोस्ट कसं काम करतं, बँकेचे व्यवहार कसे होतात, नागपालिकेत किती विभाग असतात, त्यांच्याकडे पैसे कुठून येतात, ते काय काय सेवा पुरवतात, निवडून दिलेले आणि कर्मचारी ह्यात काय फरक असतो अशा कितीतरी गोष्टी त्यांना दाखवत दाखवत आपण बोलू शकतो. नागरिकशास्त्र शिकायचा कंटाळा येण्याऐवजी मला जास्त माहिती आहे असं मुलांना नक्की वाटून जाईल.

- ह्यावर्षी एखादा साखरकारखाना, हातमाग गिरणी, चॉकोलेट कारखाना, चप्पल करणारा कारखाना अशा ठिकाणी भेट दिली तर? नेहमीच शाळेवर का अवलंबून रहायचं?

- एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाला, त्यांच्या प्रकल्पाला भेट देऊन आपणच थोडी अधिक माहिती मिळवली तर मुलं अनुकरण करतात. मुलंच छप्पन्न प्रश्न विचारातील, त्याची आवश्यकता विचारतील, आपण काही मदत करू शकू का हा प्रश्न त्यांच्याच मनात निर्माण होईल. लहान वयात जाणीवा निर्माण करणं आणि जाणीवपूर्वक आयुष्य जगणं हे पालकांशिवाय कोण शिकवणार?
- आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या मावशी किंवा परिचित झालेले पेपरवाले, दुधवाले, भाजीवाले, जवळचे चांभार, लाँड्रीवाले, दुकानदार किंवा एखादा कलाकार ह्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नांची चर्चा करून मग ती घ्यायला सांगून ती लिहायला सांगायची कल्पना कशी वाटते?
- अशा गरजू मुलांसाठी आपल्या मुलांना काय करता येईल बरं? १०० शब्दचिठ्ठ्या करून त्यांना भेट देण्याची कल्पना? घरी पडून असलेल्या विजिटिंग कार्ड्सच्या मागे किंवा त्या आकाराच्या कार्डपेपरवर सोपे वेगवेगळे लाल स्केचपेनने शब्द लिहायचे आणि ते लहान मुलांना वाचून दाखवायला सांगायचे. दोन महिन्यात मुळाक्षरे न शिकलेलं मुलंही १०० शब्द ओळखू शकतो. किंवा अजूनही काही शैक्षणिक खेळ साहित्य करून मुलं देऊ शकतात. मेमरी गेमसाठी, जोड्या लावता येतील अशी चित्र काढून पत्ते? आठवूया!
- नाईटओव्हर – मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर रात्री राहणं ही ह्या मुलांची मज्जेची कल्पना. आपणही समवयस्क बहिण भाऊ नातेवाईकांकडे राहायला जायचोच की! आताशा मुलांना मित्र-मैत्रिणींबरोबर वाटतं. आपल्या घरी बोलावूयात. झोपायचा आग्रह न करता त्यांना धमाल करु द्या. अजिबात डोकावू नका. पिझा, बर्गर, कोक हवं ते देऊ या, गाणी लावून डान्स करू देऊ या. आपल्याला शक्य असेल तर आपणही सामील होऊ या.
- एका नातेवाईक कुटुंबाबरोबर स्नेह वाढवूया. त्यांच्या मुलांना राहायला बोलावूया, आपल्या मुलांना त्यांच्याकडे सोडूया. जवळची नाती कमी होत चालली आहेत. मग ही नाती आपले चुलत, मामे, आत्ये भावंडं आणि त्यांची मुलं असतील. पाहिलं पाउल आपण उचलुया.
- काही क्लासिक, आपल्या लहानपणाचे किंवा राहून गेलेले पिक्चर्स, आवर्जून त्यांच्या सीडी आणून मुलांबरोबर बघूया. लाईफ इज ब्युटीफुल, साउंड ऑफ म्युजिक, लायन किंग, द ब्लू अम्ब्रेला, अंजली, मि. इंडिया, मकडी, पुष्पक, जंगल सफारी, मराठी ऐतिहासिक कितीतरी. बरोबरीने मुलांना परीकथा, काल्पनिक कथा वाचूद्या, वाचून दाखवूया, त्यांचेही पिक्चर्स बघूया.
- आसपासच्या एकट्या राहणाऱ्या आजी आजोबांकडे किंवा वृद्धाश्रमात जाऊन एखादी गोष्ट आपण वाचून दाखवूया. पुढच्या वेळेस त्यांनाच तसं करावसं वाटेल.
- घर आवरणे. त्यांचे कप्पे, वाह्या पुस्तकं, कपडे, त्यांचं वर्गीकरण करून त्यांना जमेल तसं आवरायला लावूयात.
- शाळेतल्या पुस्तकात शेवटी लिहिलेले शाळेत घेत नसलेले शास्त्रीय प्रयोग आपण करून बघू शकतो. झाड लावणे, पाण्याच्या वाफ, बर्फ, पुन्हा पाणी अशा अवस्था बघणे, एका ठराविक वेळेला ठराविक गोष्टीच्या सावलीचं दोन तीन महिने रोज निरीक्षण करणे, त्यावरून सूर्याचा प्रवास बघणे, शून्य सावली आवर्जून निरीक्षण करणे, टॉर्चचा वापर करून ग्रहणे दाखवणे. ह्याखेरीज कोकचं आणि मेंटॉसचं कारंजं, पाण्यात लिक्विड सोप आणि ग्लीटर घालून टोर्नाडो, पाण्यात लिक्विड सोप टाकल्यावर पळणारी मिरी पावडर आणि अजूनही खूप. शोधूयात.
- आपणच आपल्या आवडत्या कलाकाराला, नेत्याला पत्र लिहायला घेऊयात. मुलांनाही आपसूकच त्यांच्या आवडत्या व्यक्तीला लिहावसं वाटेल.
तर ह्या काही निवडक गोष्टी! काही आपण करतोच, काही आवर्जून करूया. चला तर मग मुलांचे लाड करताना महागड्या वस्तू, खेळ, क्लासेस, शिबिरं ह्याहून अधिक काही करूयात, वेळ देऊयात. ह्या सुट्टीत त्यांच्यासाठी मेमरीज क्रीएट करूयात.
- विभावरी बिडवे